विकिपीडिया:२०१००७०२ जिमी वेल्सशी भेट
विकिपीडियाचे संस्थापक, जिमी वेल्स हे लहान विकिपीडियांवरील संपादकांशी बोलून त्यांचे अनुभव ग्डान्स्क येथील विकिमेनिया परिषदेत सादर करणार आहेत. त्या अनुषंगाने त्यांनी मराठी विकिपीडियावरील प्रचालक/संपादक अभय नातू यांना चर्चेसाठी बोलावणे पाठवले आहे. ही भेट जुलै २ रोजी सकाळी ९ वाजता (माउंटन प्रमाणवेळ, GMT+7) कॉलोराडो स्प्रिंग्ज येथे होईल. यावेळी वेल्स यांना मराठी विकिपीडियाच्या वतीने काही सांगायचे असल्यास त्वरित येथे कळवावे.
जिमी वेल्स यांना सांगण्यासारखे काही
[संपादन]- सर्वांच्या आणि माझ्याही शुभेच्छा.माहितगार ०५:११, २ जुलै २०१० (UTC)
- देवनागरी <--> इंग्रजी भाषांतरासाठी एखादे software बनविण्यासाठी आवाहन. वि. नरसीकर (चर्चा) ०७:५२, २ जुलै २०१० (UTC)
- इंग्रजीमधे असलेले ले़ख मराठीतून भाषांतरीत करण्यात यावे.
जिमी वेल्स यांना विचारण्याचे प्रश्न
[संपादन]- त्यांचे येत्या वर्षात भारत भेटीचे काय प्लान्स आहेत ?माहितगार ०५:११, २ जुलै २०१० (UTC)
प्रश्नोत्तरे
[संपादन]ही भेट ठरल्यावेळेनुसार झाली. तपशील थोड्याच वेळात लिहीत आहे. अभय नातू १७:३१, ३ जुलै २०१० (UTC)
अनेक व्यवधानांतून पार पडत तपशील लिहिला आहे. माझ्या नोंदी तसेच स्मरणावर विसंबून हे लिहिलेले आहे. हकीगत थोडीशी इकडची तिकडे झाली असण्याचा संभव आहे.
१. जिमी वेल्स: तुमचे नाव काय? तुमचा विकिपीडियाशी काय संबंध आहे?
- अभय नातू: माझे नाव अभय नातू आहे. मी मराठी विकिपीडियावरील संपादक/प्रचालक/प्रशासक आहे.
२. जिवे:मराठी भाषा कोठे बोलली जाते?
- अना: भारतातील महाराष्ट्र राज्यात ही भाषा मुख्यत्वे बोलली जाते. याशिवाय मॉरिशस, इस्रायेल व इतर काही देशांतही बर्याच प्रमाणात मराठी भाषक आहेत. अमेरिकेत न्यू इंग्लंड, ह्युस्टन/डॅलस तसेच बे एरियात बरेच मराठी बोलणारे आढळतात. कॉलोराडोत, विशेषतः या गावात अगदी हातावर मोजण्याइतके मराठी आहेत.
३. जिवे: तुम्ही मराठी विकिपीडियावर किती दिवस कार्यरत आहात, तुम्ही तेथे कसे पोचलात?
- अना: मला आता नक्की आठवत नाही पण २००४ किंवा २००५पासून मी मराठी विकिपीडियावर काम करीत आहे. सुरुवातीस इंग्लिश विकिपीडिया चाळत असताना एका लेखात मराठी आंतरविकि दुवा दिसला. कुतुहलाने टिचकी दिली असता मराठी विकिपीडियावर पोचलो. असे काही आहे हे पाहून आश्चर्य वाटले व आनंद ही झाला. तेथे खुडबुड करून मराठी/देवनागरी वाचण्या/लिहिण्याची सोय करून घेतली व एका लेखाचे सहजच संपादल केले. त्यानंतर तेथील मंडळींना प्रश्न विचारुन व त्यांनी देऊ केलेली मदत घेउन हळूहळू माझी संपादनक्षमता वाढवली. त्यानंतर त्याचे व्यसनच लागल्यासारखे झाले.
४. जिवे: तेथील काम कसे चालले आहे? किती सदस्य कार्यरत आहेत?
- अना: काम बरे चालू आहे. अधिक काम होऊ शकते पण सदस्यसंख्या, विशेषतः काम करणार्या सदस्यांची संख्या कमी असल्यामुळे अडचणी उद्भवतात. साधारण ८-१० सदस्य गेली अनेक वर्षे कार्यरत आहेत. शिवाय वेळोवेळी संपादकांच्या लाटा येतात. बरेचदा हे एखाद्या प्रकाशनात, ब्लॉगमध्ये किंवा इमेलवरुन कळल्यामुळे ही मंडळी येथे येते. कधीकधी ते एखाद्या विशिष्ट विषयावर काम करतात तर कधी नाही. काही दिवस, आठवडे महिने काम केल्यावर अचानक ही मंडळी गुप्तही होते. सहसा एकावेळी २०-२२ सदस्य संपादन करीत असतात. येथे कायमचा ठिय्या दिलेली मंडळी संपादनाबरोबरच गस्त घालणे, घाण काढणे/उत्पात उलटवणे, अलिखित व लिखित नियम तयार करणे, इ. कामेही करते.
५. जिवे: हे सदस्य मराठीभाषकच आहेत कि इतरभाषीयही आहेत? काही आफ्रिकन भाषांतील विकिपीडियावर मूळ भाषा बोलणारे कमी असतात पण इतर भाषेतील सदस्यांनी ते विकिपीडिया दत्तक घेतल्यासारखे करून ते वाढवले आहेत. मराठीचे असेच आहे का?
- अना: दोन्ही. जास्तकरुन मराठी भाषक संपादक आहेत. इतरभाषिक सदस्यही भरघोस योगदान करतात. पण दत्तक वगैरे जाण्याची वेळ अजून तरी मराठी विकिपीडियावर आलेली नाही.
६. जिवे: मराठी विकिपीडियाची लेखसंख्या किती आहे?
- अना: आम्ही मागच्याच आठवड्यात ३०,००० लेखसंख्या पार केली. अजून बराच पल्ला गाठायचा आहे.
७. जिवे:तुमच्या ऑफलाइन भेटी होतात का? त्या कशा ठरवता? इतर ऑफलाइन संवाद आहे का?
- अना:होय, वर्षातून ३-४वेळा तरी ४-५ तरी सदस्य एकमेकांस भेटण्याचा प्रयत्न करतात. अजून या भेटींना ठराविक साचा आलेला नाही पण आशा आहे की येईल. ऑफलाइन संवाद साधण्यासाठी याहू ग्रूप निर्माण केला आहे तसेच गूगलवर एसएमएस चॅनलही तयार केला आहे. या भेटी विकिपीडियाशिवाय यातूनही ठरवल्या जातात.
८. जिवे:तुम्ही या भेटीत भाग घेतला आहे का?
- अना:अलीकडे नाही. ३-४ वर्षांपूर्वी भारतात गेले असता आवर्जून २-३ अशा भेटी घडवून आणल्या होत्या पण त्यानंतर मी खुद्द या भेटी घेऊ शकलेलो नाही.
९. जिवे: नवीन संपादकांकडून तुम्हाला कोणत्या प्रकारचा फीडबॅक मिळतो?
- अना:सहसा तीन-चार प्रकारचा फीडबॅक दिसतो - १. वा! अतिसुंदर. हे अगदी महत्त्वाचे काम आहे. २. हे काय? इंग्लिशमध्ये माहिती असताना येते कशाला? ३. तुम्हा लोकांना उद्योग नाहीत. ४. इत्यादी.
१०. जिवे: मग इंग्लिशमध्ये माहिती असताना मराठी वाचक येथे येउन ही माहिती वाचेल असे तुम्हाला का वाटते?
- अना:मराठी भाषेच्या सुदैवाने किंवा दुर्दैवाने मराठीभाषकांची मोठी टक्केवारी इंग्लिश किंवा इतर भाषेत पारंगत नसली तरी तोंडओळख ठेउन आहे. त्यातील काही भाग इंग्लिश व इतर भाषाप्रवीण असतात. माझ्या मते या लोकांसाठी आम्ही हा खटाटोप करीत नाहीच. आम्हाला विकिपीडियावरील व जगातीलही ज्ञानाचे भांडार अशा मराठीभाषकांसमोर ठेवायचे आहे ज्यांना संगणकाची व पर्यायाने इंग्लिशची तोंडओळख आहे पण ते इंग्लिश किंवा इतर भाषेत पारंगत नाहीत. उदा. एखाद्याला इंग्लिशमध्ये क्रिकेटचे वर्णन कळेते पण रँकाइन चक्राबद्दल, जो लेख या आठवड्यातील आमचा उदयोन्मुख लेख आहे (येथे दोन मिनिटे उदयोन्मुख लेख या संकल्पनेबद्दल साइडबार), इंग्लिशमध्ये वाचून फारसा अर्थबोध होत नाही, त्याला हा व असेच अनेक लेख वाचायला मिळून ती माहिती कळावी. दुसरे म्हणजे हँडहेल्ड, मोबाइल उपकरणे, जसे स्मार्टफोन, आय-पॉड, ब्लॅकबेरी, यांवरील माहिती अगदी खेड्यातील व्यक्तीही वाचू शकेल कारण खेड्यात ३जी किंवा ४जी मोबाइल सेवा मिळू शकेल पण संगणकांचा अभावच असतो. अशा ठिकाणी मराठीतील माहिती अत्युपयोगी ठरेल.
११. जिवे: मराठी विकिपीडियावर वाद होतात? कशावरुन वाद होतात? ते कसे हाताळले जातात? त्यांची परिणती काय होते?
- अना:अगदी घड्याळाच्या काट्याबरहुकूम (like clockwork) वाद उफाळून येतात. आत्तापर्यंत माझ्या अनुभवात दोन मोठे विषय आहेत. १. इतिहास - घडलेली घटना ही दोन व्यक्ती आपआपल्या चष्म्यातून पहात असतात व तसेच घडले हे त्यांनी गृहित धरलेले असते. २. विकिपीडियावर अमकेतमके धोरण का आहे आणि हे ठरवणारे तुम्ही कोण? पैकी पहिल्या प्रकारचे वाद संदर्भ/पुरावे मागितल्यावर मिटतात. कधीकधी एखादा सदस्य पुरावे देऊ न शकल्याने इतर सदस्यांना व बरेचदा विकिपीडियालाही शिव्याशाप देऊन पसार होतो तर बरेचदा समेटही होतो. दुसर्या प्रकारात प्रचालक मंडळी असलेली धोरणे समजवण्याचा प्रयत्न करतात व योग्य तेथे धोरणांत बदलही करतात. जेथे करता येत नाहीत तेथे नकार देतात. अशावेळी पुन्ही शिव्याशापही ऐकतात.
१२. जिवे:(हसत) शिव्याशाप ही फक्त मराठी विकिपीडियावरीलच गंमत नाही...मला वाटते हे मानवी स्वभावाचेच लक्षण आहे. असो. नवीन संपादकांना तसेच मराठी विकिपीडियासमोर कोणत्या मोठ्या समस्या आहेत?
- अना:दोन प्रकारच्या आहेत. पैकी एक मी मघाशी म्हणल्याप्रमाणे मराठीभाषकांचा इंग्लिशशी सहवास. बरेचदा इंग्लिश विकिपीडियावरील माहिती पाहून अनेक वाचक मराठी विकिपीडियाचा नाद सोडून इंग्लिश विकिपीडियावर योगदान करतात. दुसरी मोठी समस्या ही तांत्रिकी आहे. सध्या उपलब्ध असलेल्या संगणकांत देवनागरी, खरे म्हणजे कोणतीच अ-रोमन, लिपी बुद्ध्याच नसते. देवनागरी लिहिण्या-वाचण्यासाठी अनेक खटाटोप करावे लागतात, मग ते लिनक्स असो, विंडोझ किंवा ऍपलच्या प्रणाली. कारण डेलसारख्या संगणक-उत्पादकाला देवनागरी घालणे किंवा उपलब्ध करून देणे महत्त्वाचे वाटत नाही (not worth their while), तसेच मायक्रोसॉफ्ट किंवा ऍपलला देवनागरी वाचक/लेखकाचे फारसे महत्त्व नाही. असे असता मग माझ्यासारख्याला ही माहिती अनेक ठिकाणांहून गोळा करून देवनागरी फाँट इ बसवावे लागतात. यासाठी मराठी विकिपीडियावर फोनेटिक टायपिंग घातलेले आहे (येथे ४-५ मिनिटे साइडबार) ही माहिती पब्लिक डोमेनमध्ये आहे पण त्याचे प्रमाणीकरण झालेले नाही तसेच ही सगळी माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध नाही. ही माहिती गोळा करताकरता नाकीनऊ येतात. यामुळे अनेक होतकरू संपादक खड्ड्यात गेला मराठी विकिपीडिया असे म्हणून इंग्लिश विकिपीडियाकडे मोर्चा फिरवतात. जर देवनागरी (तसेच इतर अ-रोमन) लिप्या वापरण्यासाठीची माहीती व साधने (resources) प्रमाणित झाली तसेच मुक्तपणे व सहजपणे उपलब्ध झाली तर मराठी विकिपीडियासमोरील सगळ्यात मोठी तांत्रिक समस्या नाहीशी होईल.
१३. जिवे: मी ही बाब पूर्णपणे समजू शकतो आणि मला याबद्दल काही करावेसेही वाटते. मी एक-दोन महिन्यांत बिल गेट्सशी भेटणार आहे. त्यावेळी मी या चित्रफीतीतील हा भाग (snippet) त्यांना नक्की दाखवेन...
- अना:(आश्चर्यचकित) **ते** बिल गेट्स? (**That** Bill Gates?)
१४. जिवे: (हसत) हो, **ते** बिल गेट्स. मान्य आहे कि बिल आता मायक्रोसॉफ्टमध्ये कामाला नाही. पण मला वाटते त्यांच्या शब्दाला तेथे थोडेसे तरी वजन अजूनही आहे....
- अना:(हसत) होय खरेच...थोडसे तरी असावे.
१५. जिवे: इतर मोठ्या भाषांतील विकिपीडिया तुम्हाला काय मदत करू शकतात?
- अना: साच्यांचे प्रमाणीकरण, वर्गवारीमागील धोरणे, इ.ची माहिती मराठी विकिपीडियाला पुरवल्यास माहितीचे प्रमाणीकरण तसेच गती वाढेल. तसेच प्रचालकांसाठीची लिखित/अलिखित धोरणे मिळाल्यास बरे होईल. बॉट्सचे source code मिळाल्यास आंतरविकी सांगकाम्याशिवाय शुद्धलेखन, वर्गवारी, इ.साठीही सांगकामे तयार करता येतील
१६. जिवे: तुमच्या विकिपीडियावरील ४-५वर्षांत अनेक गमतीशीर किस्से घडले असणार अशांपैकी काही उदाहरण द्याल?
- अना:नावे उघड न करता सांगतो - मराठी विकिपीडियावर मानवी शरीर वर्गात प्रजननांगांबद्दल लेख आहे. त्यात कोणीतरी विषयाशी संबंधित अशी कॉमन्सवरील चित्रे उद्धृत केली. तर एक सदस्यांनी त्यावर कडाडून हल्ला चढवीत ही अश्लील माहिती व चित्रे चढवण्याबद्दल मला व्यक्तिशः जबाबदार धरले व ही माहिती येथे असल्याबद्दल मी प्रचालकपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली. यावर काय उत्तर द्यावे हे मला काही काळ सुचलेच नाही....
- अगदी हिरीरीने मुद्दा मांडणार्या एका गृहस्थांना संदर्भ मागितला असता त्यांनी मला समक्ष येउन भेटायला व विकिपीडियावर असलेल्या माहितीबद्दल जाब देण्यास फर्मावले. मी नकार देताच त्यांनी मला मोबाइलवर फोन करण्यास सांगितले. मी त्यासही नकार दिला व परत एकदा संदर्भ देण्याची विनंती केली. तेव्हा त्यांनी मला सुनावले की त्यांच्याकडील संदर्भ व पुरावे अतिगोपनीय आहेत...इतके गोपनीय की त्यांना ते उघड करताच येत नाहीत!! हे ऐकल्यावर मी त्यांचा नादच सोडला.
१७. जिवे: तुम्ही दिलेली ही माहिती अगदी मोलाची आहे. इतर छोट्या विकिपीडियांबद्दलची ही माहिती मी गोळा करीत आहे व शक्य झाल्यास पोलंडमधील विकिमेनिया कॉन्फरन्समध्ये यातील काही भाग मी दाखवेन. तुम्हाला काही प्रश्न आहेत?
- अना: सर्वप्रथम, आमच्या समस्त संपादकगणाकडून तुम्हाला शुभेच्छा (माहितगार) तसेच देवनागरी लिपीबद्दल (नरसीकर) पुढाकार घेण्याचे आश्वासन दिल्याबद्दल आभार. तुमचे भारतभेटीचे काय प्लान्स आहेत? (माहितगार) तुम्ही तेथे असताना शक्य झाल्यास मराठी विकिपीडियावरील गँगला तुम्हाला भेटायला आवडेल.
१८. जिवे:मी ऑक्टोबरमध्ये भारतात जाणार आहे. ३० ऑक्टोबरला मी मुंबईत असेन. माझा कार्यक्रम नक्की झाला की मी माझ्या मदतनीसाकरवी तुम्हाला तो कळवेनच.
- अना: धन्यवाद.
इत्यादी, इत्यादी