लिनक्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लिनक्स
Tux.svg
विकासाची स्थिती सद्य
प्रणालीलेखनाची भाषा असेंब्ली भाषा, सी
प्लॅटफॉर्म आयए-३२, एमआयपीएस, एक्स८६-६४, स्पार्क, डीईसी अल्फा, इटॅनियम, पॉवरपीसी
संचिकेचे आकारमान अंदाजे ७२.२ मेबा ( मेगा बाइट )
भाषा अनेक
सॉफ्टवेअरचा प्रकार केर्नल / गाभा
परवाना ग्‍नू जीपीएल
संकेतस्थळ केर्नल.ऑर्ग

लिनक्स (इंग्लिश: Linux) हा एक युनिक्सशी साधर्म्य असणाऱ्या ऑपरेटिंग सिस्टिम (संचालन प्रणाली)चा गाभा (इंग्लिश: Kernel) आहे. लिनक्स ही मुक्त सॉफ्टवेअर आणि मुक्तस्रोत विकासाचे प्रसिद्ध उदाहरण आहे.

लिनक्स हे नाव मूलत: लिनक्स 'गाभ्या'ला दिले गेले होते, परंतु सध्या या गाभ्याभोवती तयार झालेली लिनक्स वितरणेही 'लिनक्स' नावाने ओळखली जातात. 'लिनक्स' हे नाव लिनक्स गाभ्याच्या मूळ निर्मात्या 'लिनस टोरवाल्ड्स'च्या नावावरून ठेवले गेले. लिनक्स वितरणांतील गाभ्याव्यतिरिक्त इतर बरिचशी पायाभूत सॉफ्टवेअर्स, उदा. सिस्टिम, युटिलिटी सॉफ्टवेअर, ही ग्‍नू प्रकल्पाने विकसित केली आहेत. त्यामुळे लिनक्सला दुसरे (काही जणांच्या मते अधिक योग्य) नाव ग्‍नू/लिनक्स हे आहे. (खालील लिनक्स' आणि 'ग्‍नू/लिनक्स' नामकरणाचा वाद' विभाग पहा)

लिनक्स सुरुवातीला इंटेल-३८६ मायक्रोप्रोसेसरवर आधारित व्यक्तिगत संगणकांसाठी लिहिली होती. पण सध्या ती विविध प्रकारच्या व्यक्तिगत संगणक, महासंगणक, तसेच 'एंबेडेड' स्वरूपात इलेक्ट्रॉनिक उपकरणे (उदा. मोबाइल फोन) इत्यादी. मध्ये वापरली जाते.गूगल कंपनीची 'अँड्रॉइड' मोबाईल फोन प्रणाली ही लिनक्सवर बांधणी केली गेलेली आहे. (प्रत्येक अँड्रॉइड फोन लिनक्सवर चालतो). सुरुवातीला फक्त उत्साही लोकांनी विकसित केलेल्या लिनक्सला आता माहिती तंत्रज्ञान उद्योगातील अनेक कंपन्या - उदा. आय.बी.एम. , एचपी, अधिक विकसित करीत आहेत. सेवा संगणक क्षेत्रात लिनक्सने मोठा हिस्सा विंडोज आणि युनिक्स यांच्यावर मात करून मिळवला आहे. अनेक विश्लेषक लिनक्सच्या यशाचे श्रेय तिच्या स्वस्तपणा, विक्रेत्यापासून मुक्तता आणि सुरक्षितता या गुणांना देतात.

इतिहास[संपादन]

लिनक्स गाभा प्रथम फिनलंडच्या लिनस टोरवाल्ड्स या विद्यार्थ्याने लिहिला. त्याच्याकडे सुरुवातीला अँड्रु टॅनेनबॉम यांनी लिहिलेली मिनिक्स कार्यप्रणाली होती. पण टॅनेनबॉम ती वाढवू इच्छित नव्हते. म्हणून लिनसने त्याला पर्यायी लिनक्स प्रणाली विकसित केली.

ज्यावेळी लिनक्सची प्रथम आवृत्ती लिनसने प्रसिद्ध केली त्यावेळी ग्‍नू प्रकल्प बऱ्याच प्रमाणात विकसित झाला होता. संगणक प्रणालीमध्ये लागणाऱ्या सर्व महत्त्वाच्या भागांपैकी केवळ गाभ्याच्या भागाचे काम पूर्ण व्हायचे होते. लिनक्स गाभ्याच्या प्रोग्रॅमने ही महत्त्वाची गरज पूर्ण केली. त्यामुळे लिनक्स लगेचच नवीन ग्‍नू संगणक प्रणालीचा गाभा म्हणून वापरण्यात आली. लिनक्स ही नंतर ग्‍नू सार्वजनिक परवान्याच्याखाली आणण्यात आली.

टक्स पेंग्विन लिनक्सचे प्रतीक आहे.

नावाचा उच्चार[संपादन]

स्वतः लिनस टोरवाल्ड्सच्या म्हणण्याप्रमाणे [१][२] 'लिनक्स' हा उच्चार योग्य आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये 'लिनक्स' हा उच्चार प्रचलित आहे. मात्र, बऱ्याच वेळा (विशेषतः भारतात) 'लायनक्स' हा उच्चार केला जातो.

'लिनक्स' आणि 'ग्‍नू/लिनक्स' नावांचा वाद[संपादन]

'ग्‍नू' प्रकल्प आणि 'मुक्त सॉफ्टवेअर' चळवळीची प्रणेती 'फ्री सॉफ्टवेअर फाउंडेशन' ह्या संस्थेच्या म्हणण्यानुसार पूर्ण संगणकप्रणालीसाठी 'लिनक्स' पेक्षा 'ग्‍नू/लिनक्स' (इंग्लिश: GNU/Linux) हे नाव अधिक योग्य आहे. फ्री सॉफ्टवेअर फाउंडेशनच्या म्हणण्यानुसार, लिनक्स हा संपूर्ण संगणकप्रणालीतील केवळ एक छोटासा भाग आहे व ग्‍मू प्रकल्पाचा आवाका त्यापेक्षा बराच मोठा आहे. अशा प्रकारे कार्याच्या तौलनिकदृष्ट्या संपूर्ण संगणकप्रणालीस 'ग्‍नू/लिनक्स' नाव दिल्याने ग्‍नू प्रकल्पाच्या कामाची वाजवी दखल घेतली जाते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ग्‍नू नावाचा उल्लेख केल्याने लोकांमध्ये मुक्त सॉफ्टवेअर संकल्पनेची जागरूकता वाढते.

काही लोक हा फ्री सॉफ्टवआर फाउंडेशनचा हेकेवाद आहे व मुक्त सॉफ्टवेअरपेक्षा 'मुक्तस्रोत' (इंग्लिश: Open Source) हे नाव अधिक लोकप्रिय व गोंधळ टाळणारे आहे असा युक्तिवाद करतात.

इ.स. २०११च्या सुरवातीस लिनक्सग्‍नू/लिनक्स ही दोनही नावे प्रचलित होती. सॉफ्टवेअर प्रोग्रॅमर्समध्ये ग्‍नू/लिनक्स हे नाव अधिक लोकप्रिय आहे. सर्वसाधारण माध्यमांमध्ये (वर्तमानपत्रे, टेलिव्हिजन) लिनक्स हे नाव जास्त वापरले जाते. लोकप्रिय लिनक्स वितरणांपैकी डेबिअन वितरण हे आपल्या नावामध्ये ग्‍नू/लिनक्स नाव वापरते. इतर अनेक वितरणे त्यांच्या नावामध्ये केवळ लिनक्स वापरतात.

वितरणे[संपादन]

लिनक्स वितरण हे लिनक्स गाभा आणि त्याच्या भोवती काम करत असलेल्या इतर प्रणालींपासून बनते. बरेच लोक, समूह आणि संस्था स्वतःची लिनक्स वितरणे बाजारात आणतात. लिनक्स वापरत असलेल्या 'ग्‍नू'(GPL)साठी दिलेल्या मुक्त परवानग्यांमुळे कोणीही स्वतःचे वितरण खुलेपणाने बनवून विनामूल्य वितरित करू शकतो किंवा विकू शकतो. काही प्रसिद्ध वितरणे डेबिअन, रेड हॅट, उबुंटू, मँड्रिवा, बॉस ऑपरेटिंग सिस्टिम इत्यादी आहेत.

विकासासाठी कष्ट[संपादन]

'मोर दॅन अ गिगाबक: एस्टिमेटिंग ग्‍नू/लिनक्सेस साइझ' या लेखामध्ये रेडहॅट लिनक्स ७.१ या वितरणाच्या अभ्यासात असे दिसून आले की या वितरणामध्ये ३ कोटी ओळींचा स्रोत आहे. हे वितरण जर व्यावसायिक पद्धतीने तयार केले असते तर अमेरिकेत १०८ कोटी डॉलरइतका खर्च आला असता.

...यातील बराच स्रोत (७१%) सी भाषेमध्ये असून सी++, लिस्प, पर्ल, फोर्ट्रान, पायथॉन इत्यादी गणकभाषाही त्यात वापरल्या आहेत. यातील अर्ध्याहून जास्त ओळी ग्‍नू परवान्याखाली आहेत. लिनक्स गाभ्यामध्ये २४ लाख ओळींचा स्रोत आहे. हा संपूर्ण वितरणाच्या केवळ ८ टक्के आहे.
मोर दॅन अ गिगाबक: एस्टिमेटिंग ग्‍नू/लिनक्सेस साइझ


नंतरच्या एका अभ्यासात ('काउंटिंग पटेटोज: द साइझ ऑफ डेबियन २.२') डेबिअन २.२ या वितरणाच्या विश्लेषणात असे कळाले की त्यात ५.५ कोटी ओळींचा स्रोत आहे आणि हे वितरण जर व्यावसायिक पद्धतीने तयार केले असते तर अमेरिकेत १९० कोटी डॉलर इतका खर्च आला असता.

लिनक्सवरील प्रणाली[संपादन]

पूर्वी लिनक्स वापरण्यासाठी आणि तिचे स्थापन करण्यासाठी संगणकाचे सखोल ज्ञान लागत होते. परंतु प्रणालीतल्या अंतर्भागातील सहज पोहोचीमुळे बरेच तंत्रदृष्ट्या ज्ञानी लोक लिनक्सकडे आकर्षित झाले. अलीकडील काळात वाढलेली वापर-सुलभता आणि वितरणांचा मोठ्या प्रमाणात झालेला स्वीकार यामुळे इतर क्षेत्रांतील लोकही लिनक्स वापरत आहेत.

सेवा संगणक क्षेत्रात लिनक्स, अपॅची वेब सर्व्हर, 'मायएसक्यूएल' डेटाबेस व पीएचपी/पर्ल/पायथॉन स्क्रिप्टिंग भाषा ) या सॉफ्टवेअरांचा संच एलएएमपी (इंग्लिश: LAMP) या लघुनामाने प्रसिद्ध आहे.

महत्त्वाचे फायदे[संपादन]


Unbalanced scales.svg
या लेख/विभागाच्या नि:पक्षपातीपणाबद्दल वाद आहे.
कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहा.


लिनक्स वापरण्याचे अनेक फायदे आहेत.

  1. ग्‍नू/लिनक्स हे पूर्णपणे मुक्त सॉफ्टवेअर आहे. त्यामुळे त्यात मुक्त सॉफ्टवेअरचे सर्व अंगभूत फायदे मिळतात. (उदा. बदल करण्याचे, पुनःप्रसारण करण्याचे स्वातंत्र्य वगैरे).
  2. अनेक लिनक्स वितरणे ही विनामूल्य अथवा अतिशय माफक किंमतीला उपलब्ध आहेत.
  3. बहुतेक वितरणांबरोबर अनेक प्रकारची उपयोगी सॉफ्टवेअर्स विनामूल्य दिली जातात.
  4. कार्यक्षमतेचा स्तर, सुरक्षितता ह्या बाबींत लिनक्स इतर संगणक प्रणाल्यांपेक्षा (उदा. मायक्रोसॉफ्ट विंडोजपेक्षा) अधिक प्रगत आहे.[ संदर्भ हवा ]
  5. लिनक्स हे वापरण्यासाठी एकदम सोपे आहे.
  6. लिनक्स अतिशय सक्षम आहे!

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: