वऱ्हाडी भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(वर्‍हाडी बोलीभाषा या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
Wiktionary-logo-mr.png
Look up वऱ्हाडी भाषा in
Wiktionary, the free marathi dictionary.
वऱ्हाडी भाषा ह्या बोलीभाषेची शब्दसूची
विक्शनरी, या मुक्त शब्दकोशात पाहा/तपासा/अद्याप नसलेले शब्द/वाक्यांश जोडा अथवा सूची:मराठी बोलीभाषातील शब्द येथे मराठी बोलीभाषांची सामायिक शब्दसूची पहा
Disambig-dark.svg

वऱ्हाडी: जगातील बहुतेक प्रमुख भाषांप्रमाणेच, मराठी भाषाही एकाहून अधिक पद्धतींनी बोलली जाते. मुख्य भाषेशी नाते कायम ठेवलेली, तिची बोलीभाषा दर १२ कोसांगणिक उच्चारांत, शब्दसंग्रहांत, आघातांत व वाक्प्रचारांत बदलत रहाते. असे असले तरी लिखित भाषेत फारसा फरक नसतो.


वऱ्हाडी प्रामुख्याने विदर्भाच्या वऱ्हाड भागात म्हणजे अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशीम या जिल्ह्यांच्या ग्रामीण भागात बोलली जाते. या बोलीची पाळेमुळे १२व्या शतकातल्या, चक्रधर स्वामींच्या महानुभाव पंथाच्या उदयापर्यंत जातात. अलीकडच्या काळातही अनेक कवींनी त्यांच्या कवितांत अंशतः किंवा संपूर्ण वऱ्हाडीचा वापर केला आहे. उद्धव शेळके, मनोहर तल्हार, मधुकर केचे, गो.नी. दांडेकर, बाजीराव पाटील, नरेंद्र इंगळे, सदानंद देशमुख, रमेश इंगळे उत्रादकर, पुरुषोत्तम बोरकर, आणि इतर अनेक असे लेखक/कवी आहेत की ज्यांनी या बोलीचे सौंदर्य व ताकद वाढवण्यास हातभार लावला आहे. तिसापेक्षाही जास्त वर्षांपासून डॉ.प्रा.विठ्ठल वाघ या बोलीत कविता लिहीत आहेत. त्यांनी वऱ्हाडी बोलीवर एक शोधप्रबंध लिहिला आहे. वऱ्हाडी बोलीभाषेतील म्हणी हे त्यांचे प्रसिद्ध पुस्तक आहे. वाघ यांनी त्यांच्या काव्यगायनाद्वारे, महाराष्ट्राच्या इतर भागांतही वर्‍हाडीला लोकप्रियता मिळवून दिली आहे. मराठीच्या अन्य बोलीभाषांनी केली आहे तशी वऱ्हाडीनेही मराठी भाषा जास्त खुमासदार केली आहे. डॉ. प्रा. विठ्ठल वाघ यांच्या या बोलीभाषेतील कवितांमध्ये,काया मातीत मातीत, तिफन चालते हे एक गाजलेले चित्रपटगीत आहे.

या बोली भाषेत काही उपप्रकार आहेत. उदा० खडसी वऱ्हाडी, देसी वऱ्हाडी, वरतील्ली, खाल्तील्ली इत्यादी. या उपप्रकारांत थोडयाफार फरकाने शब्द बदलतात. उदा० बैलगाडीला देसी (देस पट्टी)मध्ये 'बंडी' तर खडसी (खडसपट्टी)मध्ये 'खासर' म्हणतात.