नारायणपेठी बोली
विक्शनरी, या मुक्त शब्दकोशात पाहा/तपासा/अद्याप नसलेले शब्द/वाक्यांश जोडा अथवा सूची:मराठी बोलीभाषातील शब्द येथे मराठी बोलीभाषांची सामायिक शब्दसूची पहा
नारायणपेठी बोली ही मराठीची एक बोलीभाषा आहे. नारायणपेठ हे आंध्र प्रदेशातील मेहबूबनगर जिल्ह्यातले एक गाव आहे. या गावी मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास असलेले विणकर समाजाचे लोक नारायण पेठी ही मराठी बोली आजही बोलतात. देशाच्या अन्य राज्यांत उपजीविकेसाठी स्थलांतरित झालेले लोक त्या राज्यांमध्ये आपापल्या उंबऱ्याच्या आत हीच नारायणपेठी बोली बोलतात. तर, या गावातून नोकरी-व्यवसायासाठी अन्य ठिकाणी गेलेले लोकही घरांमध्ये याच बोलीचा वापर करतात.
स्वकुळ साळी समाज
[संपादन]साडी, सतरंजी, चादर, पितांबर यांची हातमागावर कापड विणून निर्मिती करणारा अशी स्वकुळ साळी समाजाची ओळख आहे. अहमदाबाद, आदोनी, इचलकरंजी, इंदूर, उज्जैन, नवसारी, नाशिक, पुणे, पैठण, बंगलोर, बेळगाव, मुंबई, येवला, सुरत, सोलापूर, हुबळी अशा बाजारपेठेच्या ठिकाणी या समाजाची वस्ती आहे. भारतभर विखुरल्या गेलेल्या स्वकुळ साळी म्हणजेच विणकर समाजाची 'नारायणपेठी' ही बोलीभाषा आहे.
नारायणपेठी - मराठीची बोलीभाषा
[संपादन]नारायणपेठी बोली भाषा मराठीशी संबंधितच आहे. ही बोलण्यास सहज सुलभ, ऐकण्यास गोड आणि मवाळ असून विणकर समाजाची स्वतंत्र अशी वैशिष्ट्यपूर्ण बोली आहे. हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठाचे माजी मराठी विभागप्रमुख श्रीधर रंगनाथ कुलकर्णी यांच्या 'तेलंगणातील मराठा समाज-भाषा आणि संस्कृती' या संशोधन प्रबंधामध्ये स्वतःची बोली असलेल्या अनेक जमाती तेलंगणामध्ये आढळून आल्या असून त्यामध्ये स्वकुळ साळी या जातीचा उल्लेख करण्यात आला आहे. हातमागावर विणकाम करणे हाच व्यवसाय असल्याने हा समाज शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे. त्यामुळे या बोलीची लिपी देवनागरी असली, तरी या बोलीतील लिखित साहित्य आणि दस्तऐवज उपलब्ध होणे दुर्मिळ आहे. तरीही काही समाजबांधवांकडून या बोलीचे सर्वेक्षण आणि अभ्यास सुरू झाला आहे.
मराठी आणि नारायणपेठी शब्द (पहिला शब्द मराठी, दुसरा नारायणपेठी)
[संपादन]काय झाले? - का झालू?
कोठून - कटून
तुझे - तुझ
दुखते - दुखालै
देऊळ - गुडी
बघ - देक
बरे - बरू
बोलावणे - बोलिला
भाकरी - भक्कर
मडके - मडकू
माझे - माझ
लहान - धकटू
सतरंजी - झमकाना
नारायणपेठी बोलीतील काही वाक्ये आणि वाक्प्रचार
[संपादन]काही वाक्ये :-
[संपादन]तो घरी आला - तेने घरांन आला
मी काम करतो - मी काम करतैय
मी घरी गेलो - मी घरांन गेलू
ही आता आली - हिने आंता आली.
काही वाक्प्रचार :-
[संपादन]आता मला काम करण्यास जायचे आहे - आंता मज काम करास जॉंवई.
मुलगी पसंत पडली वाङ्निश्चय झाला - पैर पसंत पडली घट्ट झालू.