गण गवळण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तमाशामध्ये पहिले गाणे सादर केले जाते त्याला 'गण' असे म्हणतात. गण व मुजरा झाल्यावर 'गौळण' सादर केली जाते.

तत्त्ववेत्त्यांच्या ब्रह्मरूपापासून लोककथांमधील गौरीनंदनापर्यंत लोकाभिमुख झालेले गणपतीचे स्वरूप लोककलेच्या प्रत्येक आविष्कारात गणाच्या रूपात उभे राहते. लोककलाकार रंगमंचावर प्रवेश करतो आणि नम्रपणे गणेशाला वंदन करतो. तो असतो गण.

गणाचे स्वरूप तात्त्विक आहे. गणातून शाहिराच्या प्रज्ञेचे आणि प्रतिभेचे खरे दर्शन घडते. गणातील प्रत्येक शब्द हा लोकवाणीतून अध्यात्मवाणीकडे सहजपणे जातो आणि याच शब्ददर्शनातून पुढे तत्त्वदर्शन उभे राहते.

गवळण हा तमाशातील एक भाग आहे. पारंपरिक तमाशा सादरीकरणामध्ये गणानंतर गवळण सादर करण्याची प्रथा आहे.

स्वरूप[संपादन]

गौळणीत कृष्णभक्तीची गाणी व त्यावरील नृत्ये असतात. गवळणीमध्ये निमित्त हे मथुरेच्या बाजारला निघालेल्या गवळणी असतात. त्यांची चेष्टा करून रस्ता कृष्ण आणि त्याचे मित्र रस्ता अडवतात. हा रस्ता सोडण्यासाठी विनवणीयुक्त गाणी व नृत्य म्हणजे गवळण. यातील विनोदाचा आणि मार्मिकतेचा भाग मावशी हे पात्र करते. मावशी म्हणजे एक पुरुष कलाकारच असावा लागतो. हा कलाकार सोंगाड्या असतो. यात या भागात कृष्णाची खूप चेष्टा केलेली असते. त्या निमित्ताने आध्यात्मिक चर्चादेखील घडवून आणली जाते.

ही गवळणही पारंपरिक पद्धतीने राधाकृष्णाच्या शृंगारलीला नृत्य, नाट्य, संगीत या घटकांनी सादर केली जाते. गवळण सादरीकरणामागे निखळ मनोरंजन आणि समाजातील अनिष्ट प्रथांवर टीका असे स्वरूप असल्याचे दिसते. नाट्य व काव्याच्या सुरेख संगमातून गवळण लौकिक शृंगाराचा आविष्कारही करते.

गण-गवळण हे देवाचे जागरण किंवा गोंधळ या प्रकारातही दिसून येते

महाराष्ट्र सरकारने २०१८ सालच्या "तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्काराने" सन्मानित केलेले, ज्येष्ठ साहित्यिक कवी बशीर मोमीन (कवठेकर), यांनी आपल्या लेखणीतून विविध प्रकारचे गण, गवळण व् पोवाडे निर्माण केलेले आहे.[१] विविध तमाशा फड मालक आणि सादरकर्ते मोमीन कवठेकर यांच्या कडून विविध गीते, गण-गवळण लिहीन नेतात व सादर करतात.

गाजलेले कलाकार[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]

  1. ^ आयुष्यभराच्या निरपेक्ष सेवेचा गौरव- लोकशाहीर बशीर मोमीन यांच्या भावना Archived 2020-11-08 at the Wayback Machine. "Saamana, a leading Marathi Daily”, 1-March-2019