वासुदेव (लोककलाकार)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
एका वासुदेवाचे आणि सोबतच्या मुलाचे पुणे, महाराष्ट्र येथे घेतलेले प्रकाशचित्र (इ.स. २००७)

वासुदेव हा महाराष्ट्रातील गावांमध्ये सकाळच्या वेळी घरोघर हिंडून पांडुरंगावरील अभंग - गवळणी गात दान मागणारा लोककलाकार आहे. डोक्यावर मोरपिसांची टोपी, पायघोळ अंगरखा, पायांत विजार किंवा धोतर, कमरेभोवती शेलावजा उपरणे गुंडाळलेले, एका हातात चिपळ्या, दुसऱ्या हातात पितळी टाळ कमरेला पांवा, मंजिरी अशी वाद्ये आणि काखेला झोळी,गळ्यात कवड्यांच्या व रंगीबेरंगी मण्यांच्या माळा,हातात तांब्याचे कडे,कपाळावर व कंठावर गंधाचे टिळे या वेषामुळे वासुदेव अगदी ठळकपणे ओळखू येतो. वासुदेव मुख्यत: क्षेत्राच्या ठिकाणी आढळून येतो. तो खेड्यापाड्यात नेहमी आणि शहरांतही कधीमधी दिसतो.

वासुदेव हा तीर्थक्षेत्रांत स्नान करायला आलेल्या मंडळींना नाना तीर्थक्षेत्रांची आणि तिथल्या देवतांची नावे सांगतो. त्या अर्थाने वासुदेव तीर्थांचा चालताबोलता कोशच आहे. वासुदेवाला पैसे दिले की तो सगळ्या दैवतांच्या नावाने पावती देतो, आणि मग अलगूज वाजवतो. वासुदेव सहसा कुणालाही आपणहून पैसे मागत नाही.

मुळातच कृष्णभक्ती हा त्याच्या आयुष्याचा पाया असल्याने वासुदेवाच्या मुखात शक्यतो कृष्णलीला वर्णन करणारीच गाणी असतात. वासुदेव ही समाज प्रबोधन करणारी एक संस्थाच होती. या वासुदेवाच्या साहाय्याने छत्रपति शिवाजी महाराजांनी मावळ्यांच्या घरी निरोप पाठवले आहेत. तसेच वासुदेवाचा हेरगिरीसाठी उपयोग करून शत्रूंच्या गोटातल्या बातम्याही मिळवल्या आहेत.

परंपरेचा उगम[संपादन]

मराठी संस्कृतीतील वासुदेवांची परंपरा सुमारे हजार-बाराशे वर्षे जुनी असावी, असा अंदाज आहे. ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव यांच्या साहित्यात वासुदेवावरील रूपके आढळतात. परंतु एकनाथ महाराजांनी त्याला आणखी प्रसिद्धीच्या झोतात आणले.

वासुदेव लोककलाकार

वासुदेवावरील रूपकाचा नमूना[संपादन]

गातों वासुदेव मी ऐका ।
चित्त ठायीं ठेवून ऐका ।
डोळे झांकून रात्र करूं नका ।
काळ करीत बैसला असे लेखा गा ॥
राम राम स्मरा आधीं ॥ ॥

वासुदेव हरी वासुदेव हरी |
सकाळच्या पारी आली वासुदेवाची स्वारी |
सीता सावली माना दान करी वासुदेवा |
श्रीकृष्ण घ्या सखा नाही होणार तुला धोका ||

हे सुद्धा पहा[संपादन]

भटके कलावंत आणि भिक्षेकरी

वासुदेवाची पुजा

संदर्भ व नोंदी[संपादन]