गलाथिया राष्ट्रीय उद्यान
गलाथिया राष्ट्रीय उद्यान हे अंदमान निकोबार द्विपसमूहातील मोठे निकोबार या बेटावर हे राष्ट्रीय उद्यान आहे. डिसेंबर २६ २००४ रोजी या उद्यानाच्या किनाऱ्यावर आलेल्या त्सुनामी मध्ये या उद्यानाचे प्रचंड नुकसान झाले. तसेच मानवी जिवीत हानीही झाली.
भौगोलिक[संपादन]
मोठ्या निकोबारच्या द्विपाच्या दक्षिण भागात हे उद्यान आहे.हे उद्यान मोठे निकोबार या बेटावरील एकत्रित बायोस्फोर रिझर्वचा भाग आहे. बेटाच्या उत्तर भागात कॅंपबेल बे राष्ट्रीय उद्यान आहे. भारताचे दक्षिण टोक मानले जाणारे इंदीरा पॉंइट याच उद्यानात आहे. उद्यानाचा मुख्य भाग डोंगराळ आहे व अंदमान निकोबार द्विपसमूहातील सर्वोच्च शिखर येथे आहे. उद्यानाच्या मधोमध गलाथिया नदी वाहते. या नदीवरुन या उद्यानाचे नाव गलाथिया पडले आहे. उद्यानाचा दुसरा भाग समुद्रकिनार आहे. त्सुनामी मध्ये येथील किनाऱ्यामध्ये मोठे फेरबदल झाले[१].
जंगलप्रकार[संपादन]
येथील जंगल हे विषुववृतीय प्रकारचे आहे. अत्यंत उंच उंच व प्रचंड घेऱ्याची झाडे हे येथील वैशिठ्य आहे. जंगल इतके घनदाट आहे की जंगलातून ५-१० मीटर पलीकडचे दिसत नाही. गलाथिया नदीच्या कडे कडेने खारफुटीचे जंगल आहे. उद्यानाच्या काही भागात मानवी वस्ती आहे जेथे केळी, नारळ, भात इत्यादी पिके घेतली जातात.
प्राणी जीवन[संपादन]
हे उद्यान मुख्य भूमीपासून दूर असल्याने येथे नेहेमीचे आढळणारे प्राणी नाहीत परंतु पक्षीजीवन मोठ्या प्रमाणावर आहे.निकोबारी पारवा हे येथील पक्ष्यांमधील वैशिठ्य. काही माकडांच्या प्रजाती सोडल्यास सस्तन वन्य प्राण्यांचे फारसे अस्तित्व नाही. येथील सर्वांत मोठे वैशिठ्य आहे खार्या पाण्यातील मगरी. अत्यंत महाकाय मगरी गलाथिया नदीत आढळतात. तसेच अनेक प्रकारची समुद्री कासवे येथे आढळतात. काही कासवांसाठी येथील समुद्रकिनार अंडी घालण्याची जागा आहे[२]. परंतु त्सुनामी मध्ये त्यांची जागा नष्ट झाली[३][४].
आदिवासी जीवन[संपादन]
अंदमान निकोबार द्विपसमूहातील इतर बेटांप्रमाणेच या बेटावरील खास आदिवासी जमाती आहेत. मुख्यत्वे शॉंपेन ही आदिवासी जमात येथे आढळते[५]. शॉंपेन बरोबरच निकोबारी म्हणून दुसरी आदिवासी जमातीचे येथे वास्तव्य आहे.
पर्यटन[संपादन]
मोठे निकोबार हे बेट भारताच्या मुख्य भूमीपासून जवळपास १५०० किमी इतके लांब आहे. त्यामुळे येथे भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या अत्यंत नगण्य आहे. लष्कराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठिकाण असल्याने भारतीय नौदल, वायुदल व भूसेनेची येथे चौक्या आहेत. उद्यानातील मानवी वस्ती ही ३ प्रकारात आहे. आदिवासी, स्थलांतरित व लष्कर. नागरी वस्ती ही मुख्यत्वे भारत सरकारतर्फे स्थलांतरित लोकांना मोफत वाटलेल्या जमीनीवर आहे जेणेकरून येथे नागरी वस्ती होईल. येथे जायचे झाल्यास भारतातील मुख्य भूमीवरुन पोर्ट ब्लेअर येथे यावे. पोर्ट ब्लेअर मधील मुख्य वनधिकारी कार्यालयातून उद्यानाला भेट देण्याची परवानगी घ्यावी लागते[६]. पोर्ट ब्लेअर हून मोठे निकोबार मधील कॅंपबेल बे येथे जाण्यासाठी बोटीची व्यवस्था आहे. बोटीने साधारणपणे तीन दिवस लागतात. तसेच हेलीकॉप्टरने अथवा विमानाने २ तासात पोहोचता येते परंतु त्यासाठी भारतीय वायुदलाशी संपर्क साधावा लागतो. (विमान नागरिकांसाठी नाही परंतु हेलिकॉप्टर मिळू शकते. )
रहाण्याची व्यवस्था
सध्या केवळ वन विभागाच्या विश्रामगृहात व्यवस्था होउ शकेल. अथवा नागरी वस्तीतील लोकांकडे पेइंग गेस्ट म्हणून राहता येईल. पुर्वी येथे वनविभागाने समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांसाठी बीच हाउसेस उभारली होती परंतु त्सुनामीमध्ये नष्ट झाली. परत उभारली आहेत की नाही हे कळायला मार्ग नाही.