दाचीगाम राष्ट्रीय उद्यान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

दाचीगाम राष्ट्रीय उद्यान हे भारतातील जम्मू आणि काश्मीर राज्यात आहे. हिमालयाच्या कुशीत वसलेल्या ह्या राष्ट्रीय उद्यानाचे वैशिष्ट्य आहे येथे आढळणारे हंगूल हरीण. हे एक प्रकारचे सारंग हरीण असून, केवळ येथेच आढळते. हे उद्यान श्रीनगर पासून २२ किमी अंतरावर असून हिमालयाच्या मध्यम ते अतिउंच रागांमध्ये आहे. दाचीगाम या नावाचा कश्मीरीमध्ये अर्थ आहे दहा गावे. हे नाव येथून हलवलेल्या दहा गावांच्या स्मरणार्थ ठेवण्यात आले आहे. हे उद्यान १९१० पासून अस्तित्वात आहे. सुरुवातील केवळ काश्मीरचे महाराजा यांच्या अखत्यारीत होता. १९८१ मध्ये याचे राष्ट्रीय उद्यानात रूपांतर करण्यात आले.

भौगोलिक[संपादन]

हे उद्यान हिमालयाच्या कुशीत असल्याने साहजिकच अतिशय उंच पर्वतरागांनी भरलेले आहे. उद्यानाची कमीत कमी उंची ५५०० फुटापासून ते १५००० फुटापर्यंत येते. साहजिकच उद्यानाचे ढोबळ मानाने दोन भाग पडतात उंचावरचा व खोऱ्यातील भाग. हजारो फूट उंच दगडी शिळा आहेत.

हवामान[संपादन]

हिमालयाच्या कुशीत असल्याने हिमालयीन हवामान येथे अनुभवायास मिळते. अतिशय थंड हिवाळा व सौम्य उन्हाळा असतो. उन्हाळ्यात तापमान ८ ते १४ अंश से असते हिवाळ्यात तापमान २-४ पर्यंत उतरते[१]. हिवाळ्यात उद्यानाच्या वरच्या भागात मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी होते. यामुळे उद्यान जानेवारी ते एप्रिल या कालावधीत बंद असते. पाऊस जवळपास रोज पडण्याची शक्यता असते. मान्सूच्या महिन्यातही मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो.

जंगल प्रकार[संपादन]

येथील जंगल हे मुख्यत्वे सूचीपर्णी वृक्षांचे आहे. तसेच ओकचिनारचे वृक्षही मोठ्या प्रमाणावर आढळतात. उद्यानातील वृक्षरेषा ही खूपच ठळक आहे. जंगलात ठिकठिकाणी मोकळी कुरणे आहेत.

प्राणी जीवन[संपादन]

वर नमूद केल्याप्रमाणे येथील सर्वात मोठे आकर्षण आहे हंगूल अथवा काश्मीरी हरीण, हे हरीणांच्या सारंग कुळातील आहे. केवळ येथेच आढळत असल्याने तसेच जम्मू आणि काश्मीर मधील राजकीय अस्थिरता यामुळे याचे अस्तित्व धोक्यात आले आहे. सध्या या हरीणांची वर्गवारी अतिशय चिंताजनक प्रजाती म्हणून करण्यात आलेली आहे.[२].

या उद्यानातील इतर प्रमुख प्राणी म्हणजे कस्तुरी मृग, बिबट्या, हिमालयीन वानर, हिमालयीन अस्वल, हिमालयीन तपकीरी अस्वल, कोल्हा, खोकड, रानमांजर, पाणमांजरहिमालयीन मॉरमॉट आहेत.

येथे पक्षीजीवनही विपूल आहे व खास हिमालयीन जाती येथे आढळतात. हिमालयीन ग्रिफन गिधाड हे त्यापैकी एक.[३]

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ[संपादन]