सिंह (तारकासमूह)
| तारकासमूह | |
|
सिंह मधील ताऱ्यांची नावे | |
| लघुरुप | Leo |
|---|---|
| प्रतीक | सिंह |
| विषुवांश | ११ |
| क्रांती | +१५ |
| चतुर्थांश | एनक्यू२ |
| क्षेत्रफळ | ९४७ चौ. अंश. (१२वा) |
| मुख्य तारे | ९, १५ |
| बायर/फ्लॅमस्टीड तारे | ९२ |
| ग्रह असणारे तारे | १३ |
| ३.००m पेक्षा तेजस्वी तारे | ५ |
| १०.०० pc (३२.६२ ly) च्या आतील तारे | ५ |
| सर्वात तेजस्वी तारा | रेग्यूलस (α Leo) (१.३५m) |
| सर्वात जवळील तारा |
वुल्फ ३५९ (७.७८ ly, २.३९ pc) |
| मेसिए वस्तू | ५ |
| उल्का वर्षाव | लिओनिड्स |
| शेजारील तारकासमूह |
सप्तर्षी लघु सिंह गवय (कोपऱ्यामध्ये) कर्क वासुकी षडंश चषक कन्या अरुंधती केश |
|
+९०° आणि −६५° या अक्षांशामध्ये दिसतो. एप्रिल महिन्यात रात्री ९:०० वाजता सर्वोत्तम दिसतो. | |
सिंह (Leo) हा एक तारकासमूह आहे. तो पूर्वेला कन्या आणि पश्चिमेला कर्क यांच्यामध्ये आहे. सिंह ही राशीचक्रातील एक राससुद्धा आहे. याचे इंग्रजी नाव Leo हे सिंह या अर्थाचा लॅटिन शब्द आहे. या तारकासमूहाला प्राचीन ग्रीक संस्कृतीमध्ये काल्पनिक ग्रीक नायक हेरॅकल्स (ज्याला प्राचीन रोमन संस्कृतीमध्ये हर्क्युलिस म्हणत असत) याने हत्या केलेल्या नेमिअन सिंहाचे प्रतीक मानले जात होते. याचे चिन्ह
(युनिकोड ♌) आहे. दुसऱ्या शतकातील खगोलशास्त्रज्ञ टॉलेमी यांनी बनवलेल्या ४८ तारकासमूहांच्या यादीत याचा समावेश होता. हा तारकासमूह त्याच्यातील अनेक प्रखर तारे आणि त्यांच्या सिंहासारख्या आकारामुळे सर्वात सहज ओळखता येणाऱ्या तारकासमूहांपैकी एक आहे. सिंहाची आयाळ आणि खांद्यांपासून एक आकार बनतो जो उलट्या प्रश्नचिन्हासारखा दिसतो.
वैशिष्ट्ये
[संपादन]
तारे
[संपादन]सिंहमध्ये अनेक तेजस्वी तारे आहेत. यामध्ये १ किंवा २ दृश्यप्रतीचे चार तारे आहेत ज्यांमुळे हा तारकासमूह ठळकपणे दिसतो:
- रेग्यूलस किंवा आल्फा लिओनिस हा एक निळा-पांढरा मुख्य अनुक्रम तारा आहे. याची दृश्यप्रत १.३४ असून तो पृथ्वीपासून ७७.५ प्रकाश-वर्षे अंतरावर आहे. त्याच्या रेग्युलस या पारंपरिक नावाचा अर्थ छोटा राजा असा होतो.
- बीटा लेओनिस किंवा डेनेबोला हा पृथ्वीपासून ३६ प्रकाश-वर्षे अंतरावरील २.२३ दृश्यप्रतीचा निळा-पांढरा तारा आहे. डेनेबोला याचा अर्थ "सिंहाची शेपटी" असा आहे.
- अल्जीबा, गॅमा लेओनिस, द्वैती तारा आहे. मुख्य तारा पिवळा २.६१ दृश्यप्रतीचा राक्षसी तारा आहे आणि दुसरा तारा ३.६ दृश्यप्रतीचा तारा आहे. पृथ्वीपासून १२६ प्रकाशवर्षे अंतरावरील या ताऱ्यांचा आवर्तीकाळ ६०० वर्षे आहे. त्याच्या जवळ, ४० लिओनिस हा पिवळा ४.८ दृश्यप्रतीचा तारा आहे. त्याच्या अल्जीबा या पारंपारिक नावाचा अर्थ "कपाळ" असा होतो.
- डेल्टा लिओनिस, ज्याला झोस्मा असेही म्हणतात, हा पृथ्वीपासून ५८ प्रकाश-वर्ष अंतरावरील २.५८ दृश्यप्रतीचा निळा-पांढरा तारा आहे.
- एप्सिलॉन लिओनिस हा पृथ्वीपासून २५१ प्रकाश-वर्षे अंतरावरील ३.० दृश्यप्रतीचा पिवळा राक्षसी तारा आहे.[1]
- झीटा लिओनिस, ज्याला अधाफेरा असेही म्हणतात, एक तीन ताऱ्यांचा समूह आहे. त्यातला सर्वत तेजस्वी झीटा लिओनिस तारा पृथ्वीपासून २६० प्रकाश-वर्षे अंतरावरील ३.६५ दृश्यप्रतीचा पांढरा राक्षसी तारा आहे. दुसऱ्या क्रमांकाचा तेजस्वी तारा, ३९ लिओनिस ताऱ्याची दृश्यप्रत ५.८ आहे. तिसरा तारा ५३ लिओनिस ६.० दृश्यप्रतीचा तारा आहे.
- आयोटा लिओनिस पृथ्वीपासून ७९ प्रकाश-वर्षे अंतरावरील ४.० दृश्यप्रतीचा द्वैती तारा आहे. यातील घटक तारे ४.१ आणि ६.७ दृश्यप्रतीचे असून त्यांचा आवर्तीकाळ १८३ वर्षे आहे.
- टाऊ लिओनिस हादेखील एक द्वैती तारा आहे. यातील मुख्य तारा ५.० दृश्यप्रतीचा पिवळा राक्षसी तारा असून तो पृथ्वीपासून ६२१ प्रकाश-वर्षे अंतरावर आहे. दुसऱ्या ताऱ्याची दृश्यप्रत ८.० आहे.[1]
वुल्फ ३५९ (सीएन लिओनिस) हा सिंहमधील तारा पृथ्वीपासून ७.८ प्रकाश-वर्षे अंतरावर असून तो पृथ्वीपासून सर्वात जवळच्या ताऱ्यांपैकी एक आहे. वुल्फ ३५९ हा १३.५ दृश्यप्रतीचा लाल राक्षसी तारा आहे. ग्लीस ४३६ या सूर्यापासून ३३ प्रकाश-वर्षे अंतरावरील सिंहमधील ताऱ्याभोवती नेपच्यून एवढ्या वस्तुमानाचा परग्रह फिरत आहे.[१]
कार्बन तारा सीडब्ल्यू लिओ (आयआरसी +१०२१६) रात्रीच्या आकाशातील अवरक्त एन-बँडमधील (१० μm तरंगलांबी) सर्वात तेजस्वी तारा आहे.
एसडीएसएस जे१०२९१५+१७२९२७ (कफौचा तारा) हा सिंहमधील तारा अंदाजे १३ अब्ज वर्ष जुना आहे. तो आकाशगंगेतील सर्वात जुन्या ताऱ्यांपैकी एक आहे
दूर अंतराळातील वस्तू
[संपादन]
सिंहमध्ये अनेक प्रखर दीर्घिका आहेत. त्यापैकी मेसिए ६५, मेसिए ६६, मेसिए ९५, मेसिए ९६, मेसिए १०५ आणि एनजीसी ३६२८ या काही प्रसिद्ध दीर्घिका आहेत.
लिओ रिंग हा हायड्रोजन आणि हेलिअम वायूचा भव्य ढग या तारकासमूहातील दोन दीर्घिकांभोवतीच्या कक्षेमध्ये आढळतो.
एम६६ ही दीर्घिका सिंहमधील तीन दीर्घिकांच्या गटाचा एक भाग आहे ज्याचे इतर दोन सदस्य एम६५ अणि एनजीसी ३६२८ आहेत. ती ३७ दशलक्ष प्रकाशवर्षे अंतरावर आहे आणि तिचा आकार इतर सदस्यांच्या गुरुत्वीय बलामुळे काहीसा विकृत झाला आहे. इतर सदस्य तिच्यातील तारे ओढून घेत आहेत. काही काळाने तिचे सर्वात बाहेरील तारे वेगळे होऊन त्यांच्यापासून एम६६ भोवती फिरणारी एक बटू दीर्घिका बनेल असा अंदाज आहे.[२] [३]
एम९५ आणि एम९६ दोन्ही पृथ्वीपासून २० दशलक्ष प्रकाशवर्षे अंतरावरील सर्पिलाकार दीर्घिका आहेत. एम९५ ही भुजायुक्त सर्पिलाकार दीर्घिका आहे. एम१०५ ही एक लंबवर्तुळाकार दीर्घिका आहे. एम१०५ पृथ्वीपासून २० दशलक्ष प्रकाशवर्षे अंतरावर असून तिची दृश्यप्रत ९ आहे.[३]
एनजीसी २९०३ एक भुजायुक्त सर्पिलाकार दीर्घिका आहे. ती पृथ्वीपासून २५ दशलक्ष प्रकाश-वर्षे अंतरावर आहे आणि तिचा आकार आकाशगंगेशी मिळताजुळता आहे. एनजीसी २९०३ च्या केंद्रकामध्ये अनेक "हॉटस्पॉट" आहेत, जे तारे निर्मितीच्या क्षेत्रांजवळ आढळले आहेत. या भागातील तारे निर्मिती धुळीच्या भुजेमुळे होते असे मानले जाते, जी तिच्या फिरण्यामुळे २०,००० प्रकाश-वर्षे व्यासाच्या भागामध्ये अभिघात लहरी पाठवते. दीर्घिकेच्या बाहेरील भागात अनेक तरुण खुले तारकागुच्छ आहेत.[२]
उल्का वर्षाव
[संपादन]नोव्हेंबरमध्ये सिंहमध्ये गॅमा लिओनिस जवळ लिओनिड्स उल्का वर्षाव होतो. १४-१५ नोव्हेंबरला त्याची तीव्रता सर्वाधिक असते. याचा स्रोत टेम्पेल-टटल धूमकेतू आहे. सर्वोच्च तीव्रतेला उल्कांचा दर सामान्यत: १० उल्का प्रति तास एवढा असतो.[४]
जानेवारी लिओनिड्स हा १ ते ७ जानेवारी दरम्यान होणारा लहान उल्का वर्षाव आहे.[५]
संदर्भ
[संपादन]- ^ "Astronomers discover smallest "exoplanets" yet".
- ^ a b Wilkins, Jamie; Dunn, Robert (2006). 300 Astronomical Objects: A Visual Reference to the Universe.
- ^ a b Ridpath & Tirion 2001, पाने. 166-168.
- ^ Ridpath & Tirion 2001, पाने. 166-167.
- ^ Jenniskens, Peter (September 2011).