तिमिंगल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तिमिंगल तारकासमूह

तिमिंगल हा एक तारकासमूह आहे. इंग्रजीमध्ये याला Cetus (सीटस) असे म्हणतात. हे इंग्रजी नाव ग्रीक पौराणिक कथांमधील सीटस या सागरी राक्षसाच्या नावावरून पडले आहे. त्याला आजकाल व्हेल म्हणुनही संबोधतात.

गुणधर्म[संपादन]

तिमिंगल तारकासमूहाचा काही भाग उत्तर खगोलार्धामध्ये आणि बराचसा भाग दक्षिण खगोलार्धामध्ये आहे. तिमिंगल तारकासमूहाच्या उत्तरेला मीन आणि मेष, दक्षिणेला शिल्पकार आणि अश्मंत, पूर्वेला यमुना आणि वृषभ आणि पश्चिमेला कुंभ तारकासमूह आहेत. तिमिंगल तारकासमूह विषुवांश ००ता २६मि २२.२४८६से ते ०३ता २३मि ४७.१४८७से आणि क्रांती १०.५१४३९४८° ते −२४.८७२५०९५° यांच्यामध्ये आहे.[१] तिमिंगल तारकासमूहाचे खगोलावरील क्षेत्रफळ १२३१ चौ. अंश एवढे आहे. तिमिंगल तारकासमूह नोव्हेंबर महिन्यामध्ये सर्वात चांगला दिसतो.

वैशिष्ट्ये[संपादन]

उघड्या डोळ्यांनी पाहिले असता दिसणारा तिमिंगल तारकासमूह.

क्रांतिवृत्त[संपादन]

जरी तिमिंगल तारकासमूह राशींचा भाग नसले तरी क्रांतिवृत्त या तारकासमूहापासून अतिशय जवळून जाते. त्यामुळे सूर्य, चंद्र आणि ग्रह काही काळासाठी या तारकासमूहामध्ये असतात. हे लघुग्रहांसाठी अधिक योग्य आहे कारण त्यांच्या कक्षा ग्रहांच्या तुलनेत जास्त कललेल्या असू शकतात. लघुग्रह ४ व्हेस्टा याचा शोध याच तारकासमूहामध्ये इ.स. १८०७ साली लागला होता.

मंगळावरून पाहिले असता क्रांतिवृत्त या तारकासमूहातून जाते. सूर्य या तारकासमूहात जवळपास सहा दिवस असतो. कारण मंगळाची कक्षा पृथ्वीच्या तुलनेत १.८५° कललेली आहे.

तारे[संपादन]

तिमिंगल तारकासमूहामध्ये बायर नाव असलेले ८८ तारे आहेत. त्यामधील १५ ताऱ्यांभोवती ग्रह आढळले आहेत. या तारकासमूहातील काही प्रसिद्ध तारे आहेत.

मायरा (इंग्रजी: Mira, बायर नाव: Omicron Ceti, o Ceti) हा या तारकासमूहातील सर्वात प्रसिद्ध आणि पहिला ज्ञात परिवर्तनशील तारा आहे. ३३२ दिवसांच्या कालावधीमध्ये त्याची आभासी दृश्यप्रत सर्वात जास्त ३ पासून (उघड्या डोळ्यांनी दिसू शकतो) सर्वात कमी १० पर्यंत (उघड्या डोळ्यांनी दिसू शकत नाही) बदलते. त्याचे अंतर पृथ्वीपासून ४२० प्रकाशवर्ष आहे.

अल्फा सेटी (α Ceti) हा आणखी एक रेड जायंट तारा आहे. हा अतिशय जुना तारा आहे आणि त्याने सर्व हायड्रोजन इंधन संपवले आहे. काही शास्त्रज्ञ असेही मानतात की अणुकेंद्र संमीलन (न्यूक्लिअर फ्यूजन) करता करता त्याने सर्व हेलियम सुद्धा संपवला असून आता तो केंद्रामध्ये त्याच्यातील कार्बन जाळत आहे. त्याची दृश्यप्रत २.५ असून तो २२० प्रकाशवर्ष अंतरावर आहे. बीटा सेटी (β Ceti) हा या तारकासमूहातील सर्वात तेजस्वी तारा आहे. या नारंगी ताऱ्याची दृश्यप्रत २.० असून तो पृथ्वीपासून ९६ प्रकाशवर्ष अंतरावर आहे.

टाऊ सेटी (τ Ceti) हा या तारकासमूहातील तारा पृथ्वीपासून फक्त ११.९ प्रकाशवर्ष अंतरावर आहे. तो पृथ्वीपासूनचा १७वा सर्वात जवळचा तारा असून अनेक विज्ञान कथांमध्ये याचा उल्लेख आढळतो.

दूरच्या विश्वातील वस्तू[संपादन]

मेसिए ७७ सर्पिलाकार दीर्घिकेचे एचएसटी छयाचित्र.[२]

तिमिंगल तारकासमूह दीर्घिकेच्या प्रतलापासून लांब असल्यामुळे त्यामधून दूरवरच्या अनेक दीर्घिका आपल्या आकाशगंगेच्या धुळीने अंधुक न होता स्पष्ट दिसतात. त्यामुळे अतिशय लांबच्या दीर्घिकांचा निरीक्षण करून सखोल अभ्यास करण्यासाठी निवडण्यात आलेले एक क्षेत्र ज्याला एक्सएमएम-लार्ज स्केल स्ट्रक्चर (XMM-LSS) म्हणतात, या तारकासमूहामध्ये आहे. या दीर्घिकांमधील एक दीर्घिका मेसिए ७७ एक सर्पिलाकार दीर्घिका आहे. तिची आभासी दृश्यप्रत ९ आहे. ती फेस-ऑन कललेली असून तिचे १० दृश्यप्रत असलेले केंद्रक स्पष्टपणे दिसते. ही दीर्घिका पृथ्वीपासून पाच कोटी प्रकाशवर्ष अंतरावर आहे.

अलीकडे जेकेसीएस ०४१ या आतापर्यंतच्या सर्वात लांबच्या दीर्घिकांच्या समूहाचा शोध या तारकासमूहामध्ये लागला.[३]

संदर्भ[संपादन]