Jump to content

ग्रीक संस्कृती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ग्रीक संस्कृती

ग्रीक संस्कृतीचा उदय इ.स.पूर्व १५०० च्या सुमारास युरोप खंडाच्या आग्नेय दिशेला असणाऱ्या लहान-लहान बेटांमध्ये झाला.[१] येथील लोक 'ग्रीक' म्हणून ओळखले जातात आणि त्यांची संस्कृती म्हणजे 'ग्रीक संस्कृती' होय. ग्रीसमध्ये विशिष्ट प्रकारची संस्कृती उदयास येण्यास तेथील भौगोलिक परिस्थिती कारणीभूत ठरली.[२] ग्रीसच्या उत्तरेला पर्वतांच्या रांगा आहेत. इतर तिन्ही दिशांना भूमध्य समुद्र आहे. त्यामुळे तेथील लोक उत्तम दर्यावर्दी झाले.[३] तुटक डोंगराळ प्रदेश व शेकडो लहान-लहान बेटे यामुळे तेथे लहान-लहान नगरराज्ये उदयास आली.[४] मात्र प्रबळ मध्यवर्ती सत्ता उदयास येऊ शकली नाही.

राजकीय व्यवस्था

[संपादन]
ग्रीक संस्कृती

डोंगराळ प्रदेश, शेकडो लहान-लहान बेटे, मर्यादित शेतजमीन यामुळे ग्रीक समाज छोट्या-मोठ्या समूहांमध्ये विभागला गेला होता.[५] कालांतराने या समूहांमधून नगरराज्ये उदयास आली. या नगरराज्यांमधून ग्रीक संस्कृती विकसित झाली. सर्वसाधारणपणे या नगरराज्यांमध्ये लोकशाहीप्रधान राज्यव्यवस्था होती.[६] काही ठिकाणी राजसत्ता होती, मात्र तेथे राजे निवडून दिले जात असत.[७] लोकशाहीची कल्पना ही ग्रीक संस्कृतीने जगाला दिलेली देणगी मानली जाते.[८]

पुढे कालांतराने आपापसांतील युद्धांमुळे ग्रीक नगरराज्ये दुर्बळ झाली. इ.स.पूर्व ३३८ मध्ये मॅसिडोनियाचा राजा फिलिप याने ग्रीक नगरराज्यांवर आक्रमण करून ती आपल्या राज्यात समाविष्ट केली.[९]

सामाजिक जीवन

[संपादन]

ग्रीक नगरराज्ये भौगोलिकदृष्ट्या छोट्या-छोट्या बेटांमध्ये विभागली गेली असली तरी त्यांची समाजरचना, त्यांच्या धर्मकल्पना व त्यांची जीवनपद्धती यांमध्ये बरेच साम्य होते, म्हणून या नगरराज्यांच्या एकत्रित संस्कृतीला ग्रीक संस्कृती असे म्हणतात.[१०]

ग्रीक समाजात दोन प्रमुख घटक होते; एक ग्रीक नागरिकांचा व दुसरा गुलाम, युद्धकैदी इत्यादींचा.[११] राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक व धार्मिक क्षेत्रातील अधिकार फक्त ग्रीक नागरिकांनाच होते. गुलाम व युद्धकैदी त्यापासून वंचित होते.[१२] ग्रीक समाजव्यवस्था पितृसत्ताक होती. प्रांतानुसार स्त्रियांच्या स्थानात भिन्नता दिसून येत असे.[१३]

आर्थिक जीवन

[संपादन]

भूमध्य सामुद्रिक हवामान व तेथील भौगोलिक परिस्थिती यांचा ग्रीकांच्या आर्थिक जीवनावर महत्त्वपूर्ण परिणाम झाला.[१४] ग्रीसमध्ये फळफळावळ व लाकूड यांची उत्तम पैदास होत असे. फळांच्या बागा हे ग्रीकांच्या उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन होते.[१५] ग्रीक लोक या फळांपासून उत्तम प्रकारचे मद्य बनवत. फळे, मद्य व ऑलिव्ह तेल हे त्यांच्या निर्यातीचे प्रमुख घटक होते.[१६] ग्रीसमध्ये चांगल्या प्रतीचे मुबलक लाकूड उपलब्ध होते, त्याचबरोबर विपुल सागरी किनारपट्टी लाभल्यामुळे जहाजबांधणीचा उद्योग येथे विकसित झाला.[१७]

ग्रीसमधील डोंगराळ प्रदेश व मर्यादित शेतजमीन यामुळे तेथील लोक मेंढ्यापालनाचा व्यवसाय करत.[१८] कापसापासून सूत कातणे, कापड विणणे व लोकरीचे कपडे तयार करणे इत्यादी कामे स्त्रिया करत असत. निसर्गामध्ये संगमरवरी दगड निर्यात करणे हाही एक मोठा उद्योग होता.[१९]

कला व स्थापत्य

[संपादन]

निसर्गाचे वास्तववादी चित्रण हे ग्रीक कलेचे वैशिष्ट्य होय.[२०] ग्रीकांनी बांधलेल्या मंदिरांतून त्यांच्या कलात्मकतेची व भव्यतेची जाणीव होते. ग्रीक वास्तुतज्ज्ञांनी स्तंभाच्या विविध प्रकारांचा (उदा. डॉरिक, आयोनिक, करिंथियन) मोठ्या कुशलतेने व कलात्मकतेने वापर केला आहे.[२१]

ग्रीकांनी अनेक मनमोहक शिल्पे तयार केली आहेत. त्यासाठी त्यांनी संगमरवरी दगडाचा वापर केला.[२२] ग्रीक शिल्पांची वैशिष्ट्ये पाहताना त्यांची प्रमाणबद्धता, यांमधून दिसणारे शरीररचनेचे सूक्ष्म दर्शन व मानवी भाव-भावनांचा अविष्कार करण्याचे त्यांचे कौशल्य या बाबी दिसून येतात. ग्रीक वास्तुकला व शिल्पकला या बऱ्याच अंशी ग्रीकांना महत्त्वपूर्ण वाटणाऱ्या पुराणकथांवर आधारलेल्या आहेत.[२३]

धर्मकल्पना

[संपादन]
झ्यूस

झ्यूस हा ग्रीकांचा सर्वश्रेष्ठ देव होय.[२४] याबरोबर ग्रीक लोक हेरा, अपोलो, ॲथेना, व्हिनस, मर्क्युरी या देवतांची पूजा करत.[२५] ग्रीक संस्कृतीत प्रत्येक नगराची एक स्वतंत्र देवताही असे. प्रत्येक देवतेला एक परंपरा असून तिचा संबंध भौगोलिक परिस्थितीशी व समाजजीवनाशी होता.[२६] देवतांना पशुबळी दिला जात असे. धार्मिक विधींमध्ये स्त्रिया आणि पुरुष दोघेही पौरोहित्य करत.[२७] देवता आपल्या स्त्री पुरोहिताकडे प्रत्यक्ष संदेश देतात असे मानले जाई. स्त्री पुरोहिताने सांगितलेल्या या संदेशांना 'ऑरेकल्स' असे म्हणतात; डेल्फीच्या मंदिरातील ऑरेकल्स प्रसिद्ध आहेत.[२८] तसेच ग्रीकांचा मरणोत्तर जीवनावर व स्वर्ग-नरक या कल्पनांवरही विश्वास होता.[२९]

क्रीडा

[संपादन]

क्रीडा क्षेत्रात ग्रीकांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. दर चार वर्षांनी सर्व ग्रीक नगरराज्यांतील खेळाडू ऑलिम्पिया या ठिकाणी एकत्र येत.[३०] तेथे त्यांच्यात विविध खेळांच्या स्पर्धा होत. या सामन्यांसाठी ऑलिम्पिया येथील वनश्रीयुक्त जागेची निवड करण्यात येऊन तेथे ग्रीकांचे मुख्य दैवत झ्यूसचे भव्य मंदिर बांधण्यात आले.[३१] मंदिरात झ्यूसचा १२.१९ मीटर उंचीचा सुवर्ण व हिरेमाणकांचा पुतळा उभारला होता.[३२] दर चार वर्षांनी उन्हाळ्याच्या मध्यात झ्यूसच्या उत्सवार्थ ऑलिम्पिक सामने भरवण्यात येत.[३३] या सामन्यांत धावणे, भालाफेक, थाळीफेक, कुस्ती, कसरती इत्यादींचा समावेश असे.[३४] या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांच्या काळात सर्व युद्धांना बंदी घालण्यात येई.[३५] ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा म्हणजे सदभावना, मैत्री व शांतता यांचे प्रतीक मानले जाई. आजच्या ऑलिम्पिक स्पर्धांचे मूळ प्राचीन ग्रीक परंपरेत आहे.[३६]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ↑ Finley, M. I. (1963). The Ancient Greeks. Penguin Books. p. 15.
  2. ↑ Bury, J. B. (1900). A History of Greece to the Death of Alexander the Great. Macmillan. p. 4.
  3. ↑ Boardman, John (1986). The Oxford History of the Classical World. Oxford University Press. p. 22.
  4. ↑ Finley, M. I. (1963). The Ancient Greeks. Penguin Books. p. 28.
  5. ↑ Bury, J. B. (1900). A History of Greece to the Death of Alexander the Great. Macmillan. p. 12.
  6. ↑ Hornblower, Simon (2002). The Greek World 479-323 BC. Routledge. p. 45.
  7. ↑ Finley, M. I. (1963). The Ancient Greeks. Penguin Books. p. 35.
  8. ↑ Boardman, John (1986). The Oxford History of the Classical World. Oxford University Press. p. 88.
  9. ↑ Hornblower, Simon (2002). The Greek World 479-323 BC. Routledge. p. 260.
  10. ↑ Finley, M. I. (1963). The Ancient Greeks. Penguin Books. p. 42.
  11. ↑ Finley, M. I. (1980). Ancient Slavery and Modern Ideology. Chatto & Windus. p. 65.
  12. ↑ Finley, M. I. (1980). Ancient Slavery and Modern Ideology. Chatto & Windus. p. 72.
  13. ↑ Pomeroy, Sarah B. (1975). Goddesses, Whores, Wives, and Slaves: Women in Classical Antiquity. Schocken Books. p. 58.
  14. ↑ Boardman, John (1986). The Oxford History of the Classical World. Oxford University Press. p. 110.
  15. ↑ Bury, J. B. (1900). A History of Greece to the Death of Alexander the Great. Macmillan. p. 55.
  16. ↑ Boardman, John (1986). The Oxford History of the Classical World. Oxford University Press. p. 114.
  17. ↑ Finley, M. I. (1963). The Ancient Greeks. Penguin Books. p. 52.
  18. ↑ Bury, J. B. (1900). A History of Greece to the Death of Alexander the Great. Macmillan. p. 58.
  19. ↑ Boardman, John (1986). The Oxford History of the Classical World. Oxford University Press. p. 120.
  20. ↑ Boardman, John (1996). Greek Art. Thames & Hudson. p. 34.
  21. ↑ Boardman, John (1996). Greek Art. Thames & Hudson. p. 78.
  22. ↑ Boardman, John (1996). Greek Art. Thames & Hudson. p. 102.
  23. ↑ Boardman, John (1996). Greek Art. Thames & Hudson. p. 115.
  24. ↑ Burkert, Walter (1985). Greek Religion. Harvard University Press. p. 125.
  25. ↑ Burkert, Walter (1985). Greek Religion. Harvard University Press. p. 130.
  26. ↑ Burkert, Walter (1985). Greek Religion. Harvard University Press. p. 142.
  27. ↑ Burkert, Walter (1985). Greek Religion. Harvard University Press. p. 95.
  28. ↑ Burkert, Walter (1985). Greek Religion. Harvard University Press. p. 116.
  29. ↑ Burkert, Walter (1985). Greek Religion. Harvard University Press. p. 190.
  30. ↑ Swaddling, Judith (1999). The Ancient Olympic Games. University of Texas Press. p. 14.
  31. ↑ Swaddling, Judith (1999). The Ancient Olympic Games. University of Texas Press. p. 22.
  32. ↑ Swaddling, Judith (1999). The Ancient Olympic Games. University of Texas Press. p. 35.
  33. ↑ Swaddling, Judith (1999). The Ancient Olympic Games. University of Texas Press. p. 40.
  34. ↑ Swaddling, Judith (1999). The Ancient Olympic Games. University of Texas Press. p. 52.
  35. ↑ Swaddling, Judith (1999). The Ancient Olympic Games. University of Texas Press. p. 18.
  36. ↑ Swaddling, Judith (1999). The Ancient Olympic Games. University of Texas Press. p. 90.