अश्मंत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Fornax IAU.svg

अश्मंत हा दक्षिण खगोलातील एक तारकासमूह आहे. त्याचे इंग्रजी नाव फोरनॅक्स (Fornax) - ‘Furnace-भट्टी’ अर्थाच्या ग्रीक शब्दावरून आले आहे. हा समूह टॉलेमी यांनी शोधून काढला. याचे खगोलशास्त्रीय वर्णन प्रथम नीकॉला ल्वी द लाकाय यांनी १७५६ साली केले.

वर्णन[संपादन]

हा तारकासमूह तिमिंगल (Cetus) व यमुना (Eridanus) तारकासमूहाच्या दक्षिणेला, शिल्पकार (Sculptor) तारकासमूहाच्या पश्चिमेला आहे. हा तारकासमूह राईट असेंशनh ५०m ते ३h ५०m आणि डेक्लिनेशन -२४° ते -३९° यांच्यामध्ये आहे. याचे खगोलावरील क्षेत्रफळ ३९८ चौरस अंश आहे. अश्मंत डिसेंबरमध्ये महाराष्ट्रात रात्री ९ च्या सुमारास थेट दक्षिणेस दक्षिण-मध्य आकाशात अंधार्‍या रात्रीच दिसण्याची शक्यता असते.[१]

वैशिष्ट्ये[संपादन]

उघड्या डोळ्यांनी पाहिले असता अश्मंत असे दिसते.

तारे[संपादन]

या तारकासमूहातील सर्व तारे तिसर्‍या किंवा त्याहून जास्त दृश्यप्रतीचे आहेत. अल्फा फोरनॅसिस हा द्वैती तारा आहे. हा छोट्या दुर्बिणीतून पाहिला जाऊ शकतो. त्यातील प्रमुख तारा ३.९ दृश्यप्रतीचा पिवळसर तारा आहे आणि दुसरा ६.५ दृश्यप्रतीचा पिवळा तारा आहे; दुसरा तारा कदाचित चल तारा असावा. ह्या दोन्ही तार्‍यांचा आवृत्तिकाळ ३०० वर्ष आहे आणि ते पृथ्वीपासून ४६ प्रकाशवर्ष अंतरावर आहेत. बीटा फोरनॅसिस हा पिवळ्या छटेचा राक्षसी तारा असून तो पृथ्वीपासून १६९ प्रकाशवर्ष अंतरावर आहे.[1] अश्मंतमधील ७ तार्‍यांभोवती ग्रह सापडले आहेत.

दूर अंतराळातील वस्तू[संपादन]

अश्मंतमधील चार गोलाकार तारकागुच्छ.[२]

विश्वातील अतिदूरच्या वस्तूंचा आणि घटनांचा वेध घेण्यासाठी अश्मंतला लक्ष्य केले जात आहे. अश्मंत तारकापुंज हा हबल अल्ट्रा डीप फील्डमध्ये आहे आणि फोरनॅक्स समूह, दीर्घिकांचा एक छोटा समूह मुख्यत: अश्मंतमध्ये आहे.

एनजीसी १०४९ हा पृथ्वीपासून ५००,००० प्रकाशवर्ष अंतरावरील गोलाकार तारकागुच्छ आहे. तो फोरनॅक्स बटू दीर्घिकेमध्ये आहे.[३]

एचआयपी १३०४४ बी हा एक परग्रह आहे. नोव्हेंबर २०१० मध्ये याचा शोध लागला असून त्याची निर्मिती दीर्घिकेच्या बाहेर झाली आहे.[४]

एनजीसी १३१६ (फोरनॅक्स ए) दीर्घिका व तिच्यामधील धुळीचे मार्ग (डस्ट लेन).

एनजीसी १०९७ ही अश्मंतमधील पृथ्वीपासून ६० दशलक्ष प्रकाशवर्ष अंतरावरील भुजायुक्त सर्पिलाकार दीर्घिका आहे. तिची दृश्यप्रत ९ असून ती मध्यम आकाराच्या दुर्बिणीतून दिसू शकते.[५] ही एक सेफर्ट दीर्घिका असून तिच्या केंद्रस्थानी प्रचंड वस्तुमानाचे कृष्णविवर आहे.

एनजीसी १३६० हा अश्मंतमधील साधारणपणे ९व्या दृश्यप्रतीचा, पृथ्वीपासून ९७८ प्रकाशवर्ष अंतरावरील एक ग्रहीय तेजोमेघ आहे. त्याचा केंद्रीय तारा असाधारणपणे तीव्र असून त्याची दृश्यप्रत ११.४ आहे. ६.५ आर्कमिनिट आकाराचा हा तेजोमेघ स्वरमंडळ मधील प्रसिद्ध रिंग तेजोमेघापेक्षा हा पाच पटीने मोठा आहे. रिंग तेजोमेघाच्या विपरित हा स्पष्टपणे लंबवर्तुळाकार आहे.[६]

फोरनॅक्स ए एक विशाल रेडिओ लोब असलेली रेडिओ दीर्घिका आहे. ती एनजीसी १३१६ या दृश्य वर्णपटलातील ९व्या दृश्यप्रतिच्या दीर्घिकेशी संबंधित आहे.[७] फोरनॅक्स ए दृश्य वर्णपटात एक मोठी लंबवर्तुळाकार दीर्घिका असून तिच्या केंद्रामध्ये धुळीचे मार्ग दिसतात. धुळीचे मार्ग पाहता एक लहान सर्पिलाकार दीर्घिका या दीर्घिकेमध्ये विलीन झाली आहे असे खगोलशास्त्रज्ञांना वाटते. ८० दशलक्ष प्रकाशवर्ष अंतरावरील ही सक्रिय दीर्घिका पृथ्वीपासून जवळील सक्रिय दीर्घिकांपैकी एक आहे. एनजीसी १३१६ चा विश्वाचा आकार मोजण्यासाठी वापर करण्यात आला आहे. रेडिओ लोब निर्माण करणारे जेट ताकदवान नसल्यामुळे लोब आंतरदीर्घिकीय माध्यमामुळे जास्त विखुरलेले आहेत.[८]

फोरनॅक्स बटू दीर्घिका एक बटू दीर्घिका आहे जी दीर्घिकांच्या स्थानिक समूहातील एक दीर्घिका आहे. ती फक्त ५००,००० प्रकाशवर्ष या तुलनेने कमी अंतरावर असूनसुद्धा लहान दुर्बिणीतून दिसत नाही.[७]

संदर्भ[संपादन]

  • डेव्हिड एच. लेव्ही (२००५). डीप स्काय ऑब्जेक्ट्‌स. प्रोमेथिअस बुक्स. आय.एस.बी.एन. १-५९१०२-३६१-०. (इंग्रजी मजकूर) Deep Sky Objects. Prometheus Books. ISBN 1-59102-361-0. 
  • रिडपॅथ इआन व टिरिअन विल (२००१). स्टार्स ॲन्ड प्लॅनेट्स गाईड. प्रिन्सटन युनिव्हर्सिटी प्रेस. आय.एस.बी.एन. ०-६९१-०८९१३-२. (इंग्रजी मजकूर) 
  1. ठाकूर, अ. ना. "अश्मंत". मराठी विश्वकोश. खंड १ (महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ). १४६५. 
  2. फोर ग्लोब्युलर क्लस्टर्स इन फोरनॅक्स. ESA/Hubble. १५ एप्रिल २०१६ रोजी पाहिले. (इंग्रजी मजकूर)
  3. Levy 2005, पान. 176.
  4. 'एलियन प्लॅनेट डिटेक्टेड सर्कलिंग अ डाईंग स्टार. BBC News. (इंग्रजी मजकूर)
  5. Ridpath Tirion, पाने. 148-149.
  6. Levy 2005, पाने. 134-135.
  7. ७.० ७.१ Ridpath & Tirion 2001, पाने. 148-149.
  8. विल्किन्स जेमी, डुन रॉबर्ट (२००६). ३०० ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट्स: अ व्हिज्युअल रेफरन्स टु द युनिव्हर्स. Firefly Books. आय.एस.बी.एन. ९७८-१-५५४०७-१७५-३.