Jump to content

सिंह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सिंह
नर
नर
मादा (सिंहीण)
मादा (सिंहीण)
प्रजातींची उपलब्धता
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: पृष्ठवंशी
जात: सस्तन
वर्ग: मांसभक्षक
कुळ: मार्जार कुळ(फेलिडे)
जातकुळी: पँथेरा
जीव: पँथेरा लिओ
सिंहाचा अफ्रिकेतील आढळप्रदेश
सिंहाचा अफ्रिकेतील आढळप्रदेश
इतर नावे
Felis leo
Linnaeus, 1758
फिंडा रिझर्व्हमधील सिंहीण आणि तिच्या पिल्लांचा व्हिडिओ

सिंह हा जंगलाचा राजा म्हणून ओळखला जातो. तो मांसभक्षक प्राणी आहे. सिंहाचे शास्त्रीय नाव 'पँथेरा लिओ' आहे. शूर माणसाला सिंहाची उपमा देतात. एक सत्य पौराणिक कथा आहे की हिरण्यकश्यपू नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी भगवान विष्णू यांना नृसिंह अवतार म्हणजे धड सिंहाचे आणि बाकी शारीरिक भाग माणसाचा असा नृसिंह अवतार धारण करावा लागला होता. संस्कृत भाषेत सिंहाला 'केसरी, म्हणतात म्हणून लोकमान्य टिळक यांच्या वृत्तपत्राचे नामकरण 'केसरी, असे आहे.

जगभरात आशियाई किंवा आफ्रिकन या दोन प्रकारचे सिंह आढळतात. आशियाई सिंहांचे अस्तित्त्व हे पूर्वापार भारतातच राहिले असून गेल्या काही वर्षांपासून तर ते गुजरातमधील गीरपुरतेच उरले आहे. आशियाई सिंह एकेकाळी ग्रीसपासून मध्य भारतात मध्यप्रदेश,उत्तर भारतात बिहारपर्यंत होते. पण शिकारीमुळे ते आता फक्त गीर जंगलात मिळतात. परंतु काही संशोधक लेखकांच्या मते सिंह हा मूळचा भारतातील नसून तो बाहेरून भारतात आणाला गेला व त्यामुळेच त्यांची संख्या इतकी कमी आहे.[]

वाघांप्रमाणेच सिंहांची शिकार हा स्वातंत्र्यपूर्व काळात राजेमहाराजांचा छंद होता. जुनागडच्या नवाबाने मात्र विसाव्या शतकाच्या प्रारंभी सिंहांच्या शिकारींवर पूर्णतः बंदी घातली. त्याकाळी सिंहांची संख्या तेरावर आली होती, अशी एक आकडेवारी सांगितली जाते. मात्र ही संख्या नेहमीच वादग्रस्त राहिली. काहींच्या मते प्रत्यक्षात ती संख्या शंभराच्या आसपास होती. ते काहीही असले, तरी १९१० पर्यंतच्या काळात हे संकट ओळखले गेले. साहजिकच त्यापुढे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सिंहांनाही अस्तित्त्व धोक्यात आलेल्या प्रजातींच्या यादीत टाकण्यात आले आणि त्यादृष्टीने काही पावले उचलली गेली. गुजरातेतले गीर हे सिंहांसाठी संरक्षित वनक्षेत्र जाहीर करण्यात आले. गीरमधील सिंहांना आशियाई सिंहांप्रमाणेच इंडियन लायन असेही म्हणतात. आज २०१० साली गीरमध्ये ४११ सिंह आहेत. १९१० ते २०१० या काळात ३९८ सिंह वाढले.

आफ्रिकेतील जंगलात सिंहांची संख्या खूप जास्त आहे.

आशियाई सिंह पुनर्निवास योजना

[संपादन]
सिंहाचे शिकार करतानाचे छायाचित्र

या योजनेनुसार कुनो पालपूर या जंगलात गीरचे काही सिंह पुनर्वासित केले जातील. पण गुजरात सरकारचा या योजनेला विरोध आहे. कुनो पालपूर येथे वाघ असल्यामुळे गुजरात सरकारने या योजनेला विरोध केला. वाघ हा प्राणी सिंहापेक्षा तगडा असतो आणि वजनदारपण आसतो. कुनो पालपूरला नेल्यावर तिथले वाघ सिंहाची शिकार करू शकतील. पण सर्वोच्च न्यायालयाने या योजनेला हिरवा कंदील दाखवला आहे. यामुळे गुजरातला काही सिंह आता कुनो पालपूर या अभयारण्यास देणे भाग पडणार आहे. तरीसुद्धा गुजरात सरकारचा दावा आहे की या निर्णयाकडे सर्वोच्च न्यालयाने पुन्हा एकदा नजर द्यावी.

सिंह हा जंगलाचा राजा म्हणून ओळखला जातो.

वर्णन

[संपादन]

वाघा नंतर सिंह दुसरा सर्वात उंच व ताकदवान प्राणी आहे सिंहावलोकन हे सिंहाचे खास वैशिष्ट्य म्हणजे सिंह थोडं पुढे जाऊन मागे वळून पाहताना त्याच्यात कमालीचा आत्मविश्वास जाणवतो. सिंहाची चावण्याची क्षमता ही १००० पिएस आय इतकी आहे सिंहाची धावण्याची क्षमता ही प्रती तास ८० किलोमीटर इतकी असते जी की चित्ता या प्राण्या पेक्षा ४० गुणांकाने कमी आहे चित्ता हा १२० किलोमीटर प्रती तास वेगाने धावू शकतो. तर वाघ हा सिंहापेक्षा ताकदवान असला तरी केवळ ६५ किलोमीटर प्रती तास वेगाने धावू शकतो. सिंहाची एक ढांग ही ५ ते ७ मीटर जाते सिंहाची उडी घेण्याची क्षमता साधारण २५ ते ३० फूट उंच असते १५० ते २५० किलो वजनाचा सिंह हा तसा सामाजिक प्राणी आहे. त्याचे अस्तित्त्व १०००० वर्षांपासून आशिया आणि आफ्रिकामध्ये आढळते. सिंहाचे दोन प्रकार शिल्लक आहेत आफ्रिकी सिंह आणि आशियाई सिंह. पूर्वी अस्तित्त्वात असलेले युरोपियन सिंह आणि बारबेरी सिंह हे सिंह आता नामशेष झाले आहेत. आशियाई सिंह हे आफ्रिकन सिंहांच्या तुलनेत कमी ताकदवान असतात.पांढरा सिंह हा दक्षिण आफ्रिकेत मिळतो. त्याचे सरासरी आयुष्य १० ते १४ वर्ष असते. ते लहान झुडुपाच्या सवाना जंगलात आढळतात. एकट्याने राहण्यापेक्षा एखाद-दुसऱ्या सवंगड्याबरोबर तो राहतो. चितळ, हरीण, काळवीट, नीलगाय, रानडुक्कर इत्यादी प्राणी हे सिंहांचे खाद्य आहे. सिंह जरी कळपाने राहात असला तरी तो एक चपळ आणि तरबेज शिकारी प्राणी आहे जो स्वतः च्या ताकदीने चित्ता या प्राण्याची शिकार करू शकतो सिंहाला सरासरी चार प्रयत्नात एक शिकार हाती लागते, व ती शिकार ४ ते ६ दिवस पुरते असे म्हणतात. सिंह दिवसातील वीस तास झोपतात. वाघाच्या डरकाळी प्रमाणे सिंहाची गर्जना ही जवळपास २० ते २५ किलोमीटर परिसरात ऐकू येते असे म्हणतात की सिंहांच्या एका गर्जनेत अशांत जंगल शांत होते. सिंहांच्या रूबाबदार दिसण्यामुळे त्याला जंगलाचा राजा घोषित केले आहे. सिंह हा एकटा हायनास म्हणजे जंगली कुत्र्यांच्या कळपाशी भिडू शकतो. सिंहांच्या पिलांना 'छावा' असे म्हणतात.

भारताच्या राष्ट्रचिन्हावर चार दिशेला तोंड करून उभे असलेले चार सिंह आहेत. मुळात हे सिंह राजा अशोकाच्या 'अशोक स्तंभा'वर होते.

मेट्रो गोल्डविन मेयर या अमेरिकन फिल्म स्टुडियोने बनविलेल्या चित्रपटाची सुरुवात गरजणाऱ्या सिंहाने होत असे.

संस्कृत काव्यातले सिंह

[संपादन]

लोकमान्य टिळकांचे वर्तमान पत्राचे नाव 'केसरी' हे सिंहाचेच पर्यायी नाव आहे. ह्या वर्तमानपत्रावर कधीकाळी असलेला श्लोक :

गजालिश्रेष्ठा ह्या निबिडतरकान्तारजठरी। मदान्धाक्षा मित्रा क्षणभरिहि वास्तव्य न करी।
नखाग्रांनी येथे गुरूतर शिला भेदुनि करीं। भ्रमाने आहे रे गिरिकुहरि हा निद्रित हरी॥ (मूळ जगन्नाथ पंडित, अनुवाद वासुदेवशास्त्री खरे)

यातला झोपलेला सिंह म्हणजे हिंदुस्थानची जनता. आणि मदान्धाक्ष मित्र म्हणजे राज्यकर्ते ब्रिटिश सरकार.

मूळ श्लोक जगन्नाथ पंडिताच्या भामिनीविलास या काव्यात आला आहे. तो असा :

स्थितिंनो रे दध्या: क्षणमपि मदान्धेक्षण सखे।
गजश्रेणीनाथ त्वमिह जटिलायां वनभुवि।
असौ कुम्भिभ्रान्त्या खरनखरनिर्दारितमहा-
गुरूग्रावग्राम: स्वपिति गिरिगर्भे हरिपति:॥

मराठी समश्लोकी काव्यानुवाद वासुदेवशास्त्री खरे यांचा आहे.

संस्कृत काव्यांतील सिंहासंबंधी काही अन्य श्लोक

[संपादन]

१. न यत्र स्थेमानं दधुरतिभयभ्रान्तनयना-
गलद्दानोद्रेकभ्रमदलिकदम्बा: करिटिन:।
लुठन्मुक्ताभारे भवति परलोकं गतवतो
हरेरद्य द्वारे शिव शिव शिवानां कलकल:॥

ज्यांच्या गंडस्थलांच्या उद्रेकांभोवती भुंग्यांचे थवे गुंजत आहेत असे मत्त हत्तीहि जेथे भीतीमुळे डोळे फिरवीत होते आणि उभे राहू शकत नव्हते अशा सिंहाच्या (हत्तींच्या गंडस्थलातील) मोत्यांनी खचाखच भरलेल्या प्रांगणात आता तो सिंह आता परलोकी गेल्यामुळे कोल्ह्यांची कोल्हेकुई ऐकावी लागत आहे. शिव! शिव!

२. सिंह: शिशुरपि निपतति मदमलिनकपोलभित्तिषु गजेषु।
प्रकृतिरियं सत्त्ववतां न खलु वयस्तेजसो हेतु:॥

सिंहाचा छावा जरी असला तरी तो मदाने गंडस्थलांच्या भिंती ओल्या झाल्या आहेत अशा हत्तींवर हल्ला करतो. पराक्रमी पुरुषांचा हा स्वभावच असतो. त्यांच्या पराक्रम वयावर अवलंबून नसतो.

३.नाभिषेको न संस्कार: सिंहस्य क्रियते मृगै:।
विक्रमार्जितराज्यस्य स्वयमेव मृगेन्द्रता॥

सिंहाचा राज्याभिषेक वा अन्य काही संस्कार प्राण्यांकडून केला जात नाही. पराक्रमाने राज्य मिळविलेल्या त्याचे प्राण्यांवरील राज्य स्वयंसिद्ध असते.

वगैरे वगैरे.

सिंह या विषयावरील मराठी पुस्तके

[संपादन]

सांस्कृतिक महत्त्व

[संपादन]
प्रल्हादा डावीकडे पाहत असताना नरसिंह हिरण्यकशिपूला त्याच्या मांडीवर मारतो.

संस्कृत शब्द मृगेंद्र म्हणजे प्राण्यांचा राजा सिंह . भारतात, सम्राट अशोकाने तिसऱ्या शतकात उभारलेली अशोकाची सिंह राजधानी, चार सिंहांना मागे मागे उभे ( सारनाथ )[]"भारताचे राष्‍ट्रीय चिन्ह" असलेले दर्शवते. हिंदू पौराणिक कथांमध्ये, अर्ध-सिंह, नरसिंह ,विष्णूचा अवतार, दुष्ट शासक हिरण्यकशिपूशी युद्ध करतो आणि त्याचा वध करतो.[]

ज्यू धर्म

[संपादन]
जेरुसलेमचे चिन्ह

यहूदाचा सिंह (हिब्रू: אריה יהודה, Aryeh Yehudah) हे एक यहूदी राष्ट्रीय आणि सांस्कृतिक प्रतीक आहे, जे पारंपारिकपणे यहूदा जमातीचे प्रतीक मानले जाते.[]

ख्रिस्ती धर्म

[संपादन]

ख्रिश्चन धर्मशास्त्रानुसार, नवीन कराराच्या प्रकटीकरणाच्या पुस्तकात नाझरेथच्या येशूचे प्रतिनिधित्व करणारा शब्द म्हणून याचा उल्लेख आहे. यहूदाचा सिंह हा देखील सोलोमन राजवंशातील इथिओपियन सम्राटांनी वापरलेल्या पदांपैकी एक होता.[]

बायबलनुसार यहूदाचा सिंह कोण आहे?[]

प्रकटीकरण 5:5

5 पण वडीलांपैकी एकजण मला म्हणाला, “रडू नकोस! पहा, यहूदा वंशाचा सिंह, दाविदाचा अंकुर हा विजयी झाला आहे. तो गुंडाळी उघडण्यास व तिचे सात शिक्के उघडण्यास समर्थ आहे.”[]

प्रतिमा

[संपादन]
सिंह हे दुर्गामातेचे वाहन आहे
सिंह हे दुर्गामातेचे वाहन आहे  
होयसाल या प्राचीन राज्याच्या प्रतीकामधील सिंह
होयसाल या प्राचीन राज्याच्या प्रतीकामधील सिंह  
या नाण्यावर सिंहाची प्रतिमा आहे
या नाण्यावर सिंहाची प्रतिमा आहे  
गीर जंगलात उन्हामध्ये ऊब घेणारा एक नर सिंह
गीर जंगलात उन्हामध्ये ऊब घेणारा एक नर सिंह  
गीर जंगलात फिरणारा हा आशियाई सिंह
गीर जंगलात फिरणारा हा आशियाई सिंह  
पंधरा सिंह
पंधरा सिंह  
आफ्रिकन सिंह आळस देताना
आफ्रिकन सिंह आळस देताना  
आफ्रिकन सिंह आणि तरस
आफ्रिकन सिंह आणि तरस  
चार आफ्रिकन सिंहिणी, एका रानम्हशीची शिकार केल्यावर
चार आफ्रिकन सिंहिणी, एका रानम्हशीची शिकार केल्यावर  
छाव्याबरोबरचा आफ्रिकन सिंह
छाव्याबरोबरचा आफ्रिकन सिंह  
चित्र:Asiatic lion marking its territory.jpg
झाडांवर मूत्रपिंड करून त्याचे क्षेत्र चिन्हांकित आशियाई शेर
झाडांवर मूत्रपिंड करून त्याचे क्षेत्र चिन्हांकित आशियाई शेर  

संदर्भ

[संपादन]
  1. ^ गुगल बुक्सवरील एक्झॉटिक एलियन्स : द लायन अँड द चिता इन इंडिया
  2. ^ "भारत के राष्‍ट्रीय चिन्ह". विकिपीडिया (हिंदी भाषेत). 2024-11-24.
  3. ^ "Lion". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2025-06-18.
  4. ^ "The Lion of Judah at Camelot: The Second State Visit, 1963". The Lion of Judah in the New World: 112–129. 2011. doi:10.5040/9798400679759.ch-010.
  5. ^ "Lion of Judah". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2025-05-30.
  6. ^ "बाइबिल के अनुसार यहूदा का सिंह कौन है? - BibleAsk" (हिंदी भाषेत). 2021-08-01. 2025-07-03 रोजी पाहिले.
  7. ^ "Revelation 5:5 KJV;OJB;ERV-MR - And one of the elders saith unto me, - Bible Gateway". www.biblegateway.com (इंग्रजी भाषेत). 2025-07-03 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]