यमुना (तारकासमूह)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

यमुना (इंग्रजी: एरिडॅनस) हा दक्षिण खगोलार्धातील एक तारकासमूह आहे. त्याला संस्कृतमध्ये स्रोतास्विनी म्हणतात. त्याचा अर्थ नदी किंवा प्रवाह असा होतो. हा तारकासमूह नदीच्या आकाराने दर्शवला जातो. एरिडॅनिस हे पो नदीचे लॅटिन नाव ऱ्या आणि शिवाय अथेन्समधील एका लहान नदीचे नाव आहे. हा आधुनिक तारकासमूहातील सहावा सर्वात मोठा तारकासमूह आहे.[१]

वैशिष्ट्ये[संपादन]

तारे[संपादन]

याच्या दक्षिण टोकाला ०.५ दृश्यप्रतीचा अग्रनद (इंग्रजी: आचर्नार) हा तारा आहे. पृथ्वीपासून १४४ प्रकाशवर्षे अंतरावरील निळ्या-पांढऱ्या छटेचा हा ताऱा एक मुख्य अनुक्रम तारा आहे.[१] अग्रनद हा एक वैशिष्ट्यपूर्ण तारा आहे. हा माहीत असलेल्या सर्वात चपट्या ताऱ्यांपैकी एक आहे. निरीक्षणांवरून असे आढळले आहे की याच्या विषुववृत्तापाशी त्याचा व्यास हा त्याच्या उत्तर-दक्षिण ध्रुवांमधील अंतराच्या दीडपट आहे.. हा तारा स्वतःभोवती अतिशय वेगाने फिरत असल्याने असे झाले आहे. बीटा एरिडॅनी एक निळ्या-पांढऱ्या छटेचा २.८ दृश्यप्रतीचा तारा आहे. हा तारा पृथ्वीपासून ८९ प्रकाशवर्ष अंतरावर आहे. थीटा एरिडॅनी हा १६१ प्रकाशवर्ष अंतरावरील एक द्वैती तारा आहे. त्याच्यामधील घटकांना लहान दुर्बिणीतून पाहता येते. मुख्य ताऱ्याची दृश्यप्रत ३.२ असून दुय्यम ताऱ्याची दृश्यप्रत ४.३ आहे. त्याचबरोबर यमुनामध्ये ३२ एरिडॅनी, ३९ एरिडॅनी, ४० एरिडॅनी यांसारखे इतर द्वैती तारे आहेत.[१]

एप्सिलॉन एरिडॅनी या ताऱ्याभोवती फिरणाऱ्या गुरूसदृश ग्रहाचे काल्पनिक चित्र

एप्सिलॉन एरिडॅनी या ताऱ्याभोवती गुरू ग्रहासारखा एक परग्रह आहे. हा ३.७ दृश्यप्रतीचा नारंगी छटेचा मुख्य अनुक्रम तारा पृथ्वीपासून १०.५ प्रकाशवर्षे अंतरावर आहे. त्याच्या ग्रहाचे वस्तूमान अंदाजे गुरू ग्रहाएवढे असून त्याचा परिभ्रमण काळ ७ वर्ष आहे.[१]

महापोकळी[संपादन]

विश्वातील ज्या मोठ्या भागांमध्ये कोणतीही दीर्घिका नसते, अशा भागाला पोकळी म्हणतात. यमुना महापोकळी (एरिडॅनस सुपरव्हॉइड) एक मोठी महापोकळी आहे. एक अब्ज प्रकाशवर्ष व्यासाची ही महापोकळी विश्वातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी महापोकळी आहे. याचा शोध वैश्विक मायक्रोवेव्ह पार्श्वभूमीतील थंड डागाला व्हेरी लार्ज ॲरेच्या आकाशाच्या सर्व्हेमध्ये जाणवलेल्या रेडिओ दीर्घिकांच्या अभावामुळे लागला.[२] याचे अस्तित्व विश्वातील सद्य वैज्ञानिक समजुतींसाठी एक आव्हान आहे. यामध्ये एक असेही मत आहे की कदाचित ही महापोकळी आपले विश्व आणि आणखी एका विश्वातील क्वांटम एन्टॅंगलमेंटमुळे निर्माण झाली असावी.[३][४]

दूर अंतराळातील वस्तू[संपादन]

अंदाजे एक अब्ज प्रकाशवर्ष अंतरावरील सर्पिलाकार दीर्घिका एलओ ९५ ०३१३-१९२. या दीर्घिकेचा आकार आकाशगंगेसारखा आहे.[५]

एनजीसी १५३५ हा एक लहान निळा-करडा ग्रहीय तेजोमेघ आहे जो लहान दुर्बिणींमधून दिसू शकतो. २००० प्रकाशवर्ष अंतरावरील तेजोमेघाची दृश्यप्रत ९ आहे.[१]यमुनामध्ये एनजीसी १२३२, एनजीसी १२३४, एनजीसी १२९१ आणि एनजीसी १३०० या इतर भुजायुक्त सर्पिलाकार दीर्घिका आहेत.

लोकप्रिय संस्कृतींमध्ये[संपादन]

स्टार ट्रेक विश्वाच्या काही नकाशांमध्ये व्हल्कन ग्रह ४० एरिडॅनी अ जवळ दाखवण्यात आला आहे.[६]

संदर्भ[संपादन]

  1. ^ a b c d e Ridpath Tirion, पाने. 146-147.
  2. ^ "एनआरएओ: "ॲस्ट्रॉनॉमर्स फाईंड एनॉर्मस होल इन् द युनिव्हर्स"" (इंग्रजी भाषेत).
  3. ^ "द व्हॉईड: इम्प्रिंट ऑफ अनदर युनिव्हर्स?" (इंग्रजी भाषेत).
  4. ^ "ग्रेट 'कॉस्मिक नथिंगनेस' फाऊंड".
  5. ^ "अ मिसबिहेविंग स्पायरल".
  6. ^ "मॅप ऑफ द फुल स्टार ट्रेक युनिव्हर्स" (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2011-07-10. 2016-05-25 रोजी पाहिले.

स्रोत[संपादन]

  • रिडपॅथ, इआन; विल टिरिअन. स्टार्स ॲंड प्लॅनेट्स गाईड. London.
  • रिडपॅथ, इआन; विल टिरिअन. स्टार्स ॲंड प्लॅनेट्स गाईड. London.
  • स्टार नेम्स, देयर लोर अँड लिजेंड, रिचर्ड ॲलन, न्यू यॉर्क, डोव्हर