Jump to content

विकिपीडिया:सद्य घटना/जून २००८

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जून २००८
सो मं बु गु शु सो मं बु गु शु सो मं बु गु शु सो मं बु गु शु सो मं बु गु शु
<< १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० >>


आजचे छायाचित्र                                                                                  दि. ३ डिसेंबर २०२४, मंगळवार


दि. ०३.०६.२००८

[संपादन]
मॉन्सूनचे महाराष्ट्राच्या सीमेवर आगमन
तीन दिवसांपूर्वी केरळात दाखल झालेल्या नैऋत्य मोसमी पावसाची (मॉन्सून) आगेकूच सुरूच असून, उत्तर दिशेला वेगाने प्रवास करत तो कारवारपर्यंत दाखल झाला. मात्र अरबी समुद्रात तयार होणार्‍या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाची तीव्रता अजूनही अपेक्षेप्रमाणे नसल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) राष्ट्रीय हवामान केंद्राचे संचालक, डॉ. एम. राजीवन यांनी स्पष्ट केले. आयएमडीने वर्तवलेल्या अंदाजापेक्षा दोन दिवस उशिरा केरळमध्ये दाखल झालेल्या मॉन्सूनने वेगाने प्रवास करत दोन दिवसांत तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेशचा बहुतेक भाग व्यापला. कारवारपर्यंत मॉन्सून पोचला असला, तरी गोवा, कोल्हापूरसह दक्षिण महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी पावसाने आज चांगली हजेरी लावली. मात्र दक्षिण भारतात त्याचे प्रमाण अपेक्षेप्रमाणे नसल्याचेही आयएमडीने स्पष्ट केले.
सकाळ


अधिक वीजवापर; अधिक दरवाढ
महावितरणने राज्यातील वीज ग्राहकांसाठी सुचविलेली दरवाढ राज्य वीज नियामक आयोगाने सौम्य केली आहे. घरगुती ग्राहकांना तीन ते चार टक्के आणि उद्योगांना सुमारे पाच ते सहा टक्के दरवाढ करण्याचा आदेश आयोगाने आज दिला. सर्वसाधारणपणे पावणेसात टक्के दरवाढ करण्यात आली असून, प्रामुख्याने अधिक वीजवापर करणार्‍यांना अधिक दरवाढ असे सूत्र या आदेशात उमटले आहे. महावितरणने सादर केलेल्या वीजदराच्या प्रस्तावावर आयोगाने आज आदेश दिला. त्यामध्ये स्थिर आकार कमी करून विजेच्या वापरावर वीजदर अवलंबून ठेवण्यात आला आहे. महावितरणने महसुलात १९ टक्‍क्‍यांची (३ हजार ३१८ कोटी) वाढ सुचविली होती. मात्र, आयोगाने त्यापैकी पावणेसात टक्के (१५० कोटी) वाढीस मान्यता दिली आहे. शेती ग्राहकांना दहा ते बारा तास भारनियमन सहन करावे लागत असल्याने त्यांच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. तसेच, वीजबचतीला प्रोत्साहन देण्यासाठी दरमहा तीनशे ते पाचशे युनिट वीज वापरणार्‍यांना अधिक दर सुचविण्यात आले आहेत.
सकाळ


पेट्रोल, डिझेलची दरवाढ आता अटळ
डाव्यांसह सर्वच राजकीय पक्ष पेट्रोल दरवाढीला विरोध करीत असतानाच, भाववाढ रोखणे शक्‍य नसल्याचे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी सांगितले. "पेट्रोलियम उत्पादनांवरील अनुदान आणखी वाढविणेही शक्‍य नाही आणि जागतिक बाजारातील भाववाढीपासून ग्राहकांना फार काळ दूर ठेवणे अशक्‍य होत आहे," अशा शब्दांत त्यांनी सरकारची हतबलता व्यक्त केली.
सकाळ


मरीन ड्राईव्हजवळ समुद्रात शिवरायांचे स्मारक - मुख्यमंत्री
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक मरीन ड्राईव्ह येथील अरबी समुद्रात उभारण्याचे आज निश्‍चित करण्यात आले.मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत जागा निश्‍चितीवर शिक्कामोर्तब झाले. ही जागा मरिन ड्राईव्हपासून समुद्रात एक किलोमीटरवर आहे. स्मारकाची जागा मलबार हिल, गिरगाव चौपाटी आणि मरिन ड्राईव्ह या भागानी वेढलेली आहे. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्‍वारूढ पुतळा उभारण्यात येणार असून तो समुद्र किनार्‍यावरून आकर्षक स्वरूपात दिसेल. या अश्‍वारूढ पुतळ्यावर आकर्षक रोषणाई करण्यात येईल.
सकाळ

दि. ०२.०६.२००८

[संपादन]
महाराष्ट्राच्या युवराज ला अखेरचा निरोप
एकेकाळी महाराष्ट्रातील कुस्तीगीरांच्या आणि शौकिनांच्या मनावर राज्य करणार्‍या महाराष्ट्र केसरी युवराज पाटील यांना आज (सोमवारी) कोल्हापूरवासीयांनी अत्यंत शोकाकूल मनःस्थितीत अखेरचा निरोप दिला. युवराज यांचा पहाटे अपघाती मृत्यू झाला. गावातील दैनंदिन व्यवहार बंद ठेऊन गावकरी मोठ्या संख्येने अंत्ययात्रेत सहभागी झाले.
सकाळ


भाजप पुन्हा जुन्या वळणावर
कर्नाटकात विजय मिळाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचा उत्साह द्विगुणित झाला असून, गेली सुमारे दहा वर्षे बाजूला ठेवलेले "३७० वे कलम रद्द करणे" आणि "समान नागरी कायदा लागू करणे" हे मुद्दे पक्षाने पुन्हा एकदा आपल्या विषयपत्रिकेवर आणले आहेत. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या उद्‌घाटनाच्या भाषणात पक्षाध्यक्ष राजनाथसिंह यांनी त्याचे सूतोवाच केले. कर्नाटकातील विजयाचा उत्साह असला, तरी राजस्थानातील गुज्जरांच्या आंदोलनामुळे पक्षाचे नेते अस्वस्थही आहेत. बैठकीला भाजपशासित राज्यांचे सर्व मुख्यमंत्री उपस्थित असले, तरी राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे यांची अनुपस्थिती पुरेशी बोलकी होती.
सकाळ


राज्यातील खेड्यांची इत्यंभूत माहिती एका क्‍लिकवर
राज्यातील खेड्यांची सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, भौगोलिक व शेतीविषयक माहिती आता एका क्‍लिकवर उपलब्ध होणार आहे. ही खेडी www.localareaportal.org या संकेतस्थळाच्या माध्यमातून डिजिटल होणार असून, राज्यातील पहिल्या शंभर खेड्यांची माहिती संगणकावर विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. येत्या दोन महिन्यांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा संकल्प देशभक्त बाळासाहेब भारदे इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्‍नॉलॉजीचे कार्यकारी विश्‍वस्त रवी घाटे यांनी केला आहे. याबाबत घाटे म्हणाले, "देशातील प्रत्येक खेड्याला सांस्कृतिक, सामाजिक व व्यापारी पातळीवर एकमेकांशी जोडण्यासाठी नवी दिल्लीतील डिजिटल एम्पॉवरमेंट फाउंडेशनने हा प्रकल्प सुरू केला आहे. राजस्थान मधील खासदार सचिन पायलट यांच्या मतदार संघातील दोसा येथे हा प्रकल्प देशात प्रथम राबविला आहे".
सकाळ


शंभर मीटर शर्यतीमध्ये उसेन बोल्टचा नवा जागतिक विक्रम
जमैकाच्या उसेन बोल्टने शंभर मीटर धावण्याच्या शर्यतीत नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला. त्याने रिबॉक ग्रांप्री मैदानी स्पर्धेत शंभर मीटरची शर्यत ९.७२ सेकंदात जिंकली. जमैकाच्याच असाफा पॉवेलचा विक्रम त्याने मागे टाकला. पॉवेलने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये इटलीतील स्पर्धेत ९.७४ सेकंदाची वेळ नोंदवली होती.
सकाळ

दि. ०१.०६.२००८

[संपादन]
आयपीएलवर दहशतीचे सावट; वाशीत जिवंत बॉंब सापडला
आयपीएलचा अंतिम सामना काही तासांवर येऊन ठेपला असतानाच वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात आज सायंकाळी पाचच्या सुमारास बाँब असलेली पिशवी सापडल्याने खळबळ उडाली. भावे नाट्यगृह उडविण्याच्या हेतूनेच ही स्फोटके ठेवण्यात आली होती, परंतु एका प्रेक्षकाच्या प्रसंगावधानामुळे हा कट उधळला गेला, असे नवी मुंबईचे पोलिस उपायुक्त आर. डी. शिंदे यांनी सांगितले. स्फोटकांमध्ये दोन डिटोनेटर, व्हाईट पावडर, रॉकेल व वायर्स यांचा समावेश होता. रविवारी सायंकाळी आयपीएलचा अंतिम सामना होणार आहे, त्या पार्श्‍वभूमीवर ही स्फोटके सापडल्याने सामन्यावर दहशतीचे सावट पसरले आहे.
सकाळ


दोन किंग्जच्या लढतीत चेन्नई सुपर किंग्जचा एकतर्फी विजय
दोन "किंग्स"मध्ये झालेल्या सामन्यात नावामध्ये "सुपर" असलेला महेंद्रसिंग धोणीचा "सुपर किंग्ज" संघ मैदानावरही "सुपर" ठरला. युवराज सिंगच्या मोहाली किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे आव्हान ९ गडी आणि ५.१ षटके राखून उधळून लावत सुपर किंग्जने आयपीएल स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. उद्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगणार्‍या निर्णायक मुकाबल्यात त्यांचा सामना राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध होईल.
सकाळ


चीन सीमेवरील हवाई तळ ४३ वर्षांनी पुन्हा सुरू
जम्मू-काश्‍मीरमधील लडाखच्या पर्वतीय भागात चीनच्या सीमेजवळ असलेल्या हवाई दलाच्या तळाचा वापर भारताने आजपासून पुन्हा सुरू केला. दौलतबेग ओल्डी असे या तळाचे नाव आहे. चीन सीमेजवळ असलेल्या चुशूल आणि फुकचे या दोन विमानतळांचाही पुन्हा वापर सुरू करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. चीनबरोबरील १९६२ च्या युद्धाच्या काळात दौलतबेगचा हवाई तळ उभारण्यात आला आणि १९६५ मध्ये त्याचा वापर थांबविण्यात आला होता. जगातील सर्वांत उंचीवरील या विमानतळावरून यापुढील काळात एएन-३२ या विमानांद्वारे नियमित वाहतूक सुरू करण्याची हवाई दलाची योजना आहे. या तळाचा वापर पुन्हा सुरू केल्याने सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांसाठी आवश्‍यक रसद पुरवणे सहज शक्‍य होणार आहे.
सकाळ


पाकिस्तानचे माजी मंत्री बर्नी यांना विमानतळावरून परत पाठविले
पाकिस्तानचे माजी मानवी हक्कविषयक मंत्री अन्सार बर्नी यांना शुक्रवारी रात्री येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून भारतात उतरू न देता परत पाठविण्यात आले. या विषयामुळे वादंग निर्माण झाला आहे. सरकारने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. बर्नी यांच्या पाठवणीबाबतची कारणे जाणून घेण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने गृह मंत्रालयाकडे विचारणा केली आहे. पाकिस्तानच्या तुरुंगात ४० वर्षे शिक्षा भोगलेल्या काश्‍मीरसिंगची सुटका होण्यास बर्नी यांचे प्रयत्नच कारणीभूत होते. पाकिस्तानने फाशीची शिक्षा सुनावलेल्या सरबजितसिंगची सुटका होण्यासाठीही ते प्रयत्न करत आहेत.
सकाळ


मॉन्सून केरळमध्ये; दोन दिवसांत कर्नाटकात
हवामान अनुकूल झाल्याने वेगाने आगेकूच करत मॉन्सून आज अंदाजापेक्षा दोन दिवस उशिरा केरळमध्ये दाखल झाला. दक्षिण किनारपट्टीवर अरबी समुद्रातून पूर्वेकडे वाहणार्‍या वार्‍यांची तीव्रता वाढली असून, किनारपट्टीजवळ द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. मॉन्सून सक्रिय होण्यासाठी ही परिस्थिती अनुकूल असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) म्हटले आहे. मॉन्सूनने आज केरळचा बहुतांश भाग व्यापला असून, राज्यात सर्वदूर मुसळधार पाऊस पडत आहे. त्याची आगेकूच होण्यासाठी वारे अनुकूल असल्याने येत्या दोन-तीन दिवसांत तो कर्नाटकातही दाखल होईल, असा अंदाज आयएमडीतर्फे वर्तविण्यात आला आहे.
सकाळ


मुख्यमंत्री निधीतून दिल्लीत प्रसाधनगृह आणि विदेश वारी
मुख्यमंत्री सहायता निधीचा मूळ उद्देश बाजूला सारून दिल्लीत प्रसाधनगृह बांधणे, परदेश दौरा अशा भलत्याच कामांसाठी देणगी दिल्याचे माहितीच्या अधिकारामुळे उघड झाले आहे. राज्यात निर्माण होणार्‍या निकडीच्या विषयांसाठी आणि विशेष मदतकार्यांसाठी हा निधी निर्माण करण्यात आला आहे. भूकंप, त्सुनामी, पूर, दुष्काळ अशा नैसर्गिक संकटांचा सामना करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी ट्रस्टची निर्मिती राज्य शासनाने केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या नावाने असलेल्या या ट्रस्टची आखणी विशिष्ट उद्देशाने व विशेष अधिकाराने करण्यात आली आहे; मात्र ज्या प्रकारचे साह्य ट्रस्टच्या वतीने दिले गेले आहे ते चिंताजनक आहे, असे समाजसेवक शैलेश गांधी यांनी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
सकाळ

हे सुद्धा पहा

[संपादन]