मराठी रंगभूमी दिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

दरवर्षी ५ नोव्हेंबर हा दिवस मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो. विष्णुदास भावे यांनी १८४३ साली सीता स्वयंवर हे पहिले नाटक रंगभूमीवर सदर करून मराठी नाट्यसृष्टीचा पाया घातला. १९४३ साली या घटनेचे स्मरण म्हणून राज्यातील या क्षेत्रातीलसर्व नामवंत एकत्र आले आणि सांगली येथे ५ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत शताब्दी महोत्सव साजरा करण्यात आला. या निमित्ताने ५ नोव्हेंबर रोजी नाट्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाचे अध्यक्ष वि.दा.सावरकर हे होते. याच दिवशी नाट्यविद्येच्या संवर्धनासाठी अखिल महाराष्ट्र नाट्यविद्या मंदिर समिती स्थापण्यात आली. चिंतामणराव पटवर्धन यांनी दिलेल्या जागेवर विष्णुदास भावे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या नावाने उभारण्यात येणाऱ्या नाट्यमंदिराची कोनशिला बसविण्यात आली. या महत्त्वाच्या क्षणी सर्व नाट्य रसिकांच्या साक्षीने सांगली येथे समितीने ठराव करून हा दिवस जाहीर केला.

विष्णुदास भावे गौरवपदक[संपादन]

मराठी रंगभूमी दिनी सांगलीची 'अखिल महाराष्ट्र नाट्यविद्या मंदिर समिती’ १९६० सालापासून विष्णुदास भावे यांच्या स्मृत्यर्थ मराठी रंगभूमीवर दीर्घकाळ सेवा करणाऱ्या ज्येष्ठ कलाकाराला 'विष्णुदास भावे गौरवपदक’ देऊन त्यांचा सन्मान करते. गौरव पदक, ११ हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप असते.आत्तापर्यंत हा पुरस्कार अमोल पालेकर, केशवराव दाते, ग.दि. माडगूळकर, छोटा गंधर्व, डॉ.जब्बार पटेल, जयंत सावरकर, ज्योस्ना भोळे, दाजी भाटवडेकर, दिलीप प्रभावळकर, दुर्गा खोटे, नानासाहेब फाटक, प्रभाकर पणशीकर, पु.श्री.काळे, फैयाज, बापूराव माने, बालगंधर्व, भालचंद्र पेंढारकर, महेश एलकुंचवार, माधव मनोहर, मामा पेंडसे, मास्टर कृष्णराव, रत्नाकर मतकरी, रामदास कामत, वसंत कानेटकर, विश्राम बेडेकर, शरद तळवलकर, शं.ना. नवरे, हिराबाई बडोदेकर,मोहन जोशी इत्यादींना मिळाला आहे.[१]

संदर्भ[संपादन]

  • अखिल महाराष्ट्र नाट्यविद्या मंदिर समिती स्मरणिका
  1. ^ http://www.lokmat.com/maharashtra/vishnudas-bhaves-hariunnariya-मंत्र-success/