मराठी रंगभूमी
भाषांतरित नाटके[संपादन]
पिग्मॅलियनचे मराठी भाषांतर ती फुलराणी[संपादन]
अनेक वर्षांपूर्वी मी शॉचे पिग्मॅलियन हे नाटक वाचले आणि वाचता वाचता त्यातली पात्रे मला आपली मराठी वाटायला लागली. स्वभाषेचा आग्रह, दुराग्रह, भाषेच्या उच्चारपद्धतीवरून ठरणाऱ्या उच्चनीचत्वाच्या कल्पना जगभरच्या मनुष्यसमाजात रूढ आहेत. बोलण्याची भाषा, शब्दांचे उच्चार, त्यांतले हेलकावे, लकबी, ह्यांतून आढळून येणारी जातीय,प्रांतीय, ग्रामीण, नागरी वैशिष्ट्ये टिपत राहणे हा माझा आवडीचा छंद आहे. अर्थात तो मराठीपुरता मर्यादित आहे. ह्या माझ्या छंदाला वाव देणारे पिग्मॅलियन वाचत असतानाच त्यातल्या पात्रांच्या संवादांची मराठी रूपडी मला दिसायला लागली. हे नाटक मराठीत आणावे असे मधून मधून वाटत राहिले आणि हा विचार त्या त्या वेळी कुठे कुठे मी बोलूनही दाखवला.
त्यानंतर काही वर्षांनी सतीश दुभाषी माझ्याकडे नवीन नाटकाची मागणी घेऊन आला, तेव्हा माझ्या मनात हा पिग्मॅलियन पुन्हा जागा झाला. सतीशसारखा गुणी नट मला प्रो. हिगिन्सच्या भूमिकेत दिसायला लागला आणि मग मात्र मी ‘ती फुलराणी’ हे नाटक लिहून काढले. मुख्यत: सतीशसाठी. मंजुळेच्या भूमिकेसाठी भक्ती बर्वेला आणि विसूभाऊसाठी अरविंद देशपांडेला घेण्याचा आग्रह धरला तो सुनीताने. इंडियन नॅशनल थिएटरने हे नाटक रंगमंचावर आणले. सतीश दुभाषी, भक्ती बर्वे, अरविंद देशपांडे, राजा नाईक, मंगला पर्वते ह्या गुणी कलावंतांना बरोबर घेऊन ह्या नाटकाचे दिग्दर्शन करणे हा एक अतिशय आनंददायक अनुभव होता. ह्या नाटकाच्या स्वभावाला धरून त्यातल्या शब्दाशब्दाला, वाक्यावाक्याला खेळवीत ह्या प्रयोगातल्या कलावंतांनी नाटकात रंग भरला.
संदर्भ:- पु. ल. देशपांडे- "ती फुलराणी",मौज प्रकाशन गृह, मुंबई.
मराठी रंगभूमीवरील बुकिश नाटके:- मराठी रंगभूमीवर बुकिश नाटकांची लाट आली तो कालखंड म्हणजे विष्णूदास भावेंच्या कालखंडानंतर साधारणपणे १८६१ च्या दरम्यान विश्वविद्यालयाची स्थापना होऊन महाराष्ट्रात इंग्रजी शिक्षण सुरू झाल्यावर त्या शिक्षणाने जे काही परिणाम झाले त्यातील एक म्हणजे लोकांची बुकिश नाटकाकडील प्रवृत्ती वाढली. महाविद्यालयामध्ये शेक्सपिअर, कालिदास यांच्या नाटकाचा रसास्वाद जेव्हा उमजू लागला तस तसे इंग्रजी, संस्कृत नाटकाचे प्रयोग होऊ लागले. संस्कृत नाटकांची, इंग्रजी भाषेतील नाटकांची भाषांतरे होऊन पाश्चिमात्य रीतीरिवाज, आचारविचार यांच्याकडे मराठी रंगभूमीचा ओढा वाढला. विद्वान मंडळींनी संस्कृत व इंग्रजी नाटकांची भाषांतरे किंवा रूपांतरे केली त्याचबरोबर स्वतंत्र नाटके मराठीत रचून नाटक मंडळींना शिकवली याचा मराठी रंगभूमीला उपयोग झाला व सुधारणा झाली. बुकिश नाटकांकडे कल वाढविण्यास प्रामुख्याने ‘आर्योद्धारक नाटक मंडळी’ कारणीभूत आहे. ‘वेणीसंहार’, ‘ऑथेल्लो’, ‘तारा’, ‘किंगलियर’, शंकरराव पाटकर हे नट ‘ऑथेल्लो’ नाटकातील ‘यागोची’ व्यक्तिरेखा खूप कमालीची करीत.
बुकिश नाटकापासून पडदे, पोशाख, देखावे वैगरे या बाबतीत खूपच सुधारणा झाल्या. बुकिश नाटकासंबंधाने सर्वात चांगले नाव मिळवलेली नाटक मंडळी म्हणजे ‘शाहूनगरवासी’ हीच होय. ‘त्राटिका’ हे नाटक शेक्सपिअरच्या ‘टेमिंग ऑफ धी श्र्यू’ या नाटकाच्या आधारावर रचलेले आहे. विनोदी व हास्यपूर्ण आहे. प्रोफेसर वासुदेवराव केळकर व शंकर मोरो रानडे यांच्या साह्याने ही मंडळी बुकिश नाटकाचे प्रयोग करीत असे. सामाजिक, ऐतिहासिक नाटकेसुद्धा या दरम्यान रंगभूमीवर आली. मराठीतील स्वतंत्र नाटकांना सुरुवात झाली ती सामाजिक नाटकापासून. गोविंद ना. माडगावकर यांनी आपले ‘व्यवहारोपयोगी नाटक’ १८५९ साली प्रसिद्ध केले. स्वतंत्र पहिले ऐतिहासिक नाटक म्हणून ‘थोरले माधवराव पेशवे’ याचा उल्लेख करावा लागेल. वि. ज. कीर्तने यांनी १८६१ साली हे लिहिले. बुकिश नाटकांनी मराठी रंगभूमीवर गद्य नाटके समृद्ध केली. (संदर्भ: भरत नाटय संशोधन मंदिर)
मराठीत मोलिअर[संपादन]
‘समाजस्वाथ्य’कार रघुनाथ धोंडो कर्वे यांनी फ्रेंच नाटककार मोलिअर यांच्या एका नाटकाचे (Tartuffe) रूपांतर मराठीत केले आहे. मोलिअर यांचे ते नाटक फ्रेंच रंगभूमीवर इ.स. १९६४ मध्ये प्रथम आले. र. धों.नी स्वतः त्याचे रूपांतर इ.स. १९३७ साली प्रकाशित केले. प्रस्तावनेत ते सांगतात, की हस्तलिखित त्यांच्याकडे अठरा वर्षें पडून होते. कोणी तरी त्यांच्याकडे क्लबात करण्यासारखे एखादे नाटक आहे का अशी विचारणा केली तेव्हा त्यांनी ते हस्तलिखित पृच्छा करणाऱ्याला दाखवले. परंतु त्याचा प्रयोग झाला नाही. मात्र ‘संबंधितांनी ते एखाद्या नाटकाकंपनीने करण्याजोगे आहे असा अभिप्राय दिल्यामुळे ते छापून तरी काढावे’ या उद्देशाने कर्वे यांनी स्वतः ते प्रकाशित केले. त्याची किंमत आठ आणे एवढी ठेवली होती. त्या नाटकाचे नाव ‘गुरूबाजी’.
नाटकाच्या नावावरून ते दांभिक गुरूसंबंधी असावे असा एक अंदाज वाचक बांधू लागतो. तो तसा चुकीचा नाही. ते नाटक रूपांतरित झाले ते मूळ लिहिल्यानंतर दोनशेपन्नास वर्षांनी व तेही फ्रेंच नाटकावरून असे लक्षात घेतले तर मराठीमधील ‘बुवा तेथे बाया’ या नाटकातील गुरूच्या ठिकाणी त्या काळी चर्चमधील धर्मोपदेशक होता हे सुसंगत वाटते.
मराठीत ‘बुवा तेथे बाया’ लोकप्रिय झाले, तर मोलिअर यांच्या नाटकाला तेथे प्रचंड विरोध झाला व तो धर्मगुरूंकडून. तितकेच नव्हे, तर मोलिअर यांच्या नाटकांपैकी सर्वात जास्त वादळ उठले ते त्या नाटकामुळे. त्यामुळे त्या नाटकाचे प्रयोग पहिली तीन वर्षें तुरळक होत असत. मॉलिअर यांनी संहितेत फेरफार इ.स. १६६७ मध्ये केले - मूळ तीन अंकी असलेले नाटक पाच अंकी केले. कर्वे यांनी रूपांतर केले ते त्या दुसऱ्या संहितेचे असावे असे इंग्रजी संहिता वाचल्यावर दिसते. नाटककाराने त्याच्या प्रस्तावनेत त्यासंबंधी काही तपशील दिलेले नाहीत.
नाटकात केंद्रीय भूमिकेत एक गुरू आहे. एका सुखवस्तू जमीनदाराने त्याला त्याच्या घरी आणून बसवले आहे. जमीनदाराला सुस्वरूप अशी दुसरेपणावर आलेली बायको आणि पहिल्या बायकोची दोन मुले आहेत. जमीनदाराने त्यांपैकी त्याच्या मुलीचे लग्न तिच्या प्रियकराशी लावून देण्याचे वचन दिले होते, परंतु तो गुरूच्या नादी लागल्यावर त्याने त्याचे वचन बदलून तिचे लग्न गुरूशी लावून देण्याचा निर्णय जाहीर केला. मुलगी त्यासाठी अर्थातच तयार होत नाही, परंतु त्याच वेळी तिच्यात वडिलांच्या विरोधात जाण्याचे बळही नसते. पण घरची मोलकरीण जमीनदाराची कानउघाडणी करते, इतरही लोक तसा प्रयत्न करतात, पण व्यर्थ. गुरू जमीनदाराच्या पत्नीवरच नजर ठेवून असतो. पत्नी त्याचा पर्दाफाश करते. जमीनदाराला त्याची चूक कळते, पण त्यासाठी फार उशीर झालेला असतो. कारण पर्दाफाश होण्यापूर्वीच, जमीनदाराने त्याची सर्व संपत्ती - घरासकट गुरूच्या नावे केलेली असते. गुरू जमीनदाराला घराबाहेर काढण्यासाठी बेलीफ आणतो. जमीनदाराने गुरूच्या हाती विश्वासाने एक कागद सोपवलेला असतो त्यावरून जमीनदाराचे संबंध बंडखोरांशी आहेत असे राजाला वाटते -(तो कागद गुरूनेच राजाला दिलेला असतो)- त्यामुळे शिपाई जमीनदाराला अटक करण्यास येतात. अखेर चमत्कार व्हावा तसे गुरूचे खरे रूप उघडकीला आल्याने राजा जमीनदाराची सुटका, त्याची अगोदरची राजनिष्ठा लक्षात घेऊन करतो. म्हणजे जे नाटक शोकांतिका होणे स्वाभाविक असे वाटते ते सुखान्त होते.
कर्वे यांना तो अनपेक्षित शेवट पटला होता की नाही ते सांगता येणार नाही. तो त्यांनी स्वीकारला हे महत्त्वाचे. त्याच प्रमाणे त्यांनी मूळ नाटकाचे रूपांतर करताना शब्द इतके नेमके वापरले आहेत की नाटक पाच अंकी असूनही कंटाळवाणे होत नाही. मोलकरणीने जमीनदाराचे मन वळवण्याचा केलेला प्रयत्न वाखाणण्यासारखा आहे. तसेच, तिने जमीनदाराची मुलगी व तिचा प्रियकर यांचे मिलन घडवून आणण्यासाठी योजलेले स्वभावस्वरूपाचे ज्ञान लक्षणीय आहे. मूळ इंग्रजी संहिता वाचली की कर्वे यांचे रूपांतराचे कौशल्य मनावर जास्त ठसते. मूळ नाटकात असलेली जमीनदाराची आई - तीही गुरूचा पक्ष धरणारी - रूपांतरातही आहे. तिचे मतपरिवर्तन जरा अचानकच झाले आहे असे दिसते, पण त्याला रूपांतरकाराचा नाईलाज होता. रूपांतराचा एक उत्तम आविष्कार असे या नाटकाचे वर्णन करता येईल. संदर्भ:- (मुकुंद वझे-थिंक महाराष्ट्र)
सामाजिक नाटके[संपादन]
मराठीतील स्वतंत्र नाटकांना सुरुवात झाली ती सामाजिक नाटकापासून. गोविंद.ना.माडगावकर यांनी आपले ‘व्यवहारोपयोगी नाटक’ इ.स.१८५९ साली प्रसिद्ध केले. पण 'तृतीय रत्न' या इ.स. १८५५ साली लिहिलेल्या नाटकामुळे पहिले लिखित मराठी नाटक असून, जोतिराव फुले हे पहिले मराठी नाटककार आहेत. आपली परिवर्तनवादी चळवळ सशक्त आणि परिणामकारक करण्यासाठी ‘नाटक’ या हत्याराचा वापर करण्याचा त्यांचा हेतू होता.
नाटकाचे स्वरूप:-
तृतीय रत्न या नाटकाला रूढ कथानक नाही. त्यात एक शोषकाचा, एक शोषिताचा असे दोन पक्ष आहेत. अशिक्षित कुणबी, त्याची बायको, भिक्षुक जोशी, त्याचा भाऊ, त्याची पत्नी, एक ख्रिस्ती धर्मोपदेशक, एक मुसलमान आणि विदूषक अशी एकूण आठ पात्रे आहेत. या सर्वच पात्रांना स्वतःचे असे चेहरे नाहीत. नाटकाची संकल्पना प्रातिनिधिक पातळीवर आहे. समाजातील एक विशिष्ट वर्ग जन्माने उच्च असल्याच्या एकमेव भांडवलावर समाजातील दुसऱ्या एका अंधश्रद्ध, अडाणी, गरीब वर्गाला कसा लुबाडत असतो, नागवीत असतो याचेच प्रातिनिधिक चित्रण या नाटकात आहे. 'संदर्भ:-म. फुले समग्र वाङ्मय,१९९१,पाचवी आवृत्ती)'
कल्पनाप्रधान नाटके[संपादन]
पहिले संगीत नाटक[संपादन]
मराठी संगीत रंगभूमी
मराठी संगीत रंगभूमीला वैभवशाली परंपरा आहे. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच ब्रिटिशांनी त्याच्या सत्तेचा पाश आवळायला सुरुवात केली होती. १८१७ मध्ये पेशव्यांनी पुणेही त्यांच्या ताब्यात दिले आणि इंग्रजांचा एकछत्री अंमल सुरू झाला. प्रशासन चालवण्यास उपयुक्त असणारे इंग्रजी जाणणारे कर्मचारी निर्माण करण्यासाठी १८५२ मध्ये ब्रिटिशांनी मुंबई विद्यापीठाची स्थापना केली.
विद्यापीठात शिकवण्यात आलेल्या इंग्रजी साहित्याद्वारे महाराष्ट्राला शेक्सपिअरचा परिचय झाला. त्याच्या सुखात्मिका, शोकात्मिका, त्याचे भाषावैभव, त्याच्या नाटकांतील विलक्षण व्यक्तिरेखा ह्यांचे नवे दालनच मराठी माणसांसमोर खुले झाले. ह्या नाटकांनी प्रभावित होऊन अनेकांनी त्यांचे मराठीत अनुवाद केले, काहींनी रूपांतरे केली, तर काहींनी त्यावर आधारित नवीन नाटके लिहिली. एकूण झाले काय तर विद्यापिठांत शिकणाऱ्या आणि न शिकणाऱ्या अशा सर्वांपर्यंतच शेक्सपिअर पोचला.
ह्याच काळात अनेक संस्कृत नाटकांची देखील मराठीत भाषांतरे झाली. संस्कृत नाट्यरचनेचा प्रभाव असलेली स्वतंत्र मराठी नाटके देखील लिहिली गेली. त्यांचे प्रयोग झाले नाहीत. पण विष्णूदासी पद्धतीच्या आख्यान नाटकांचेच प्रयोग प्रचलित होते.
विष्णूदास भाव्यांनी ज्या काळात सीतास्वयंवर हे नाटक रचले, त्या काळी मराठी प्रांतात लोकरंगभूमीचे विविध प्रकार दिसून येत होते. धार्मिक ग्रंथांची प्रवचने, त्यातील कथानकांवर आधारित कीर्तने, कोकणाकडचा दशावतार, कानडी भाषेतले यक्षगान, भागवतमेळे, वर्षभरातले विविध व्रतवैकल्ये, सण, समारंभ, बारसे, विवाह, अत्यंसंस्कार असे विविध विधी ह्याने सगळे सांस्कृतिक वातावरण भरलेले-भारलेले होते. काही धार्मिक प्रसंगी, विशेषतः दसऱ्याच्या दिवशी सोंग काढण्याची परंपरा अनेक ठिकाणी दिसून येते. इथे कथानक आणि संवाद हे घटक नसतात, पण व्यक्तिरेखा, वेषभूषा, थोडे संगीत, नाच हे नाटकातले घटक मात्र दिसून येतात. कथन परंपरेत पारायण – प्रवचन – कीर्तन असे विविध टप्पे दिसून येतात.
पारायणात वाचन असते, प्रवचनाच वाचनासोबत थोडे समजावून सांगितले जाते, तर कीर्तनात समजावून सांगणे एवढ्या मोठ्या प्रमाणावर असतं की त्यासाठी संगीत आणि अभिनय हे घटक वापरले जातात. कीर्तनातील गेय काव्य आणि त्याचं गद्य निरूपण ह्यात विष्णूदासांच्या नाटकाचे मूळ आढळतं, शिवाय होनाजी बाळांच्या शाहिरी काव्याचा विष्णूदासांना परिचय होताच. त्यामुळे हे सगळे प्रभाव विष्णूदासी नाटकांवर दिसून येतात.
भारत त्या काळात एक ब्रिटिश वसाहत असल्यामुळे अनेक ब्रिटिश सैनिक अधिकारी भारतात रहात होते. त्यांच्या मनोरंजनासाठी तत्कालीन ब्रिटिश नाटक मंडळ्या भारतात येऊन प्रयोग सादर करत असत. त्यातील काही नाटके शेक्सपिअरची तर काही तत्कालीन ब्रिटिश नाटककारांची होती. त्यांची मंचनाची पद्धत मात्र शेक्सपिअर कालीन नसून त्याच काळातली असल्यामुळे ही नाटके कमानी मंचाच्या पद्धतीची होती.ह्या नाटकांचे प्रयोग होण्याकरिता ब्रिटिशांनी भारतात काही कमानी-मंच नाटकघरे उभारली. ही नाटके पहायला ब्रिटिश अधिकाऱ्यांसोबतच प्रतिष्ठित धनिक तसेच ब्रिटिशांची चाकरी करणाऱ्या भारतीयांना आमंत्रण असे. अशा प्रकारे त्या काळात युरोपात ज्या पद्धतीने नाटक सादर होत असे, त्या पद्धतीचा परिचय महाराष्ट्रातील जनतेला झाला.
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात पश्चिम भारतात पारशी नाटकांचा उदय झाला. व्यापारी, उद्योजक पारशी समाज यांच्याकडून ह्या नाटकांना अर्थसहाय्य होत असल्यामुळे त्यांना पारशी नाटके असे म्हणत असत. गुजराती तसेच हिंदुस्थानी भाषांमधून ती नाटके सादर होत असत. सादरीकरणाच्या पद्धतीवर युरोपीय प्रभाव होता, पण त्यांची कथानके मात्र भारतीय पुराणे, अरबी भाषेतील सुरस आणि चमत्कारिक कथा आणि शेक्सपिअरची नाटके ह्यांच्यावर आधारित अशी होती. ह्या नाटकांमधले संगीत आणि नृत्य हे एकोणिसाव्या शतकातल्या तवायफ परंपरेतील होते. पारशी नाटकांचे प्रयोग लाहोर, आग्रा, लखनौ तसेच मुंबई येथे होत असत. बहुतेक सर्व प्रयोग ब्रिटिशांनी बांधलेल्या कमानी-मंच पद्धतीच्या नाटकघरांमध्येच होत असत. कथानक, वेशभूषा आणि संगीत भारतीय परंपरेतील तर सादरीकरणाची आणि अभिनयाची पद्धत काहीशी पाश्चिमात्य असे विलक्षण मिश्रण पारशी नाटकात होते.
अशा प्रकारे एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्रात कीर्तन, दशावतार, लळीत, भारूडासारख्या लोकपरंपरा, विष्णूदासी पद्धतीची आख्यान नाटके, शेक्सपिअरच्या नाट्य-संहिता, त्यांचे मराठी अनुवाद, रूपांतरे, संस्कृत नाटकांचे मराठी अऩुवाद, ब्रिटिश नाटक मंडळ्यांचे नाट्यप्रयोग, कमानी-मंच नाटकघरे, पारशी नाटके असे विविध प्रकार रंगभूमीवर नांदत होते. महाराष्ट्रात मराठी संगीत नाटक उगम पावले त्यामागे त्या काळात ही सर्व पार्श्वभूमी होती.
१९३१ मध्ये महाराष्ट्रात बोलपटांचे आगमन झाले. तोपर्यंत मराठी नाटक लोकप्रियतेच्या शिखरावर होते, पण मुका चित्रपट जसा बोलायला लागला, तशी लोकांना नाटकापेक्षा त्याचीच गोडी जास्त वाटू लागली, नाटकघरांचे रूपांतर चित्रपटगृहांमध्ये झाले आणि मराठी नाटकाच्या लोकप्रियतेला ओहोटी लागली.
नाटक परंपरा[संपादन]
- पोवाडा
- भारूड
- लळित
- दशावतारी खेळ
- यक्षगान नाटक
- भागवत मेळा नाटकम्
- तमाशा
- तंजावरी नाटकः
तंजावरी नाटक[संपादन]
मराठी नाटकाचा उगम विविध लोककलांपासून झाला. त्या त्या काळातल्या लोकजीवनाच्या प्रभावाने नाटकांचे विषय बदलत गेले, नाट्यसादरीकरणाची पद्धत बदलत गेली म्हणून प्रत्येक काळातले नाटकही बदलत गेले. मागच्या नाटकांमधल्या काही गोष्टींचे अनुकरण करत, काही नाकारत तर काही गोष्टी नव्याने सामावत त्या त्या काळातले नाटक सिद्ध होत गेले. अशा प्रकारे नाटकाच्या इतिहासाचा एक अखंड प्रवाहच निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. पण इतिहास मोठा मनोरंजक असतो, त्यात काही प्रवाह मध्येच निर्माण होतात, काही आपल्या दिशा बदलतात, तर काही प्रवाह लुप्त देखील होतात. मराठी नाटकांच्या एका महत्त्वाच्या प्रवाहाचा उल्लेख करायलाच पाहिजे. महाराष्ट्रापेक्षा लांब, तामिळनाडूमधील तंजावर येथे सतराव्या ते एकोणिसाव्या शतकात मराठीतून काही नाटके लिहिली गेली आणि सादरही झाली.. त्यांना मराठी भाषेतील आद्य नाटके म्हणावी लागतील.
तंजावरातील भोसले घराण्यातील व्यक्तींनी मोठ्या प्रमाणावर नाट्यलेखन केले. स्थानिक थेरूकुतू, भागवतमेळ्यासारख्या लोकनाटकांचा त्याच्या सादरीकरणावर बराच प्रभाव होता, तर लिखाण नाट्यशास्त्र परंपरेत उल्लेख केल्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न होता.. नाटकांत नृत्य-संगीताचा वापर बऱ्याच मोठ्या प्रमाणात केला जात असे. संगीत वृंद गायन-वादन करीत असे, सूत्रधार हा गद्यात भाषण करीत असे तर नट मुख्यत्वेकरून गायल्या जाणाऱ्या पदांवर नृत्य करीत असत, एका अर्थाने ते नट कमी आणि नर्तक अधिक असत. त्या नाटकांनाही नृत्य-नाट्य म्हणणे अधिक योग्य ठरेल. नाटकांची कथानके बव्हंशी धार्मिक असत. नाटकांचे प्रयोग राजदरबारात सादर होत असत आणि दरबारातील मानकरी, सरदार, उमराव हेच बहुधा प्रेक्षक असत. नाटकात स्त्रियांच्या भूमिका पुरुषच करीत असत आणि नाटकातल्या प्रस्तावनेतला सूत्रधार आणि कंचुकी नामक विदूषकाचा संवाद बऱ्याचदा अश्लील असे.
शहाजी भोसले, प्रतापराव भोसले आणि सर्फोजी भोसले ह्या तीन राजांनी विपुल नाट्यलेखन केलं. बहुतेक सर्व नाटकांचे विषय देव-देवतांच्या विवाहांचे होते. सीताकल्याण, लक्ष्मीनारायणकल्याण. श्रीकोर्वंजी ही त्यातली काही महत्त्वाची नाटके होत.या नाटकांनी इतिहास घडविला. १८५५ मध्ये इंग्रजांनी तंजावरवर वर्चस्व मिळवले आणि भोसले घराण्याची राजसत्ता गेली. त्यानंतर तिथे फारसे नाट्यलेखन वा सादरीरकण झाले नाही. तंजावरी नाटकांचा प्रवाह हा तिथेच लुप्त झाला. त्याचा शोध नंतर विसाव्या शतकात लागला. ज्येष्ठ इतिहासकार वि. का. राजवाडे ह्यांना एका रामदासी मठात तंजावरी नाटकांची बाडे सापडली. तंजावरी नाटकांमधील पदांचे नाते संस्कृत नाट्य परंपरेतील धृवांशी सांगता येते. तंजावरी परंपरेत त्यांना दरू असे संबोधत असत.
महाराष्ट्र आणि तंजावर ह्यांच्यात भौगोलिक अंतर असल्यामुळे तेथील नाटकांचा महाराष्ट्रातील नाटकांवर कोणत्याच प्रकारचा प्रभाव पडलेला दिसून येत नाही. नृत्यातून थोड्या प्रमाणात ह्या परंपरेचा पुन्हा उदय झालेला असला तरी मराठी नाटकांशी त्याची कुठल्याही प्रकारे नाळ जुळलेली दिसत नाही. अशी ही मराठी नाटकाची आद्य परंपरा नाटकाच्या इतिहासात एखाद्या बेटाप्रमाणे मराठी नाटकापासून आपले वेगळे असे अस्तित्व राखून आहे. मराठी नाटकाची आद्यपरंपरा सर्वंकष आहे.