बुडीत कर्ज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

बुडीत कर्ज तथा अनुत्पादक कर्ज हे परतफेड न होणारे कर्ज होय.

बुडीत खात्याचे निकष[संपादन]

भारत[संपादन]

एखादे कर्ज 'बुडीत' आहे , अनुत्पादक कर्ज आहे हे कधी जाहीर करायचे याचे नियम भारतीय रिझर्व्ह बँकेने आखून दिले आहेत. जागतिक बँकिंग संदर्भात होणाऱ्या बदलाप्रमाणे ही व्याख्या बदलत असते. रिझर्व्ह बँकेच्या सध्याच्या नियमानुसार कुठलेही कर्ज खालील निकषांवर बुडीत म्हणून जाहीर करावे लागते.

१) कर्जाचे व्याज अथवा मुद्दल सलग ९० दिवसात परतफेड केले गेले नाही तर सदर कर्ज 'बुडीत कर्ज' म्हणून जाहीर होते.

२) रोख पत खात्याच्या ( इंग्लिश Cash credit Account) बाबतीत खात्यातील ठराविक मर्यादेपेक्षा नावे रक्कम सलग ९० दिवसापेक्षा जास्ती असेल तर सदर खाते बुडीत होते. याचा अर्थ खातेदाराने ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्ती रक्कम वापरली आहे.

३) रोख पत खात्याच्या ( इंग्लिश Cash credit Account) बाबतीत खात्यावर केलेल्या जमा व्यवहारांची रक्कम मागील तीन महिन्याच्या वसूल केलेल्या व्याजापेक्षा कमी असेल तर.

४) रोख पत खाते किंवा मुदत कर्ज खाते यासाठी तारण म्हणून दिलेल्या मालमत्तेची किंमत कर्जापेक्षा कमी झाल्यास.

५) रोख पत खात्याच्या मर्यादा मंजुरीचा कालावधी ९० दिवसापेक्षा जास्ती उलटून गेल्यावर खाते बुडीत होते. रोखपत खाते मर्यादा साधारणतः एक वर्ष मुदतीसाठी दिले जाते. या कालावधीनंतर नवीन मर्यादा मंजूर करून घेणे आवश्यक असते. मुदत उलटून ९० दिवस झाल्यास खाते बुडीत होते.

६) एका खातेदाराचे एक कर्ज खाते बुडीत / अनुत्पादक झाले असता त्या ग्राहकाची इतर सर्व खाती सुद्धा बुडीत / अनुत्पादक ठरवली जातात.

कर्ज बुडीत जाण्याची कारणे[संपादन]

 1. अनुत्पादक कारणासाठी कर्जाची रक्कम वापरणे.
 2. व्यावसायिक अपयश
 3. देणेकर्यांनी पैसे बुडवणे
 4. हेतुपुरस्सर खाते थकीत करणे
 5. व्यवसायास आवश्यक आर्थिक गरजेपेक्षा कमी कर्ज मिळणे. यातून होणारी संसाधनाची ओढाताण आणि त्याचा व्यावसायिक फटका.
 6. कर्जाची रक्कम इतर धंद्यासाठी वळवणे

बुडीत खाते झाल्यामुळे होणारे नुकसान[संपादन]

कर्ज बुडीत होऊ नये म्हणून सर्व बँका काळजी घेतात. बुडीत कर्जामुळे बँकांना विविध प्रकारे नुकसान सोसावे लागते.

१) बुडीत खात्यावर वसूल न झालेले व्याज उत्पन्नातून वजा करावे लागते.९० दिवसाचा कालावधी आहे म्हणजे मागील तीन महिन्यातील व्याज बँकेच्या नफ्यातून कमी करावे लागते.

२) बुडीत खात्यावर भविष्यातील व्याजाची रक्कम बँकेला उत्पन्न म्हणून धरता येत नाही.

३) बुडीत खात्यावर वसुली होत नाही म्हणजे या खात्याचे मुद्दल परतफेड होण्याची शक्यता मावळते म्हणून बँकेच्या नफ्यातून काही भाग मुद्दलाचे नुकसान यासाठी बाजूला ठेवावा लागतो. म्हणजेच बँकेच्या इतर उत्पन्नातून बुडीत खात्यांसाठी तरतूद करावी लागते.

४) उत्पन्न घटल्यामुळे बँकेची माणशी उत्पादकता घसरते.

५) बुडीत खात्यामुळे भांडवली उभारणीवर विपरीत परिणाम होतो.

६) खातेदाराचे एक खाते बुडीत असले तरी इतर सर्व खाते बुडीत / अनुत्पादक करावे लागत असल्याने या सर्व खात्यावरील व्याजाच्या उत्पन्नास बँकेला मुकावे लागते.

७) बुडीत / अनुत्पादक खात्यांच्या वसुलीसाठी बँकेला अधिक खर्च करावा लागतो.

बुडीत खात्यांची वसुली[संपादन]

बुडीत खात्यामध्ये असणारे व्याज तथा मुद्दलाच्या वसुलीसाठी बँका / पतपेढ्या खालील प्रमाणे विविध उपाय अवलंबतात

 • जामीनदार व्यक्तीकडून वसुली.
 • कर्जाचे हफ्ते कमी करण्यासाठी व्याजदर सवलतीचा देणे किंवा कर्ज परतफेडीची मुदत वाढवून देणे.
 • तारण ठेवलेल्या मालमत्तेचा लिलाव करणे.
 • भजन मंडळी, वसुली एजंट या माध्यमातून वसुली करणे.
 • ग्राहकाच्या इतर मुदत ठेवी मोडून कर्जाचे पैसे वसूल करणे.