समाशोधन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

समाशोधन ही धनादेशा द्वारे रकमेच्या हस्तांतरणाची प्रक्रिया होय.

ही प्रक्रिया समाशोधन गृहाद्वारे चालवली जाते. समाशोधन गृह सहसा मोठ्या बँकांद्वारे चालवली जातात. प्रत्येक गावासाठी किंवा जवळ जवळ असणाऱ्या शहरांसाठी एक समाशोधन गृह असते. त्या विभागातील सर्व बँका या समाशोधन गृहाच्या सदस्य असतात.

पद्धत[संपादन]

ग्राहकाने बँकेत भरलेले धनादेश एकत्र करून समाशोधन गृहात पाठवले जातात. प्रत्येक धनादेशावर चुंबकीय वर्णओळख पट्टी वर बँकेचे नाव/ संकेतांक तसेच इतर तपशील छापलेले असतात त्या प्रमाणे प्रत्येक बँकेने भरलेले धनादेश इतर कुठल्या बँकांना द्यायचे याची यादी बनवली जाते. सहभागी बँकांनी किती रक्कम देणे आहे आणि प्रत्येक सहभागी बँकेला किती रक्कम येणे आहे याचा हिशोब ठेवण्याचे काम समाशोधन गृह करते. हे धनादेश प्रत्येक शाखेत पाठवले जातात. ग्राहकाच्या खात्यात रक्कम पुरेशी असेल तर धनादेश खात्याला नावे टाकले जातात.याला धनादेश वटणे असे म्हणतात. रक्कम पुरेशी नसल्यास धनादेश वटला नाही म्हणून परत केला जातो.

दुसऱ्या दिवशी न वटलेला धनादेश सादर करणाऱ्या बँकेस परत केला जातो.

समाशोधनाची नवी चेक ट्रंकेशन पद्धत[संपादन]

मोठ्या शहरात धनादेश प्रत्यक्ष पाठवण्याऐवजी त्याची प्रतिमा घेऊन, ही प्रतिमा आणि धनादेशाची माहिती विशिष्ट स्वरूपात भारतीय राष्ट्रीय भुगतान निगमच्या (National Payment Corporation Of India) माध्यमातून इतर बँकाकडे पोचवली जाते.

समाशोधन गृहाचे व्यवस्थापन आता भारतीय राष्ट्रीय भुगतान निगमच्या माध्यमातून केले जाते.

इलेक्ट्रोनिक स्वरूपात या माहितीचे आदानप्रदान झाल्यामुळे खालील फायदे झाले आहेत :

  • समाशोधन प्रक्रियेचा वेळ कमी झाला आहे.
  • मानवी चुकांची शक्यताही मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे.
  • पूर्वी एकाच शहरात चालू शकणारे समाशोधन आता अनेक शहरांना सामावून घेऊ शकते.