Jump to content

पतपत्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पतपत्र ही आयातदाराच्या बँकेने, आयातदाराने वस्तू आयात केल्यावर निर्यातदारास व्यवहाराची रक्कम प्रदान केली जाईल याची दिलेली लेखी हमी होय. पतपत्र ही आयात निर्यातीच्या व्यापारात आवश्यक असणारी महत्त्वाची प्रक्रिया आहे.

पतपत्रास इंग्लिशमध्ये 'लेटर ऑफ क्रेडिट' असा शब्द आहे. पतपत्र हा बँकेसाठी अ-रोख, म्हणजे ज्यात लगेच पैसे द्यावे लागत नाहीत, असा व्यवहार आहे.

वापर

[संपादन]

१) आयातदाराने वस्तू आयात करायच्या ठरवल्यावर तो आपल्या बँकेकडे जाऊन पतपत्राची मागणी करतो.

२) निर्यातदाराच्या बँकेची माहिती, व व्यापाराचे तपशील आयातदाराच्या बँकेला पुरवले जातात.

३) आयातदाराच्या बँकेच्या ग्राहकाच्या पतदर्जानुसार बँक तारण रक्कम घेऊन पतपत्र जारी करते.

४) हे पतपत्र जारी केल्याची माहिती निर्यातदाराच्या बँकेस स्विफ्ट मार्फत कळवली जाते.

५) पतपत्राच्या अटीनुसार निर्यातदार माल पाठवतो आणि त्यासंबंधित कागदपत्र आपल्या बँकेमार्फत पतपत्र जारी करणाऱ्या बँकेला पाठवतो.

६) आयातदार माल पाठवण्यासंबंधित कागदपत्रे आपल्या बँकेकडून ताब्यात घेतो.

७) जर आयातदाराने आपल्या आयात मालाची रक्कम आपल्या बँकेला दिली नाही तर बँकेला पतपत्रात नमूद केल्या प्रमाणे स्वतःच्या गंगाजळीतून हे पैसे निर्यातदारास द्यावे लागतात.

८) अशा प्रकारे बँकेने दिलेले पैसे ग्राहकाला कर्जाऊ दिले असे मानून वसूल केले जातात.

पतपत्राचे फायदे

[संपादन]
  • आयात निर्यात व्यापारात दोन्ही पक्ष परस्परापासून अतिशय अंतरावर असतात. अशा वेळी माल योग्य वेळी मिळणे आणि त्या मालाचे पैसे मिळण्याची हमी या दोन्ही गोष्टी बँकेला मध्यस्थ ठेवून साधल्या जातात.
  • दोन्ही पक्षांची तसेच पतपत्राची विश्वासार्हता बँक आणि स्विफ्ट या माध्यमातून जोखली जाते.
  • पतपत्राची रक्कम ठराविक कालावधीनंतर मिळणार असते. पण पतपत्राच्या जोरावर निर्यातदार आपल्या बँकेकडून कर्ज घेऊ शकतो. मालाच्या निर्यातीसाठी या खेळत्या भांडवलाचा उपयोग निर्यातदार करतो.
  • पतपत्रासाठी दोन्ही बँकांना आपल्या ग्राहकाकडून विविध प्रकारचे सेवाशुल्क मिळते.
  • पतपत्र असल्याने आयातदारास स्वतःचे भांडवल अडकवावे लागत नाही. बँकेकडे असणाऱ्या त्याच्या पतीच्या जोरावर त्याला आयात करता येते.

पतपत्रातील जोखीम

[संपादन]

पतपत्र हा बँकिंग व्यवहारात जोखमीचा व्यवहार समजला जातो. याची कारणे खालीलप्रमाणे

१) पतपत्र व्यवहार अ-रोख असल्याने बँकेच्या ताळेबंदात दिसत नाही.

२) पतपत्र व्यवहार हा ग्राहकाने पैसे भरण्यास असमर्थता दाखवल्यावर रोख व्यवहारामध्ये रूपांतरित होतो. ही घटना अनिश्चित असल्याने बँकेच्या तरलतेवर परिणाम घडवू शकते. भांडवली गंगाजळीचे व्यवस्थापन पतपत्र व्यवहारामुळे अवघड बनते.

३) आयात निर्यात व्यापार साधारणतः मोठ्या रकमेचे असतात.

४) आयात निर्यात व्यापारात परकीय चलन वापरले जाते. परकीय चलनाचा दर बदलता असल्याने बाजारातील चलन विनिमयाचा फटका रोखीत रूपांतरित झालेल्या व्यवहारास बसू शकतो.

५) बँकांची आर्थिक स्थिती तसेच दोन्ही व्यापाऱ्यांची ऐपत याचा परिणाम व्यवहाराच्या पूर्ततेवर होऊ शकतो.