रोखपाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

व्यवसायाच्या ठिकाणी रोख रक्कम हाताळणाऱ्या व्यक्तीस रोखपाल असे म्हणतात. रोख रकमेचे आदान प्रदान करणे, रोख खात्याची नोंद ठेवणे, दिवसा अखेरीस जमा झालेली रोख रक्कम त्याब्यात घेऊन ती सुरक्षितपणे ठेवणे ही रोखपालाची कामे आहेत.

दुकानातील रोखपाल[संपादन]

दुकानातील रोखपाल हे सर्व खरेदी विक्रीच्या व्यवहारांवर लक्ष ठेवतात. ग्राहकांकडून रोख रक्कम घेणे, सुट्टे पैसे देणे, पावती बनवणे, वस्तूंचे बारकोडिंग वाचून संपूर्ण खरेदीचे बिल बनवणे, कार्ड द्वारे बिल प्रदान केले जाणार असेल तर कार्ड स्वीप करून रक्कम वसूल करणे, दिवसाखेरीस एकूण पावत्या आणि जमा झालेली रक्कम यांचा ताळा करणे ही दुकानातील रोखपालाची कामे असतात. आधुनिक विपणन प्रणालीप्रमाणे भेटीची चलने (गिफ्ट व्हाऊचर्स) विकणे, परत केलेल्या वस्तूंची रक्कम ग्राहकास देणे अशीही कामे रोखपालाच्या कर्तव्यात येतात.

बँकेतील रोखपाल[संपादन]

पूर्वी बँकेत एकाच रोखपाल असायचा, जो रोखीची सर्व कामे करत असे. आता टेलर पद्धतीमुळे बरेचसे कारकून रोखपालाचेही काम करतात. हाताळावयाची रक्कम जर फार मोठी असेत तर व्यवहाराच्या ठरावीक मर्यादेनंतर मुख्य रोखपाल रोख रकमेचे व्यवहार करतो. बँकेतील रोखपाल ग्राहकाकडून रोख देवाण घेवाण, बँकेच्या इतर शाखांकडून रोख रक्कम घेणे अथवा देणे, जुन्या फाटक्या नोटा रिझर्व्ह बँकेकडे पाठवणे, शाखेतील रोख रकमेची दिवसाखेरीची शिल्लक रक्कम ताळा करून तिजोरीत ठेवणे अशी कामेही करतात.