Jump to content

कर्ज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

स्वतःकडे पैसे किंवा आर्थिक स्रोत नसल्यामुळे दुसऱ्याकडून उधार घेतलेले पैसे किंवा आर्थिक साहाय्य याला कर्ज अथवा ऋण असे म्हणतात. कर्जाने रक्कम घेणाऱ्याला ऋणको अथवा कर्जदार म्हणतात. कर्जे देणाऱ्याला धनको, किंवा सावकार असे म्हणतात.. आधुनिक काळात विविध बँका, पतपेढ्या, खासगी ऋणसंस्था, सरकारी संस्था यांच्यामार्फत कर्ज देण्याचे काम केले जाते. पैसे देउन कर्जाची परतफेड करावी लागते. क्वचित पैशाऐवजी इतर वस्तूही परतफेड म्हणून दिले-घेतले जातात.[]

कर्ज घेणारा पैसे वापरण्याबद्दल व्याज देतो. व्याज हे दरसाल दर शेकडा अश्या पद्धतीने मोजतात. व्याजाची परतफेड बहुधा दर महिन्याला करायची असते. मिळणारे व्याज हा धनकोचा किंवा सावकाराचा फायदा असतो.

बँक जेव्हा कर्ज देते तेव्हा या कर्जाची ऋणकोकडून परतफेड होईलच याची हमी देणाऱ्या व्यक्तीस हमीदार किंवा जामीनदार असे म्हणतात.

कर्ज" म्हणजे दोन प्रकारच्या असतात, "सुरक्षित कर्ज" आणि "असुरक्षित कर्ज.

जामीनदार

[संपादन]

जामीनदार हा कर्ज प्रक्रियेमधील एक महत्त्वाचा घटक आहे. कर्जाची हमी देणारा जामीनदार हा बाजारात पत असणारा असावा अशी किमान अपेक्षा असते. एखाद्या व्यक्तीला जामीनदार म्हणून स्वीकारताना बँक त्या व्यक्तीची आर्थिक परिस्थिती, उत्पन्नाची साधने, डोक्यावर असणारी कर्जे याही गोष्टींचा आढावा घेते. मासिक हजार रुपये उत्पन्न असणारा माणूस कोट्यावधी रुपयांच्या कर्जाची हमी घेऊ शकत नाही हे वास्तव आहे. त्यामुळे कर्ज देताना, जामीनदार कोण आहे याचाही विचार बँका करतात.

बँकेचा खातेदार मयत झाला असता आणि खात्याला नामनिर्देशन नसेल तर त्या खातेदाराच्या वारसांना खात्यातील शिल्लक रक्कम देण्यापूर्वी बँक जामीनदार मागू शकते. संभाव्य कायदेशीर कटकटीपासून बचाव करण्यासाठी आणि वारसदार व्यक्तीवर दबाव राहण्यासाठी जामीनदाराची मागणी केली जाते.

अस्थायी (टेंपररी) सरकारी कर्मचारी जेव्हा सरकारकडून पैशाची आगाऊ उचल करतात, त्यावेळी त्यांनाही स्थायी (परमनन्ट) सरकारी कर्मचाऱ्याच्या सहीचा जामीन द्यावा लागतो.

गुन्ह्याच्या आरोपाखाली पकडल्या गेलेल्या एखाद्या कच्च्या कैदेतील माणसाची जामीनावर तात्पुरती सुटका करता येते, त्यावेळी त्याला जामीनदार लागतो.

जामीनदाराची कर्तव्ये

[संपादन]

१) कर्जदाराने घेतलेले कर्ज नियमितपणे फेडले जाते की नाही यावर लक्ष ठेवणे

२) कर्जाचे हप्ते नियमित भरले जात नसल्यास कर्जदारास साहाय्य करणे

३) कर्जदाराने कर्ज बुडवले असता आपल्या संपत्तीमधून हे कर्ज फेडणे. जामीनदाराने हे कर्ज भरण्याची हमी दिलेली असते, त्यामुळे कर्जदाराने पैसे बुडवल्यास त्याची थेट जबाबदारी जामीनदारावर येते.

कर्ज मंजूरी

[संपादन]

कर्ज घेण्यासाठी ग्राहकाला बँकेकडे अथवा पत संस्थेकडे अर्ज करावा लागतो. अर्थात अर्ज केला म्हणजे कर्ज मिळेलच असे नाही कारण प्रत्येक अर्ज हा कर्जमंजूरी प्रक्रियेतून जावा लागतो. कर्ज मंजूर करताना धनको खालील गोष्टी पाहतो

१) कर्जदाराची सत्यता ( के वाय सी - आपल्या ग्राहकाला ओळखा)

२) कर्जाचा उद्देश

३) कर्जाची रक्कम

४) कर्जाचा कालावधी

५) कर्ज परतफेडीची क्षमता

६) कर्जासाठी देऊ केलेली तारण मालमत्ता

७) जामीनदार

सर्व बाबींची पूर्तता झाल्यावर सुयोग्य हुद्यावरील अधिकारी ( पतपेढी असल्यास संचालक मंडळ ) कर्ज मंजूरीचे पत्र ग्राहकास देतो. या पत्रात बँकेच्या सर्व अति, व्याज दर, परतफेडीची मुदत, मासिक हफ्ता अशा कर्जविषयक बाबी असतात. ग्राहकाने या अटींना मंजूरी दिल्यावर कर्जाची रक्कम दिली जाते.

कर्ज परतफेडीशी संबंधित संकल्पना

[संपादन]

कर्जाची परतफेड कशी करायची हा निर्णय कर्जदार आणि धनको ठरवतात. एखाद्या व्यावसायिक किंवा विशेष हेतूने घेतलेल्या कर्जासाठी व्यवसायातून येणारे उत्पन्न, किंवा हेतूची पूर्तता याचा विचार परतफेड ठरवताना केला जातो. उदा. घर बांधणी साठी घेतलेले कर्ज फेडण्याची सुरुवात घर बांधून झाल्यावर, शैक्षणिक कर्जाची परतफेड शिक्षण पूर्ण होऊन नोकरी मिळाल्यावर करता येते. एखाद्या व्यवसायात असणारे चढ उतार , रोख रकमेची उपलब्धता यावर परतफेडीचे वेळापत्रक ठरते.

विलम्बावधी

[संपादन]

ज्या कारणासाठी कर्ज दिले जात आहे त्याची पूर्तता दीर्घ कालावधीनंतर होत असेल तर ग्राहकास विलम्बावधी मंजूर केला जातो. पायाभूत सुविधा उभारणीसाठी दिलेले कर्ज, गृह कर्ज, शैक्षणिक कर्ज इत्यादी कर्जामध्ये ग्राहकाला व्याज किंवा मुद्दल परतफेड करण्यापासून काही कालावधी साठी सूट दिली जाते.

समान मासिक हप्ता

[संपादन]

ग्राहक आपल्या कर्जाचे मुद्दल आणि व्याज समान मासिक हप्त्यांमध्ये करतो. कर्ज परतफेड सुरू असताना व्याजदर बदलले तर हप्त्याच्या रकमेवर फरक पडतो. अशा वेळी ग्राहक कर्ज हप्त्याची रक्कम तीच ठेवून कर्जाचा कालावधी कमी जास्ती करू शकतो.

मुद्दल आणि व्याजाचा हप्ता

[संपादन]

या प्रकारात कर्जाचे मुद्दल मुदतीच्या समान प्रमणात वाटले जाते तसेच दर महिन्याला होणारी व्याजाची रक्कम वेगळी भरली जाते. दर महिन्याचे दिवस वेगवेगळे असल्याने व्याजाची रक्कम वेगवेगळी असते.

एक रकमी परतफेड

[संपादन]

सोने किंवा मुदत पावत्यांच्या तारणावर घेतलेली कर्जे एक रकमी परतफेड तत्त्वावर मंजूर केली जातात. धनको कडे पुरेशी तारण रक्कम जमा असल्याने ही जोखीम घेण्यास धनको तयार असतो.

कर्जातील कालाधिष्ठित घटना

[संपादन]

१) कर्जासाठी विनंती करणारा अर्ज

२) कर्जाची मंजूरी

३) कर्जाच्या रकमेची ऋणकोला अदायगी

४) मासिक व्याजाची गणना

५) मासिक व्याजाची आणि मुद्दलाच्या हप्त्यांची वसुली

६) मासिक हप्ता न आल्यास दंडाची आकारणी सुrU.

७) मुदतपूर्व खाते बंद करण्यासाठी पैसे जमा करणे

८) कर्जाच्या खात्याची फेररचना - मासिक हप्ता बदलणे, कर्जाची रक्कम वाढवणे, व्याजाचा दर कमी / जास्ती करणे इत्यादी

९) कर्ज थकीत होणे

१०) कर्जाची थकीत झाल्यामुळे फेररचना करणे

११) थकीत कर्जाची परतफेड किंवा एकरकमी तडजोड

१२) कर्ज वसुलीसाठी कोर्टात दावा दाखल करणे

१३) तारण मालमत्ता विकून कर्जाची वसुली

कागदपत्रे

[संपादन]

कर्ज व्यवहारासाठी अनेक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. प्रत्येक कर्ज वेगळे असले तरी खालील कागदपत्रे आणि दस्तऐवज सामान्यतः घेतले जातात.

कर्जमंजूरीसाठी

[संपादन]

१) कर्ज मागणी अर्ज २) 'आपल्या ग्राहकाला ओळखा' साठी (इंग्लिश : Know Your Customer) लागणारी राहत्या पत्त्याचा पुरावा, छायाचित्र असणारे ओळख पत्र, कर भरणा चलने ३) मालमत्तेचे पुरावे ४) जामीनदाराची 'आपल्या ग्राहकाला ओळखा' कागदपत्रे ५) अर्जदाराच्या तसेच जामीनदाराच्या उत्पन्नाचे पुरावे ६) तारण द्यायच्या मालमत्तेचे मालकी दस्त

कर्ज उचल करताना

[संपादन]

१) वचनचिट्ठी २) जमीनदारांची हमी पत्रे ३) मालमत्ता गहाण किंवा नजर गहाण ठेवण्याचा करारनामा ४) कर्ज उचल करण्यासाठी अर्ज ५) कर्ज वापराचा पुरावा तसेच पावत्या ६) निबंधकाकडे अचल मालमत्ता ठेवण्याबद्दलची कागदपत्रे

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "कर्ज वसुली". BBC News मराठी. 2023-08-09. 2023-10-08 रोजी पाहिले.