बचत खाते

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बचत खाते ही बँका आणि इतर वित्तसंस्थांची सर्वात लोकप्रिय सेवा आहे.

विशिष्ट अपवाद वगळता कोणीही व्यक्ती किंवा व्यवसाय आपले पैसे बँकेला देते. हे पैसे बँक तिसऱ्या व्यक्तीस कर्ज म्हणून वापरावयास देते व त्यासाठी व्याज आकारते. या व्याजातील पैशातून बँक मूळ ठेवदारास व्याज देते. घरी रोख रक्कम ठेवण्यापेक्षा सुरक्षित रहावे म्हणूनही पैसे बचत खात्यात ठेवले जातात.

ग्राहकाने आपली ओळख पत्रे आणि पत्त्याचा पुरावा बँकेला अर्जासोबत देऊन बचत खाते उघडता येते. बचत खाते उघडल्यास ग्राहकाला धनादेश (चेक बुक) , ए टी एम कार्ड, नेट बँकिंग अशा अनेक सोयी उपलब्ध होतात. ग्राहक आपले पैसे हवे तेव्हा काढून घेऊ शकतो तसेच धनादेश , आर टी जी एस, एन इ एफ टी असे मार्ग वापरून इतरांना आपले पैसे देऊ शकतो.

बचत खात्या बरोबर मिळणाऱ्या विविध सोयीसाठी ग्राहकाला वेगवेगळे शुल्क द्यावे लागते. काही वेळा ग्राहकाच्या खात्यावर मोठी रक्कम शिल्लक असेल तर बँका हे शुल्क माफ करू शकतात.

बचत खाते उघडण्या साठी काही किमान रक्कम आपल्या खात्यात ठेवावी लागते. अशी किमान रक्कम खात्यात न ठेवल्यास बँक अशा ग्राहकास दंड करू शकते.

जन धन योजने अंतर्गतभारत सरकारने शून्य किमान रक्कम आणि कुठलेही शुल्क नसलेली बचत खाती उघडण्याची सोय भारतीय जनतेला करून दिली. या योजने अंतर्गत कोट्यावधी बचत खाती उघडली गेली.

बचत खात्याला नामनिर्देशन करण्याची सोय उपलब्ध आहे.

खातेपुस्तक[संपादन]

बँकेत बचत खाते असणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या खात्यावरील व्यवहारांची माहिती देणारे "खाते पुस्तक" दिले जाते. खातेपुस्तकात खातेदाराचे नाव, पत्ता, खात्याचा क्रमांक, खात्याचा प्रकार, बँक शाखेचा पत्ता, शाखेचा IFSC आय एफ एस सी कोड, पेन्शन ऑर्डर क्रमांक असे तपशील पहिल्या पानावर असतात. खाते पुस्तकावरील इतर पानावर व्यवहारांची माहिती उदा. तारीख, तपशील, रक्कम, धनादेश क्रमांक, जमा कि नावे आणि व्यवहारानंतर खात्यातील शिल्लक रक्कम असते.

खाते पुस्तक हरवले तर बँकेला अर्ज करून नवीन खातेपुस्तक मिळू शकते. या साठी काही शुल्क भरावे लागते. काही वेळा ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी पैसे काढताना खाते पुस्तक बरोबर असणे सक्तीचे केले जाते. गैर व्यक्तीने खात्यातील पैसे काढू नयेत या साठी हे आवश्यक आहे.

खाते उतारा आणि खाते पुस्तक यांचा उद्देश एकाच आहे, ग्राहकाला त्याच्या खात्यातील व्यवहारांची माहिती होणे. खातेपुस्तक ग्राहक कधीही भरून घेऊ शकतो व त्यामुळे व्यवहारांची माहिती क्षणात होऊ शकते. खाते उतारा हा ठराविक कालावधी नन्तर दिला जातो.

बचत खात्यावरील व्याजाची मोजणी[संपादन]

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे ग्राहकाच्या खात्यावर रोज दिवसाखेरी शिल्लक असणाऱ्या रकमेवर ठराविक दराने व्याज दिले मोजले पाहिजे. व्याजाचा दर सर्व बचत खाते ग्राहकांना समान असावा असा रिझर्व्ह बँकेचा दंडक आहे. जमा रकमेवरील व्याजाची रक्कम दर तीन महिने किंवा दर सहा महिन्यांनी देण्याची मुभा बँकांना आहे.

जर खात्यामध्ये नावे रक्कम असेल म्हणजेच खात्यामध्ये ओव्हर ड्राफ्ट असेल तर व्याजाची रक्कम दर महिनाअखेरीस वसूल करता येते. नावे रकमेवरील व्याजसुद्धा दर दिवसा अखेरीच्या नावे रकमेवर मोजले जाते.