कोकणी, कोकणा समाज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कोकणा समाजाचे महाराष्ट्रातील वास्तव्य नाशिक, ठाणे, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये आहे, तर गुजरात राज्यात डांग, नवसारी, धरमपूर, सुरत या जिल्ह्यांमधून वास्तव्य करणाऱ्या कोकणा एक आदिवासी समाज आहे.[१] प्राध्यापक बी. ए. देशमुख यांच्या मतानुसार रत्‍नागिरी परिसरात, समुद्र किनारपट्टीला लागून आर्य येण्यापूर्वी 'कुंकण' नावाचे नागकुल वास्तव्य करीत होते. ते मोठे पराक्रमी कूल होते आणि या 'कुंकण' कुलाच्या काहीतरी चिरस्मरणीय कामगिरीमुळेच या प्रांताला 'कोंकण' हे नाव पडलेले असून, कुंकण कुलाचे वारसदार म्हणजे आजचे कोकणा- कोकणी आदिवासी असावेत. आज बरेच कोकणा हे शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सामील झाले आहेत.[२]

सामाजिक जीवन[संपादन]

कोकणां-कोकणी आदिवासी समाज हा प्राचीन आदिम संस्कृतीचा महत्त्वपूर्ण समाज आहे आणि त्याचे सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय जीवन वैशिष्ट्यपूर्ण आहे. याशिवाय जमिनीच्या मालकी मुळे कोकणांचा सामाजिक दर्जा उच्च राहिला आहे. आर्थिक-सामाजिक स्तर उंच असल्यामुळेच कोकणा आदिवासी इतर आदिवासी जमातींपेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजतात. कोकणा जमातीची एकूण लोकसंख्या विचारात घेता कोकणा ही महाराष्ट्रातील प्रमुख आदिवासी जमात आहे हे लक्षात येते.[३]

धर्म आणि सांस्कृतिक जीवन[संपादन]

सर्वसाधारणपणे आदिवासी जमातींमध्ये आढळून येणाऱ्या धर्मश्रद्धा व धर्माचरण कोकणा जमातीतही दिसून येते. अलौकिक शक्‍ती व दिव्य प्राण्यांवरील विश्वास म्हणजे धर्म होय. जलदेवता, अग्निदेवता, प्राणिदेवता यांसारख्या निसर्गदेवता बरोबरच देवदेवता व पिशाच्च योनीवरही कोकणांचा विश्वास आहे. कोकणा मुख्यतः निसर्गपूजक आहेत. त्यामुळे त्यांची दैवते आणि श्रद्धास्थाने सुद्धा निसर्गाधिन असतात. कोकणा बऱ्याच वर्षापासून शेतीवर स्थिरावल्यामुळे शेत पिकवणारा पाऊस हा सर्वश्रेष्ठ देव आहे असे ते मानतात. धान्य देणारी 'धनतरी', शेताच्या कामी उपयोग पडणारी 'गावकरी' व जीवन जगविणारी 'कणसरी' अशा दैनंदित जीवन संबंधांवर आधारित यांच्या देव-देवता आहेत. कोणतेही शुभ काम, आर्थिक क्रियेची सुरुवात करताना देवदेवतांना प्रसन्न ठेवण्यासाठी पूजा-विधी केले जातात. कोकणाच्या सामाजिक-आर्थिक जीवनाचा पाया हा निसर्ग असल्यामुळे त्यांच्या धर्मसंकल्पना आणि दैवकल्पना या देखील निसर्ग या आधारावरच विकसित झालेल्या आहेत.[४]

डोंगरीदेव[संपादन]

डोंगर कपाऱ्यात किंवा गुहेत देवाचे वास्तव्य आहे आणि त्याची प्रसन्नता व खिन्नता याचा आपल्या जीवनातील आनंद आणि दुःख यावर परिणाम होतो या श्रद्धेने डोंगरी देवाची पूजा केली जाते. डोंगरीदेव उत्सव सर्व गाव मिळून साजरा केला जातो. गाव-पाड्यावरील प्रत्येक कुटुंबातील किमान एका व्यक्तीला या उत्सवात सहभाग घ्यायला लागतो. सत्तर-ऐंशी लहान-थोर माणसे एकत्र येऊन त्यांच्या कोकणी बोलीभाषेत देवगिते म्हणून गोलाकार फेर धरून नाचतात. या उत्सवात आराधनेसाठी विविध साधने वापरली जातात. मुख्यतः ध्वजनिशान, घुंगरू काठी, पावरी, टापरा, झेंडूची भरपूर फुले, नाचणीची रोपे आणि तांदळाचे दाणे इत्यादी साधने महत्त्वाची आहेत. हा उत्सव सर्व साधारणपणे आठ ते दहा दिवस सुरू असतो. शेवटी पौर्णिमेच्या आदल्या रात्री देव डोंगराच्या पायथ्याशी रान खळीवर जाऊन ते रात्रभर नाचतात, देवगाणी म्हणातात आणि पहाटे गड पूजा करून डोंगरावरून खाली उतरतात. या उत्सव काळात सहृदयता, सौहार्द, औदार्य, प्रामाणिकपणा, शिस्त, समूहजीवन, मनशुद्धी या सर्व गुणांचा आविष्कार होत असतो. कोकणांचा अशाप्रकारे सण महोत्सवातून, परंपरामधून मानवी जीवनमूल्ये आचरणात आणण्याचा प्रयत्न अतुलनीय आहे.

[५]


घर्यादेव ढाक वादन

आदिवासी कोकणी कोकणा समाजात विवाहापूर्वी कुलदैवतांचे लग्न लावण्याची प्रथा आहे. प्रत्येक कुलाचे स्वतंत्र असे मंडळ असते. हे सर्व करत असताना त्या ठिकाणी गावातील तसेच त्या कुळातील सर्व नातेवाईक उपस्थित असतात.


सर्व प्रथम मुलाच्या आई वडिलांच्या हस्ते कुलदैवतांची दूध आणि शुद्ध पाण्यात आंघोळ केली जाते. सर्व देवतांना एका देव्हाऱ्यात पायरी प्रमाणे रांगेत बसवले जाते. यामध्ये खंडेराव,बहिरम,वाघ देव,नाग देव,मुंडा देव,बानु,म्हाळसा,चांद देव,सूर्य देव,ईत्यादी देवदेवता असतात. या सर्वांची मांडणी अत्यंत काळजीपूर्वक केली जाते. एका पाटा वर देवांना ठेवल्यावर त्यांच्या चारही बाजूंनी शुद्ध पाण्याने भरलेले तांबे ठेवले जाते. नंतर या चारही तांब्यांना दोऱ्याने हळद लावून पाच वेगवेगळ्या कुळातील व्यक्तिच्या हस्ते गुंफले जाते. दोरा गुंफले असताना विशिष्ट अशा भागता कडून  मंत्र उच्चारला जातो.

                 

                      येळकोट येळकोट जय मल्हारचा घोष केला जातो.

यानंतर देवांच्या लग्नाची तयारी केली जाते. देवांना बाशिंग,नवे कापड,नारळ,सुपारी,नागेल पान,हळद कुंकू,धान्य वैगेरे चढवले जाते. सर्व उपस्थित मंडळींना अक्षदा वाटल्या जातात आणि देवांचे लग्न लावले जाते.


जागरण गोंधळ (वहि हा गाण्याचा प्रकार)

     आदिवासी कोकणी कोकणा समाजात लग्नाच्या आदल्या दिवशी संपूर्ण रात्र जागरण केले जाते. संपूर्ण रात्रभर देवतांचे गौरव पूर्ण अशा वाह्या म्हंटल्या जातात. प्रत्येक वहिला स्वतंत्र अशी चाल असते. त्याला ढाक या ढोलकी सारख्या वाद्याची साथ दिली जाते. यामध्ये प्रामुख्याने दोन गात केले जातात. एक गात नवीन वहि म्हणणारा असतो आणि दुसरा गात झिलक्या असतो. पूर्ण रात्र वेगवेगळी गाणी म्हटली जातात. यामध्ये बरीच गाणी ही प्रसंगांवर आधारित देखील असतात. जसे की देव्हारा घडवने,कुळातील मंडळी एकत्र बसुन देव घडण्याचे विचार करणे,देणगी जमा करणे,सोनाराकडून देव घडवने (देवांची टाक),देव पालखीत बसवणे,सोयऱ्याच्या घरी देव आणणे,ज्या कुळातील देव आहे तिथे मंडप तयार करणे,देव सोयऱ्याच्या घरून पालखीत बसवून जिथे दगडावर देवांचे चित्र कोरले (पाटलि) तिथे देव भेटवने,तिथून देव मंडळात आणणे आणि जसे ही वहि चालू होते तसे ज्याला पिढीचा वारा येतो तो वारा खेळवतो,नंतर पिढीला देव्हारात बसविण्याची वहि लावतात (देवाला खारीक लागेव माय करू तरी काय, देवाला डाळी-पोहू लागेव माय करू तरी काय!),नंतर सूर्य देव रथावर बसुन येतो ही वहि लावतात (पहाटेच्या वेळी),(नंतर भगत हात पाय धुऊन देव्हारा जवळ बसतो,त्याच्या बाजूला होकाऱ्या बसतो) हनुमानची वहि चालू होते आणि जस हनुमान मूर्तीच्या पायाचा नख टोचतात तस वारा येतो आणि मूर्तीचा मुख फोडल्यावर (तोंड घडव ताना) हाक फुटते (हाऊ पायऱ्यानी ........ माऊली),नंतर एक-एक करून देवांचे नाव घेतात (कंसरा वळता झाली व,धंसरा वळता झाली व!),नंतर एक-एक करून सोयऱ्या-सोयरींन,वडिल-वडळींन यांचे एक-एक करून नाव घेऊन त्यांना भात व मोहाची दारू चढवता (भगत:- हाऊ महादू भोया,हाऊ सहादु भोया,हाऊ मंडळ म खेळाला उनाव हारं! होकाऱ्या:- हाऊ मंडळ म येजोस! भगत:- हाऊ रं! होकाऱ्या:- हाऊ मंडळ शोभित करजो! भगत:- हाऊ रं! होकाऱ्या:- धन-धान्यला बरकत देजोस! भगत:- हाऊ रं! होकाऱ्या:- हाऊ पोरा म दगा नको करजोस! भगत:- नाही रं!),

शेवटी मुंज बाळची वहि लावतात, सोडव ढाक माय,सोडव ढाक माय! ही वहि लावून ढाक सोडतात.

       

       नंतर पिढीला आंघोळ घालतात. पिढीला बोकडाचे,कोंबड्यांचे नयवैद्य चढवण्यात येते. ते पाणलोट जेवतात. गाईच्या गोठ्यात एक कोंबडा मारतात. यांच्यात अशी मान्यता आहे की असे केल्यावर पूर्वज खुश होतात. धन-धान्य लाभते,शेतीला बरकत येते,गाई-ढोर यांचे रक्षण करतात. [6]

साहित्य[संपादन]

ललितेतर[संपादन]

  • ‘बदलाच्या उंबरठ्यावरील कोकणा आदिवासी’ - डॉ.गोविंद गारे
  • कोकणा-कोकणी इतिहास आणि जीवन - प्रा. बी. ए. देशमुख

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "कुंकणा: जाती और बोली" (PDF).
  2. ^ http://www.rasik.com/cgi_bin/display_book.cgi?bookId=b49316&lang=marathi
  3. ^ "Koknanche Samajik ani Arthik Adhyayan" (PDF).
  4. ^ "Kokananche Samajik ani Arthik Adhyayan" (PDF).
  5. ^ "डोंगरीदेव....... एक आदिवासी (कोकणी) सण/सोहळा" (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2021-08-23. 2020-04-28 रोजी पाहिले.