कोकणा जमात

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

कोकणा ही भारतातील एक अनुसूचित जमात असून प्रामुख्याने महाराष्ट्रातील नासिक, धुळेठाणे या जिल्ह्यांतून आढळते. डांग तसेच गुजरात, कर्नाटक, दादरा व नगरहवेली यांत या जमातीचे काही लोक राहतात. १९६१ च्या शिरगणतीप्रमाणे त्यांची लोकसंख्या ३,३०,५०८ होती. ही जमात कोकणातून घाटमाथ्यावर आली असावी, असे सर्वसाधारण मत आहे. जव्हार तालुक्यातील गंभीरगडच्या संरक्षणासाठी या जमातीचे लोक रत्नागिरीहून आणले गेले. १३९६ ते १४०८ या दरम्यानच्या दुष्काळात या जमातीने कोकणातून उत्तरेकडे स्थलांतर केल्याचेही सांगण्यात येते.

वर्णन[संपादन]

ही जमात निमभटकी आहे. फिरती शेती करण्याची पद्धत त्यांच्यात अद्यापि पहावयास सापडते. त्यास ते ‘आदर करणे’ असे नाव देतात. कोकणे प्रामुख्याने शेती व मजुरी करतात. ह्यांच्यात असगोत्र विवाही कुळी असून त्यांची नावे कुणबी, गामीत, गायकवाड, पवार , भोये, चौधरी, जाधव, बागुल, कोयर, महाला व राठोड अशी आहेत.

चालीरिती[संपादन]

मुलींचे विवाह वयाच्या १५ ते १८ व्या आणि मुलांचे १६ ते २० व्या वर्षी करतात. या जमातीत बहुपत्नीत्वाची पद्धत रूढ आहे आणि विधवाविवाहास त्यांची मान्यता आहे. प्रथम मुलाच्या वडिलांकडून मुलीस मागणी घातली जाते. वधूमूल्य देण्याची पद्धत असून गरीब मुलगा भावी सासऱ्याच्या घरी नोकरी करतो व मग त्याचे लग्न केले जाते. या पद्धतीस नाशिक जिल्यातील आदिवासी बांधव ‘घरतन्या’ असे म्हणतात. वेगवेगळ्या भागात या पद्धतीस वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते.

कोकणे लोक डोंगऱ्यादेव, कंसरा माता व वाघदेव यांची पूजा करतात.डोंगऱ्यादेव देव सण डोंगराला देव मानले जाते, या डिसेंबर महिन्यातील पौर्णिमेच्या आधी काही दिवस व्रत पाळले जाते. पौर्णिमेच्या दिवशी सर्व सगे सोयरे नातेवाईक यांना घरी बोलावून गावात सामूहिक रित्या कार्यक्रम केला जातो. अशा प्रकारे डोंगऱ्यादेव साजरा केला जातो.

गावाच्या वेशीजवळ एका दगडाची वाघदेव म्हणून प्रतिष्ठापना करून त्याला पूजतात व तेथे झेंडा लावतात. एका लाकडी खांबावर वाघाची मूर्ती कोरून त्यावर शेंदूर फासतात व त्यास वाघदेव म्हणतात. दिवाळीच्या सणातील पहिला सण म्हणजे बारस. या दिवशी वाघदेवाचे धार्मिक विधी करतात, व या दिवसापासून आदिवासींच्या दिवाळी सणाला सुरवात होते.

या जमातीमध्ये काही लोक मृतास जाळतात. संध्याकाळी स्मशानभूमीवर जाऊन अस्थी गोळा करतात व नंतर त्या जमिनीवर पाणी टाकतात. दहा दिवस मृत आत्म्याच्या नावाने सुतक पाळले जाते. नातलगांना दहाव्या दिवशी जेवण दिले जाते. वर्षअखेर मृताची प्रतिमा करून पूजतात.

संदर्भ[संपादन]

  • Enthoven, R. E. Tribes and Castes of Bombay, 3 Vols., Bombay, 1920-22.
  • फडके, डॉ. सुधीर, महाराष्ट्रातील आदिवासी आणि त्यांचे प्रश्न, पुणे, १९६३.
  • मराठी विश्वकोश
  • http://mr.vikaspedia.in/