होमिओपॅथी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

होमियोपॅथी ही एक औषधोपचाराची पद्धत आहे. तिचा शोध १७९० साली डॉ. सामुएल हानेमान ह्या जर्मन शास्त्रज्ञाने लावला. होमियोपॅथी समानाला समान बरे करते (लॅटिन: Similia Similibus Curenture ) ह्या तत्त्वावर आधारलेली आहे. म्हणजे लोखंडाने लोखंड कापावे, काट्याने काटा काढावा किंवा विषाने विष उतरवावे हे ते तत्त्व. म्हणूय या चिकित्सा पद्धतीला समचिकित्सा असेही म्हंटले जाते. या नियमानुसार, ज्या गोष्टीच्या सेवनाचा परिणाम म्हणून निरोगी माणसांमध्ये जशी लक्षणे उद्भवतात तशीच लक्षणे असलेल्या रोगात तीच गोष्ट औषध म्हणून देणे. याच तत्त्वावर ऍलोपॅथीमधेही अनेक रोगप्रतिबंधक लसी तयार केल्या जातात.

औषध

होमिओपॅथीचा शोध लावण्यापूर्वी सामुएल हानेमान याने केलेल्या प्रयोगांत त्याला बार्क ऑफ चायना म्हणजे सिंकोना नावाच्या वनस्पतीचा रस प्यायल्यावर स्वतःमध्येमलेरियाची लक्षणे दिसून आली होती. परंतु सिंकोना हे औषध मलेरिया रोग बरा करण्यासाठी वापरत असत. रसामध्ये घातलेले पाणी औषधाचे गुणधर्म स्मरणात ठेवून त्याप्रमाणे रुग्णास गुण देत असले पाहिजे असा हानेमानाने तर्क केला. त्यामुळे होमिओपॅथीमध्ये मूळ औषध किती सौम्य करायचे याला म्हणजेच औषधांच्या पोटेन्सीला (मात्रेला) महत्त्व असते.

सामुएल हानेमानाने त्यानंतर, समानाला समान बरे करते या तत्त्वावर आधारित औषधोपचाराची नवीन पद्धती होमिओपॅथी या नावाने अस्तित्वात आणली. होमिओपॅथी हा शब्द एका ग्रीक शब्दावरुन निर्माण झाला आहे. या शब्दाची फोड पुढील प्रमाणे होते. होमिओस म्हणजे सारखे आणि पॅथॉस म्हणजे रोग अथवा रोगलक्षणे. अनेक प्रकारच्या व्याधींमध्ये होमिओपॅथीच्या औषधांमुळे रोग्यास गुण आल्याचे दिसून येते. जे रोग अन्य औषधपद्धतीला दाद देत नाहीत ते रोग बरे करण्याचा दावा होमिओपॅथी करते.. उदा० संधिवातसांधेदुखी, मधुमेह वगैरे. होमिओपॅथीच्या औषधाची मात्रा फार कमी प्रमाणात वापरावी लागत असल्याने त्याचे दुष्परिणाम दिसत नाही - त्यामुळे ही उपचारपद्धती लहान मुलांसाठी चांगली आहे असे समजले जाते.

डॉ. सामुएल ख्रिस्तिआन हानेमान

स्वरूप[संपादन]

होमिओपॅथी ही उपचार पद्धती मनोरचनेवर काम करते. म्हणून होमिओपॅथीचे औषध देताना रोग्याचे व्यक्तिमत्त्व, आवडीनिवडी, सवयी आणि एकूण आरोग्य विचारात घेऊन उपचार केले जातात. प्रत्येक औषधाला स्वतंत्र अस्तित्व, रूपरंग व स्वभाव आहे आणि ते आपल्याशी सहरूप असलेल्या व्यक्तीला बरे करू शकते हे होमिओपॅथीचे मूळ सूत्र आहे. अर्थात, एकाच आजारासाठी दोन व्यक्तींना दोन तर्र्हेची वेगळी औषधे दिली जाऊ शकतात. म्हणजेच शारीरिक आजार बरा करण्यासाठी होमिओपॅथी मानसिक आरोग्य दुरुस्त करून मग शरीरावर काम करते. फार लहान मात्रेत असलेल्या होमिओपॅथीच्या औषधांत रोगनिवारणाची सुप्त शक्ती असते असे समजले जाते. एका रोग्यासाठी निवडावयाचे औषध रोगाच्या नावावर अवलंबून नसते तर ते रोग्याच्या संपूर्ण शरीरात होणाऱ्या बदलांवर अवलंबून असते; यासच सारखेपणाचा कायदा असे म्हणतात.

कायदे[संपादन]

 • सारखेपणाचा कायदा
 • एका वेळी एकच औषध, मिश्रण नाही, हा कायदा
 • जितका रोग जुना आणि गंभीर जितकी औषधाची मात्रा कमी, हा कायदा.
 • औषधे सिद्ध करण्याची खास रीत
 • रोगांचे चिरकालीन सिद्धान्त
 • आंतरिक शक्तीचा सिद्धान्त
 • औषधांच्या गतिशीलतेचा कायदा

तत्त्वे[संपादन]

 • काट्याने काटा काढणे या तत्त्वाप्रमाणे रुग्णाला ज्या प्रकारचा त्रास होतो आहे त्याच आजारांचे अंश थोड्या प्रमाणात रोग्याच्या शरीरात सोडून त्याची प्रतिकारशक्ती वाढवली जाते यामुळे रोगाशी प्रतिकार करण्याची क्षमता येते.
 • सूक्ष्म औषध देऊन जास्त परिणाम साधला जातो.
 • प्रत्येक व्यक्ती वेगळी असते व त्यामुळे प्रत्येकाला वेगळ्या उपचाराची गरज असते अशा तत्त्वावर उपचार केला जातो.
होमियोपॅथी औषधाच्या गोळ्या

संशोधन[संपादन]

मटेरिया मेडिका[संपादन]

बाराक्षार पद्धती[संपादन]

आक्षेप[संपादन]

होमिओपॅथीच्या ३०सी, २००सी यासारख्या औषधांपुढील क्षमतेच्या औषधात मूळ घटक सापडत नाही. त्यामुळे कुठल्याही वैज्ञानिक कसोटीत ही औषधपद्धती कधीही सप्रमाण सिद्ध होऊ शकत नाही. होमिओपॅथी ही आपल्या औषधांमध्ये कुठल्याही मूलभूत औषधी घटकांच्या अस्तित्वाचा कणमात्रही अंश असल्याचे सिद्ध करू शकत नाही यामुळे ‘प्लॅसिबो इफेक्ट’ म्हणून यावर आक्षेप घेतला जातो.

खंडन[संपादन]

इ.स. २००८ सालचे नोबेल पारितोषिक मिळवणाऱ्या डॉ. ल्यूक माँतेनर नावाच्या फ्रेंच शास्त्रज्ञाने जुलै इ.स. २०१०मध्ये असा शोध लावला की, एका द्रावणात जर कुठल्याही आजाराचे विषाणू किंवा जिवाणूंचे डिऑक्सिरायबोन्यूक्लिक आम्लाच्या (डीएनए)च्या असतील तर ते द्रावण एक प्रकारच्या हलक्या पद्धतीच्या विद्युत चुंबकीय लहरी त्या पाण्यात सोडते. या हलक्या प्रतीच्या विद्युत चुंबकीय लहरींमुळे त्या द्रावणातील आजूबाजूच्या पाण्यातील अणुरेणूंची रचना अतिसूक्ष्म संरचनेत बदलते. या शास्त्रज्ञाने असेही संशोधन केले की, हे उरलेले पाणीही मग अशाच प्रकारच्या हलक्या प्रतीच्या विद्युत चुंबकीय लहरी सोडते. यावरून असे अनुमान काढले जाते की, एखादे द्रावण जर कितीही पाणी मिसळून अतिविरळ करण्यात आले आणि त्या द्रावणातील मूलभूत गोष्टींचे डीएनए जरी दिसू शकले नाहीत, तरीही हे पाणी त्या मूलभूत घटकांच्या सर्व गुणधर्माचे अस्तित्व स्मरणात ठेवून त्या प्रकारच्या हलक्या प्रतीच्या विद्युत चुंबकीय लहरींच्या स्वरूपात दाखवू शकते. डॉ. ल्यूक माँटेनर यांनी ‘स्मरणात ठेवून हा शब्द वापरून या क्षेत्रात क्रांतिकारक माहिती सादर केली आहे. ऑक्टोबर इ.स. २०१० मध्ये भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबईच्या डॉ. जयेश बेल्लारे आणि त्यांचे विद्यार्थी प्रशांत चिक्रमाने यांनी मुंबईच्या आयआयटीमध्ये संशोधन करून असेच काही निष्कर्ष काढले. होमिओपॅथीच्या पोटेन्सी असलेल्या गोळ्यांमध्ये ते औषध ज्या मूलभूत घटकांपासून केलेले असते त्यांचा अतिसूक्ष्म अंश असतो आणि ते सिद्ध करता येऊ शकते. हा शोध निबंध इ.स. २०१० मध्ये प्रसिद्ध झाला.

शिक्षण[संपादन]

 • बॅचलर ऑफ होमिओपॅथी मेडिसिन ऍण्ड सर्जरी
केन्ट या लेखकाची होमियोपॅथी रेपर्टरी

संस्था[संपादन]

 • होमिओपॅथी परिषद
 • असोसिएशन फॉर रिसर्च इन होमिओपॅथी
 • होमिओपॅथीक एज्युकेशन अँड रिसर्च असोसिएशन (Homeopathic Education & Research Association) - मेलबर्न, ऑस्ट्रेलिया

इस्पितळे[संपादन]

 • रॉयल लंडन होमिओपॅथीक हॉस्पिटल

प्रशिक्षण[संपादन]

होमिओपॅथीचे शिक्षण देणार्‍या महाराष्ट्रातील संस्था[संपादन]

 • श्रीमती चंदाबेन एम. पटेल होमिओपॅथी कॉलेज, विलेपार्ले
 • येरला मेडिकल ट्रस्ट होमिओपॅथी कॉलेज, करी रोड मुंबई
 • विरार होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजीस, वीर सावरकर मार्ग, विरार, मुंबई
 • अहमदनगर होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, अहमदनगर
 • अण्णासाहेब कानसे होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, पुणे
 • अंतरा भारती होमिओपॅथिक मे. कॉलेज, नागपूर
 • दापोली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, दापोली, रत्नागिरी
 • धोंडू मामा साठे होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, पुणे
 • दिशा शिक्षण विकास केंद्र इ. बी. गडकरी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, कोल्हापूर
 • पं. जवाहरलाल नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ होमिओपॅथिक मेडिकल सायन्स, अमरावती
 • पी.एस.पी.एम. महिला होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, सोलापूर

हेही पाहा[संपादन]

अधिक माहिती[संपादन]

या उपचार पद्धतीवर मराठी भाषेत प्रतिसाद नावाचा चित्रपटही मराठी भाषेत निर्माण करण्यात आला आहे.

बाह्य दुवे[संपादन]