वेळ अमावास्या

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मूळ कर्नाटकी असणारा पण महाराष्ट्रातील उस्मानाबादलातूर येथे साजरा होणारा कृषिप्रधान उत्सव आहे वेळ अमावास्या.मार्गशीर्ष अमावास्येला हा उत्सव साजरा केला जातो.[[पेरणी]नंतर येणा-या सातव्या अमावास्येला हा उत्सव होतो.

भारतीय संस्कृती ही प्रामुख्याने कृषी संस्कृती आहे. सर्व प्राणिमात्रांची मूलभूत गरज म्हणजे अन्न. त्यामुळे मानवी जीवनात अन्न-धान्याचे महत्व अविवाद्य असल्याने आपल्या पूर्वजांनी त्यासंबंधी विशेष विचार केलेला आढळून येतो.

वेळ अमावास्या उत्सव दृश्य
वेळ अमावास्या पूजा

मार्गशीर्ष महिन्यात शुभदिवशी  स्नान करून त्यानंतर शेतक-याने आलेल्या पिकातील केवळ अडीच मुठी धान्य कापावे.शेताच्या ईशान्य कोप-यात गंध, फुले,धूप, नैवेद्य यांनी धान्याची पूजा करून मगच धान्य कापावे.[१]


विधीचे स्वरूप[संपादन]

गोल आकाराच्या मडक्यावर चुन्याने बोटे ओढली जातात.कुंकू, काव यांचेही पट्टे ओढले जातात आणि नंतर त्यात काठोकाठ आंबील भरतात.बाजरीचे मुटके, ज्वारीचे मुटके,पुरणपोळी , यांचा नैवेद्य केला जातो.शेतात पिकलेल्या पालेभाज्या शिजवून त्याचा गरगटा तयार केला जातो. शेतात आल्यावर शेतकरी आपल्या डोक्यावर घोंगड्याची खोळ घेतो आणि त्यात मडके झाकतो. तसे करून संपूर्ण शेताच्या बांधावरून शेताला फेरी मारली जाते. “काळ्या आईचं चांगभलं” असा पुकारा केला जातो. शेतात नैवेद्यासाठी केलेला काला फेकला जातो. नंतर एका झाडाखाली खड्डा करतात. तेथे माठाची पूजा करतात. माठातील आंबील,पुरणपोळी सगळे सेवन करतात.रिकामा माठ पांढरे फडके गुंडाळून खड्यात पुरतात. पाच खडे घेवून त्यांचीही पूजा केली जाते.

विधीमागील प्रतिकात्मकता[संपादन]

मातीचे मडके हे मानवी शरीराचे प्रतीक आहे. मडके मातीत गाडले जाते त्याप्रमाणेच माणूस गेल्यावर त्याची राखही मातीत पुरली जाते. पिके आणि भूमी यांना अन्न देण्याच्या प्रक्रिएचे प्रतीक म्हणून काला शेतात फेकला जातो. माठावरचे चुना,कुंकू हे रंग शुचिता आणि समृद्धीचे प्रतीक होत. काळी घोंगडी अंथरून घेण्यात जणू शेतकरी काळी माती अंगभर माखण्यात धन्यता मानतो असा आशय ध्वनित होत असावा असा याचा प्रतीकात्मक आशय सांगितला आहे.[२]

  1. ^ कृषी पराशर ग्रंथ
  2. ^ भोसले, द.ता. (२००१). “संस्कृतीच्या पाऊलखुणा”. पद्मगंधा प्रकाशन.