वेळ अमावास्या
वेळ अमावास्या (किंवा वेळा अमावास्या, मराठी ग्रामीण भाषेत येळवस) हा मूळ कर्नाटकी असणारा पण महाराष्ट्र मध्ये नांदेड धाराशिव,लातूर, सोलापूर आणि परळीचा उर्वरित भाग येथे साजरा होणारा कृषिप्रधान उत्सव आहे. [१]मार्गशीर्ष अमावास्येला हा उत्सव साजरा केला जातो. पेरणीनंतर येणाऱ्या सातव्या अमावास्येला हा उत्सव होतो.[२]भारतीय संस्कृती ही प्रामुख्याने कृषी संस्कृती आहे. सर्व प्राणिमात्रांची मूलभूत गरज म्हणजे अन्न. त्यामुळे मानवी जीवनात अन्न-धान्याचे महत्त्व अविवाद्य असल्याने आपल्या पूर्वजांनी त्यासंबंधी विशेष विचार केलेला आढळून येतो.
प्राचीन विधी
[संपादन]मार्गशीर्ष महिन्यात शुभदिवशी स्नान करून त्यानंतर शेतकऱ्याने आलेल्या पिकातील केवळ अडीच मुठी धान्य कापावे. शेताच्या ईशान्य कोपऱ्यात गंध, फुले,धूप, नैवेद्य यांनी धान्याची पूजा करून मगच धान्य कापावे.[३]
नैवेद्य
[संपादन]वेळामवस्याच्या आदल्या दिवशी रात्री भाकरी करतात. भाकरीला त्या दिवशी भाकर न म्हणता ‘रोडगा’ म्हणतात. त्याचबरोबर भाज्यांची मोकळी भजी, खीर,आंबील, सजगुरऱ्याचे (बाजरीचे) व ज्वारीचे उंडे, तिळाच्या भाकरी, भजी, शेंगदाण्याचे लाडू हे नैवेद्याचे पदार्थ करून ठेवतात. आदल्याच दिवशी सगळा भाजीपाला आणि ‘आळंदे’ खरेदी केले जाते. 'आळंदे' म्हणजे एक लहान बिंदगी (लहान मडके) आणि त्यावर झाकायला एक येळणी (खापराची प्लेट). या ‘आळंद्यात सकाळी घरातील एका माणसाने आंबील भरून शेतात घेऊन जायचे असा रिवाज आहे.
वर्षाच्या सर्व उत्सवांमध्ये वेळामावास्या हा एकमेव उत्सव असा आहे की, या उत्सवासाठीचा स्वयंपाक हा आदल्या दिवशी करतात जातो आणि दुसऱ्या दिवशी दिवसभर आनंदाने खातात.. काहीजण तर आंबील आणि तत्सम पदार्थ शेतातच ठेवून दोनदोन दिवस त्यावर ताव मारतात.
शेताचा प्रवास
[संपादन]पूर्वी बैलगाडीमध्ये हे सर्व साहित्य भरून घरचा सगळा लवाजमा याच बैलगाडीत धडधड आदळत आपटत मस्त सफर करत शेताला जायचा. आता मात्र सवडीप्रमाणे मोटारसायकल, ऑटोचा वापर केला जातो. काहीजण डोक्यावर डालगे (मोठे टोपले) घेऊन शेतात जातात. या दिवशी आपल्या कामानिमित्त बाहेगावी असणारी माणसे वेळामावस्याला मात्र आपापल्या गावी आवर्जून सहकुटुंब येतात आणि आनंदाने हा उत्सव एकत्र साजरा करतात.
शेतात आल्यानंतर एका झाडाखाली पाच पांडव मांडतात. त्यांना चुन्याने रंगवतात. त्यावर कडब्याच्या पाच पेंढ्या उभ्या करून एक सुंदर खोप (कोप) करतात. लाल शालीने ते बांधतातही. डालग्यातून साहित्य काढतात. पांडवासमोर हिरवे कापड ठेवून लक्ष्मीची पूजाही मांडतात. नैवेद्य म्हणून भजी, वांग्याचे भरीत, ऊस, पेरू, बोरे, शेंगदाण्याचे लाडू, आंबील, आंबटभात, ज्वारी आणि बाजरीचे उंडे ठेवतात. कोणतीही आरती किंवा मंत्र न म्हणता पांडवाची पूजा करतात. शेवटी नारळ फोडून अगदी साध्या पद्धतीने पूजा संपवतात, हा नैवेद्य एका माठात भरतात.
पूजा झाल्यावर
[संपादन]पूजाविधी झाल्यानंतर लगेच जेवणाची पंगत बसते. यात काल रात्री केलेल्या सर्वच पदार्थांचे आनंदाने सेवन केले जाते. या मजेव्या वनभोजनात शेजारी पाजारी, मित्रवर्ग, सगेसोयरे यांना आग्रहाचे आमंत्रण देऊन एकत्रित जेवण करतात. एखादी अनोळखी व्यक्ती जरी जवळून बांधाने जात असेल तर तिलाही आवर्जून बोलावतात. जेवायला नको म्हणले तर किमान आंबिलीचा थोडा स्वाद तरी घ्यायचा आग्रह केला जातो.
थंडगार बिंदगीतली आंबील पिली की, एक प्रकारची मस्त झिंग येते. ( झिंग म्हणजे नशा नाही!) जेवण करून, आंबिलीचा आस्वाद घेऊन झाडाखाली एक छान झोप घेतात. काहीजण शेताशेतांतील आमंत्रणाचा मान स्वीकारत फिरत असतात. अशी फिरस्तीचीही मजा वेगळीच असते.
या मार्गशीर्ष महिन्यात गहू, ज्वारी, करडई, हरभरा, वाटाणा, तुरी, ऊस ही रब्बीची पिके जोमात आलेली असतात. शेतात निसर्गाची उधळण झालेली असते. बोरांच्या झाडाला बोरे लगडलेली असतात. आंब्याला नुकताच मोहोर फुटायला सुरुवात झालेली असते होतो. वातावरणात गुलाबी गारवा असतो. जणू निसर्गाने हिरवा शालूच पांघरल्याचा भासच व्हावा अशी हिरवळ असते.जेवण झालं की, काहीजण झोका बांधून झोक्यावर हिंदोळे घेतात. मुली ‘भजी रोडगा, आंबट भात खिचडा’ असे म्हणत झोक्यावर झुलण्याचा आनंद घेतात. काही पुरुष, पोरे हातात कुऱ्हाड नाहीतर एखादा विळा घेऊन मधमाश्यांचे मोहोळ शोधायची मोहीम हातात घेतात. सोबत एखादी काडीपेटी आणि पांघरायला एखादे कापड. झाडाझुडपात नजर बारीक करून पाहात पाहात चालत राह्यले की अवघड जागी एखादे मोहाळ दिसते. मग सगळ्या युक्त्या प्रयुक्त्या वापरून पोरे मधमाशांचा हल्ला सहन करून ते शेवटी मधाचा गड्डा ओढून घेतात. आणि ताठ छाती करून ते मोहाळ घेऊन येतात. महाकष्टाने घेऊन झाडलेल्या त्या मोहाळाच्या गोडगोड मधाचा सर्व मिळून आस्वाद घेतात. आंबटगोड बोरे-ऊस तोडतात आणि खातात.
विधीचे स्वरूप
[संपादन]गोल आकाराच्या मडक्यावर चुन्याने बोटे ओढतात. कुंकू, काव यांचेही पट्टे ओढतात आणि नंतर त्यात काठोकाठ आंबील भरतात. बाजरीचे मुटके, ज्वारीचे मुटके, पुरणपोळी यांचा नैवेद्य करतात. शेतात पिकलेल्या पालेभाज्या शिजवून त्याचा गरगटा तयार करतात जातो, व एका मडक्यात भरतात. शेतात आल्यावर शेतकरी आपल्या डोक्यावर मडके घेतो व घोंगड्याच्या खोळीने झाकतो. तसे करून तो संपूर्ण शेताच्या बांधावरून “ओलगे ओलगे ..सालम पोलगे,पाची पांडव सहावी द्रौपदी. हर हर महादेव..हर भगत राजोss हारभलंss..!!!’च्या घोषात 'काळ्या आईचं चांगभलं” असा पुकारा करीत, शेताला फेरी मारतो. नंतर तो काला शेतात फेकतो. एका झाडाखाली खड्डा करतात. तेथे माठाची पूजा करतात. सगळेजण माठातील आंबील, पुरणपोळी आणि भज्जी यांचे सेवन करतात. रिकामा माठ पांढरे फडके गुंडाळून खड्यात पुरतात.[२] पाच खडे घेऊन त्यांचीही पूजा केली जाते.सर्व काही उरकून झाल्यावर एका छोट्याशा वाटी मध्ये दूध ठेवून त्याच्या खाली जाल (आग) लावून ते दूध ज्या दिशेने उत्त्तू जाईल त्या दिशेला उत्पन्न जास्त निघेल असे समजले जाते.
संध्याकाळी छोट्या मटक्यात दूध आणि शेवया शिजवतात. त्याला उतू येऊ देतात. ते दूध ज्या दिशेला उतू जाईल त्या दिशेला पुढील वर्षी चांगले पीक येईल असा समज असतो. थोड्या वेळात पेंढ्या पेटवतात. त्या पेटत्या पेंढ्या घेऊन पिकाच्या भोवती शेताला प्रदक्षिणा घालतात. यामुळे पिकांवर कसल्याही रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही असा समज असतो. काही ठिकाणी त्या पेंढ्या तशाच पेटत्या ठेवून गावात आणतात आणि मारुतीच्या देवळाला एक फेरी मारून मंदिरासमोर टाकतात. ज्यांची शेते दूर आहेत असे शेतकरी इथेच पेंढ्या पेटवतात आणि मंदिराला प्रदक्षिणा घालून तिथेच मंदिरासमोर टाकतात. शेतातली सर्व मंडळी सूर्यास्ताच्या वेळी दिवसभरात हा अनोखा आनंदोत्सव साजरा करून सुखासमाधानाने घरी येतात.
या दिवशी लातूर, धाराशिव, जिल्ह्यात शाळेला सुट्टी असते. वेळामावसेच्या पूर्वसंध्येला बसलाही खूप गर्दी असते. सर्वजण या दिवसासाठी रजेची मागणी करतात. जणू शेतकऱ्यांसाठी हा सणांचा राजाच असतो. येळवशीची भजी दोन दिवस पुरवून खातात. भज्यांमधे वाटाणे, दूध, तुर, मेथी, कोथिंबीर, गाजर, वांगे,आले,लसूण यांचे सुरेख मिश्रण असल्याने ती चविष्ट असतातच मग ती एकमेकांना भेट देऊन, बायका एकमेकींचे कौतुक करतात. कर्नाटकातली सून असेल तर पातळ पापडासारख्या बाजरीच्या भाकरी असतात.
विधीमागील प्रतिकात्मकता
[संपादन]मातीचे मडके हे मानवी शरीराचे प्रतीक आहे. मडके मातीत गाडले जाते त्याप्रमाणेच माणूस गेल्यावर त्याची राखही मातीत पुरली जाते. पिके आणि भूमी यांना अन्न देण्याच्या प्रक्रियेचे प्रतीक म्हणून काला शेतात फेकला जातो. माठावरचे चुना,कुंकू हे रंग शुचिता आणि समृद्धीचे प्रतीक होत. काळी घोंगडी अंथरून घेण्यात जणू शेतकरी काळी माती अंगभर माखण्यात धन्यता मानतो असा आशय ध्वनित होत असावा असा याचा प्रतीकात्मक आशय सांगितला आहे.[४]
अन्य
[संपादन]ग्रामीण भागात काही ठिकाणी या पूजेनंतर संध्याकाळी पतंग उडवतात. तर काही शक्ति-प्रदर्शनाचे खेळ खेळतात.[२]
संदर्भ
[संपादन]- ^ "चाऊर चाऊर चांगभलं… बळीराजाची आरोळी, वेळ अमावस्येनिमित्त शेतशिवार गजबजले". लोकसत्ता. १७.१७.२०१७. २६.१२.२०१९ रोजी पाहिले.
|access-date=, |date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[permanent dead link] - ^ a b c "वेळ अमावास्या". https://www.marathisrushti.com. २६.१२.२०१९ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); External link in|संकेतस्थळ=
(सहाय्य) - ^ कृषी पराशर ग्रंथ
- ^ भोसले, द.ता. (२००१). “संस्कृतीच्या पाऊलखुणा”. पद्मगंधा प्रकाशन.