जनकल्याण समिती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जनकल्याण समिती ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाद्वारे चालविलेली जनसेवा संस्था आहे. इ.स १९७२ सालच्या दुष्काळामुळे समाजाला आलेल्या अडचणींवर वेगवेगळ्या स्तरांवर सेवा कार्ये उभी करणे गरजेचे होते. त्यातून स्थायी स्वरूपाची सेवा कार्ये सुरू करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून जनकल्याण समितीचे काम सुरू झाले. ही संस्था दुष्काळ निवारणासाठी महाराष्ट्रात कार्य करते.

इतिहास[संपादन]

१९७२ च्या दुष्काळात रा.स्व. संघाच्या वतीने दुष्काळ विमोचन समिती या नावाने प्रथम जन कल्याण व मदतीचे काम करण्यात आले. त्यानंतर जनकल्याण समितीच्या कामाची सुरुवात झाली.

कार्याचे स्वरूप[संपादन]

 • आदिवासींच्या जीवनात आरोग्य - ग्राम आरोग्य रक्षक प्रकल्प
 • विकलांग कल्याण - बहुविकलांग मुलांसाठी लातूर शहरात विशेष शाळा
 • अल्पसंख्यक समुदाय पढो परदेश योजना
 • जनकल्याण समाजोन्नती अन्याय, भ्रष्टाचार निवारण समिती - कल्याण येथे कार्यरत
 • जनकल्याण समितीच्या सहकार्यातून जलयुक्त शिवारची कामे
 • महाराष्ट्रात पूर्वोत्तर राज्यातील मुलींचे असे १४ ठिकाणी शैक्षणिक प्रकल्प

दुष्काळ[संपादन]

 • दुष्काळ निवारण जलसंधारण कामे
 • शाश्वत जलस्रोत विकास कार्यक्रम

दुष्काळ निवारणाच्या कामासाठी केवळ भारतीय शासकीय यंत्रणेवर अवलंबून न राहता गावकऱ्यांच्या मदतीने गावागावांमध्ये काहीना काही कामे केली पाहिजेत, या विचाराने जनकल्याण समितीने दुष्काळ निवारणाची विस्तृत योजना २०१५ मध्ये तयार केली होती. दुष्काळग्रस्त गावांमध्ये आवश्यकतेनुसार जलसंधारणाची कामे, पशुधन वाचवण्यासाठी चारा वाटप, चारा डेपो, जनावरांच्या छावण्या, मागेल त्या गावाला पाण्याची टाकी आणि टॅंकरद्वारे पाणीपुरवठा अशा स्वरूपाची कामे जनकल्याण समितीने निश्चित केली होती. याश्ािवाय आवश्यकतेनुसार दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी अन्नपुर्णा प्रकल्प, पशुपक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था अशीही कामे समितीच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली.

२०१५ व २०१६ मधील कार्य[संपादन]

जनकल्याण समितीचे कार्य सद्य काळात दुष्काळ पिडीत भागात जास्त चालले. लातूर, (रेणा व मांजरा नदी पुनरुज्जीवन) बीड (तलवाडा तलावातील गाळ काढण्याचे काम), धाराशिव (उस्मानाबाद), संभाजीनगर (औरंगाबाद), परभणी, जालना, सोलापूर, सातारा, नगर, नाशिक आणि पुणे या अकरा जिल्ह्यांतील ३२५ गावांमध्ये समितीने विविध स्वरूपाची कामे केली. जनकल्याण समितीचे २०१६ मधील कार्य पुढील प्रमाणे

 • समितीच्या कामांचा ११ जिल्ह्यांतील ३२५ गावांना लाभ
 • जलसंधारणाची कामे १० जिल्ह्यांतील ३० गावांमध्ये
 • आठ जिल्ह्यांतील २७ गावांमध्ये चारा वितरण केंद्र
 • ५२ गावांमध्ये टॅंकरद्वारे पाणीपुरवठा
 • २७० गावांमध्ये पाण्याच्या टाक्यांचे वाटप
 • २०१६मध्ये महाराष्ट्र राज्यात जनकल्याण समितीची सुमारे १५०० प्रकल्प सेवाकार्ये

निधी संकलन[संपादन]

या कामांसाठी लागणारा निधी प्रामुख्याने शहरांमधून संकलित करण्यात आला. समितीच्या आवाहनाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि त्यामुळेच सुमारे सहा कोटी रुपयांचे निधीसंकलन झाले.

आरोग्य[संपादन]

पनवेल येथे या समितीचे अत्याधुनिक व अद्ययावत रुग्णालय आहे जे कमीत कमी शुल्क आकारून सर्वांच्याच उपचारांसाठी खुले आहे. या समितीचे फिरते रुग्णालयसुद्धा आहे, जे अगदी कानाकोपऱ्यांमधील पाडे शोधून तिथे जाऊन तिथल्या आदिवासींना विविध सेवा पुरवते. नगर, नाशिक व ठाणे या जिल्ह्यांत रक्तपेढ्या कार्यरत आहेत. सेरेब्रल पाल्सीच्या (बहुविकलांग) मुलांसाठी लातूरमध्ये ‘संवेदना’ नावाने प्रकल्पातून काम सुरू आहे. १५० ठिकाणी रुग्णोपयोगी साहित्य केंद्रे कार्यरत आहेत.

कोरोना काळातले कार्य[संपादन]

कोरोना काळात जनकल्याण समितीची आठ ठिकाणी कोविड केंद्रे कार्यरत होती. विविध ठिकाणी रुग्णांना २५ व्हेंटिलेटर्स आणि ४०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स उपलब्ध करून दिली गेली असल्याचे दिसून येते. मोठ्या प्रमाणात मास्क, सॅनिटायझर वाटप केले गेले. आवश्यकतेनुसार औषधे पुरवण्यात आली. अन्नपूर्णा प्रकल्पाअंतर्गत सरकारी दवाखाने|सरकारी दवाखान्यात]] आणि अन्य ठिकाणी रुग्णांच्या नातेवाईकांना दररोज जेवणाचे ३५० डबे पुरवण्यात आले आहेत. लॉकडाउनच्या काळात एक कोटी वीस लाख डबे वाटप करून नागरिकांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली. चार लोकांचे कुटुंब याप्रमाणे रोजच्या गरजेतील किराणा सामानाच्या २७ हजार किराणा किट्सचे वाटप करण्यात आले आहे.

शिक्षण[संपादन]

शाळेविषयी व अभ्यासाविषयी ओढ असलेले अनेक विद्यार्थी असतात, ज्यांना केवळ घरच्या परिस्थितीमुळे किंवा अपुऱ्या जागेमुळे नियीमत अभ्यास करता येत नाही व याचा त्यांच्या शैक्षणिक विकासावर वाईट परिणाम होतो. फिरत्या विज्ञान प्रयोगशाळेच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जाऊन मुलांना विविध प्रात्यक्षिके शिकवली जातात. अनेकदा आजूबाजूच्या गजबजाटामुळे, सततच्या भारनियमनामुळे किंवा प्रदुषणामुळेसुद्धा अनेक विद्यार्थी कष्टाळु व होतकरु असुनसुद्धा शालेय परिक्षांमध्ये, केवळ अपुऱ्या तयारीमुळे मागे पडतात. अशांसाठी समितीने पनवेल कोळीवाडयामध्ये मोठी अभ्यासिका बांधली आहे. ईशान्य भारतातील मेघालय, नागालँड, मणिपूर अशा भागांतील बाल व युवा मुलामुलींसाठी सहा वसतिगृहे कार्यरत आहेत.

पुरस्कार[संपादन]

जनकल्याण समितीच्या वतीने गेल्या पंचवीस वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात निःस्पृहपणे काम करणाऱ्या स्वयंसेवी व्यक्तींना श्रीगुरुजी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. ४५ वर्षे वयाच्या आतील समाजसेवींना स्वामी विवेकानंद युवा पुरस्काराने गौरवण्यात येते. जनकल्याण समितीच्या क्षेत्रात काम करणारे कार्यकर्त्यांना आणि कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यासाठी कै. आप्पासाहेब सोहनी पुरस्कार देण्यात येतो.


हे सुद्धा पाहा[संपादन]