औद्योगिक क्रांती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
स्पिनिंग जेन्नी - १७६४ साली जेम्स हारग्रीव्जने याचा अविष्कार केला. हे यंत्र औद्योगिक क्रांतीतील सर्वात पहिल्या आविष्कारांपैकी एक समजले जाते.
स्पिनिंग जेन्नी - १७६४ साली जेम्स हारग्रीव्जने याचा अविष्कार केला. हे यंत्र औद्योगिक क्रांतीतील सर्वात पहिल्या आविष्कारांपैकी एक समजले जाते.

इंग्लंडमध्ये प्रथम सुरू झालेल्या आणि नंतर सर्व युरोपभर पसरलेल्या उत्पादन साधने व प्रक्रियांत झालेल्या बदलाला औद्योगिक क्रांती असे म्हणतात. सर्वसाधारणपणे इ.स. १७५० ते इ.स. १८५० असा शतकभराचा कालखंड या क्रांतीच्या पहिल्या टप्प्याने व्यापला होता. औद्योगिक क्रांती म्हणजे हस्त उद्योगाकडून यांत्रिक उत्पादनाकडे झालेले संक्रमण होय अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकात बाष्प शक्ती आणि जनशक्ती यांचा उपयोग करून उत्पादनाच्या प्रक्रियेत यंत्रांचा उपयोग करण्यास युरोपमध्ये सुरुवात झाली औद्योगिक क्रांती घडून येण्यासाठी भांडवलशाहीचा विकास होणे आवश्यक होते वस्तूच्या किंमती कमी ठेवणे श्रमाचा मोबदला कमी देणे अधिक अधिक नफा मिळविणे अशी या भांडवलशाही व्यवस्थेची वैशिष्ट्ये होती इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती घडून येण्यासाठी अनुकूल पार्श्वभूमी तयार झालेली होती त्याठिकाणी लोखंड व कोळशाचे साठे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते दमट हवामानामुळे सुती कापड उद्योग याठिकाणी भरभराटीला आलेला होता इंग्लंडच्या ताब्यात वसाहतींचा मोठा प्रदेश उपलब्ध होता उत्पादनासाठी लागणारा कच्चामाल आयात करणे इंग्लंडला सहज शक्य झाले त्यानंतर मालवर प्रक्रिया करून पक्क्या स्वरूपात इंग्लंडच्या ताब्यातील वसाहतीत विकणे सुलभ झाले मिळणाऱ्या नफ्यातून मोठ्या प्रमाणात अतिरिक्त भांडवल उपलब्ध झाले या सर्व पार्श्वभूमीवर इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली या औद्योगिक क्रांतीचे भारतावर दूरगामी परिणाम झाले घरगुती उद्योगांचा त्रास झाला भारतातील कापड उद्योग मंदावला सरकारचे आर्थिक धोरण भारतापेक्षा इंग्लंडच्या हिताचे झाले रेल्वे वापरात आल्यामुळे युरोपियन राष्ट्रांचा माल भारतात खेडोपाडी नेणे सोपे झाले यातून भारताचे आर्थिक शोषण सुरू झाले

औद्योगिक क्रांतीचा इंग्लंडमधील प्रारंभ[संपादन]

इंग्लंडमधील लोह पोलादाचा कारखाना

औद्योगिक क्रांतीला आवश्यक असणारे मूलभूत घटक इंग्लंडमध्ये अस्तित्वात होते. इंग्लंडमध्ये प्रथम औद्योगिक क्रांतीला प्रारंभ झाला. इंग्लंडचे व्यापारी आशिया खंडात दूरवर पोहोचले होते. भारतात साम्राज्य विस्ताराच्या स्पर्धेत इंग्लंडने फ्रान्सचा पाडाव केला. त्याचप्रमाणे अमेरिकेतील वसाहतींमधून इंग्लंडला आमाप नफा व लूट मिळाली होती. इंग्लडने वसाहतींचे मोठ्या प्रमाणात आर्थिक शोषण करून भरपूर प्रमाणात संपत्ती मिळवली. या संपत्तीचा वापर इंग्लंडने आपल्या औद्योगिक विकासासाठी केला. ब्रुक ॲडम्स या इतिहासकाराच्या मते भारताच्या भांडवलावर इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीची उभारणी झाली होती.

याच सुमारास इंग्लंडमध्ये मोठ्या प्रमाणात वैज्ञानिक प्रगती सुरू झाली. इंग्लंडमध्ये उत्साही, धाडसी, कल्पक संशोधकांनी विविध शोध लावले. नवीन यंत्रे तयार केली. उदारणार्थ, जेम्स वॅटने बाष्पयंत्राचा शोध लावला, जॅार्ज स्टीफन्सनने रेल्वे इंजिनाचा शोध लावला. यांच्या शोधामुळे इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली. इंग्लंडमध्ये घडून आलेल्या औद्योगिक क्रांतीने संपूर्ण युरोप आणि आशिया खंडामध्ये परिवर्तनाला दिशा दिली औद्योगिक क्रांतीच्या परिणामस्वरूप वसाहतवादी स्पर्धा निर्माण झाली

इंग्लंडमधील नैसर्गिक अनुकूलता[संपादन]

औद्योगिकीकरणाला आवश्यक असणारी नैसर्गिक अनुकूलता इंग्लंडमध्ये होती. यंत्रेकारखाने उभारण्यासाठी लागणारी खनिजेदगडी कोळसा भरपूर प्रमाणात होता. त्याचा शास्त्रीय पद्धतीने वापर करून नवीन यंत्रसामग्री तयार करण्यात इंग्लंड अग्रेसर ठरले.

कापड व्यवसाय हा इंग्लंडमधील प्रमुख व्यवसाय होता. सोळाव्या शतकाच्या माध्यापासून इंग्लंडमध्ये कापड उद्योगाला चालना मिळाली होती. इंग्लंडमधील हवामान हे कापड व्यवसायाला अनुकूल होते. इंग्लंडच्या अमेरिकेतील वसाहातींमधून लांब धाग्याच्या कापसाचा पुरवठा इंग्लंडला सहजपणे होत होता. इंग्लंडमध्ये विशेषत्वाने कापड क्षेत्रात क्रांती झाली. इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीची सुरुवात कापड व्यवसायापासून होणे अपरिहार्य होते.

औद्योगिक क्रांतीचा प्रसार[संपादन]

इंग्लंडमध्ये सुरू झालेली औद्योगिक क्रांती थोड्याच कालावधीत युरोपात पसरली. इंग्लंडनंतर फ्रान्सजर्मनीत ही क्रांती घडून आली. फ्रान्स व जर्मनीने लोखंड, पोलाद व रासायनिक उद्योगाच्या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली. नेदरलॅंड, बेल्जियम, स्पेन या देशात उद्योगीकरणास सुरुवात होऊन तेथे औद्योगिकीकरणाचा वेग चांगलाच वाढला. युरोप बाहेर प्रथम अमेरिकेत औद्योगिक क्रांती झाली. अमेरिका अल्पावधीतच एक उद्योगप्रधान अर्थव्यवस्था म्हणून नावारूपास आली. रशियात औद्योगिक क्रांतीचा प्रसार उशिरा झाला.

आशिया खंडात ही क्रांती प्रथम जपान या देशात झाली. जपानने पोलाद, यंत्रे, रसायन उद्योगाच्या क्षेत्रात आश्चर्यकारक प्रगती केली. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला भारतात औद्योगिक क्रांतीची सुरुवात झाली. आज औद्योगिक क्रांती साऱ्या जगभर जाऊन पोहचली आहे.

औद्योगिक क्रांतीचे परिणाम[संपादन]

औद्योगिक क्रांती ही मानवी समाजाला काही बाबतीत वरदान तर काही बाबतीत शापही ठरली. क्रांतीचे परिणाम इष्ट आणि अनिष्ट असे दुहेरी स्वरूपाचे आहेत.

औद्योगिक क्रांतीचे इष्ट परिणाम[संपादन]

 • औद्योगिक क्रांतीमुळे कारखानदारींचा उदय झाला. कारखान्यातून कमी वेळात, कमी खर्चात, चांगल्या प्रतीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेणे शक्य झाले. उत्पादनात वाढ झाल्यामुळे सर्व लोकांना जीवनोपयोगी वस्तू स्वस्तात मिळू लागल्या. रोजगारात बरीच वाढ झाल्यामुळे सामान्य जनतेची क्रियाशक्ती वाढली. विविध वस्तू व स्वस्त भाव यामुळे सर्वसामान्य जनतेचे राहणीमान सुधारण्यास मदत झाली.
 • औद्योगिकीकरण झालेल्या राष्ट्रांची आर्थिक स्थिती चांगलीच सुधारली. प्रामुख्याने इंग्लंड व युरोपातील अनेक राष्ट्रे श्रीमंत झाली. त्यांनी इतर राष्ट्रांना आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आर्थिक साहाय्य केले.
 • औद्योगिक क्रांतीमुळे देशांतर्गत व आंतराष्ट्रीय व्यापार वाढला. जग एकच बाजारपेठ झाल्यामुळे कोणताही माल कोठेही मिळू लागला. त्यातून आंतराष्ट्रीय व्यापार वाढला. तसेच आंतराष्ट्रीय सहकार्याची भावना वाढीस लागली.
 • औद्योगिक क्रांतीमुळे नवीन शहरे उदयास आली. शहरे व्यापाराची व उद्योगधंद्याची केंद्रे बनली. खेड्यातील लोक रोजगार मिळवण्यासाठी शहराकडे जाऊ लागल्याने शहरातील लोकसंख्या भरमसाठ वाढली.
 • औद्योगिक क्रंतीमुळे वाहतूक व दळणवळणाच्या साधनांत प्रगती घडून आली. दळणवळणाच्या साधनांतील प्रगतीमुळे व्यापारवाढीस उत्तेजन मिळाले. लोकांचा एकमेकांशी जलद गतीने संपर्क होऊ लागला.
 • औद्योगिक क्रांतीमुळे शेतीच्या क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर होवू लागल्याने श्रमाची बचत झाली. अन्नधान्याचे उत्पादन वाढले.
 • औद्योगिक क्रांतीमुळे सर्वसामान्य माणसाचे जीवनमान सुधारले. कला व सांस्कृतिक अविष्कारांमध्ये सामान्य माणसांच्या जीवनाचे पडसाद उमटले. लघुकथा व कादंबरी या नव्या वाड्मयीन प्रकाराच्या उदयामुळे वाड्मय अधिक समृद्ध झाले. चित्रकलेत सामान्य माणसाचे जीवन वास्तवाने चितारले जाऊ लागले. पुढे विसाव्या शतकात चित्रपट कलेचाही विकास तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे प्रचंड प्रमाणावर होऊ लागला.

औद्योगिक क्रांतीचे अनिष्ट परिणाम[संपादन]

 • औद्योगिक क्रांतीमुळे सामान्य लोकांच्या जीवनात अनेक अडचणी निर्माण झाल्या. यंत्रामुळे घरगुती उद्योग बंद पडले. अनेक कारागीर बेकार झाले. मागणीपेक्षा कामगारांचा पुरवठा जास्त झाल्याने त्याचा फायदा भांडवलदारांनी घेतला. कमी वेतनात जास्त वेळ कामगारांना राबवून घेतले जाऊ लागले. पुरुष कामगारांपेक्षा स्त्री कामगारांना व मुलांना कमी पगार दिला जाई. कामगारांना कामावरून केव्हाही काढून टाकले जाई. अपघात झाल्यास कामगारांना नुकसान भरपाई दिली जात नसे. कामगार भांडवालदारांचे गुलाम बनले. बेकारी, अल्पमजुरी, सुरक्षा व्यवस्थेचा अभाव यांसारखे प्रश्न गंभीर बनले. कामगारांची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस खालावली. या उलट भांडवलदार, कारखानदार श्रीमंत झाले. समाजात आर्थिक विषमता वाढली.
 • औद्योगिकीकरण झालेल्या युरोपीयन राष्ट्रांनी व्यापारवाढीसाठी साम्राज्य विस्ताराचे धोरण स्वीकारले. त्यांनी आशिया, आफ्रिका खंडात साम्राज्य विस्तार करण्यास सुरुवात केली. त्यामुळे तेथील अनेक राष्ट्रांचे स्वातंत्र्य नष्ट झाले. साम्रज्यवादी राष्ट्रांनी या राष्ट्रांचे आर्थिक शोषण मोठ्या प्रमाणात केले. साम्राज्यवादी राष्ट्रे श्रीमंत बनली. वसाहतवादी राष्ट्रे गरीब बनली. श्रीमंत राष्ट्रे व गरीब राष्ट्रांतील आर्थिक विषमता वाढत गेली.
 • औद्योगिक क्रांतीमुळे नव्या शहरांमधून विविध नागरी समस्या निर्माण होवू लागल्या. खेड्यातून शहरांकडे येणाऱ्या लोकांची संख्या वाढली. शहरांची लोकसंख्या वाढल्यामुळे जागांची टंचाई, अपुरा पाणीपुरवढा, अपुऱ्या सोयी यांसारखे प्रश्न उद्भवले. अनारोग्य, गलिच्छ वस्त्या, प्रदुषण यामुळे भयावह परिस्थिती निर्माण झाली.
 • औद्योगिक क्रांतीमुळे राष्ट्रांचे एकमेकांवरचे परावलंबन वाढले, उदा. इंग्लंड अमेरिकेतून कापूस, कॅनडातून गहू यांसारख्या जीवनावश्यक वस्तू मागवत असे. एखाद्या राष्ट्रात राज्यक्रांती झाल्यास अथवा युद्ध सुरू झाल्यास आयात-निर्यात व्यापारास धोका उत्पन्न होई. त्यावर अवलंबून असणारे उद्योगधंदे धोक्यात येत. आयात होणाऱ्या वस्तूंची आवक थांबल्यास सामान्य माणसाला त्याची झळ लागे.
 • कामगारांच्या कुटुंबातील स्त्रिया आणि मुले यांना देखील पोटाकरिता कारखान्यात काम करणे भाग पडे. सर्वजण अतिश्रमाने थकून जात. त्यामुळे कौंटुबिक जीवनातील आनंद पूर्णपणे नष्ट झाला. खेड्यातून अनेक लोकांना रोजगारासाठी शहराकडे स्थलांतर करावे लागल्याने एकत्र कुटुंब पद्धतीचा ऱ्हास झाला. संसारातील दुःखे विसरण्यासाठी मजूर व्यसनांना बळी पडू लागले.

औद्योगिक क्रांतीचे पर्यावरणावरील परिणाम[संपादन]

औद्योगिक क्रांतीमुळे कारखानदारी उदयास आली. कारखानदारीमुळे जल प्रदूषण, हवा प्रदूषण, ध्वनी प्रदूषण घडून आले. हवेच्या प्रदूषणामुळे लोकांना श्वसनांचे विकार जडले. काही कारखान्यातून विषारी वायूंची गळती होऊन अनेक माणसे मृत्युमुखी पडली, विकलांग झाली. कारखान्यातून व शहरातून सोडलेले सांडपाणी नद्या, नाले, समुद्राच्या पाण्यात मिसळल्यामुळे पाणी दूषित झाले. त्यातून लोकांना अतिसार (गॅस्ट्रो), कावीळ, अर्धांगवायू यांसारखे आजार होऊ लागले. जलचर प्राणीजल वनस्पतींचे अस्तित्व धोक्यात आले. शहरे व कारखान्यांच्या वाढीतून घाणीचे साम्राज्य निर्माण झाले.

कचऱ्यांची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न गंभीर बनला. डासांचा प्रादुर्भाव वाढून मलेरिया, हिवताप यांसारख्या रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला. दरवर्षी अनेकांना प्राण गमवावे लागतात. कारखान्यात वापरण्यात येणाऱ्या ज्वालाग्रही पदार्थांचे स्फोट होवून जीवित व वित्तहानी मोठ्या प्रमाणावर घडून येते. औद्योगिक उत्पादनासाठी अणूऊर्जा वापरली जाते. अणुभट्यातून किरणोत्सर्गाची गळती झाल्यास त्याचे मानवी शरीरावर वाईट परिणाम घडून येतात. शहरातील वाहने, आणि कारखन्यांतून यंत्रांच्या आवाजातून ध्वनी प्रदूषण होते. त्यातून अनेक लोकांना बहिरेपणा येतो. उद्योगीकरणांच्या विकासासाठी खनिज संपत्ती, नैसर्गिक संपत्ती मोठ्या प्रमाणात वापरली जाते. यांची टंचाई भविष्यात निर्माण होण्याचा धोका आहे. उद्योगीकरणासाठी मोठ्या प्रमाणात जंगलतोड केली जाते. शेती उपयुक्त जमीन व शेतीचे पाणी वापरल्यामुळे शेतजमिनीचे क्षेत्र कमी होऊ लागले. पाण्याच्या प्रश्नावरून आंदोलने होऊन समाजात संघर्षाचे वातावरण निर्माण होते.