ओंगल गाय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ओंगल गाय
मूळ देश भारत
आढळस्थान पूर्व गोदावरी, गुंटुर, प्रकाशम किंवा ओंगोल, नेल्लोर तथा कुर्नूल जिल्हा
मानक agris IS
उपयोग दुहेरी हेतूचा गोवंश (शेतीकाम तथा दुधदुभते)
वैशिष्ट्य
वजन
 • बैल:
  ४३४ किलो (९६० पौंड)
 • गाय:
  ३८२ किलो (८४० पौंड)
उंची
 • बैल:
  १४७.४७ सेंमी
 • गाय:
  १३४.९४ सेंमी
आयुर्मान १८ ते २० वर्षे
डोके आखूड मान, मोठे त्रिकोणी डोके, भव्य कपाळ, मोठे टोकदार कान
पाय लांब, काटक आणि भरीव
शेपटी मध्यम, लांब काळा शेपूट गोंडा
तळटिपा
भारतातून परदेशात सर्वात जास्त प्रसारित झालेला गोवंश

ओंगल गाय हा शुद्ध भारतीय गोवंश असून, याचे मूळ आंध्रप्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यातील ओंगोल या गावातील आहे.[१] तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडूत कधीकाळी ही प्रजाती खूप प्रसिद्ध होती. विशेषकरून जलीकट्टू या खेळासाठी या प्रजातीचे सांड वापरले जात असत. यांच्या रोगप्रतिकारक शक्तीमुळे आणि मजबूत अंगकाठीमुळे या प्रजातीचे बैल शेतीकामासाठी अत्यंत उपयुक्त आहेत.[२]

शारीरिक रचना[संपादन]

हा गोवंश भरलेल्या अंगकाठीचा असून या बैलाचे वजन बऱ्याच वेळा ५०० किलोपर्यंत भरते. हा गोवंश पांढऱ्या रंगाचा असून बैल व सांड हे गाईपेक्षा मोठे व रुबाबदार असतात. या गोवंशाची मान आखूड, राखाडी रंगाची असून डोके मोठे आणि त्रिकोणी असते. या गोवंशातील गाईंचे कपाळ मोठे रुंद आणि भरीव असून त्यांचे डोळे मोठे आणि काळेभोर असतात. या गोवंशाचे कान मोठे असून टोकदार व आतून गडद राखाडी असतात. या गोवंशाचे शिंग मध्यम ते आखूड असून मुळाशी जाड असतात. शिंगांचा आकार मागे बाहेर वळलेला असून शेवटी टोकदार असतात. गायीचे शिंग थोडे पातळ असून बऱ्याचदा टोकाशी थोडे बाहेरून आत वळलेले असतात. शिंगांचा रंग काळा असतो.

या गोवंशाचे लांब मजबूत आणि मांसल पाय असून खूर आणि खुराभोवतालचा आणि पुढे सांध्यापर्यंतचा भाग गडद काळपट असतो. त्याचप्रमाणे गुढघेसुद्धा काळ्या रंगाचे असतात. पाठीवर मोठे मांसल कमनीय वशिंड असून वशिंडाचा रंग राखाडी असतो. शेपटी मध्यम लांबीची असून शेपुटगोंडा लांब, काळा आणि झुपकेदार असतो.

वैशिष्ट्य[संपादन]

आखूड मान, मोजक्या लांबीचे शिंग, डोळे, मान, कानाचा आतील भाग राखाडी रंगाचा आणि रुबाबदार चाल हे या गोवंशाचे वैशिष्ट्य आहे. हा गोवंश भारताबाहेर पूर्व आफ्रिका आणि मेक्सिकोत बुल फाईटसाठी मोठ्या प्रमाणात वापरला जातो.

राष्ट्रीय डेरी विकास बोर्डाच्या (NDDB) निकषानुसार हा दुहेरी हेतूचा गोवंश म्हणून ओळखला जातो[३]. ओंगल गायीची विशेष काळजी घेतल्यास हा चांगला दुधारू गोवंश ठरू शकतो.

हा गोवंश भारताबाहेर अमेरिका, नेदरलँड, मलेशिया, ब्राझील, अर्जेंटिना, कोलंबिया, मेक्सिको, पेराग्वे, इंडोनेशिया, वेस्ट इंडीज, ऑस्ट्रेलिया, फिजी, मॉरिशस आणि फिलिपाइन्ससहित अनेक देशात सर्वात जास्त निर्यात झालेला भारतीय गोवंश आहे. ब्राझील मधील नेल्लूर गाय आणि अमेरिकेतील ब्राह्मण गायीच्या निर्मितीतील हा एक प्रमुख गोवंश आहे.[४][५]

इ.स. १९६१-६२ मध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तेव्हा तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू व इतर
इ.स. १९८८ मधील आंध्रप्रदेशातील राज्य पुरस्कार मिळाला तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री एन.टी. रामाराव, केंद्रीय कृषिमंत्री बलराम जाखड व इतर
फिलिपाइन्समधील तपकिरी ओंगल गोवंश

भारतीय गायीच्या इतर जाती[संपादन]

भारतीय गायीच्या इतर विविध जातींची माहिती मिळवण्यासाठी येथे टिचकी द्या ― भारतीय गायीच्या विविध जाती

हेसुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ[संपादन]

 1. ^ Bajpai, Diti. "ये हैं भारत की देसी गाय की नस्लें, जिनके बारे में आप शायद ही जानते होंगे" (हिंदी भाषेत). ५ मार्च २०२१ रोजी पाहिले.
 2. ^ Bajpai, Diti. "क्या आपको भारत की इन 43 नस्ल की गायों के बारे में पता है?". www.gaonconnection.com (इंग्रजी भाषेत).
 3. ^ "Breeds | nddb.coop" (इंग्रजी भाषेत). ५ मार्च २०२१ रोजी पाहिले.
 4. ^ "Breeds of Livestock - Nelore Cattle" (इंग्रजी भाषेत). ३१ मार्च २०२१ रोजी पाहिले.
 5. ^ Important Breeds of Cattle and Buffalos in India.