विकिपीडिया:मासिक सदर/नोव्हेंबर २०१५
साम्राज्यवाद हा शब्द Imperium (इंपेरियम) या लॅटिन शब्दापासून निर्माण झाला आहे. हा शब्द साम्राज्य प्रस्थापित करण्याचे समर्थन करण्यासाठी वापरला जातो. विकसित राष्ट्राने अविकसित राष्ट्रावर आपले वर्चस्व प्रस्थापित करणे व अनेक वसाहती स्थापन करणे याला साम्राज्यवाद असे म्हणतात. साम्राज्यवादात एखादा बलाढ्य देश किंवा राष्ट्र दुसर्या कमकुवत देशाच्या मोठ्या भूभागावर अधिपत्य प्रस्थापित करून तो भूभाग आपल्या नियंत्रणाखाली आणतो. साम्राज्यवादासाठी बहुधा लष्करी बळाचा वापर केला जातो. नव्या भूभागांवर वसाहती स्थापन करणे हे देखील साम्राज्यवादाचेच उदाहरण आहे.
रोमन साम्राज्य, ब्रिटिश साम्राज्य, फ्रेंच वसाहती साम्राज्य, जपानी साम्राज्य, जर्मन साम्राज्य, रशियन साम्राज्य, ओस्मानी साम्राज्य इत्यादी साम्राज्य ही जगातील एकेकाळची आघाडीची साम्राज्ये होती. युरोपीय राष्ट्रांनी आशिया खंडातील भारत, चीन, जपान, म्यानमार, इंडोनेशिया, मलाया, फिलिपाईन्स, थायलंड या देशांवर विविध प्रकारे आपला साम्राज्यावाद लादला होता. त्यातून आशिया खंडात साम्राज्यवादास सुरूवात झाली. इ.स. १४९८ मध्ये वास्को-द-गामा हा पोर्तुगीज खलाशी आफ्रिका खंडाच्या दक्षिण टोकाला वळसा घालून भारताच्या पश्चिम किनार्यावरील कालिकत बंदरावर पोहचला. तेथील झामोरिन राजाकडून त्याने व्यापारी सवलती मिळवल्या. प्रारंभीच्या काळात भारताच्या राजकारणात पोर्तुगीजांना विशेष महत्त्व होते. पण एकाच वेळी धर्मप्रसार, सत्ताविस्तार आणि व्यापार या गोष्टी करण्याचा पोर्तुगीजांनी प्रयत्न केला, त्यामुळे त्यांना भारतात प्रबळ साम्राज्य निर्माण करता आले नाही. त्यांना केवळ गोवा, दमण आणि दीव या प्रदेशावरच समाधान मानावे लागले. पोर्तुगीजांच्या नंतर डच भारतात व्यापार करण्याकरिता इ.स. १५९५ मध्ये आले. डचांनीसुद्धा भारतात येवून व्यापाराला सुरूवात केली. पण व्यापाराच्या दृष्टीने त्यांनी आपले लक्ष आग्नेय आशियातील बेटांवरच केंद्रित केले. इ.स. १६२५ पासून फ्रेंचांनी भारतात व्यापार सुरू केला. पण फ्रेंचांना केवळ चंद्रनगर, पॉन्डिचेरी, कराईकल, यानम व माहे हे प्रदेशच हस्तगत करण्यात यश मिळाले. इंग्रजांनी इ.स. १६०० मध्ये भारताबरोबर व्यापार करण्याकरिता ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. इंग्रज भारतात आले तेव्हा उत्तर भारतात मोगलांची सत्ता होती. इंग्रजांनी इ.स. १६१५ मध्ये मोगल बादशहा जहांगीरकडून सुरत येथे वखार स्थापन करण्याची परवानगी मिळवली. सुरुवातीस ईस्ट इंडिया कंपनीने भारतात फक्त व्यापार करण्याचे धोरण अवलंबिले. औरंगजेब बादशहाच्या मृत्यूनंतर मुघल सरदारांच्या आपापसातील मतभेदांमुळे मोगल सत्ता कमकुवत झाली. या काळात भारतात राजकीय अस्थिरता निर्माण झाल्याने इंग्रजांनी भारताच्या राजकारणात लक्ष द्यायला सुरुवात केली.