Jump to content

मराठी भाषेचा इतिहास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून



  • ग्रांंथिक साधने
  • कोरीव लेख-शिलालेख,ताम्रपट;लोकसाहित्य,

प्रमाण साधने

  • शासकीय आदेश
  • शासकीय आदेश,
  • राजाने काढलेली फर्माने
  • आज्ञापत्रे,करारनामे,तहनामे
  • आपापसातील पत्रव्यवहार

दुय्यम साधने

तवारिखा,बखरी,पोवाडे,स्रोत्रे

ऐतिहासिक उत्पत्ती

[संपादन]

वेदपूर्वकालीन भाषा, वैदिक भाषा, संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश इ. भाषेच्या स्वरुपावरून प्रत्येक भाषेतील काही वैशिष्टे मराठी भाषेत दिसतात. त्यामुळे मराठी ही वेदपूर्वकालीन भाषेपासून, संस्कृतपासून, पालीपासून, प्राकृत भाषेपासून, महाराष्ट्री किंवा अपभ्रंश भाषेपासून तयार झाली असावी असा विचार अनेक अभ्यासक मांडतात मात्र त्यांच्यात एकमत अजूनही दिसून येत नाही.[]

मराठी भाषेच्या बाबतीत काही मते अशी-

वेदकालीन

[संपादन]
  • वेदकालीन ज्या बोलीभाषा होत्या त्यावरून मराठीचा जन्म झाला. या मतात भाषेच्या स्वभावाशी विसंगत भावाविशेष सापडतात. आणि इतर प्राकृत भाषेच्या रुपाशी जुळणारविशष सापडतात. पण एवढ्यावरून अभ्यासक तिला प्राकृत पासून निर्माण झाली असे मानण्यास तयार नाहीत. वेदकाळापासून इ.स.५०० - ७०० पर्यंत वेदकालीन प्राकृत भाषा समाजात वापरात नव्हत्या त्यामुळे हे मत योग्य वाटत नाही.

वेदकालीन ज्या बोलीभाषा होत्या त्यावरून मराठीचा जन्म झाला असे एक मत आहे. या मताचे कारण असे की, वेदात संस्कृत भाषेच्या स्वभावाशी विसंगत भावाविशेष सापडतात. म्हणजे वेदपूर्वकालीन भाषेत साधे स्वर, संयुक्त स्वर, आणि अर्धस्वर दिसतात. तिन्हीपैकी उच्चारदृष्ट्या अर्धस्वर हे प्रथमचे असावेत. अर्धस्वरापासून साधे स्वर आणि शेवटी संयुक्त स्वर असा क्रम आहे.हा क्रम संस्कृत भाषेमधे नाही, असे मत मांंडण्याचा प्रयत्न या विषयाचे अभ्यासक करतात.

तमिळ-मराठी भाषा संबंध

[संपादन]

मराठी भाषेचा ज्ञात इतिहास साधारणपणे हजार ते तेराशे वर्षांचा आहे. कन्नड आणि तेलुगू भाषा आणखी पाचशे वर्ष वरिष्ठ आहेत असे मानले जाते. मराठीच्या आधी प्राकृत-अपभ्रंश आणि महाराष्ट्री प्राकृत ह्यांचा वावर सुमारे १५०० वर्षे होता असे मानले तरी त्यापूर्वी महाराष्ट्रात कोणती भाषा बोलली जायची हा प्रश्न उरतोच. मराठी भाषेत त्या काळात असणारे जे स्थानिक द्रविड कुलोत्पन्न शब्द होते, ते आजही वापरात आहेत, "देशी" अशा अर्थाने भाषातज्‍ज्ञ त्यांचा उल्लेख करतात. डॉ.पां.दा. गुणे व भाषाशास्त्रज्ञ विल्सन ह्याने मराठीतील देशी शब्दांचे ॠण मान्य केले आहे. अनुलोम-प्रतिलोम पद्धतीने प्रत्येक मराठी शब्दाचा संबंध संस्कृतशी जोडणे तार्किक वाटत नाही, त्यामुळे भाषेचे जाणकार श्री.केतकर ह्यांचे मत संस्कृत देखील स्थानिक भाषांपासून तयार झाली असावी असे आहे, जे आत्यंतिक स्वरूपाचे वाटते.
भाषातज्‍ज्ञ विश्वनाथ श्री. खैरे ह्यांनी "संमत" सिद्धान्ताद्वारे मराठीचे मूळ तमिळ भाषेमध्ये शोधले असल्याचे त्यांनी द्रविड महाराष्ट्र, अडगुलं मडगुलं (पुस्तक) या पुस्तकांत सांगितले आहे. डॉ. श्री.ल. कर्वे ह्यांचेही मत तसेच आहे. तमिळ आणि जुनी मराठी (साधारणपणे सातशे ते आठशे वर्षापूर्वीची- संत ज्ञानेश्वरांच्या काळातील) ह्यांचे पदक्रम, व्याकरण, वाक्यरचना ह्यांत खूपच साम्य आहे. वापरात असलेले मराठी शब्द थोड्याफार फरकाने आजही तमिळमध्ये दिसून येतात. त्यामुळे फक्त संस्कृत आणि प्राकृत ह्याच भाषांच्या आरोपणांतून मराठीचा जन्म झाला हा तर्क योग्य वाटत नाही. तर त्या उलट खैरे ह्यांचा संमत सिद्धान्त अधिक स्वीकारार्ह वाटतो. (संमत=संस्कृत-मराठी-तमिळ).

संस्कृतपासून मराठी

[संपादन]
  • संस्कृतपासून मराठी भाषा निर्माण झाली असे एक मत आहे. संस्कृतपासून मराठी निर्माण झाली नाही कारण वर्णांने बदल, प्रयोगातील वेगळेपणा, उच्चारणातील फरक, वाक्प्रचार, इत्यादी बाबतीत दोन्हीही भाषेत खूप वेगळेपणा आहे. जे थोडेफार साम्य आहे ते पुरेसे नाही.

प्राकृतापासून मराठी

[संपादन]
  • प्राकृतापासून मराठी भाषा निर्माण झाली असे मत आहे. पण कोणत्या प्राकृत भाषेपासून याचेही नेमकेपणाने उत्तर मिळत नाही. संस्कृत,प्राकृत, अपभ्रंश या भाषेचे थोडे थोडे गुण दिसतात. पण याच प्राकृतपासून मराठी जन्माला आली असे म्हणता येत नाही. प्राकृत भाषेपासून आधुनिक भाषा तयार झाल्या आहेत जश्या शौरसेनीपासून हिंदी, सिंधी, अपभ्रंशीपासून गुजराती, तर बंगाली मागधीपासून. मराठी भाषेच्या बाबतीत असे म्हणता येत नाही. जेव्हा एखादी भाषा एखाद्या विशिष्ट भाषेपासून तयार झाली असे आपण म्हणतो तेव्हा तिचे मूळ भाषेच्या व्याकरणाचे सर्व रूपे स्वीकारलेली दाखविता आले पाहिजे. मराठीचे संदर्भात असे दिसते की, नामविभक्तीचा भाग मराठीने अपभ्रंश भाषेपासून तर आख्यात -विभक्ती क्रियापदाचे प्रत्यय वगैरे महाराष्ट्रीपासून घेतलेले दिसतात.

आधुनिक भारतीय भाषेत निरनिराळ्या प्राकृत भाषेच्या ज्या लकबी दिसतात त्यावरून त्या प्राकृत भाषेपासून ती आधुनिक भाषा निर्माण झाली असे समजले जाते. मराठीच्या बाबतीत असे ठामपणे म्हणता येत नाही.

मराठीपासून प्राकृत

[संपादन]

प्रा. हरी नरके यांनी नव्यानेच मांडलेल्या सिद्धान्ताप्रमाणे मराठी ही इसवी सनाच्या पूर्वीपासून असलेली भाषा आहे. त्यांच्या मते माहाराष्ट्री उर्फ प्राचीन मऱ्हाठी. हिच्यापासून शौरसेनी निघाली. शौरसेनीपासून कालांतराने मागधी व पैशाची या दोन भाषा निघाल्या. तेव्हा मागधी व पैशाची ही दोन्ही प्राचीन मराठीची नातवंडे होत. शौरसेनीची खरी आई म्हणजे प्राचीन मऱ्हाठी भाषा.

हालाच्या सप्तशतीतील काव्यही लोकवाङ्मय आहे. कुठल्यातरी राज्याच्या राजकवीने केलेले ते काव्य नसून महाराष्ट्रात प्रचलित असलेल्या लोकप्रिय काव्याचे ते संकलन आहे. त्यात राजांच्या दरबाराचे चित्र नसून गावगाड्याचे, पाटलाचे, पाटलाच्या सुनेचे म्हणजेच महाराष्ट्राच्या साध्या ग्रामीण जीवनाचे चित्र पाहायला मिळते. लीलावती ही अद्भुतरम्य कथा हाल या राजाबद्दल आहे. त्यातही महाराष्ट्राचा प्राण जे प्रतिष्ठान नगर(पैठण) व तेथील गोला उर्फ गोदावरी नदी व तीत नाहणाऱ्या, अंगाला हळद फासणाऱ्या महाराष्ट्र सुंदरीचे वर्णन आढळते. हा कवी आपल्या भाषेला 'मरहठ्ठ देसी भाषा' असे नाव देतो.

दुर्गा भागवतांनी राजारामशास्त्री भागवतांच्या संशोधनाचा निष्कर्ष सांगताना म्हणले आहे, की जुनी माहाराष्ट्री संस्कृतपेक्षा जुनी व खरी जिवंत भाषा आहे हे त्यांनी दाखवले आहे.

यांवरून महाराष्ट्री भाषा ही किमान अडीच हजार वर्षे जुनी, म्हणजे इसवी सनाच्या आधीच्या पाचव्या शतकाइतकी जुनी असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. म्हणजे ती कन्नड आणि तेलुगू यांच्यापेक्षा जास्त जुनी किंवा निदान तितकीच जुनी असली पाहिजे.

पाली

[संपादन]
  • पाली या या प्राकृत भाषेतील काही गोष्टी मराठी भाषेत दिसतात.बऱ्याच शब्दांची वर्णप्रक्रियेमुळे झालेली रुपे पाली भाषेत जशी आढळतात. तशी ती मराठी भाषेत दिसतात.

पाली : तृण, प्रावृष, पीडन, गूड मराठी: तिण, पाऊस, पिळणे, गूळ

पाली भाषेतील ळ हा वर्ण पाली आणि पैशाची भाषेशिवाय दुसऱ्या भाषेत नाही. 'ळ' हा वैदिक भाषेत आहे, तेथूनच तो दक्षिण भारतीय भाषांत गेला. मराठी आणि गुजराती याही भाषांत ळ आहे.

पैशाची

[संपादन]
  • पैशाची भाषा

पैशाची भाषा: ऊन, तहान, कान, रान, मराठी भाषा: उष्ण, तृष्णा,कर्ण,अरण्य पैशाच्या भाषेतील वरील शब्द आजही मराठीत दिसतात. पैशाच्या आणि काही प्राकृत भाषेत 'ण' नाही

मागधी

[संपादन]
  • मागधी भाषा

मागधी भाषेच्या काही खुणा मराठी भाषेत आढळतात. मागधी भाषेत 'र' आणि 'स' या बद्दल 'ल' आणि 'श' वर्ण येतात. 'ष्ट' बद्दल 'स्ट' आणि 'स्थ' बद्दल 'र्थ' येतो. जसे, मिसळ =मिशळ /मिश्र, केसर = केशर.

अर्धमागधी

[संपादन]

प्राकृत अर्धमागधीचे बरेच विशेष मराठी भाषेत आढळतात. अर्थमागधीची रुपे माहाराष्ट्रीशीही जुळतात. दीर्घ स्वर ऱ्हस्व करण्याची प्रवृत्ति मराठीने अर्थमागधी भाषेतून उचलली आहे. जसे, कुमर= कुमार

महाराष्ट्री

[संपादन]

महाराष्ट्री भाषेची बरीच वैशिष्ट्ये मराठीत दिसतात, महाराष्ट्रीय आख्यात विभक्तीचे बरेच प्रकार ही महाराष्ट्री भाषेतून स्वीकारली आहे. जसे, हत्तीस= हत्तिस्स, आगीस = अग्गिस, करीन = करिस्सामो, करिशील = करिस्सासि.

'मी' या सर्वनामाची सर्व रुपे महाराष्ट्रीच्या रुपाशी जुळतात. जसे अहस्मि = मी, आम्मि = मज, मए= मिया, म्या, मझतो = मजहुनि, मज्झ = मज. अनेकवचनी रुपे, अम्हे= आम्ही, अहमसुंतो = आम्हाहुनी, अहम= आम्हा.

अपभ्रंश

[संपादन]

अपभ्रंश भाषा:अपभ्रंश ही अभिरांची भाषा होती. [[[अभीर]]] जमात गुजरात, कोकण, विदर्भात स्थायिक झाली. मराठी काव्यात असणारी अन्त्य 'यमक पद्धती' अपभ्रंश भाषेपासून मराठीने स्वीकारली आहे.

संस्कृत

[संपादन]

संस्कृत भाषेपासूनही मराठीने काही बाबी स्वीकारल्या आहेत.

१) ऋ, ई, औ, हे वर्ण संस्कृतमधे आणि मराठी भाषेतही आहेत. प्राकृत भाषेत हे वर्ण नाहीत. २) ड; ञ हे नासिक्य वर्ण संस्कृतमधे आहेत. ते मराठीत आले. ३) अनेक संस्कृत शब्द मराठीने स्वीकारलेले आहेत. त्यातले अनेक तत्सम(संस्कृतच) आहेत आणि अनेक तद्भव(संस्कृत शब्दापासून बनलेले) आहेत.

मराठी ज्या प्राकृत भाषेपासून निर्माण झाली त्यासाठी एक दीर्घ कालखंड गेला असणार. पाली, शौरसेनी, महाराष्ट्री, वगैरे प्राकृत भाषा समाजात मान्यता पावल्या म्हणजेच त्या भाषेतून ग्रंथ निर्मितीही झालेली आहे. आधुनिक भाषा निर्माण झाल्यावर प्राकृत भाषेतून ग्रंथ निर्मिती होत होती इ.स.११०० पर्यंत अनेक ग्रंथ निर्माण झाले असावेत. निरनिराळ्या प्राकृत भाषेपासूनच पुढे मराठी भाषेची निर्मिती झाली. शौरसेनी भाषा बोलणारा राष्ट्रीक समाज, मागधी व महाराष्ट्री बोलणारा वैराष्ट्रीक समाज आणि आभीर समाज महाराष्ट्रात आले त्यातूनच मराठी भाषा बोलली जाऊ लागली.

सामाजिक इतिहास आणि मराठी भाषा

[संपादन]

सम्राट हर्षवर्धनाच्या काळात(इ.स. ७ वे शतक) चीनी प्रवासी ह्यु एन त्संग याने महाराष्ट्राचे (त्याचे त्या काळात वास्तव्य विदर्भात असावे.) असे वर्णन केले आहे :

"येथील लोक इतर हिंदुस्थानींपेक्षा (हर्षाच्या उत्तरेतील राजधानीतील लोकांपेक्षा)किंचित बुटके, वर्णाने सावळे पण काटक आणि सशक्त तब्येतीचे आहेत....... दिल्हे गिल्हे(दिहिल्ले -गिहिल्ले) अशी भाषा ते बोलतात.

आर्य आणि द्रविड

[संपादन]

मराठीची इतर आधुनिक भारतीय भाषांशी (विशेषतः इंडो-आर्यन भाषांशी) तुलना करून पाहिली तर त्यांच्यातही बरीच साम्यस्थळे आहेत असे कळते. अगदी बिहारची मैथिली ही भाषा, जी अर्धमागधीपासून निर्माण झाली असे मानले जाते, तीही व्याकरणदृष्ट्या मराठीला बरीच जवळ आहे. शिवाय त्या भाषेत खोपा वगैरे सारखे काही खास मराठी शब्द आहेत. ही एवढी साम्यस्थळे असण्याचे कारण या सर्व भाषांचे मूळ संस्कृत अथवा वैदिक संस्कृत असल्याने असावे, असे मानले जाते. हा शब्द द्रविड भाषेतून आला आहे.

मतभिन्नता

[संपादन]

मराठीचे भाषिक परिवर्तन

[संपादन]
  • संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश, महाराष्ट्री असे बदल होत मराठी भाषा बनत गेली. मराठीने संस्कृत भाषेतून अधिकाधिक शब्द घेतले. त्यांना तत्सम शब्द म्हणतात. अनेक मराठी शब्द संस्कृत शब्दांपासून थोडाफार बदल होऊन बनले. अशा शब्दांना तद्भव शब्द म्हणतात. याशिवाय मराठी भाषेने पाली, अर्धमागधी, हिंदी, फारसी, अरेबिक, तुर्की, उर्दू, इंग्रजी, पोर्तुगीज या भाषांतूनही बरेच शब्द घेतले. मराठीतले काही शब्द तर तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, गुजराती, ओरिया, बंगाली या भाषांमधूनदेखील आले. त्यामुळे संस्कृतपेक्षा मराठीचे वेगळेपण अधोरेखित होते. याउलट मराठी भाषेतून अनेक शब्द इंग्रजी, हिंदी, गुजराती आणि इतर भारतीय भाषांनी घेतले.

मराठी भाषा लोकांना आवडते; कारण ती काळाच्या ओघात स्वतःला बदलवून घेते. मूळ मराठी ही जणू काही संस्कृतच आहे.

ग्रंथ

[संपादन]

गाथा सप्तशती, लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, विवेकसिंधू, ज्योतिषरत्नमाला

शिलालेख व ताम्रपट

[संपादन]

अभ्यासकांना मराठीचा पहिला शिलालेख सापडला तो म्हणजे १) उनकेश्वराचा शिलालेख इ.स. १२८९ ला. आणि त्याहीपेक्षा मागे जातांना श्रवणबेळगोळचा शिलालेख इ.स. ९८३ ला. त्याही मागे अनेक मराठीचे उल्लेख, शिलालेख सापडतात अगदी इ.स. ६८०च्या ताम्रपटात 'पन्नास, आणि प्रिथवी' हे शब्द आहेत म्हणून ती मराठीची सुरुवात आहे असे मानणार अभ्यासक आहेत पण भाषातज्ज्ञांचे त्यावर एकमत होत नाही. त्याचबरोबर 'धर्मोपदेशमाला' (इ.स. ८५९) या ग्रंथात मराठी भाषेचा उल्लेख आहे. मराठी भाषा कशी आहे हे त्या दोन ओळीत सांगितले आहे.

सललयि-पय-संचारा पयडियमाणा सुवण्णरयणेल्ला ! मरहठ्य भासा कामिणी य अडवीय रेहंती !!

मराठी भाषा सुंदर कामिनीप्रमाणे असून ती अटवीप्रमाणे सुंदर गतीची, मदनाने भरलेली आणि चांगल्या वर्णाची आहे, असे मराठी भाषेचे कौतुक केलेले आहे. 'कुवलमाला' या ग्रंथाचे लेखक उद्योतनसुरी यांच्या ग्रंथात १८ भाषांचा उल्लेख येतो. ही अठरा भाषा बोलणारी माणसे कशी आहेत त्याचा उल्लेख त्यात येतो. पण केवळ 'मराठा' या उल्लेखाने मराठा म्हणजे मराठी बोलणारे असे म्हणणे जरा घाईचे होईल. प्राकृत भाषा बोली भाषा म्हणून लोप पावल्यानंतर देशीभाषा सुरू झाल्या या देशभाषा गुप्त राजांच्या काळात होत्या.

मराठी भाषेबाबत असे म्हणता येते की, मराठी भाषा ही कोणत्याही एका भाषेपासून सुरू झालेली नाही. महाराष्ट्री आणि अपभ्रंश भाषेचे उपकार मराठी भाषेवर अधिक आहेत. नारदस्मृतीत देशभाषांचा जो उल्लेख आहे तो 'मराठी' असा लक्षात घेतला तर मराठीचा उत्पत्तीकाळ इ.स. सनाच्या ५ व्या शतकापर्यंत मागे नेता येतो. प्रत्यक्ष मराठी वळणाचे शब्द इ.स. ६८०पासून शिलालेख आणि ताम्रपटात सापडतात.

२) कुडल जिल्हा सोलापूर येथे "वाछि तो विजेया होईवा ।।" असे कोरलेला शिलालेख सापडला आहे. याखाली शके ९४० अशी तारीख आहे.

मराठीच्या विकासाचे टप्पे

[संपादन]

उगम,पूर्वमराठी काळ

[संपादन]

आदिपर्व

[संपादन]

मराठीचे मध्ययुग

[संपादन]

अर्वाचीन

[संपादन]

आधुनिक

[संपादन]

भाषाशुद्धी चळवळ

[संपादन]

स्वातंत्र्यवीर सावरकर १९२३पासून १९३७पर्यंत रत्‍नागिरीला स्थानबद्ध होते. प्रत्यक्ष राजकारणात भाग घ्यायला त्यांना बंदी होती. तेव्हा त्यांनी समाजातील अंधश्रद्धा, कालबाह्य रूढी यांवर टीका करणारे पुष्कळ लेख 'किर्लोस्कर' मासिकातून लिहिले. १९२४मध्ये 'केसरीत' 'मराठी भाषेचे शुद्धीकरण' ही लेखमाला लिहिली. याच शीर्षकाची पुस्तिका नंतर प्रकाशित झाली.

ही लेखमाला सावरकरांनी रत्‍नागिरीत स्थानबद्ध असताना लिहिली असल्यामुळे आणि सावरकरांबद्दल सुशिक्षित समाजास आदर आणि कुतूहल वाटत असल्यामुळे त्यांच्या सांगण्याचा अनेकांवर प्रभाव पडला. भाषाशुद्धी करणे हे राष्ट्रकार्यच आहे. त्यामुळे आपण जरी राजकारणात भाग घेऊन इंग्रजी राजवटीचा प्रतिकार करू शकलो नाही तरी सावरकर सुचवितात त्याप्रमाणे आपल्या भाषेचे शुद्धीकरण करून त्या रूपाने इंग्रजीची हकालपट्टी करू शकतो अशी सावरकरांच्या अनुयायांची श्रद्धा होती.

अरबी-फारसी आणि इंग्रजी शब्दांच्या ऐवजी मराठी आणि संस्कृत शब्दप्रयोग करावेत असे विनायक दामोदर सावरकर व त्यांच्या अनुयायांचे मत होते. ही सावरकरांची भूमिका माधवराव पटवर्धनांनी थोड्या फरकाने म्हणजे शक्य तिथे संस्कृतसुद्धा टाळावे व मराठी शब्द वापरावे अशा स्वरूपात मांडली(जळगाव साहित्य संमेलन अध्यक्षीय भाषण १९३६).

भाषाशुद्धी भूमिकेच्या मर्यादासुद्धा विविध व्यक्तींनी व्यक्त केल्या तर काहींनी टीकाही केली. १९२७ च्या पुणे साहित्य संमेलनात श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनी भूमिका अशी घेतली की कोणतीही भाषा अन्य भाषासंपर्कापासून अलिप्त राहू शकत नाही. दीर्घकाळ एकमेकींच्या सहवासात आदान-प्रदान होणे ही स्वाभाविक क्रिया आहे. जे शब्द मराठीशी एकरूप झाले आहेत ते केवळ अन्य भाषांतून आले या कारणासाठी त्यांना बहिष्कृत करणे अव्यवहार्य आहे. मराठीत हवा, जमीन, वकील गरीब, सराफ, महाल, इलाखा, जिल्हा, मुलूख, मसाला, हलवा, गुलकंद, बर्फी, मुद्दा ,अत्तर, तवा ,तपशील, सरबत असे शेकडो अरबी-फारसी शब्द आले आहेत व ते मराठीचा एक भाग झाले आहेत. त्यांना मराठीतून काढून टाकणे अशक्य आहे.

प्राध्यापक श्री.के. क्षीरसागर यांचा विरोध अधिक तीव्र होता."खरी भाषाशुद्धी आणि तिचे खरे वैरी सावरकर आणि पटवर्धन" हा क्षीरसागरांचा आक्रमक शैलीतील लेख त्या वेळच्या सह्याद्री मासिकात प्रकाशित झाला, त्यामुळे बरीच खळबळ निर्माण झाली. 'सह्याद्री' आणि 'लोकशिक्षण' या त्यावेळच्या मासिकांमधून भाषाशुद्धीबद्दलची मतमतांतरे मांडणारे अनेक लेख प्रकाशित झाले.

प्रा. क्षीरसागरांच्या मते भाषाशुद्धिवाद्यांना क्लिष्ट आणि विकृत शब्द निर्मितीचा रोग जडला आहे. भाषाशुद्धीचे कारण पुढे करून हल्ली जो उठतो तो नवे शब्द बनवत सुटला आहे. यामुळे मराठीचे स्वाभाविक सौंदर्य बिघडत असून फारसी आणि इंग्रजी शब्दांचे उच्चाटन व्हायच्या ऐवजी त्यांची आठवण पक्की होत आहे.

गोल्डन मीन साठी 'सुवर्णमध्य' 'क्रोकोडाइल टियर्स' साठी 'नक्राश्रू'; 'रेकॉर्ड ब्रेक'ला 'उच्चांक मोडणे' हे किंवा असले शब्द म्हणजे शब्दाला शब्द ठेवून केलेली भाषांतरे होत. या भाषांतरित शब्दांमुळे मूळ इंग्रजी शब्दच कृत्रिम रूपाने मराठीत येत आहेत. सर्वसामान्य मराठी माणसालाही कोणता शब्द कोठे वापरावयाचा ते स्वभावतःच कळते. 'कमाल' शब्द त्याज्य आणि 'पराकाष्ठा' तेवढा स्वीकार्ह असे तो मानणार नाही.तर 'प्रयत्‍नांची पराकाष्ठा' आणि 'मूर्खपणाची कमाल' असा योग्य वापर तो करील.

परभाषांमुळे अधिक पर्याय उपलब्ध होतात. त्यामुळे सूक्ष्म अर्थच्छटा व्यक्त करायला त्यांचा उपयोग होतो हे मत गो.कृ. मोडक यांनीही मांडले आहे. अर्भक, संतान, संतती, मूल, बालक हे सगळे स्वकीय शब्द आहेत. पण कोणता शब्द कोठे वापरावयाचा याचे संकेत वेगळे आहेत. यात औलाद या परकीय शब्दामुळे आणखी भर पडली आहे. सह्याद्री मासिकासाठी एका विस्तृत लेखाद्वारा न.चिं. केळकरांनी भाषाशुद्धीचे स्वागत करूनही तिच्या मर्यादा स्पष्ट केल्या आहेत. त्यांच्या पद्धतीने युक्तिवाद करताना त्यांनी म्हणले आहे, 'तत्त्वात जिंकाल पण तपशिलात हराल'.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 'भाषाशुद्धी' या प्रश्नाची 'चळवळ' होण्यासारखी स्थिती उरली नसली तरी अनेक भाषिक प्रश्नांची गुंतागुंत वाढली आहे असे दिसून येते.

अभिजात भाषा

[संपादन]

मराठी भाषेचा इतिहास विचारात घेता ०३ ऑक्टोबर २०२४ रोजी भारतीय केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून घोषित केले आहे .[]

पुस्तके

[संपादन]

मराठी भाषेची ऐतिहासिक माहिती देणारी पुस्तके पुढील प्रमाणे

ललितेतर

[संपादन]

भाषा इतिहास

[संपादन]

भाषाविज्ञान

[संपादन]

समीक्षा

[संपादन]

ललित

[संपादन]

हे सुद्धा पहा

[संपादन]

मोडी लिपीतील असंख्य दस्तऐवज हे खाली दिलेल्या ठिकाणी संग्रहित केले आहेत.

बाह्य दुवे

[संपादन]
  1. ^ K.P.KULKARNI (2019-08-14). MARATHI BHASHA UDGAM VA VIKAS. Mehta Publishing House. ISBN 978-93-87319-68-4.
  2. ^ "मराठीला अभिजात दर्जा मिळाला म्हणजे काय झालं? निकष काय होते? कोणते फायदे मिळणार?". Loksatta. 2024-10-04. 2024-10-04 रोजी पाहिले.