Jump to content

सरस्वती महाल ग्रंथालय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सरस्वती महाल ग्रंथालयाची स्थापना शिवाजी महाराजांचे वंशज सरफोजी महाराज दुसरे यांनी तंजावर येथे केली. हे ग्रंथालय संपूर्ण जगातले मध्ययुगीन काळातील एक महत्त्वपूर्ण ग्रंथालय मानले जाते.या ग्रंथालयात ४९,००० ग्रंथ आहेत आणि सुमारे ४६,००० हस्तलिखिते संग्रहित केलेली आहेत. त्यातील काही प्राचीन असून भूर्जपत्रांवर व ताडपत्रांवर लिहिलेली आहेत. त्यात मध्ययुगीन काळातील वाल्मीकी रामायण, कंब रामायण व इतर पुरातन ग्रंथांच्या ताडपत्रावरील आवृत्त्या आहेत. कागदांवर लिहिलेल्या हस्तलिखितांमध्ये इसवी सन १४६८ मध्ये लिहिलेले भामती, भगवद्गीतेचे सर्वात लहान आकारातील हस्तलिखित, अंबर होसैनी या मुसलमान कवीने केलेले भगवद्गीतेचे मराठी निवेदनाचे हस्तलिखित, तत्त्व चिंतामणी हा बंगाली लिपीतील संस्कृत ग्रंथ यांचा समावेश आहे.

मराठी हस्तलिखिते

[संपादन]

इसवी सन १६७६ ते १८५५ च्या मराठा राज्यकाळात लिहिली गेलेली अनेक मराठी हस्तलिखिते या ग्रंथालयात जतन केलेली आहेत. त्यांची संख्या अदमासे १८५६ आहे. यात संतकवी रामदासी व दत्तात्रय मठातील विपुल साहित्य आहे. पुढे जेव्हा हे ग्रंथालय सर्वसामान्य जनतेसाठी खुले केले गेले त्यावेळेस अनेक मराठी पंडित व विद्वानांनी लिहिलेल्या १२२० हस्तलिखितांची या संग्रहात भर घातली गेली. आता त्यांची संख्या ३०७६ इतकी आहे.

यातील बरेचसे साहित्य महाराष्ट्रात उपलब्ध नसल्याने त्याला दुर्मिळतेचे एक वेगळेच महत्त्व प्राप्त आहे. माधव स्वामींचे रामायण, महाभारत, मेरु स्वामीचे अवधूत गीता टीका व रामसोहळा, मुकुंद स्वामींचे श्री रामकृपा विलास, राघव स्वामीचे आत्मबोध, आणि अनंत मुनी यांची भगवद् गीता यांचा या दुर्मिळ हस्तलिखितांत समावेश आहे.

याखेरीज तमिळ, संस्कृत, उर्दू हस्तलिखितांचाही या ग्रंथालयात समावेश आहे. मोडी लिपीतील राज्यकारभार विषयक दैनंदिनी, हिशेब, टिप्पणी, पत्र व्यवहार या सारखी लिखितेही या ग्रंथालयात जतन केलेली आहेत. याखेरीज मराठी भाषेतील आणि मोडी लिपीत लिहिलेल्या चार प्राचीन ताम्रपट्टिका या ग्रंथालयात दर्शनी ठेवलेल्या आहेत. तसेच येथे अनेक प्राचीन नकाशांचाही संग्रह केलेला आहे.

सध्या हे ग्रंथालय सर्वसामान्य जनतेसाठी खुले असून त्यातील संग्रहाचा संदर्भ कोश म्हणून वापर करता येतो.