भितरकनिका राष्ट्रीय उद्यान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भितरकनिका ( वित्रकर्णिका) राष्ट्रीय उद्यान हे भारतातील ओडिशा राज्यातील केंद्रपाडा जिल्ह्यात आहे. याचे एकूण क्षेत्रफळ ६७२ चौ.किमी. आहे. या राष्ट्रीय उद्यानाच्या बाजूने भितरकनिका अभयारण्य वसलेले आहे. याच्या पूर्वेला गहिरमाथा सागरकिनारा आणि सागरी अभयारण्य आहे. १६ सप्टेंबर १९९८ रोजी हे राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित केले गेले. या राष्ट्रीय उद्यानात ब्राह्मणी, बैतरणी, धामरा, पाठसाला या नद्यांमधून पाणी येते.

इतिहास[संपादन]

भितरकनिकाला मोठा सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा आहे. पूर्वी कनिका राजाचे हे शिकारीचे राखीव क्षेत्र होते. त्यामुळे शिकारीसाठी बांधलेले मनोरे व कृत्रिम तळी आपण जागोजागी बघू शकतो. भितरकनिका येथील जैवविविधतेसाठी आणि खारफुटीच्या वनस्पतींसाठी जागतिक पातळीवर प्रसिद्ध आहे.

वनस्पती सृष्टी[संपादन]

भितरकनिका हे खारफुटीचे जंगल असल्याने येथे सुंदरी(थेस्पिया) सारख्या विविध प्रकारच्या खारफुटी वनस्पतींच्या प्रजाती आहेत. भारतातील ही दुसऱ्या क्रमांकावर असलेली सर्वांत मोठी खारफुटी परिसंस्था आहे.येथील वन हे हेंतल वन म्हणूनही ओळखले जाते.

प्राणी सृष्टी[संपादन]

भितरकनिका येथे लांडगा, तरस, कोल्हा, खोकड, रानमांजर, रानडुक्कर, लाल तोंडी माकड, वानर, चितळ, सांबर, मुंगूस असे विविध जातीचे सस्तन प्राणी आढळतात.त्याशिवाय खाऱ्या पाण्यातील मगर, पाण घोरपड, अजगर, नाग यासह इतर अनेक साप हे सरीसृप वर्गातील प्राणी आढळतात.

भितरकनिका हे पक्ष्यांचे नंदनवन म्हणून ओळखले जाते. बगळ्यांच्या विविध जाती,करकोच्यांच्या विविध जाती, विविध जातींची वन्य बदके,तिरंदाज,खंड्या यासह अनेक जातींचे पक्षी येथे आढळतात. हिवाळ्यात हजारोंच्या संख्येने पाणपक्षी येथे स्थलांतर करून येतात तर पावसाळ्यात विविध जातींचे पाणपक्षी येथे घरटी बांधतात

धोका असलेल्या खाऱ्या पाण्यातील मगरी येथे सर्वात जास्त संख्येने आढळतात.

खास आकर्षण[संपादन]

जगातील सर्वांत मोठ्या आकाराची खाऱ्या पाण्यातील मगर(लांबी जवळपास २३ फूट), पाण घोरपड, गहिरमाथा या सागर किनाऱ्यावर दिसणारे ऑलिव्ह रिडले हे समुद्र कासव अशा दुर्मिळ प्रजाती येथील सर्वात मोठे आणि खास आकर्षण आहे. खंड्या या पक्ष्याच्या वेगवेगळ्या ८ जाती येथे आढळतात.

पर्यटन[संपादन]

येथे आपल्याला वनखात्याने परवाना दिलेल्या बोटीतून फिरावे लागते. याचे मुख्य प्रवेशद्वार म्हणजे खोला हे असून गुप्ती येथूनही प्रवेश दिला जातो. काही वर्षांपूर्वी येथे पर्यटन अजिबात नव्हते. परंतु आता मात्र परिस्थितीत बदल होत आहे. राज्य सरकार करत असलेल्या प्रयत्नांमुळे आता येथील पर्यटन थोडे वाढले आहे. येथील खोला ते डांगमल ही बोट सफारी पर्यटकांचे मोठे आकर्षण आहे. या सफारीत जैवविविधतेने नटलेली खारफुटी परिसंस्थेचा आपण आनंद घेऊ शकतो. ही सफारी शक्यतो सकाळी लवकर किंवा सूर्यास्ताच्या सुमारास करणे योग्य ठरते.

भितरकनिका राष्ट्रीय उद्यानात पोहोचण्यासाठी मार्ग[संपादन]

या ठिकाणाला भेट देण्याचा उत्तम कालावधी ऑक्टोबर ते एप्रिल हा आहे. पावसाळ्यात हे उद्यान बंद असते.

जवळील रेल्वे स्थानके - भद्रक, कटक आणि भुवनेश्वर

जवळील विमानतळ - कलकत्ता आणि भुवनेश्वर

जवळील मोठे गाव - चांदबाली

अंतर-

भुवनेश्वर ते खोला/गुप्ती प्रवेशद्वार- १६० किमी.

कटक ते खोला/गुप्ती प्रवेशद्वार- १४० किमी.

भद्रक ते चांदबाली- ६० किमी.

भद्रक ते जयनगर- ८० किमी.

खोला आणि गुप्ती या ठिकाणी जाऊन वनविभागाकडून उद्यानात प्रवेश करण्यासाठी परवानगी घ्यावी लागते. येथे सफरीसाठी वनविभागाच्या बोटी उपलब्ध असतात. याशिवाय जयनगर आणि चांदबाली येथे खासगी बोटीही उपलब्ध आहेत.

चित्रदालन[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]