आनंदीबाई गोपाळराव जोशी
आनंदीबाई गोपाळराव जोशी | |
---|---|
जन्म |
३१ मार्च, १८६५ कल्याण , महाराष्ट्र |
मृत्यू |
२६ फेब्रुवारी, १८८७ (वय २१) पुणे |
मृत्यूचे कारण | क्षयरोग |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
नागरिकत्व | भारतीय |
शिक्षण | एम.डी. |
प्रशिक्षणसंस्था | विमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेन्सिल्व्हेनिया |
पेशा | वैद्यकीय |
ख्याती | भारतातील पहिल्या महिला डॉक्टर |
धर्म | हिंदू |
जोडीदार | गोपाळराव जोशी |
स्वाक्षरी |
आनंदीबाई गोपाळराव जोशी (३१ मार्च, १८६५:कल्याण, - २६ फेब्रुवारी, १८८७:पुणे) या पहिल्या भारतीय महिला डॉक्टर होत्या.[१][२] २२ वर्षाच्या असताना त्या मरण पावल्या.
जीवन
[संपादन]आनंदीबाई जोशी यांचा जन्म ३१ मार्च १८६५ रोजी पुण्यात त्यांच्या आजोळी झाला. यांचे पूर्वाश्रमीचे नाव यमुना होते. जुन्या कल्याण परिसरातील पारनाका येथे राहणाऱ्या गणपतराव अमृतेश्वर जोशी यांच्या ज्येष्ठ कन्या होत्या.[३][४] वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह वयाने त्यांच्याहून २० वर्षांनी मोठे असणाऱ्या गोपाळराव जोशी यांच्याशी झाला. गोपाळराव जोशी हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील रहिवासी होते. लग्नानंतर गोपाळरावांनी आपल्या पत्नीचे यमुना हे नाव बदलून आनंदीबाई असे ठेवले. वयाच्या चौदाव्या वर्षी आनंदीबाईंनी एका मुलाला जन्म दिला, परंतु वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे मूल फक्त दहा दिवस जगले. आनंदीबाईंच्या जीवनात हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला. या घटनेनंतर त्यांनी डॉक्टर होण्याचे ठरविले. गोपाळरावांनी तिला मिशनरी शाळांमध्ये प्रवेश मिळावा म्हणून प्रयत्न केला. जोशी यांनी कलकत्त्याला बदली घेतल्यावर तेथे आनंदीबाई संस्कृत आणि इंग्लिश वाचणे आणि बोलणे शिकल्या.
गोपाळराव कल्याणला पोस्ट ऑफिसात कारकून होते. नंतर त्यांची अलिबाग येथे आणि नंतर कोलकाता येथे बदली झाली. ते एक पुरोगामी होते आणि त्या काळातही त्यांचा महिला शिक्षणाला पाठिंबा होता. आपल्या काळातील इतर पती आपल्या पत्नींना स्वयंपाक न केल्याबद्दल मारहाण करत, या उलट गोपाळराव हे आपल्या तरुण पत्नीला अभ्यास न केल्याबद्दल मारहाण करीत होते.[ संदर्भ हवा ], कारण पत्नीने वैद्यकीय शिक्षण घेऊन डॉक्टर बनावे असा त्यांचा आग्रह होता. ते स्वतः लोकहितवादींची शतपत्रे वाचत. आपल्या पत्नीला शिक्षणात रस आहे हे गोपाळरावांनी कळल्यावर लोकहितवादींच्या शतपत्रांमुळे ते प्रेरित झाले आणि आपल्या पत्नीस इंग्रजी शिकविण्याचे ठरविले.[ संदर्भ हवा ]
वैद्यकीय शिक्षण
[संपादन]आनंदीबाईंच्या वैद्यकीय शिक्षणाच्या बाबतीत गोपाळरावांनी अमेरिकेत काही पत्रव्यवहार केला. परंतु हे शिक्षण घेण्यासाठी ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याची अट होती आणि धर्मांतर करणे तर यांना मान्य नव्हते. पुढे गोपाळरावांची चिकाटीमुळे आनंदीबाईंना ख्रिस्ती धर्म न स्वीकारता १८८३मध्ये, वयाच्या एकोणिसाव्या वर्षी विमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेन्सिल्व्हेनियामध्ये प्रवेश मिळाला. तेथे गेल्यानंतर अमेरिकेतील नवीन वातावरण आणि प्रवासातील दगदग यामुळे आनंदीबाईंची प्रकृती खूप ढासळली होती. परंतु अमेरिकेतील कारपेंटर जोडप्याचे साहाय्य त्यांना लाभले.[ संदर्भ हवा ]
सुरुवातीला तत्कालीन भारतीय समाजाकडून आनंदीबाईंच्या डाॅक्टर होण्याला खूप विरोध झाला. त्यावेळी आनंदीबाईंनी कोलकाता येथे एक भाषण केले. तेव्हा त्यांनी भारतामध्ये महिला डॉक्टरांची किती आवश्यकता आहे याचे प्रतिपादन केले, आणि हे स्पष्ट सांगितले की, मला यासाठी धर्मांतर करण्याची काही गरज नाही. मी माझा हिंदू धर्म व संस्कृती यांचा कदापि त्याग करणार नाही. मला माझे शिक्षण पूर्ण झाल्यावर भारतात येऊन महिलांसाठी एक वैद्यकीय महाविद्यालय सुरू करायचे आहे.[५]
आनंदीबाईंचे हे भाषण लोकांना खूप आवडले. त्यामुळे त्यांना होणारा विरोध तर कमी झालाच पण त्यांना या कार्यात हातभार म्हणून सबंध भारतातून आर्थिक मदत जमा झाली. भारताचे तत्कालीन व्हाइसरॉय यांनी पण २०० रुपयांचा फंड जाहीर केला.[ संदर्भ हवा ]
कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर अभ्यासक्रम दोनच वर्षांत पूर्ण करून मार्च इ.स. १८८६ मध्ये आनंदीबाईनी एम.डी.ची पदवी मिळवली. एम.डी.साठी त्यांनी ‘‘हिंदू आर्य लोकांमधील प्रसूतिशास्त्र’‘ या विषयावर प्रबंध लिहिला. एम.डी. झाल्यावर व्हिक्टोरिया राणीकडून त्यांचे अभिनंदन झाले. हा प्रवास करताना त्यांना गोपाळरावांचा पाठिंबा होता. तिच्या पदवीदान समारंभाला गोपाळराव स्वतः अमेरिकेत गेले होते. पंडिता रमाबाई यांनीसुद्धा या समारंभात भाग घेतला. एम.डी. झाल्यावर आनंदीबाई जेव्हा भारतात आल्यावर त्यांना कोल्हापूरमधील अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटलमधील स्त्री-कक्षाचा ताबा देण्यात आला.[ संदर्भ हवा ]
मृत्यू
[संपादन]वयाच्या विशीतच त्यांना क्षयरोग झाला होता. पुढे काही महिन्यातच म्हणजे २६ फेब्रुवारी, इ.स. १८८७ रोजी त्यांना पुण्यात मृत्यू आला.
केवळ २१ वर्षाच्या जीवनयात्रेत आनंदीबाईंनी भारतीय स्त्रियांसाठी प्रेरणादायी जीवनादर्श उभा केला.[६] दुदैवाने आनंदीबाईंच्या बुद्धिमत्तेचा आणि ज्ञानाचा फायदा जनतेला होऊ शकला नाही. मात्र 'चूल आणि मूल' म्हणजेच आयुष्य असे समजणाऱ्या महिलांना त्या काळात आनंदीबाई जोशी यांनी आदर्श व मानदंड घालून दिला. एकीकडे सावित्रीबाई व ज्योतिबा फुले स्त्रीशिक्षणासाठी प्रयत्न करत असतानाच आनंदी-गोपाळ हे जोडपे आपले ध्येय प्राप्त करण्यासाठी झटत होते. जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतेही मोठे काम अशक्य नाही हे या जोडप्याने समाजाला सिद्ध करून दाखवले आह असे म्हणता येऊ शकेल. समाजात राहून काम करायचे तर अडथळे येणारच.
स्वतः डॉक्टर होऊनही कुणा देशभगिनीवर उपचार करण्याची संधी आनंदीबाईंना मिळालीच नाही. तिकडे अमेरिकेत मात्र कारपेंटर यांनी आपल्या कुटुंबाच्या स्मशानात[७] त्यांचे लहानसे थडगे बांधले. त्यावर ‘आनंदी जोशी, एक तरुण हिंदू ब्राह्मणकन्या. परदेशात शिक्षण घेऊन डॉक्टर पदवी मिळवणारी पहिली भारतीय स्त्री’ अशी अक्षरे कोरून तिचे स्मारक केले.
लोकप्रिय संस्कृतीतील चित्रणे
[संपादन]चित्रपट
[संपादन]आनंदीबाई यांच्या जीवनाचा आढावा घेणारा "आनंदी गोपाळ" हा मराठी चित्रपट फेब्रुवारी २०१९मधे प्रदर्शित झाला.[८] दिग्दर्शक समीर विद्वांस. या चित्रपटाला पुणे फिल्म फाऊंडेशन आणि राज्य सरकार यांच्यातर्फे जानेवारी २०२०मध्ये आयोजित केलेल्या १८व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या मराठी विभागात पहिला पुरस्कार मिळाला आहे.
डॉक्युड्रामा
[संपादन]आनंदीबाई जोशी यांच्या संघर्षगाथेवर अंजली कीर्तने यांनी एक डॉक्युड्रामा तयार केला आहे. या लघुपटात दिलीप प्रभावळकर यांनी गोपाळराव जोश्यांची आणि अनुजा बिनीवाले व क्षमा खांडेकर यांनी आनंदीबाईंची भूमिका केली आहे. या लघुपटाला महाराष्ट्र सरकारचा सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार मिळाला आहे.[ संदर्भ हवा ]
नाटक
[संपादन]आनंदी गोपाळ हे राम जोगळेकर यांनी लिहिलेले मराठी नाटक आहे.
आनंदीबाईंबद्दलची पुस्तके
[संपादन]- कै.सौ. डॉ. आनंदीबाई जोशी यांचे चरित्र - काशीबाई कानिटकर[९]
- आनंदी गोपाळ - श्री.ज. जोशी यांनी लिहिलेली कादंबरी[१०]
- डॉ. आनंदीबाई जोशी : काळ आणि कर्तृत्त्व (अंजली कीर्तने)[११]
- आनंदी गोपाळ (मराठी नाटक, लेखक - राम जोगळेकर)
हे सुद्धा पहा
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ Walsh, Judith E. (2004). Domesticity in Colonial India: What Women Learned when Men Gave Them Advice (इंग्रजी भाषेत). Rowman & Littlefield Publishers. ISBN 9780742529373.
- ^ Datta, Amaresh (1987). Encyclopaedia of Indian Literature: A-Devo (इंग्रजी भाषेत). saud
Akademi. ISBN 9788126018031. line feed character in
|publisher=
at position 5 (सहाय्य) - ^ Kosambi, M., Ramaswamy, R., Kolhatkar, M. and Mukherji, A., 2019. A Fragmented Feminism: The Life and Letters of Anandibai Joshee. Routledge India.
- ^ Kosambi, M; Thorner, Alice; Krishna Raj, Maithreyi (2000). Ideals, Images, and Real Lives: Women in Literature and History. Hyderabad India: Orient Longman. p. 107. ISBN 81-250-0843-8.
- ^ अप्रकाशित साधनांतून दिसणारे आनंदी गोपाळ. पुणे: डॉ. चिं. ना. परचुरे. २८ ऑगस्ट १९९७. pp. ४०७.
- ^ Kumar, Radha (1997). The History of Doing: An Illustrated Account of Movements for Women's Rights and Feminism in India 1800-1990 (इंग्रजी भाषेत). Zubaan. ISBN 9788185107769.
- ^ Grave-yard
- ^ परब, भक्ती (१०.२.२०१९). "आनंदी -गोपाळ एका स्वप्नपूर्तीची गोष्ट".
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ Thorner, Alice; Raj, Maithreyi Krishna (2000). Ideals, Images, and Real Lives: Women in Literature and History (इंग्रजी भाषेत). Orient Blackswan. ISBN 9788125008439.
- ^ Joshi, Shrikrishna Janardan (1992). Anandi Gopal (इंग्रजी भाषेत). Bhatkal & Son. ISBN 9788185604008.
- ^ कीर्तने, अञ्जली (2015). डॉक्टर आनंदीबाई जोशी, काळ आणि कर्तृत्त्व. Mêjesṭika Prakāśana. ISBN 9789383678907.