Jump to content

अंबिका मंदिर (सांगोला)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अंबिका मंदिर (१४ सप्टेंबर, २०२१)
अंबिकादेवी मंदिर, सांगोला

नाव: अंबिकादेवी किंवा अंबाबाई
निर्माण काल : १४ वे शतक
देवता: अंबिकादेवी (मुख्य),
तुळजाभवानी,
यमाई
स्थान: सांगोला, सोलापूर


अंबिका मंदिर हे सोलापूरच्या सांगोला शहरातील हिंदू मंदिर आहे. हे मंदिर १४ व्या शतकातील आहे असे सांगितले जाते. एकाच सिंहासनावर अंबिका माता, तुकाई (तुळजाभवानी) आणि औंधची यमाईदेवी येथे विराजमान आहे, त्यामुळे याला विशेष धार्मिक महत्त्व आहे. सांगोला शहराचे हे ग्रामदैवत आहे.[][]

चैत्र महिन्यात या मंदिरात रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी होते. या देवीची भरणारी यात्रा फार प्रसिद्ध आहे. दरवर्षी रथसप्तमीला अंबिका यात्रा भरते.[]

मंदिराची वास्तू

[संपादन]

एकाच सिंहासनावर अंबिका माता, तुकाई (तुळजाभवानी) आणि औंधची यमाईदेवी अशा तीन मूर्ती आहेत. मंदिराच्या गाभाऱ्यात डावीकडे अंबिकादेवी, मध्यभागी तुकाई माता तर उजव्या बाजूला यमाई मातेची मूर्ती आहेत. तसेच या गाभाऱ्यासमोर सिंहाची मूर्ती आहे, जे देवीचे वाहन आहे.

मंदिराच्या समोर दोन दीपमाळा आहेत. तसेच येथे जुन्या काळातील धर्मशाळाही आहे. या मुख्य मंदिराबरोबरच येथे मारूती, चिंतामणी आणि नागनाथ या देवतांची लहान मंदिरे आहेत. येथील सभामंडपाच्या शेजारीच यज्ञकुंड आहे. यात्रेच्या वेळी भाविकांकडून येथे आहुत्या दिल्या जातात. मंदिराच्या चारही बाजूने सर्व भिंतींवर विविध शिल्पे आहेत. या शिल्पांमध्ये हिंदू पुराणातील विविध प्रसंग आणि विविध देवदेवतांच्या मूर्ती आहेत.

मंदिराच्या आवारात एक चबुतरा आहे. या चबुतऱ्याखाली जुन्या काळातील एका योगीची समाधी असल्याची कथा सांगितली जाते.[]

इतिहास

[संपादन]

या मंदिराचे सांगोला आणि माणदेशाच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. माणदेशावर राज्य करणाऱ्यांमध्ये निजामशहा, आदिलशहा, मुघल, मराठे, पेशवे- आणि पुढे ब्रिटिशांचा समावेश होतो. अंबिका मंदिर या सर्व ऐतिहासिक घडामोडींमध्ये महत्त्वाच्या स्थानी होते.

१४ व्या शतकात मंदिर बांधले गेले असावे, असा लोकांचा दावा आहे. मराठ्यांच्या इतिहासात छत्रपती राजाराम यांना नामधारी केले गेले आणि खरी सत्ता पेशव्यांकडे गेली. ही ऐतिहासिक घटनदेखील याच मंदिरात घडल्याचा दावा केला जातो.

मूळ अंबिका मंदिर यादवकालीन आहे. त्या काळात इथे फक्त मंदिराचा गाभारा होता. पुढच्या काळात मंदिराचा जीर्णोद्धार झाला. त्यानंतर येथे सभामंडप तसेच कमान बांधण्यात आली. अंबिका माता ही सांगोला गावाचे मूळ दैवत होती. पुढे जेव्हा या भागावर मराठ्यांची सत्ता आली तेव्हा या मंदिरात तुळजाभवानीची मूर्तीची स्थापना केली गेली. औंधच्या यमाई मातेची मूर्ती पेशवाईच्या काळात स्थापन केल्याचा दावा केला जातो, पण अजून या दाव्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नसल्याचे इतिहासकार सांगतात.

मंदिराचा शिवाजी महाराजांशी संबंध

[संपादन]

सांगोल्यात छत्रपती शिवाजी महाराज आले असल्याची बातमी मोगलांना मिळाली. त्यानुसार मोगल शिवाजी महारांजावर हल्ला करण्यासाठी आले, पण शिवाजी महाराज त्यांना सांगोल्यात कुठेच सापडले नाहीत. परिणामतः संतापलेल्या मोगलांनी अंबिका मंदिराची नासधूस केली. पुढील काळात मूर्ती पुन्हा एकदा बसवली गेली.[]

उत्सव आणि यात्रा

[संपादन]

चैत्र महिन्यात या मंदिरात रामनवमी साजरी होते. दुर्गाष्टमीला जप तप केला जातो. शारदीय नवरात्र आणि पौष महिन्यातील शाकंबरी नवरात्रामध्ये येथे धार्मिक कार्यक्रम साजरे होतात.

दरवर्षी रथसप्तमीला अंबिका यात्रा भरते. ही यात्रा फार प्रसिद्ध आहे.[] पूर्वीच्या काळात दगडी रथातून देवीची मिरवणूक काढली जायची. पण आता हा रथ शिल्लक नाही. रथाची फक्त चाके शिल्लक राहिली आहेत. म्हणून ती कट्ट्यावर बसवली गेली आहेत.

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
  • युट्युब [१]
  • युट्यूब [२]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b c टीम, एबीपी माझा वेब. "ग्रामदेवता : सांगोल्यातील शिवकालीन अंबिका माता मंदिर". ABP Marathi. 2021-12-31 रोजी पाहिले.
  2. ^ "vikaspedia Domains". mr.vikaspedia.in. 2021-12-31 रोजी पाहिले.
  3. ^ a b "कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सांगोल्यातील अंबिकादेवी यात्रेसह जनावरांचा बाजारही रद्द ! | Sakal". www.esakal.com. 2021-12-31 रोजी पाहिले.