यमाई देवी मंदिर
| श्री यमाई देवी (मुळपीठ) | |
|---|---|
| स्थानिक नाव | |
![]() आई तुळजाभवानीची थोरली बहीण | |
| नाव | |
| भूगोल | |
| संस्कृती | |
| स्थापत्य | |
| इतिहास व प्रशासन |
शिव-पार्वती यांचे एकत्रित पुजले जाणारे रूप म्हणजे यमाई. शिवशक्तीस्वरुपिनी यमाई देवीला पार्वतीमातेचा त्याचप्रमाणे रेणुका देवीचा अवतार देखील मानले जाते. महाराष्ट्रात व अन्य राज्यांत यमाई देवीची अनेक उपपीठे (मंदिरे) आहेत; परंतु महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील औंध गावच्या डोंगरावरती वसलेले हे मंदिर यमाई देवीचे मुळ उगमस्थान असल्याने या ठिकाणास मुळपीठ त्याचबरोबर देवीलाही यमाईदेवी व्यतिरिक्त मुळपीठदेवी म्हणून देखील ओळखले जाते.[१]
निसर्गाच्या वरदानाने नटलेल्या आणि नांदणी नदीच्या पवित्र प्रवाहाने पावन झालेल्या प्राचीन मोरळातीर्थाच्या शांत वातावरणात ऋषी-मुनी व भक्तगण अत्यंत सुखात आपली साधना करत असत. मात्र, या नंदनवनावर एका क्रूर राक्षसाची वक्रदृष्टी पडली आणि त्याने आपल्या त्रासाने तिथल्या मंगलमयी शांततेचा पूर्णपणे भंग केला. अशा महाभयंकर औंधासूर राक्षसाचा भक्तजणांवर चाललेला अन्याय दूर करण्यासाठी दख्खनचा राजा श्री जोतीबा मोरळातीर्थ परिसरात चालून आले. परंतु त्यांची शक्ती या बलाढ्य राक्षसाच्या शक्ती पुढे कमी पडू लागली. दिव्यस्मरण करताच या असुराचा वध आदिशक्तीच्या हातून घडणार हे नाथांस उमगले. तेव्हा जोतिबांनी आदिमायेस "ये माई" अशी साद घातली. जोतिबांनी घातलेली साद ऐकताच पार्वती आणि रेणुकेचा तेजःपुंज अवतार असलेली दिव्य शक्ती धावून आली. सुसज्ज आयुधे हातात घेऊन युद्धभूमीवर आलेली भवानीमाता व तिचा पराक्रम पाहून सर्वांचे डोळे दिपून गेले. देवीच्या हातात खड्ग, त्रिशूल, धनुष्य होते. पाठीवर बाणांनी भरलेला भात प्रत्येक टोकदार बाण असुरावर स्वार होणेस सज्ज होते. औंधसूराचे आणि देवीचे निकराचे तुंबळ युद्ध झाले. देवी प्रचंड क्रोधीत झाली होती. तिने उचललेला निर्वाणीचा शेवटचा बाण सळसळत औंधासुराजवळ गेला व क्षणात त्याने धड आणि डोके वेगळे केले. अखेर पौष पौर्णिमेच्या भयाण रात्री तिने प्रखर युद्धाअंती औंधासुराचा वध करून जनतेस भयमुक्त केले. मृत्यूसमयी असुराने देवीकडे करुणा भाकली व औंधासूर नावाच्या असुराच्या नावावरून 'औंध' हे नाव अजरामर झाले. अशाप्रकारे औंध नावाबरोबर मुळमाया यमाई देवीचे वास्तव्य तेथे चिरकाल सुरू झाले. औंध एक पुण्यभूमी ठरली.
आख्यायिकेनुसार कोल्हापूरच्या देवी महालक्ष्मी अंबाबाई, दख्खनचा राजा श्री जोतिबा आणि प्रभू श्रीराम (भगवान विष्णू) तिला "ये माई" असे संबोधत; म्हणून ती "यमाई" या नावाने प्रसिद्ध झाली. महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या आई तुळजाभवानीची यमाई देवी ही थोरली बहीण म्हणून ओळखली जाते कारण यमाई हे शिवपार्वती यांचे एकत्रित स्वरूप असून ती पार्वती आणि रेणुका देवीचा संयुक्त अवतार मानली जाते. रेणुका अवतार कृतयुगात आणि तुळजाभवानी अवतार त्रेतायुगात घडल्याने या कालक्रमानुसार यमाई तुळजाभवानीची मोठी बहिण मानली जाते. त्यामुळे बरेच भाविक तुळजाभवानी दर्शनानंतर जवळच असलेल्या यमाईदेवीच्या प्रसिद्ध बारा पीठांपैकी एक उपपीठ असलेल्या उत्तर सोलापुरातील मार्डी किंवा मुळपीठ म्हणजेच औंधच्या यमाई देवीचे दर्शन घेण्याची प्रथा आज देखील पाळतात; परंतु विशेष बाब म्हणजे तुळजापूर क्षेत्री देखील यमाई देवीचे जागृत स्थान असून ते तुळजाभवानी मंदिर संकुलातच असण्यामुळे भाविकांना दोन्ही बहिणींचे एकत्र दर्शन घेता येते, ही एक धार्मिक सुलभता मानली जाते.
मंदिर परिसर
[संपादन]औंध गावच्या नैऋत्य दिशेस असलेल्या टेकडीच्या पायथ्यापासून सुरू होणाऱ्या पायऱ्या वापरून किंवा ऐवजी घाटाचा रस्ता वापरून कारने टेकडीच्या माथ्यावर पोहोचता येते. आता रस्त्यांची स्थिती पहिल्या पेक्षा चांगली सुधारल्याने वाहने वरपर्यंत पोहोचू शकतात. वरच्या बाजूला पार्किंग उपलब्ध आहे. काळ्या पाषाणातील यमाई देवीची बैठी मूर्ती जवळपास दोन मीटर उंच असून, पायाची मांडी अढी घालून बसलेल्या स्थितीत आहे. हे मंदिर मोठ्या संख्येने मराठी कुटुंबांचे कुळ-दैवत आहे. मंदिराच्या शिखरावर विविध हिंदू देवतांच्या प्रतिमा आणि मूर्ती आहेत. हे शहर आणि मंदिर अनेक शतकांपासून चालुक्य, यादव, भोसले, जगदाळे या शासकांशी गुरवघराणे कुंटूण्बाशी संबंधित आहे. अलीकडेच लोकवर्गनीतून देवीस या सोन्याचा कलश स्थापित केला आहे. टेकडीवरील मंदिरा व्यतिरिक्त यमाई देवीचं आणखी एक मंदिर खाली गावात आहे.[१][२]
पौराणिक इतिहास
[संपादन]औंध हे श्रीमंत पंडित पंतप्रतिनिधी यांच्या संस्थानाचे मुख्य ठिकाण होते. त्या आगोदर औंधला जसा पौराणिक इतिहास आहे तसा मध्य युगीन इतिहासाच्या पाऊल खुणा पाहवयास मिळतात. त्याचा पुरावा म्हणजे औंध गावच्या नैऋत्य दिशेस एका लहानश्या टेकडीवर श्रीमुळपीठ यमाई देवीचे जागृत स्थान आहे. शिवाय गावात पद्माळें, नागाळें व विशाळें ही तीन तळी अस्तित्वात होती, त्यापैकी विशाळे हे तळे बुझलेले आहे. उर्वरित दोन तळी अद्याप अस्तित्वात आहेत.
इ.स. १००० ते ११५० पर्यंत औंध वरती देवगिरीच्या यादवांचा अंमल होता. सोळाव्या - सतराव्या शतकात आदिलशाहीचा अंमल कऱ्हाड, सातारा, करवीर या प्रांतावर होता. याच काळात मसूर व औंध या दोन परगण्यांची देशमुखी मसूरचे जगदाळे - पाटील यांच्याकडे होती. औंध परगण्यांत तेव्हा २७ गावे होती. तद्नंतर रक्ताजी रुपजी यांच्याकडे देशमुखी गेल्याचे उल्लेख आढळतात.
१६ शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी बादशाही विरुद्ध उभारलेल्या बंडामुळे त्रस्त झालेल्या आदिलशाहीने महाराष्ट्र मराठी संस्कृती राज्य धुळीत मिळवण्याचा चंग बांधला होता. तेव्हा अफजलखानाने तुळजापूर व पंढरपूर ही ठिकाणे उध्वस्त केल्यानंतर कराड - रहिमतपूर मार्गे औंधकडे मोर्चा वळवला. तेव्हा औंधच्या पुजाऱ्यांनी श्री यमाई देवीच्या मूर्तीस लहानश्या देवळात बंदिस्त करून त्या देवळाला मस्जिदीचे रूप दिले. तेव्हापासून यमाईच्या पुजाऱ्यांपैकी एका शाखेस (फकीर) पुजारी असे म्हणतात. यावेळी औंध गावातील यमाई मंदिरासमोर असलेली महाराष्ट्रातील किंबहुना देशातील सर्वात उंच सुमारे ६५ फुट उंच असलेल्या दीपमाळेचे सौंदर्य व भव्यता पाहून हिंदू मंदिरे धुळीस मिळवणाऱ्या खुद्द अफजलखानाची देखील तिला हात लावायची हिम्मत झाली नाही; अशी बॉम्बे गॅझेट मध्ये नोंद आहे.
इ.स. १७०१ ते १८०६ पर्यंत परशुराम पंतप्रतिनिधी औंधच्या गादीवर राज्य करीत होते. १८०६ साली पेशवाई जप्त झाल्यानंतर १८११ पर्यंतचा कालावधी वगळल्यास सर्वकाळ पंतप्रतिनिधींचा औंध संस्थानावर अंमल राहिला.
श्री भवानी संग्रहालय
[संपादन]मंदिर संकुलात औंधच्या महाराजांच्या आपल्या खाजगी संग्रहातून स्थापन केलेले श्री भवानी संग्रहालय देखील आहे. संग्रहालयाची इमारत मंदिराच्या टेकडीच्या मध्यभागी वसलेली आहे. अभ्यागत पायऱ्या आणि रस्त्याने संग्रहालयापर्यंत पोहोचू शकतात. संग्रहालयात एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकातील प्रसिद्ध भारतीय कलाकार जसे की एमव्ही धुरंधर, बाबुराव पेंटर, माधव सातवळेकर आणि राजा रवि वर्मा तसेच ब्रिटिश कलाकार हेन्री मूर यांच्या प्रसिद्ध मदर आणि चाइल्ड स्टोन स्ट्रक्चरची चित्रे देखील आहेत.[३][४][५]
श्री यमाई देवीची महाराष्ट्र राज्यातील प्रमुख बारा पीठे
[संपादन]दैत्यसंहारासाठी व भक्तकल्याणासाठी यमाई देवीची अनेक ठिकाणी उपपीठे निर्माण झालेली आहेत व ती मुळपीठाइतकीच पूजनीय मानली जातात. त्यातील बारा प्रमुख मुळपीठ व उपपीठे खालीलप्रमाणे :
१. मुळपीठ (उगमस्थान) : श्री यमाई देवी देवस्थान, औंध (मुळपीठ), ता. खटाव, जि. सातारा.
- श्री यमाई देवीची प्रमुख उपपीठे :-
२. श्री जगदंबा यमाई देवी देवस्थान, श्री क्षेत्र राशिन, ता. कर्जत, जि. अहमदनगर
३. श्री यमाई देवी देवस्थान, श्री क्षेत्र जोतिबा डोंगर (वाडी रत्नागिरी), ता.पन्हाळा, जि. कोल्हापूर
४. श्री यमाई देवी देवस्थान, श्री क्षेत्र मार्डी, ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर
५. श्री यमाई देवी देवस्थान, श्री क्षेत्र कन्हेरसर, ता. खेड, जि. पुणे
६. श्री यमाई देवी देवस्थान, श्री क्षेत्र शिवरी, ता. पुरंदर, जि. पुणे
७. श्री यमाई देवी देवस्थान, श्री क्षेत्र कवठे यमाई, ता. शिरूर, जि. पुणे
८. श्री साखरगडनिवासिनी अंबाबाई - यमाई देवी देवस्थान, श्री क्षेत्र किन्हई, ता. कोरेगाव, जि. सातारा
९. श्री यमाई देवी देवस्थान, श्री क्षेत्र हिंगणगाव, ता. परंडा, जि. धाराशिव
१०. श्री यमाई देवी देवस्थान, श्री क्षेत्र हिप्परगाराव, ता. उमरगा, जि. धाराशिव
११. श्री यमाई देवी देवस्थान, श्री क्षेत्र महाळुंग, ता. माळशिरस, जि. सोलापूर
१२. श्री यमाई देवी देवस्थान, श्री क्षेत्र कोरेगाव, ता. बार्शी, जि. सोलापूर
श्री यमाई देवीची अन्य प्रसिद्ध मंदिरे
[संपादन]- श्री क्षेत्र बिटले, ता. मोहोळ, जि. सोलापूर
- श्री क्षेत्र मालेगाव खुर्द, ता. मावळ, जि. पुणे
- श्री क्षेत्र राजुरी, ता. परांडा, जि. धाराशिव
- श्री क्षेत्र टाकळी, ता. धाराशिव, जि. धाराशिव
- श्री क्षेत्र जातेगांव, ता. गेवराई, जि. बीड
- श्री क्षेत्र इंजेगाव ता. परळी वैजनाथ, जि. बीड
- श्री क्षेत्र तुळजापूर, ता. तुळजापूर, जि. धाराशिव - महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिर परिसरात देखील श्री यमाई देवीचे जागृत स्थान आहे. यमाई देवीला तुळजाभवानीची मोठी बहीण मानली जाते. त्यामुळे बरेच भाविक तुळजाभवानी दर्शनानंतर जवळच असलेल्या मार्डी किंवा मुळपीठ म्हणजेच औंधच्या यमाई देवीचे दर्शन घेण्याची प्रथा आज देखील पाळतात.
- श्री क्षेत्र सांगोला, ता. सांगोला, जि. सोलापूर (अंबिका मंदिर) - अंबिका मंदिर हे सोलापूरच्या सांगोला शहरातील हिंदू मंदिर आहे. हे मंदिर १४ व्या शतकातील आहे असे सांगितले जाते. एकाच सिंहासनावर अंबिका माता, तुकाई (तुळजाभवानी) आणि औंधची यमाईदेवी येथे विराजमान आहे. मूळ अंबिका माता ग्रामदैवत असून त्यानंतर तत्कालीन मराठा साम्राज्य असताना महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून तुकाई अर्थात तुळजाभवानीची स्थापना करण्यात आली व पेशवे साम्राज्यात पेशवे घराण्याची कुलस्वामिनी औंधनिवासिनी यमाई देवीची स्थापना करण्यात आली. एकाच सिंहासनावर अंबिका, तुकाई आणि यमाई देवी विराजित असल्याने; या क्षेत्रास विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झालेले आहे. सांगोला शहराचे हे ग्रामदैवत आहे.
- श्री क्षेत्र कुळधरण, ता. कर्जत, जि. अहमदनगर
- श्री क्षेत्र पंढरपूर, ता. पंढरपूर, जि. सोलापूर (श्री यमाई - तुकाई देवस्थान)
- श्री क्षेत्र केरळ, ता. पाटण, जि. सातारा
- श्री क्षेत्र अतीत, ता. सातारा, जि. सातारा
- श्री क्षेत्र कोरफळे, ता. बार्शी, जि. सोलापूर
- श्री क्षेत्र सनपाने, ता. जावळी, जि. सातारा
- श्री क्षेत्र कोनवडे, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर
- श्री क्षेत्र इंदापूर, ता. इंदापूर, जि. पुणे (श्री यमाई देवी मंदिर मठ)
- श्री क्षेत्र न्हावी, ता.भोर, जि. पुणे
- श्री क्षेत्र गिरजवडे, ता. शिराळा, जि. सांगली. येथे एका नयनरम्य टेकडीवर श्री यमाई देवीचे प्राचीन शिळारूपी देवस्थान आहे.
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- 1 2 "Yamai Devi: Legend behind the goddess and her temple in Aundh!". झी न्यूझ. Apr 17, 2017. April 21, 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. १४ नोव्हेंबर २०२१ रोजी पाहिले.
- ↑ Pant, Apa (1974). A moment in time. Bombay Calcutta Madras New Delhi: Orient Longman. p. 20. ISBN 9780340147900.
- ↑ Bhagwat., Nalini. "M. V. Dhurandhar". indiaart.com. १४ नोव्हेंबर २०२१ रोजी पाहिले.
- ↑ Chaitanya, Krishna (1994). A History of Indian Painting: The modern period. New Delhi: Abhinav Publications. pp. 273–274. ISBN 81-7017-310-8.
- ↑ "Shivaji designs for stained-glass windows: the art of Ervin Bossanyi. - Free Online Library". Thefreelibrary.com. 2013-05-09 रोजी पाहिले.
