उल्का

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑस्ट्रेलिया येथे आढळलेली उल्का - विज्ञान प्रदर्शनात मांडलेली असतांना घेतलेले चित्र

उल्का (इंग्रजी : meteoroid) अवकाशात फिरणाऱ्या छोट्या छोट्या खगोलीय वस्तू जेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेत येतात आणि जळून जातात तेव्हा त्यांना उल्का किंवा अशनी या नावांनी ओळखले जाते. कोसळल्यानंतर पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोहोचण्याआधीच त्यांचे एकसंध घनअस्तित्व संपुष्टात येते. उल्कांपैकी फारच थोड्यांचे पाषाण पृथ्वीतलावर आदळतात. पडलेल्यांचा आकार लहानमोठा असू शकतो.

अवकाशात असंख्य लहान घन पदार्थ फिरत असतात. बहुधा ते धूमकेतूंचे अविशिष्ट तुकडे असतात. त्यांना उल्काभ (मिटिअरॉइड) म्हणतात. जेव्हा उल्काभ पृथ्वीकडे आकर्षिला जातो तेव्हा पृथ्वीच्या वातावरणातून जाताना त्याचे हवेशी घर्षण होऊन तो तापतो व काही क्षण आकाशात एक चमकती रेखा उमटवीत काही मार्ग आक्रमून दिसेनासा होतो. या आविष्काराला उल्का (मिटिअर) पडणे असे म्हणतात. त्यालाच ‘तारा तुटणे’ असेही म्हणतात. उल्का बहुधा वातावरणातच जळून नष्ट होतात. परंतु क्वचित उल्काभ पूर्णतया जळून जाण्यापूर्वीच पृथ्वीवर पडतो. अशा बाह्य अवकाशातून पृथ्वीवर येऊन पोहोचलेल्या पृथ्वीबाहेरच्या पदार्थाला अशनी (मीटिऑराइट) म्हणतात. उल्काभांची प्रत्यक्ष माहिती अल्प प्रमाणातच मिळू शकते. परंतु उल्का व अशनी यांच्या अभ्यासावरून उल्काभांसंबंधी अप्रत्यक्ष माहिती मिळविता येते. म्हणून या नोंदीमध्ये उल्का व अशनी यांसंबंधीची विस्तृत माहिती पुढे दिलेली असून तीमध्येच उल्काभांसंबंधीच्या अप्रत्यक्ष माहितीचा समावेश केलेला आहे. उल्कांसंबंधीची माहिती ज्योतिषशास्त्र, उच्चवातावरणविज्ञान व रेडिओ संदेशवहन यांच्या दृष्टीने उपयुक्त असते, तर अशनींसंबंधीची माहिती भूविज्ञान व भौतिक रसायनशास्त्र यांच्या दृष्टीने महत्त्वाची असते.[१]

अशनी

मोठे उल्काभ वातावरणातून येताना पूर्ण जळून जाण्यापूर्वीच पृथ्वीवर पडतात. अशा अपार्थिव पदार्थांना 'अशनी' म्हणतात. उल्काभांच्या मानाने अशनींची संख्या अल्प असते, कारण बहुसंख्य उल्काभ वातावरणातच जळून जातात. पृथ्वीवर ते क्वचितच आढळतात. सामान्यत: उल्कावृष्टी होते तेव्हा अशनी पडत नाही. अशनी एकटा पडतो किंवा वातावरणात फुटून अनेक तुकडेही पडतात. कधी कधी अशनीच्या आघाताने भूपृष्ठावर विवर निर्माण होते. ॲरिझोनातील अशनिविवर व लोणार सरोवर ही याची ठळक उदाहरणे आहेत.अशनीला बहुधा तो जेथे पडला किंवा सापडला तेथून जवळात जवळ असलेल्या गावाचे नाव देतात. उदा., होबा. पृथ्वीवरील खडकात न आढळणारी वैशिष्ट्ये अशनीत असल्यामुळे तो प्रत्यक्ष पडताना दिसला नाही, तरी निराळा ओळखता येतो. त्यामुळेच पडताना नोंद न झालेलेही कित्येक अशनी सापडले आहेत. १९५२ साली जगातील एकूण अस्सल अशनींची संख्या १, ५०२ होती. १९६० पर्यंत ती संख्या सु. १,७०० झाली. १९७० पर्यंत जगात सु. २,००० अशनींचे भाग संग्रहित केले गेले, त्यांपैकी ७२७ अशनी एकट्या अमेरिकेत आहेत. अशनींप्रमाणे सूक्ष्म अशनी व वैश्विक धूळही (अवकाशातील अतिसूक्ष्म वस्तुकण) पृथ्वीवर येत असते. आतापर्यत पृथ्वीवर पडलेल्या या सर्व पदार्थाचा तिच्या संपूर्ण पृष्ठावर सु. २·५ सेंमी जाडीचा थर होऊ शकेल.

अशनींमुळे सूर्यकुलातील द्रव्याचे रासायनिक संघटन व संरचना यांच्याबद्दल प्रत्यक्ष माहिती देणारे साधन उपलब्ध झाले असून पृथ्वीच्या अंतरंगाची माहितीही यांच्यामुळे अप्रत्यक्षपणे मिळू शकते. शिवाय बाहेरून येणाऱ्या पदार्थांवर वातावरणाचे होणारे परिणाम व उच्च वातावरण यांच्याबद्दलची माहिती अशनींच्या अभ्यासाने मिळू शकते. अशनी हा ज्योतिषशास्त्रभूविज्ञान यांच्यातील एक दुवा आहे. यामुळे अशनींचे शास्त्रीयदृष्ट्या फार महत्त्व आहे.[१]


अशनिपात

अशनिपाताची निश्चित नोंद सर्वप्रथम चिन्यांनी केलेली आढळते. अशनिपात विरळाच व केव्हातरी होतात. त्यांच्यात उल्कावृष्टीसारखा नियमितपणा नसतो. परंतु त्यांच्यामुळे निर्माण होणारा प्रकाश व आवाज यांच्यामुळे ते लक्षात राहतात. त्यामुळे पूर्वीपासून त्यांची नोंदही ठेवली गेली.

अशनी पडताना सामान्यत: आकाशात एक तेजः पुंज लोळ दिसतो. तो घिरट्या घालतो व चकचकीत तेजोरेषा मागे राहते. कधीकधी अशनी वातावरणातच फुटतो तेव्हा गडगडाटासारखा मोठा आवाज होतो. कारण त्याच्या द्रव्यमानाबरोबर आलेल्या आघात तरंगांमुळे ध्वनी निर्माण होतो व नंतर त्याचे प्रतिध्वनी येत राहतात. कधीकधी काळे तुकडे पडताना दिसतात. तुकडे विवृत्ताकार क्षेत्रात विखरून पडतात. मोठे तुकडे वेग कमी न झाल्याने या क्षेत्राच्या दुरवरच्या भागात जाऊन पडतात व लहान तुकड्यांची गती हवेने रोखली जाऊन ते जवळच पडतात. पडताना अशनीचा वेग कमी होत जातो व सामान्यत: शेवटी तो केवळ गुरूत्त्वाकर्षणामुळे पडतो. त्याचे द्रव्यमानही कमी होत जाते. त्यामुळे बहुधा तो जमिनीत एक मीटरापेक्षा अधिक घुसत नाही. एकदा तर एका सरोवरातील काही सेंमी. जाडीच्या बर्फावर अशनी पडला, परंतु बर्फ फुटला नाही. मात्र मोठे अशनी अधिक जोराने आदळत असावेत. दिवसा अशनिपात झाल्यास स्थानपरत्वे सामान्यत: काळा ढगही दिसतो. नॉर्मंडीत झालेल्या अशनिपाताच्या वेळी एका गावी अग्‍निगोल व दुसऱ्या गावी काळा ढग दिसला होता.[१]

इ. स. १८०० सालापासून ६२७ आश्मिक, २९ धात्विक व १० धातवाश्मिक प्रकारचे अशनी प्रत्यक्ष पडताना पाहिले गेले आहेत. १९३० साली सर्वांत अधिक म्हणजे तेरा अशनी पडले. परंतु १८३२ व १८८० साली एकही अशनी पडल्याची नोंद नाही. ३० जून १९०८ रोजी (तुंगुस्का स्फोट[२]) मध्ये सायबेरियात सर्वांत मोठा अशनिपात झाला. सु. १३० टन वजनाच्या एका अशनीच्या आघातामुळे अतितप्त तेजस्वी पदार्थ उंच फेकले गेले व लहानसा भूकंपच झाला. तेथून ४,८०० किमी. दूर असलेल्या येना येथे व जगात इतरत्रही त्याची नोंद केली गेली. ३२ किमी. परिसरातील झाडे पडली वा जळून गेली. स्फोटाने हवेत निर्माण झालेले तरंग ६,००० किमी. अंतरावरच्या लंडन व ९,६०० किमी. अंतरावरील वॉशिंग्टन येथे नोंदले गेले. उच्च वातावरणात उडालेल्या धुळीमुळे नंतरच्या दोन रात्री उत्तर युरोपभर आकाशात तेजस्वी प्रकाश दिसत होता. १९ जुलै १९१२ रोजी होलब्रुकजवळ (ॲरिझोना)[३]अशनिपात झाला. अशनी पडण्यापूर्वी ६० किमी. अंतरापर्यत ऐकू जाईल एवढा मोठा गर्जनेसारखा आवाज झाला व पाच किमी. लांब व पाऊण किमी. रूंद एवढ्या क्षेत्रातून चौदा हजाराहून अधिक अशनी गोळा करण्यात आले. १९२० साली सीमेनजवळ झालेल्या अशनिपातामुळे हवेत स्फोट होऊन १९ किमी. लांब व तीन किमी. रुंद क्षेत्रात तुकडे विखरून पडले व ७ अशनी सापडले. १७ फेब्रुवारी १९३० रोजी पॅरागूल्ड (Paragould ) ( आर्कान्सा , अमेरिका ) [४]येथे प्रत्यक्ष पडताना दिसलेला अशनी सु. दोन मीटर आत घुसला, तो खणून काढावा लागला.[१]


अशनिवृष्टी

अशनिवृष्टी मान्यत: जमिनीवर पडण्यापूर्वी अशनी फुटतात. परंतु कधीकधी यापेक्षाही अधिक उंचीवर ते फुटतात व खाली येताना या तुकड्यांचे आणखी बारीक तुकडे होतात. असे तुकडे एकत्रितपणे पडल्यास 'अशनिवृष्टी' झाली असे म्हणतात. सामान्यत: अशनिवृष्टीत विविध आकाराचे व आकारमानाचे पुष्कळ अशनी पडतात. १८६८ साली पोलंडमध्ये पूलटूस्कजवळ सु. एक लाख, १९१२ साली होलब्रुकजवळ (ॲरिझोना, अमेरिका) चौदा हजार, १८०३ मध्ये लेगलजवळ (फ्रान्स) दोन ते चार हजार व १८०८ साली स्टॅनर्म (मोरेव्हिया) येथे दोनशे ते चारशे आश्मिक अशनी व १९४७ साली सायबेरियात कित्येक हजार धात्विक अशनी पडल्याची नोंद आहे.[१]


अशनिविवर (उल्काविवर)

मोठा अशनी वेगाने येऊन पृथ्वीवर आदळल्यामुळे तिच्या पृष्ठावर ज्वालामुखी विवरासारखा खळगा पडतो, त्याला 'अशनिविवर' म्हणतात. अशनीच्या आघातामुळे खडक उचलले जाऊन विवराच्या कडा निर्माण होतात. त्यामुळे विवर वाडग्यासारखे दिसते. मोठ्या अशनींची गती वातावरणाच्या विरोधामुळे अल्प प्रमाणातच घटते. त्यामुळे त्यांची आघाताच्या वेळची गती पुष्कळ असते. ती दर सेकंदाला काही किलोमीटरांइतकी असली, तरी तीमुळे अशनीस प्राप्त होणारी गतिज ऊर्जा आघातानंतर त्याला वितळविण्यास व त्याचे बाष्पीभवन करण्यासही पुरेशी होते. ही गतिज ऊर्जा अल्प काळातच मुक्त होत असल्यामुळे तीव्र स्फोटही होतो. या कल्पनेनुसार ॲरिझोनातील कॅन्यन डिॲब्‍लो (किंवा बॅरिंजर) विवराच्या निर्मितीचे स्पष्टीकरण करता येते. या विवराच्या कडा सभोवतालच्या मैदानापैक्षा ३६ ते ४६ मी. इतक्या उंच असून त्याच्या भोवतालच्या कित्येक किलोमीटरांपर्यंतच्या क्षेत्रात हजारो लहान मोठे अशनी सापडले आहेत. मात्र विवरात अशनी सापडला नाही. त्याच्या भोवताली वाळूच्या कणाएवढे लोह-निकेलाचे असंख्य कणही सापडले आहेत. त्यांच्या संघटनावरून व प्रसारावरून ते धातूंच्या वाफेच्या ढगाचे संघनन होऊ तयार झालेले आहेत, असे दिसून येते. शिवाय कोएसाइट हा उच्च दाबास व तापमानास तयार होणारा सिलिकेचा प्रकारही तेथे १९६० साली सापडला. यांवरून हे विवर अशनिपाताने निर्माण झाले आहे, याची खातरजमा झाली. ते सु. ५०,००० वर्षांपूर्वी निर्माण झाले असावे. मध्ये ऑस्ट्रेलियातील हेनबरी व अरेबियाच्या वाळवंटातील वाबर येथील विवरांच्या अध्ययनावरूनही वरील गोष्टींना दुजोरा मिळाला आहे. वाबर येथे उष्णतेने काही भागाचे बाष्पीभवन झाल्याचे आढळले. कारण तेथे पमिसासारख्या काचमय पदार्थाचे पुंज आढळले असून त्यांतील काळसर किंवा करडसर काचेत लोह-निकेल मिश्रधातूचे असंख्य सूक्ष्म गोलक असल्याचे दिसून आले. सारेमा (एस्टोनिया), वूल्फ क्रीक (ऑस्ट्रेलिया), हॅविलंड व ओडेसा (अमेरिका) इ. विवरे अशनिपाताने निर्माण झाल्याचे सिद्ध झाले आहे. इतर विवरांच्या बाबतीतही अशनिपाताची शक्यता सुचविण्यात आलेली असली, तरी तसे अद्यापि सिद्ध झालेले नाही.

सर्व विवरे भूवैज्ञानिक दृष्ट्या अलीकडची असली तरी ऐतिहासिक दृष्ट्या ती प्राचीनच आहेत. मात्र ३० जून १९०८ रोजी रशियातील तुंगूस्का नदीच्या खोऱ्यात पडलेल्या मोठ्या अशनीमुळे निर्माण झालेली व सिखोटे अलीन अशनिपाताने निर्माण झालेली विवरे ही अगदी नुकतीच तयार झालेली आहेत. २२० टनांचा अशनी दीडशे वर्षांतून एकदा तर बॅरिंजर विवराएवढे विवर निर्माण करू शकेल इतका मोठा म्हणजे सु. ५०,००० टन वजनाचा अशनी लाख वर्षातून एकदाच पडण्याचा संभव असतो.

स्फोटाने निर्माण होणारा खळगा व या विवरांमध्ये पुष्कळ साम्य असले तरी त्यांच्यात भेदही असतात. अशनिविवरे काही बाबतीत चंद्रावरील खळग्यांसारखी असल्यामुळे चंद्रावरील खळगेही अशनिपातामुळे निर्माण झाले असावेत असा शास्त्रज्ञांचा कसायआहे. कोष्टक क्र. ३ मध्ये काही अशनिविवरांसंबधी थोडक्यात माहिती दिलेली आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराचा खळगा हाही अशनीच्या आघाताने निर्माण झाला असावा, असे अलीकडेच आढळून आले आहे. या विवराचा व्यास सु. १,९०० मी. आहे तर खोली अंदाजे १९० मी. आहे. शास्त्रज्ञांच्या मते दहा लाख वर्षापूर्वी वीस लक्ष टन वजनाचा अशनी पडल्याने हे विवर निर्माण झाले असावे. बेसाल्ट खडक असलेल्या भागातील हे एकमेव असे विवर असावे.[१]


अवकाशात फिरणाऱ्या छोट्या छोट्या खगोलीय वस्तू जेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेत येतात आणि जळून जातात तेव्हा त्यांना उल्का किंवा अशनी या नावांनी ओळखले जाते. कोसळल्यानंतर पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोहोचण्याआधीच त्यांचे एकसंध घनअस्तित्व संपुष्टात येते. उल्कांपैकी फारच थोड्यांचे पाषाण पृथ्वीतलावर आदळतात. पडलेल्यांचा आकार लहानमोठा असू शकतो.

पृथ्वीच्या वातावरणात दररोज निदान अडीच कोटी उल्का घुसत असाव्यात असा अंदाज आहे. उल्कांचा मोठा जमाव पृथ्वी-कक्षेतून जाऊ लागला की उल्कांचा वर्षाव झाल्यासारखे वाटते. पृथ्वीची कक्षा आणि उल्कांची कक्षा निश्चित आहेत. त्यामुळे आकाशातील ठरावीक विभागात, ठरावीक काळात उल्कावर्षाव होतात. ज्या नक्षत्रातून उल्कावर्षाव झाल्यासारखे वाटते त्या नक्षत्राला त्या उल्कावर्षावाचे उगमस्थान असे म्हणतात. पृथ्वीवर मोठ्या आकारमानात पडणाऱ्या उल्केला उल्कापात म्हणतात.

  • ययाती(Pereus) नक्षत्रातून होणाऱ्या उल्का वर्षावाला Perseids (पर्सीड्‌ज) म्हणतात. दरवर्षी ऑगस्ट महिन्यातील १ ते २० तारखांमध्ये हे वर्षाव होतात. जोराचा वर्षाव १२ ऑगस्टला होतो.
  • सिंह राशीतून होणाऱ्या उल्का वर्षावाला लिओनिड्‌ज(Leonids) म्हणतात. काळ दरवर्षी ११ ते २० नोव्हेंबर. जोराचा वर्षाव १२ तारखेचा.
  • स्वरमंडळ (Lyra) तारकापुंजातून होणाऱ्या उल्का वर्षावाला लिरिड्ज(Lyrids) म्हणतात. दरवर्षी १६ एप्रिल ते २६ एप्रिल काळात हे उत्‌-स्वरंडळ उल्कावर्षाव होतात. यांचा जोर २१-२२ एप्रिलच्या रात्री असतो.
  • देवयानीतून (Andromeda) होणाऱ्या उल्कावर्षावाला ॲन्ड्रोमीडस (Andromedus) म्हणतात. काळ दरवर्षी २४ ते २७नोव्हेंबर.
  • मिथुन (Gemini) राशीमधून होंणाऱ्या उल्कावर्षावाला जेमिनिड्ज म्हणतात. काळ दरवर्षी ९ ते१४ डिसेंबर, कमाल वर्षाव १२ तारखेला.
  • मेष (Aries) राशीतून होणाऱ्या उल्कावर्षावाला एरिड्‌ज म्हणतात. कालमर्यादा दरसाल ३० मे ते १४ जून. महत्तम ७ जूनला.
  • डेल्टा ॲक्वेरी या ताऱ्याच्या जवळून होणारा उल्कावर्षाव : Delta Acqarids


  1. ^ a b c d e f "उल्का व अशनि". मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती. 2020-01-09 रोजी पाहिले.
  2. ^ "तुंगुस्का स्फोट". विकिपीडिया. 2017-06-30.
  3. ^ "Meteorite fall". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2019-12-18.
  4. ^ "Paragould meteorite". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2019-12-18.