सावळाराम लक्ष्मण हळदणकर
सावळाराम लक्ष्मण हळदणकर | |
पूर्ण नाव | सावळाराम लक्ष्मण हळदणकर |
जन्म | नोव्हेंबर २५, १८८२ सावंतवाडी, महाराष्ट्र, भारत |
मृत्यू | मे ३०, १९६८ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | चित्रकला, कलाअध्यापन |
प्रशिक्षण | जे.जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई |
सावळाराम लक्ष्मण हळदणकर (जन्म २५ नोव्हेंबर१८८२ - मृत्यू ३० मे १९६८) हे महाराष्ट्रीय चित्रकार होते. जलरंग आणि तैलरंगातील चित्रकारीतेत त्यांची विशेष ख्याती होती. ते उत्तम कलाशिक्षक आणि संगीताचे दर्दी म्हणूनही ख्यात होते.[१]
बालपण
[संपादन]सावळाराम यांचा जन्म कोकणातील सावंतवाडी येथे झाला. ते तीन वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाल्याने त्यांचे बालपण अत्यंत हालाखीत गेले. [१]
शिक्षण
[संपादन]सावळाराम ह्यांचे शालान्त परिक्षेपर्यंतचे शिक्षण सावंतवाडीतच झाले. तिथले चित्रकलाशिक्षक श्री.एन.एस.मालणकर यांनी सावळाराम यांचे कलागुण हेरून त्यांना ग्रेड परिक्षां देण्यासाठी उत्तेजन दिले.[२] चित्रकलेच्या ग्रेड परिक्षांमध्ये सावळाराम हे प्रत्येक विषयात पहिले आले होते. इ.स. सन १९०३ साली त्यांनी मुंबईस येऊन सर जे.जे. कला महाविद्यालयात प्रवेश-परिक्षा दिली व त्या कला महाविद्यालयात प्रवेश घेतला. येथे त्यांना कला-शिक्षक गणपतराव केदारी, त्रिदांद, आगासकर, वॉल्टर रोब्रोथॅम यांच्याकडून चित्रकलेविषयी मार्गदर्शन लाभले. इ.स. सन १९०७ पासून एक चित्रकार म्हणून त्यांचे नाव ख्यात होऊ लागले.[२]
कलाशिक्षक
[संपादन]इ.स. सन १९०८ मध्येच त्यांनी मुंबईतल्या दादर येथे नव्या पिढीला चित्रकलेचे शिक्षण देण्यासाठी वर्ग सुरू केले. पुढे हा वर्ग 'हळदणकर फाईन आर्ट इन्स्टिट्यूट' म्हणून ऑपेरा हाऊस येथील केनडी ब्रीजजवळ स्थिरावला.[१] सावळाराम निवृत्त झाल्यावर हे वर्ग त्यांचे पुत्र गजानन हळदणकर ह्यांनीही निष्ठेने चालू ठेविले. गजानन हळदणकर हेही चित्रकार होते.
चित्रकार सा.ल.हळदणकर
[संपादन]इ.स. सन १९०७ पासून त्यांची चित्रे मुंबई, चेन्नई, कोलकाता, सिमला येथील कलाप्रदर्शनात झळकू लागली आणि त्यांच्या चित्रांना मोठ्यामोठ्या राजेरजवाड्यांच्या कलासंग्रहात स्थान मिळू लागले. त्यांच्या चित्रात मुख्यत्वे व्यक्तिचित्रे, निसर्गचित्रे आणि पौराणिक चित्रे यांचा समावेश असे. त्यांच्या 'ग्लो ऑफ होप', 'निरांजनी', 'अमिरी इन फकिरी' यांसारख्या त्यांनी निवडलेल्या साध्या विषयातून व्यापक दृषानुभव व्यक्त होताना दिसतो. 'ग्लो ऑफ होप' हे चित्र म्हैसूरच्या 'जयचामराजेन्द्र' या कला संग्रहालयात आहे.[१]
त्यांची व्यावसायिक व्यक्तिचित्रेही नावाजली गेली. यात नाना शंकर शेठ, मफतलाल गगनभाई, शिक्षणमहर्षी धोंडो केशव कर्वे इ. प्रतिष्ठित व्यक्तिचां समावेश होता. त्यांनी भारत सरकारसाठी पं. मदन मोहन मालवियांचे व्यक्तिचित्रही केले होते.[१]
पुरस्कार आणि सन्मान
[संपादन]इ.स.सन १९२५ साली त्यांना मुंबईच्या 'बॉम्बे आर्ट सोसायटी'चे सुवर्णपदक मिळाले होते.[१]
इ.स.सन १९६२ साली दिल्लीच्या 'ललित कला अकादमी'ने त्यांना फेलोशिप देऊन सन्मानीत केले होते.[१]
इ.स.सन १९६४ साली भारत सरकारसाठी केलेल्या पं. मदन मोहन मालवियां यांच्या व्यक्तिचित्रासाठी सावळाराम यांचा राष्ट्रपती राजेन्द्रप्रसाद यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.[१]
कलासंस्थेची स्थापना
[संपादन]सर जे.जे. कलामहाविद्यालयात शिक्षण घेत असताना तिथल्या कलाशिक्षणाच्या धोरणात गोंधळाचे वातावरण होते. भारतीय कलेचे पुनरुज्जीवन करावे हे जरी इंग्रजी राजकर्त्यांचे धोरण असले तरी त्याची अमंलबजावणी कशी करावी याबाबत संभ्रमानस्था होती. तशाही अवस्थेत स्वतः सावळाराम आणि त्यांचे सहअध्यायी चुडेकर, परांडेकर इत्यादी स्व-गुणांच्या जोरावर पुढे आले.[१] भारतातील इंग्रजी राजवटीच्या काळात त्यांनी देशात अनेक ठिकाणी कलासंस्था स्थापन केल्या. मात्र त्या संस्थांवर इंग्रजाचेच प्राबल्य होते. याबाबत त्याकाळात कार्यरत असणाऱ्या मुंबईतील काही भारतीय चित्रकार आणि शिल्पकारांच्या मनात तीव्र नाराजी होती. यातूनच पुढे सावळाराम आणि त्यांचे सहअध्यायी परांडेकर तसेच शिल्पकार बाळाजी तालीम यांनी एकत्र येऊन, होतकरू कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी ' द आर्ट सोसायटी ऑफ इंडिया' ही संस्था स्थापनी केली.[३]
संदर्भ
[संपादन]- ^ a b c d e f g h i महेन्द्र दामले; हळदणकर, सावळाराम लक्ष्मण ; समाविष्ट : विवेक आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण - शिल्पकार चरित्रकोश; खंड ०६; दृश्यकला; संपा. बहुळकर, सुहास आणि घारे, दीपक; साप्ताहिक विवेक (हिंदुस्थान प्रकाशनसंस्था); २०१३; मुंबई (पृ. ५७२-५७६)
- ^ a b साधना बहुळकर, सा.ल.हळदणकर, समाविष्ट-मास्टर स्ट्रोक भाग २ रा, संपा- प्रफुल्ला डहाणूकर आणि सुहास बहुळकर, जहांगिर आर्ट गॅलरी, २००३.
- ^ ड़ॉ. गोपाळ नेने, माहितीपुस्तक (कॅटलॉग), ९९ वे वार्षिक प्रदर्शन, समा- 'शतकपूर्ति' आनंददायी वाटचाल, पान-०३.