ऑपेरा हाउस (मुंबई)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

ऑपेरा हाउस मुंबईच्या गिरगाव भागात सॅंडहर्स्ट पुलाजवळील देखणी इमारत आहे. जहांगीर फ्रामजी काकरा आणि मॉरिस बॅंडमन यांच्या प्रयत्‍नांतून हे ऑपेरा हाऊस उभारण्यात आले होते. या इमारतीसाठी तेव्हा साडे सात लाख रुपयांचा खर्च आला होता. १९१२मध्ये पाचव्या किंग जॉर्जने या वास्तूला रॉयल अशी उपाधी वापरण्याची परवानगी दिली.

ऑपेरा हाउसमध्ये बालगंधर्वांपासून ते राज कपूर, लता मंगेशकर अशा अनेक कलाकारांनी आपली कला सादर केली आहे. येथील पहिला कार्यक्रम १६ ऑक्टोबर, इ.स. १९११ रोजी झाला होता. चित्रपटांची लोकप्रियता वाढल्यानंतर नाटकांना आणि संगीत कार्यक्रमांखेरीज येथे चित्रपट दाखवण्याची सोय करण्यात आली. त्यावेळी याचे न्यू ऑपेरा हाउस करण्यात आले. कालांतराने चित्रपटांची लोकप्रियताही कमी झाली आणि १९९१मध्ये ऑपेरा हाऊसला कठीण दिवस आले. तरीही या इमारतीचा कायापालट करून परत तिला मूळचे भव्यदिव्य स्वरूप देण्याचे प्रयत्‍न नव्याने सुरू झाले.

१९५२ मध्ये गोंडलच्या महाराजांनी ही वास्तू खरेदी केली. या वास्तूची मालकी त्यांचा मुलगा ज्योतेंद्रसिंह यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी २००९मध्ये या वास्तूला पुन्हा लोकांसाठी, कलाप्रेमींसाठी, कलाकारांसाठी खुली करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नूतनीकरणाचे काम सुरू करण्यात आले. कॉन्झर्व्हेशन आर्किटेक्ट आभा लांबा यांच्याकडे या प्रकल्पाची जबाबदारी असून सतीश धुपेलिया हे स्ट्रक्चरल इंजिनीअर आहेत.

रॉयल ऑपेरा हाऊसचे नूतनीकरण हे जबरदस्त आव्हान होते. या वास्तूच्या जीर्णोद्धारासाठी नेमणूक करण्यात आलेले कॉन्झर्व्हेशन आर्किटेक्ट आभा लांबा सांगतात की, 'या वास्तूच्या बांधकामाला मोठा धोका निर्माण झाला होता. याच्या भिंतींमधून अनेक लहान-मोठी झाडे डोकवायला लागली होती. हा प्रकल्प हाती घेण्यासाठी कोणीही स्ट्रक्चरल इंजिनिअर तयार नव्हता. अखेर सतीश धुपेलिया यांनी हे आव्हान स्वीकारले. कमानींना आधार द्यावा लागला. स्टील गंजून गेले होते. छत दुरुस्त करण्यात आले. २०१२ साली ही वास्तू वर्ल्ड मॉन्युमेंट वॉचलिस्टच्या धोकादायक अवस्थेतील इमारतींच्या यादीत होती. आता ती सुरक्षित स्थितीत आहे.

१६ ऑक्टोबर २०१६ नंतर, म्हणजे पहिल्या कार्यक्रमानंतर बरोबर १०५ वर्षांनी, पुढच्या पिढ्यांसाठी रॉयल ऑपेरा हा‍उसचे हे व्यासपीठ जुन्या वैभवाने पुनरुज्जीवित होईल आणि त्याच श्रीमंती तोर्‍यात टिकून राहील अशी अपेक्षा आहे.