शौकत अझीझ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इ.स. २००७ च्या जागतिक आर्थिक मंचावर सहभागी शौकत अझीझ

शौकत अझीझ (उर्दू: شوکت عزیز ; रोमन लिपी: Shaukat Aziz) (६ मार्च, इ.स. १९४९ ; कराची, तत्कालीन पश्चिम पाकिस्तान - हयात) हे पाकिस्तानी अर्थशास्त्रज्ञ व राजकारणी आहे. यांनी जनरल परवेझ मुशर्रफ यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त लष्करी राजवटीत २० मे, इ.स. २००४ ते १५ नोव्हेंबर, इ.स. २००७ या कालखंडात पाकिस्तानाचा १५वे पंतप्रधान म्हणून सूत्रे सांभाळली. यांनी आपल्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत देशाच्या अर्थव्यवस्थेची विस्कटलेली घडी बसवण्यासाठी प्रयत्न केले व त्यात त्यांना काही अंशी यशही आले. पंतप्रधानपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर हे लंडन, युनायटेड किंग्डम येथे स्थायिक झाला असून मिलेनियम अँड कॉप्थॉर्न पीएलसी या कंपनीच्या मंडळावर काम करत आहे[ संदर्भ हवा ].

राजकारणात प्रवेशण्याअगोदर अझीझ अमेरिकेत सिटीबँक समूहात वरिष्ठपदावर काम करत होते. परवेझ मुशर्रफ याच्या आमंत्रणावरून अमेरिकेतून पाकिस्तानात परतून नोव्हेंबर, इ.स. १९९९मध्ये याने पाकिस्तानाच्या अर्थमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली. ६ जून, इ.स. २००४ रोजी तत्कालीन पंतप्रधान झफरुल्लाखान जमाली याने पदाचा राजीनामा दिल्यामुळे पाकिस्तान मुस्लिम लीग (क्यू) या राजकीय आघाडीने शौकत अझीझ याचे नाव पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी पुढे केले. २८ ऑगस्ट, इ.स. २००४ रोजी त्याने पंतप्रधानपदाची शपथ घेतली व १५ नोव्हेंबर, इ.स. २००७ रोजी मुदत संपेपर्यंत पदाची धुरा वाहिली. कार्यकाळाची मुदत पूर्ण केलेला तो पहिला पाकिस्तानी पंतप्रधान ठरला.

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत