शबद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गुरू ग्रंथसाहिबातील शबद

शबद ही संज्ञा शीख संप्रदायातील पवित्र ग्रंथ समजल्या जाणाऱ्या गुरू ग्रंथसाहिबातील व धार्मिक ग्रंथांमधील गीतरचनांना उद्देशून वापरली जाते. ह्या रचना शीख परंपरेतील गुरूंनी प्रामुख्याने रचल्या असून त्यात गुरू नानक, गुरू रामदास, गुरू अर्जुनदेव या गुरूंनी रचलेले शबद आहेत. तसेच रविदास, कबीर शेख़ खरीद, जयदेव, त्रिलोचन, सधना, नामदेव, वेणी, रामानंद, पीपा, सैठा, धन्ना, भीखन, परमानंद आणि सूरदास अशा पंधरा भक्तियुगीन संतांच्या रचनाही समाविष्ट आहेत. याशिवाय हरिबंस, बल्हा, मथुरा, गयंद, नल्ह, भल्ल, सल्ह, भिक्खा, कीरत, भाई मरदाना, सुंदरदास, राय बलवंत, सत्ता डूम, कलसहार, जालप या कवींच्या कवनांचाही यात समावेश होतो. शीख तत्त्वविचारांची सूत्रे, परिच्छेद किंवा ग्रंथांमधील अंशात्मक कृतींचा भाग त्यात अंतर्भूत असू शकतो. गुरुमुखी लिपीत लिहिलेल्या या रचना शीख अनुयायांमध्ये दैनंदिन पाठासारख्या प्रचलित आहेत.

तत्त्वविचार[संपादन]

गुरू नानकांनी हिंदूइस्लाम इत्यादी भिन्न मतपरंपरांमध्ये प्रतिपादन केलेला ईश्वर एकच असून सर्व मानव एकाच ईश्वराची लेकरे आहेत आणि ईश्वरासाठी सर्वजण समान आहेत असा प्रमुख विचार उपदेशिला. या तत्त्वविचाराचे ग्रथन केलेल्या गुरू ग्रंथसाहिब ग्रंथात विविध मतप्रणालींमधील चांगल्या गोष्टी एकत्रित केल्या. मनुष्याने सतत चांगली कर्मे करावीत म्हणजे ईश्वराच्या दरबारी त्याला शरमिंदे व्हावे लागणार नाही अशा अर्थीच्या शबद रचना ग्रंथ साहेबात जागोजागी आढळतात. पंजाबी, ब्रज, हिंदी भाषा, संस्कृत, पर्शियन तसेच स्थानिक भाषांतील साहित्याचा ह्यात समावेश आहे. मध्ययुगीन संतभाषेतील साहित्यही त्यात आढळते. शीख संप्रदायाचा प्रमुख धर्मग्रंथ म्हणून गणल्या जाणाऱ्या गुरू ग्रंथ साहिबचे संपादन पाचवे गुरू अर्जुन सिंग देव यांनी केले. ह्या ग्रंथाचे प्रकाशन १६ ऑगस्ट इ.स. १६०४ साली अमृतसरच्या हरिमंदिर साहिब मध्ये झाले. गुरू ग्रंथ साहिबात एकूण १४३० पृष्ठे आहेत. दहावे गुरू गोविंद सिंह यांनी इ.स. १७०५ मध्ये ह्या ग्रंथास पूर्ण केले. फक्त शीख गुरूच नव्हे तर तत्कालीन अनेक हिंदू-मुस्लिम भक्तांची वाणी समाविष्ट करण्यात आलेला हा ग्रंथ जातीपाती, भेदभाव यांपलीकडे जातो. आपल्या सरळ, सुबोध भाषेमुळे सर्वसामान्य माणसास तो समजण्यासही सोपा जातो. त्यातील भाषा रसाळ, अर्थगर्भ असून अभिव्यक्ती, चिंतन, दार्शनिकता व त्यातून जनमानसास दिला जाणारा संदेश बघू जाता गुरू ग्रंथ साहेबाचे आगळे स्थान लक्षात येऊ लागते. जगातील सर्व मानवांना समान लेखणारा, स्त्रियांना घरात व समाजात आदराचे स्थान देणारा, सर्वांचा ईश्वर हा एकच आहे हे ठासून सांगणारा, सचोटीने जगण्या-बोलण्याचा संदेश देणारा, काम-क्रोध-लोभ-मोह-मद ह्यांसारख्या पंचरिपूंना दूर ठेवायला सांगणारा, कर्मवादाला मान्यता देणारा, आत्मनिरीक्षण व ध्यानाचे महत्त्व समजावणारा, लोककल्याणाला प्रेरक असा गुरू ग्रंथ साहिबातील संदेश व्यवहारातही मधुर शब्द वापरण्याची व विनम्रतेने वागण्याची शिकवण देतो.

रचना[संपादन]

शबदांमध्ये ओळींच्या संख्येनुसार आकॄतिबंधाचे वैविध्य आढळते. त्यांत द्विपदी, चौपदी, पंचपदी, षट्पदी, अष्टपदी व षोडशपदी रचना उपलब्ध आहेत.

रागबद्ध संगीत[संपादन]

गुरू ग्रंथ साहिबातील सर्व शबद हे वेगवेगळ्या रागांमध्ये गुंफले असून ते तसेच गायले जातात. सुरुवातीची जपजी साहिब ही रचना व शेवटचा काही भाग सोडला तर उर्वरीत सर्व ग्रंथातील रचना ह्या निरनिराळ्या एकतीस रागांमध्ये आहेत असे संदर्भ गुरू ग्रंथसाहिबात आढळतात.

बाह्य दुवे[संपादन]

  • अरुंधती कुलकर्णी. "शबद गुरबानी".