Jump to content

विकिपीडिया:मासिक सदर/नोव्हेंबर २०१८

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रांगोळी भारताची प्राचीन सांस्कृतिक परंपरा आणि लोक-कला आहे. भारताच्या वेगवेगळ्या प्रांतात रांगोळीचे वैविध्य दिसून येते पण त्यामागील निहित भावना आणि संस्कृतीमध्ये पर्याप्त समानता आहे. संस्कृत भाषेत रांगोळीला रंगवल्ली म्हटले जाते. सौंदर्याचा साक्षात्कार व मंगलाची सिद्धी हे रांगोळीचे उद्देश मानले जातात. रांगोळी म्हणजे रंगांच्या सहाय्याने रेखाटलेल्या ओळींपासून तयार झालेली आकृती होय. भारतीय संस्कृतीमध्ये रांगोळीला बरेच महत्व आहे. सण, उत्सव, मंगलसमारंभ, पूजा, कुलाचार, कुलधर्म, संस्कारविधी, व्रतवैकल्ये यांच्याशी सामान्यपणे ही कला निगडित आहे. तिचा उगम धर्माच्या अनुबंधानेच झाला आहे असे मानले जाते. प्रत्येक दिवसाला किंवा सणाला वेगवेगळ्या आकाराची रांगोळी काढण्याची प्रथा परंपरेने चालत आलेली आहे. देवघर, अंगण, उंबरठा तसेच तुळशी जवळ रांगोळी काढली जाते. एखाद्या व्यक्तीला ओवाळताना ती व्यक्ती बसलेल्या पाटाभोवती आणि पाटाखालीही रांगोळी काढतात.

रांगोळीचा उल्लेख रामायण, महाभारत तसेच वेदांसोबत अनेक ग्रंथांमध्येही आढळतो. वैदिक साहित्यात मंडल अथवा चक्र असे शब्द आढळतात. सुमारे एक हजार वर्षांपूर्वी वात्स्यायनाने लिहिलेल्या कामसूत्र या ग्रंथामध्ये स्त्रियांना अवगत असाव्या अशा चौसष्ट कलांमध्ये रांगोळी या कलेचा सामावेश होतो. इसवी सनाच्या तिसऱ्या शतकात धान्याचा उपयोग करून रांगोळी काढीत. सरस्वतीच्या मंदिरात तसेच कामदेव व शिवलिंग यांच्या पूजेसाठी विविधरंगी फुलांनीही आकृतिबंधात्मक रांगोळी काढत. वरांग चरित या ग्रंथात (सातवे शतक) पंचरंगी चूर्ण, धान्ये व फुले यांनी रांगोळीचे चित्रविचित्र आकृतिबंध तयार करीत असल्याचे उल्लेख सांगितले आहे. नलचम्पू ग्रंथात (दहावे शतक) उत्सवप्रसंगी घरापुढे रांगोळी काढीत असल्याचे उल्लेख आहेत. गद्यचिंतामणी, देशीनाममाला, मानसोल्लास या ग्रंथातही रांगोळीचे संदर्भ सापडतात. गद्यचिंतामणी (अकरावे शतक) या ग्रंथात भोजनसमारंभात मंगलचूर्णरेखा काढीत, असा उल्लेख आढळतो. हेमचंद्राच्या (अकरा-बारावे शतक) देशीनाममाला या ग्रंथात तांदळाच्या पिठाने रांगोळी काढीत असल्याचा निर्देश आहे.

सौंदर्याचा साक्षात्कार व मंगलाची सिद्धी हे रांगोळीचे दोन उद्देश होत. रांगोळीच्या ज्या आकृत्या काढतात त्या प्रतीकात्मक असतात. स्वस्तिक, सूर्य, चंद्र, तारे, चक्र, चक्रव्यूह, त्रिशूळ, वज्र, कलश अशा प्रतीकांचा समावेश असतो. रांगोळीचे त्रिदल हे त्रिभुवन, तीन देव, तीन अवस्था आणि त्रिकाळ यांचे म्हणजेच पर्यायाने त्रिधा विभक्त अशा विश्वतत्वाचे प्रतीक असते असे मानले जाते. शंख, स्वस्तिक, चंद्र, सूर्य ही आणखी प्रतीके होत. साखळी ही नागयुग्माचे, अष्टदल हे अष्टदिशातत्मक विश्वाचे, कमल हे लक्ष्मीचे व प्रजननशक्तीचे प्रतीक असून वैष्णव उपासनेत त्याला विशेष महत्व आहे. याशिवाय एकलिंगतोभद्र, अष्टलिंगतोभद्र, सर्वतोभद्र अशाही रांगोळ्या धर्मकृत्यात काढल्या जातात. प्रतीकांच्या रचना म्हणजे एक प्रकारची सांकेतिक भाषाच असते असे मानले जाते. रांगोळीतील प्रतीके ही आध्यात्मिक अनुभूती देतात अशीही धारणा रांगोळी काढण्यामागे दिसून येते.

पुढे वाचा... रांगोळी