ललिता पवार
भारतीय अभिनेत्री | |||||
| माध्यमे अपभारण करा | |||||
| उच्चारणाचा श्राव्य | ⓘ | ||||
|---|---|---|---|---|---|
| स्थानिक भाषेतील नाव |
| ||||
| जन्म तारीख | एप्रिल १६, इ.स. १९१६ नाशिक | ||||
| मृत्यू तारीख | फेब्रुवारी २४, इ.स. १९९८ पुणे | ||||
| कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||||
| कार्य कालावधी (अंत) |
| ||||
| नागरिकत्व |
| ||||
| व्यवसाय |
| ||||
| उल्लेखनीय कार्य |
| ||||
| पुरस्कार |
| ||||
| |||||

ललिता पवार (१८ एप्रिल, १९१६:येवला, नाशिक जिल्हा, महाराष्ट्र - २४ फेब्रुवारी, १९९८, पुणे) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री होती. सुरुवातीच्या काळात मराठी चित्रपटसृष्टीमध्ये नायिकेच्या भूमिका करणाऱ्या ललिता पवार यांनी नेताजी पालकर, संत दामाजी, अमृत, गोरा कुंभार इत्यादी यशस्वी मराठी चित्रपटांमध्ये कामे केली होती. त्यानंतर त्यांच्या डोळ्याला इजा झाल्यानॆ त्यांना बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये खलनायिकेच्या भूमिका कराव्या लागल्या. दूरदर्शनवरील रामायण या मालिकेमध्ये त्यांनी मंथरेची भूमिका केली होती.
वयाच्या १२ वर्षापासून चित्रपटांत काम करणाऱ्या ललिता पवार यांची विक्रमी सिनेकारकीर्द एकूण ७० वर्षांची आहे. त्यांनी सुमारे ७०० चित्रपटांत भूशा भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री. त्यांचा जन्म नाशिकजवळील येवला येथे झाला. त्यानंतर त्यांचे पुढील वास्तव्य इंदूर आणि पुणे येथे होते. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव अंबिका लक्ष्मण सगुण. त्यांचे वडील लक्ष्मण सगुण हे व्यापारी होते. ललिताबाईंचे शिक्षण प्राथमिक शाळेपर्यंत झाले. त्यानंतर त्यांनी मूकपटात बालकलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली.
१९२८ साली आर्यमहिला या मूकपटात त्यांना भूमिका मिळाली. त्यानंतर गनिमी कावा (१९२८), जी. पी. पवारदिग्दर्शित ठकसेन राजपुत्र (१९२९), समशेर बहादूर (१९३०), चतुर सुंदरी (१९३०), पृथ्वीराज संयोगिता (१९३०), दिलेर जिगर (१९३१) इ. मूकपटांत त्यांनी विविध प्रकारच्या भूमिका केल्या. पुढे बोलपटांची सुरुवात झाल्यानंतर त्यांना बोलपटातही चांगली कामे मिळू लागली. मुंबईच्या चंद्र आर्ट्सच्या हिम्मते मर्दा (१९३५) या बोलपटात त्या नायिका होत्या. या चित्रपटाचे नायक मास्टर भगवान होते. हाच त्यांचा मुख्य भूमिका असलेला पहिला बोलपट. हा चित्रपट खूप गाजला. या चित्रपटाचे दिग्दर्शक गणपतराव पवार होते.
१९३८ मध्ये टॉलस्टॉयच्या रेसरेक्शन या कादंबरीवरून दुनिया क्या है? (१९३८) ह्या चित्रपटाची निर्मिती पवार यांनी केली आणि त्यात भूमिकाही केली. त्यातील गाणी त्यांनी स्वतःच म्हणली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांचे पती गणपतराव पवार यांनीच केले होते. भालजी पेंढारकरलिखित-दिग्दर्शित अरुण पिक्चर्सच्या नेताजी पालकर (१९३९) या चित्रपटात काशी या नायिकेची भूमिका त्यांनी प्रभावीपणे वठविली. हा त्यांचा पहिला मराठी बोलपट. एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अनवधनाने घडलेल्या अपघातामुळे त्यांना चेहऱ्याच्या पक्षाघाताचा आजार झाला व या आजारपणात त्यांचा एक डोळा अधू झाला. परिणामी त्यांना चित्रपटांमध्ये नायिकेच्या भूमिका मिळणे बहुतांशी बंद झाले. पुढे त्यांनी चित्रपटांमध्ये चरित्र भूमिका साकारण्यास सुरुवात केली. त्यांच्या महत्त्वाच्या भूमिका असलेले मराठी चित्रपट म्हणजे अमृत (१९४२), गोरा कुंभार, जय मल्हार (१९४७), रामशास्त्री (१९४४), अमर भूपाळी (१९५१), मानाचं पान (१९५०), चोरीचा मामला (१९७६) हे होत. प्रभातच्या रामशास्त्री या चित्रपटात त्यांनी महत्त्वाकांक्षी, निष्ठूर आणि करारी स्वभावाच्या आनंदीबाईंची भूमिका केली होती.
ललिताबाईंना अनाडी चित्रपटातील डिसा या भूमिकेकरिता फिल्मफेअरचा साहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला (१९६०). त्यांना १९६१ साली संगीत नाटक अकादेमी पुरस्कार व १९७७ साली महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त झाला. गृहस्थी, सजनी, अनाडी, घर बसा के देखो या चित्रपटांतील उत्कृष्ट भूमिकांबद्दल त्यांना विविध पुरस्कार मिळाले.
मूकपटापासून बोलपटापर्यंतच्या सु. सात दशकांच्या प्रदीर्घ कालखंडात चित्रपटसृष्टीत टिकून राहिलेल्या ललिता पवार चरित्रनायिका म्हणून विशेष लक्षात राहतात.
ललिताबाईंचा विवाह दिग्दर्शक गणपतराव पवार यांच्याशी झाला. पण हे विवाहबंधन फार काळ टिकले नाही. त्यांचा दुसरा विवाह निर्माते राजप्रकाश गुप्ता यांच्याशी झाला.
आयुष्याच्या उत्तरार्धात ललिताबाईंना तोंडाचा कर्करोग झाला होता. यामुळे त्यांची प्रकृती खूप खालावली. त्यातच त्यांचे पुणे येथे एकाकी अवस्थेत निधन झाले.
- फिल्मफेअर पुरस्कार
- १९५९ - सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री - अनाडी
- संगीत नाटक अकादमी पुरस्कार - १९६१
निवडक चित्रपट
[संपादन]| चित्रपट | वर्ष | भाषा | सहकलाकार | पुरस्कार आणि श्रेणी | वैशिष्ट्य |
|---|---|---|---|---|---|
| राजा हरिश्चंद्र | १९२८ | मूकपट | -- | -- | बालकलाकार म्हणून पदार्पण |
| हिम्मत-ए-मर्दा | १९३५ | हिंदी | पैदी जयराज | -- | नायिका म्हणून सुरुवातीचा मोठा चित्रपट |
| नेताजी पालकर | १९३८ | मराठी | मास्टर विठ्ठल | -- | भालजी पेंढारकर दिग्दर्शित यशस्वी मराठी चित्रपट |
| अमृत | १९४१ | मराठी/हिंदी | गजानन जागीरदार | -- | व्ही. एस. खांडेकर यांच्या कथेवर आधारित |
| रामशास्त्री | १९४४ | मराठी | गजानन जागीरदार | -- | आनंदीबाईंच्या भूमिकेसाठी विशेष कौतुक |
| अमर भूपाळी | १९५१ | मराठी | पंढरीनाथ बेरे | कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गौरव | व्ही. शांताराम दिग्दर्शित महत्त्वाचा चित्रपट |
| दाग | १९५२ | हिंदी | दिलीप कुमार, निम्मी | -- | चरित्र अभिनेत्री म्हणून ओळख निर्माण झाली |
| श्री ४२० | १९५५ | हिंदी | राज कपूर, नर्गिस | -- | 'गंगा माई' ही सकारात्मक भूमिका गाजली |
| मिस्टर अँड मिसेस ५५ | १९५५ | हिंदी | गुरू दत्त, मधुबाला | -- | कठोर मावशीची भूमिका |
| अनाडी | १९५९ | हिंदी | राज कपूर, नूतन | फिल्मफेअर पुरस्कार: सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री [१] | 'मिसेस डिसोझा' ही अजरामर भूमिका |
| जिस देश में गंगा बहती है | १९६० | हिंदी | राज कपूर, पद्मिनी | -- | मोठा व्यावसायिक विजय |
| संपूर्ण रामायण | १९६१ | हिंदी | महिपाल, अनिता गुहा | -- | मंथरा या भूमिकेची पहिली मोठी छाप |
| प्रोफेसर | १९६२ | हिंदी | शम्मी कपूर, कल्पना | फिल्मफेअर नामांकन: सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री | व्यावसायिक यश |
| संगम | १९६४ | हिंदी | राज कपूर, वैजयंतीमाला | -- | राज कपूर यांच्यासोबतचे यशस्वी काम |
| बॉम्बे टू गोवा | १९७२ | हिंदी | अमिताभ बच्चन, महमूद | -- | विनोदी-चरित्र भूमिका |
| सौ दिन सास के | १९८० | हिंदी | रीना रॉय, राज बब्बर | -- | 'कठोर सासू' या प्रतिमेसाठी गाजलेला चित्रपट |
| रामायण | १९८७ | टीव्ही मालिका | अरुण गोविल, दीपिका चिखलिया | संगीत नाटक अकादमी पुरस्कार (अभिनय) [२] | मंथरा म्हणून मिळालेली जागतिक ओळख |
| भैय्या | १९९७ | हिंदी | सनी देओल | -- | त्यांच्या कारकिर्दीतील शेवटच्या प्रमुख चित्रपटांपैकी एक |
वैयक्तिक जीवन
[संपादन]ललिता पवार यांचे पहिले लग्न गणपतराव पवार यांच्याशी झाले होते. परंतु, गणपतरावांचे त्यांच्या धाकट्या बहिणीशी संबंध असल्याचे समजल्यानंतर हा विवाह संपुष्टात आला. त्यानंतर त्यांनी मुंबईतील अंबिका स्टुडिओचे चित्रपट निर्माते राजप्रकाश गुप्ता यांच्याशी विवाह केला. त्यांचा मुलगा जय पवार हे निर्माते बनले आणि त्यांनी 'मंझिल' सारख्या चित्रपटांमध्ये त्यांच्यासोबत काम केले. जय पवार यांना संजय पवार आणि मनोज पवार ही दोन मुले होती. ललिता पवार त्यांच्या पतीसह जुहू, मुंबई येथे त्यांचा नातू संजय पवार आणि पणती अनुष्का व आन्य पवार यांच्यासोबत राहत असत. २४ फेब्रुवारी १९९८ रोजी पुणे येथील औंध भागात त्यांचे निधन झाले. त्या काही काळापासून तिथे वास्तव्यास होत्या. तोंडाच्या कर्करोगामुळे त्यांची प्राणज्योत मालवली.[३][४][५]
बाह्य दुवे
[संपादन]- इंटरनेट मुव्ही डेटाबेस वरील ललिता पवार चे पान (इंग्लिश मजकूर)

संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ↑ "Filmfare Awards Winners 1960". The Times of India. १५ मार्च २०२६ रोजी पाहिले.
- ↑ "Sangeet Natak Akademi Awardees - Acting". Sangeet Natak Akademi. १५ मार्च २०२६ रोजी पाहिले.
- ↑ "Lalita Pawar — Bollywood's wicked mother-in-law who we all loved to hate". The Print. १८ एप्रिल २०१९. १५ मार्च २०२६ रोजी पाहिले.
- ↑ "अभिनयाने सासू या शब्दाला वेगळी ओळख मिळवून देणाऱ्या ललिता पवार". लोकसत्ता. १८ एप्रिल २०२१. १५ मार्च २०२६ रोजी पाहिले.[permanent dead link]
- ↑ "ललिता पवार यांची आज पुण्यतिथी: जाणून घ्या त्यांच्याबद्दलच्या काही खास गोष्टी". महाराष्ट्र टाइम्स. २४ फेब्रुवारी २०२१. १५ मार्च २०२६ रोजी पाहिले.[permanent dead link]