मधुरिता सारंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
मधुरिता सारंग
आयुष्य
जन्म इ.स. १९५३
मृत्यू ३ एप्रिल २००६
व्यक्तिगत माहिती
धर्म हिंदू
नागरिकत्व भारतीय
देश भारत
पारिवारिक माहिती
आई अन्नपूर्णा सारंग
संगीत साधना
गुरू पं. शंकर प्रसाद
लच्छू महाराज
पं. चौबे महाराज
बिरजू महाराज
गायन प्रकार हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत, कथक
संगीत कारकीर्द
पेशा नृत्यांगना

नृत्यश्री मधुरिता सारंग (जन्म: इ.स.१९५३; - ३ एप्रिल २००६) या महाराष्ट्रातील एक प्रथितयश नृत्यांगना होत्या.

पूर्वायुष्य[संपादन]

मधुरिता यांच्या आईचे नाव अन्नपूर्णा. त्या डॉक्टर होत्या. सारंग घराणे अत्यंत श्रीमंत असल्याने मधुरिताच्या वाढदिवसाला त्यांच्या घरी अली अकबर खॉं, पंडित जसराज, रईस खान, प्रोतिमा बेदी, शोभा गुर्टू, किशोरी आमोणकर, सितारादेवी यांसारखे कलाकार येऊन आपले कार्यक्रम करीत असत. साहजिकच मधुरिताला संगीताची आणि नृत्याची गोडी अगदी बालवयातच लागली. जरी मधुरिताची इच्छा वकील होण्याची होती तरी त्या शेवटी नृत्यकलेत पारंगत झाल्या. त्यांनी पंडित शंकर प्रसाद, लच्छू महाराज, पंडित चौबे महाराज आणि बिरजूमहाराज या नृत्यकलेतील दिग्गजांकडून कथक नृत्याचे शिक्षण घेतले होते. त्या चंद्रशेखर पिल्लै आणि कल्याणसुंदरम् यांच्याकडे भरतनाट्यम्‌ही शिकल्या होत्या.

कारकीर्द[संपादन]

मधुरिता सारंग यांचे मानवी भावनांचे दर्शन घडवणारे नृत्यकौशल्य, नाच बसवून घेण्याची हातोटी आणि नृत्यनाट्याच्या अद्‌भुत संकल्पना खरोखरच लाजवाब असत. अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील जगप्रसिद्ध ॲलिस टुली हॉलमध्ये त्यांचा कथक नृत्याचा कार्यक्रम आणि त्याच वेळी झालेला शोभा गुर्टू यांचे गायन फार वाखाणले गेले होते. मधुरिता सारंग यांनी अमेरिकेशिवाय ब्राझील(१९९५), ऑस्ट्रेलिया, रशिया, न्यूझीलंड, जपान आदी देशांत आणि लंडन, सिंगापूर, रिओ-डी-जानीरो, दुबई आदी ठिकाणी आपल्या नृत्याचे कार्यक्रम केले होते.

मधुरिता सारंग याच्या भगिनी आणि गुरुभगिनी रचना सारंग यांनीही मधुरिताच्या स्मरणार्थ मुंबईत ’रचना आणि मधुरिता सारंग स्कूल ऑफ कथक ॲन्ड परफॉर्मिंग आर्ट्‌स’ (Rachna and Madhurita Sarang Academy of Performing Arts) या नावाची नृत्यसंस्था काढली आहे. मधुरिता सारंग यांच्या शिष्या अर्चना संजय यांनी २००४ साली पुणे शहरात ’कथक साधना केंद्र’ नावाची एक कथक नृत्य शिकवणारी संस्था काढली होती. मधुरितांच्या अकाली मृत्यूनंतर त्यांच्या स्मरणार्थ त्या संस्थेचे नाव ’मधुरिता सारंग स्कूल ऑफ कथक ॲन्ड परफॉर्मिंग आर्ट्‌स’असे बदलण्यात आले. अर्चना संजय या त्या संस्थेच्या सध्याच्या (इ.स.२०१३) संचालिका आहेत.

सारंग यांच्या नावे दिला जाणारा पुरस्कार[संपादन]

पुण्याच्या त्या नृत्यसंस्थेतर्फे मधुरिता सारंग यांच्या जानेवारीतील स्मृतिदिनाच्या निमित्ताने दरवर्षी एका नृत्यकलाकाराला आणि एका दृश्यकला सादर करणाऱ्या कलावंताला 'मधुरिता सारंग स्मृति सन्मान' पुरस्कार दिला जातो. ह्या पुरस्काराचा दर्जा आंतरराष्ट्रीय पुरस्काराच्या वा जीवनगौरव पुरस्कारांच्या योग्यतेचा असतो. आत्तापर्यंत हे पुरस्कार राजेंद्र गंगाणी, पुरु दधीच (२०१०), मंजिरी देव, गीतांजली लाल (२०१२), कुमुदिनी लाखिया (२००९), शमा भाटे (२०१३), डॉ.सुचेता भिडे चापेकर या नृत्यगुरूंना, तसेच गायक अजय पोहनकर (२०१०), बासरीवादक रोणू मुजुमदार (२०१२), तबलावादक सुरेश तळवलकर (२००९) व सतारवादक मंजू मेहता (२०१३) यांना प्रदान केले गेले आहेत.

हा पुरस्कार वितरण सोहोळा पुण्यात होतो आणि त्या दिवशी होणाऱ्या नृत्याच्या आणि संगीताच्या कार्यक्रमाला श्रोत्यांना आणि प्रेक्षकांना मुक्त व विनामूल्य प्रवेश असतो.

पहा : मराठी नर्तकी