शमा भाटे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


शमा भाटे

शमा भाटे ( ६ ऑक्टोबर १९५०) या एक कथ्थक नृत्यांगना आहेत.[१] गुरू रोहिणी भाटे यांच्या त्या स्नुषा आणि त्यांच्या प्रमुख शिष्यांपैकी एक आहेत. त्यांची नृत्यातील कारकीर्द सुमारे ३५ वर्षांची आहे. त्या वयाच्या चौथ्या वर्षापासून कथक नृत्य करत आहेत. त्या कथक नृत्याचे शिक्षण देतात. तसेच कथक नृत्यांचे दिग्दर्शनसुद्धा करतात. त्यांनी कथक नृत्याच्या प्रसारासाठी नादरूप अकादमीची पुण्यात स्थापना केलेली आहे.[२]

पार्श्वभूमी[संपादन]

शमा भाटे यांचा जन्म बेळगाव येथे ६ ऑक्टोबर १९५० रोजी झाला. त्यांच्या आईचे नाव गुलाब बाईसा नाईक आणि वडलांचे नाव गंगाधर जी. नाईक आहे. १९७४ मध्ये त्यांचा विवाह गुरू रोहिणी भाट्यांचा पुत्र सनत यांच्याशी झाला. त्यांना अंगद भाटे हा पुत्र आहे.   

शिक्षण[संपादन]

शमा भाटे या गुरु रोहिणी भाट्यांच्या प्रमुख शिष्यांपैकी एक[३] तसेच त्यांची सून आहेत. त्यांनी कथक सम्राट पंडित बिरजू महाराज आणि पंडित मोहनराव कल्याणपूरकर यांच्याकडूनसुद्धा कथकचे शिक्षण घेतले आहे. कथकमधील या गुरूंबरोबरच त्यांनी ताल आणि लयीचे खास शिक्षण पंडित सुरेश तळवलकर यांच्याकडून घेतले आहे.[१]

गेली अनेक वर्षे, शमा भाटे या अनेक शिष्यांना कथक नृत्याचे शिक्षण देत आहेत. हा शिष्यवर्ग भारतात आणि परदेशात नृत्याचे कार्यक्रम तसेच नृत्य प्रशिक्षणाचे काम करत असतो. त्या अनेक विद्यापीठांच्या समित्यांवर आहेत. तसेच पुण्याचे ललित कला केंद्र, मुंबई विद्यापीठातील नालंदा महाविद्यालय, नागपूर विद्यापीठाच्या अंतर्गत असलेले भारत महाविद्यालय, पुण्यातील भारती विद्यापीठ येथे त्या ज्येष्ठ गुरू म्हणून काम करतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 30 पेक्षा जास्त विद्यार्थीनींनी विविध विद्यापीठांमधून पदव्युत्तर पदवी मिळवली आहे आणि 12 विद्यार्थीनींनी केंद्रिय मनुष्यबळ विकास मंत्रालयाची शिष्यवृत्ती आणि सीसीइआरटी शिष्यवृत्ती मिळवली आहे.

नृत्य दिग्दर्शन[संपादन]

शमा भाटे यांनी नृत्य दिग्दर्शनाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी केलेली आहे. त्यांनी पारंपरिक तसेच आधुनिक दोन्ही प्रकारच्या कथक नृत्यात प्रयोग केले आहेत. त्यांनी त्रिशूल (९,१० आणि ११ तालांचे एकत्रीकरण, लयसोपान  (पंच जातींद्वारे पारंपरिक कथक प्रस्तुती. त्यांनी भारतीय महाकाव्य महाभारतावर आधारित “अतीत की परछाईया” नावाचा कार्यक्रम केला होता. त्यामध्ये ७ विविध भारतीय नृत्य प्रकार आणि लोकनृत्ये यांचा समावेश आहे.

विविध समित्यांवर काम[संपादन]

संगीत नाटक अकादमीच्या सल्लागार समिती सदस्या २०१५ पासून

कथक केंद्र दिल्लीच्या सल्लागार समिती सदस्या २०१० पासून

आवर्तन गुरूकुल पुणे, येथे गुरू

टिळक महाराष्ट्र विद्यापीठात पी.एच.डी. मार्गदर्शक म्हणून नियुक्ती

एम.आय.टी. विश्वशांती गुरुकुल येथे सल्लागार आणि व्यवस्थापन समिती सदस्या

पुणे विद्यापीठात  पी.एच.डी. मार्गदर्शक म्हणून नियुक्ती

बी.ए. आणि एम.ए. (नृत्य) परीक्षांच्या परीक्षक

नृत्यभारती कथक नृत्य अकादमीच्या सचिव

पुरस्कार आणि सन्मान[संपादन]

  • शमा भाटे यांना २०१३ साली मधुरिता सारंग स्मृति पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • १० जानेवारी २०१६ रोजी झालेल्या अखिल भारतीय नृत्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांना मिळाले. हे संमेलन सासवड येथील ‘कलासिद्धी नृत्यालय’, ‘हिरकणी महिला प्रतिष्ठान’, ‘पायलवृंद आणि अभिव्यक्ती’ या संस्थानी आयोजित केले होते. पुण्यातल्या पद्मावती येथील अण्णा भाऊ साठे नाट्यगृहात हे संमेलन झाले.
  • लोकरंग सांस्कृतिक मंच या संस्थेतर्फे नाटककार आणि गीतकार अशोक परांजपे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात आलेला पुरस्कार (१६-७-२०१६)
  • शमा भाटे व कथक नृत्य गुरू नीलिमा अध्ये यांना महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते गुरू रोहिणी भाटे पुरस्कार देण्यात आला (जून २०१९)

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Expanding The Boundaries". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2019-10-24 रोजी पाहिले.
  2. ^ "Shama Bhate | Nadroop" (इंग्रजी भाषेत). 2019-10-24 रोजी पाहिले.
  3. ^ Kothari, Sunil (1989). Kathak, Indian Classical Dance Art (इंग्रजी भाषेत). Abhinav Publications. ISBN 9788170172239.