Jump to content

अब्दुल हमीद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कंपनी क्वार्टरमास्टर हवालदार
अब्दुल हमीद इद्रिशी
साचा:Post-nominals
refer to caption
अब्दुल हमीद यांच्या स्मरणार्थ इंडिया पोस्टने काढलेले ३ रुपयांचे टपालतिकिट
जन्म १ जुलै, १९३३
धामुपूर, गाझीपूर जिल्हा, उत्तर प्रदेश, भारत
मृत्यू १० सप्टेंबर, १९६५
खेम करण, तरण तारण जिल्हा, पंजाब, भारत
सैन्यशाखा भारतीय सैन्य
सेवावर्षे १९५४-६५
हुद्दा कंपनी क्वार्टरमास्टर हवालदार
सैन्यपथक ४ ग्रेनेडियर्स
लढाया व युद्धे
पुरस्कार
पती/पत्नी रसूलन बेगम
नातेवाईक मोहम्मद उस्मान (वडील), सकीना बेगम (आई)

कंपनी क्वार्टरमास्टर हवालदार अब्दुल हमीद इद्रिशी पीव्हीसी (१ जुलै, १९३३:धामुपूर, गाझीपूर जिल्हा, उत्तर प्रदेश, भारत - १० सप्टेंबर, १९६५:खेम करण, तरण तारण जिल्हा, पंजाब, भारत), हे एक भारतीय सैनिक होते. १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यानच्या त्यांच्या शौर्याबद्दल त्यांना भारताचा सर्वोच्च लष्करी सन्मान, परमवीर चक्र मरणोत्तर देण्यात आला.

हमीद डिसेंबर १९५४मध्ये सैन्यात दाखल झाले. त्यांची नियुक्ती ग्रेनेडियर्स रेजिमेंटच्या ४थ्या बटालियनमध्ये झाली. चीन-भारत युद्धादरम्यान, त्यांच्या बटालियनने चिनी पीपल्स लिबरेशन आर्मी विरुद्ध नामका चूच्या लढाईत भाग घेतला. १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान त्यांच्या ४ ग्रेनेडियर्स बटालियनला खेम करण - भिखीविंड मार्गावरील चिमा गावाजवळील एक व्यूहात्मक जागेचे रक्षण करण्याची जबाबदारी दिली गेली. ९-१० सप्टेंबर ला झालेल्या असल उत्तरच्या लढाईत हमीदने आठ पाकिस्तानी रणगाडे नष्ट केले आणि नवव्या रणगाड्याचा धुव्वा उडवत असताना त्यांना वीरमरण आले.

प्रारंभिक जीवन

[संपादन]

अब्दुल हमीद यांचा जन्म १ जुलै, १९३३ रोजी उत्तर प्रदेश राज्यातील गाझीपूर जिल्ह्यातील एका गावात झाला. त्यांच्या आईचे नाव सकिना बेगम आणि वडील मोहम्मद उस्मान हे शिंपी होते. हमीद वडिलांच्या व्यवसायात कपडे शिवून मदत करायचे. []

लष्करी कारकीर्द

[संपादन]

अब्दुल हमीद २७ डिसेंबर, १९५४ रोजी ते भारतीय लष्कराच्या ग्रेनेडियर्स रेजिमेंटमध्ये ४थ्या बटालियनमध्ये सामील झाले. तेव्हापासून आपल्या वीरमरणापर्यंत आपल्या उर्वरित कारकिर्दीत त्यांनी येथेच सेवा बजावली. [] हे आग्रा, अमृतसर, जम्मू काश्मीर, दिल्ली, नेफा आणि रामगढ येथे तैनात होते. []

१९६५ चे भारत-पाकिस्तान युद्ध

[संपादन]
भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यात शेकडो घुसखोरांच्या अस्तित्त्व असल्याचे सांगणारा यूएस स्टेट डिपार्टमेंटचा तारसंदेश.

भारताच्या जम्मू आणि काश्मीरमध्ये देशाविरुद्ध बंडखोरी आणि उठाव घडवून आणण्यासाठी पाकिस्तानने १९६५ च्या उन्हाळ्यात चकमकी सुरू केल्या. याचा फायदा घेत त्यांनी शेकडो घूसखोर भारतात पाठवले. ५-१० ऑगस्ट दरम्यान भारतीय सैन्याने असे घूसखोर पकडले व पाकिस्तानच्या बेताचा पर्दाफाश केला. हस्तगत केलेली कागदपत्रे आणि कैद्यांच्या जबानीतून गनिमी हल्ल्याने काश्मीर ताब्यात घेण्याची पाकिस्तानची योजना उघडकीस आली. या हल्ल्यासाठी सुमारे पाकिस्तानने सुमारे ३०,००० गनिमांना पाकिस्तानींनी प्रशिक्षण दिले होते. अनाकलनीय कारणांमुळे या गनिमी तुकड्या विखुरल्या किंवा नष्ट झाल्या आणि ही कारवाई कधीच झाली नाही. [] या गनिमी तळांचा नाश करण्याच्या चकमकींमध्ये पाकिस्तानने छंब आणि जौरियान ताब्यात घेतले. अमृतसरमधील भारतीय हवाई दलाच्या तळावरही हल्ले झाले. []

प्रत्युत्तरात भारताने आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून कारवाया सुरू केल्या. इचोगिल कालव्याच्या [a] पूर्वेकडील पाकिस्तानी प्रदेश ताब्यात घेण्याचा आणि कसुर - खेम करण अक्षाच्या बाजूने संभाव्य हल्ला दडपण्याची जबाबदारी चौथ्या पायदळ डिव्हिजनवर ठेवण्यात आली होता. कालव्यापर्यंत जाउन ही डिव्हिजन पाकिस्तानी प्रतिहल्ल्याची वाट पाहत होती. यात ४ ग्रेनेडियर्सना खेम करण- भिखीविंड मार्गावरील चिमा गावाजवळील एक महत्त्वपूर्ण स्थान सोपविण्यात आले. []

असल उत्तरची लढाई

[संपादन]

४ ग्रेनेडियर्सनी ७-८ सप्टेंबर दरम्यानच्या मध्यरात्री या जागेवर ठाण मांडले आणि पहाटेपर्यंत ३-फूट (०.९१ मी) रुंदीचे खंद खणून ठेवले. सकाळी ७:३० वाजता त्यांना पाकिस्तानी रणगाड्यांची पहिली चाहूल लागली. [] सुमारे ९:०० वाजेपर्यंत हे रणगाडे चीमा गावाजवळील ४ ग्रेनेडियर्सच्या समोरील तासानंतर रस्त्यावर आले. अब्दुल हमीदकडे त्यांच्या बटालियनच्या जाँगा-माउंटेड ॉरिकोइलेस रायफल (RCLR) तुकडीचे नेतृत्व होते. [] त्यांनी धीर धरीत रणगाड्यांना जवळ येऊ दिले ३० फूट अंतरावर पहिला रणगाडा आल्याबरोबर हमीदनी आपल्या आरसीएलमधून त्याच्यावर हल्ला केला. असा अचानक आणि भेदक मारा पाहताच नष्ट झालेल्या रणगाड्यामागील रणगाड्यांनी पळ काढला. नंतर ११:३० चिलखती गाड्या आणि रणगाडे पुन्हा ग्रेनेडियर्सवर चालून आले. यावळी हमीदने अजून एका रणगाड्याला यमसदनी धाडले आणि पुन्हा एकदा उरलेल्या पाकिस्तान्यांनी पळता भुई थोडी केली. संध्याकाळ होताना अशा हल्ल्यांविरुद्ध संरक्षण म्हणून इंजिनियर्स कोरने ग्रेनेडियर्सच्या खंदकाभोवती सुरुंग लावून ठेवले.[]

अब्दुल हमीद यांनी वापरलेली १०५ मिमी जाँगा - माऊंटेड आरसीएल तोफ

दुसऱ्या दिवशी (९ सप्टेंबर) सकाळी ९ वाजता पाकिस्तानी सेबरजेट विमानांनी ४ ग्रेनेडियर्सवर तुफानी बॉम्बफेक केली व मोठी जीवितहानी केली. त्यानंतर लगेच ९:३० वाजता पुन्हा एकदा पाकिस्तानी चिलखती सैन्य चालून आले. त्या हल्ल्याला रोखून धरल्यावर पाकिस्तान्यांनी ११:३० आणि नंतर दुपारी २:३० वाजता कडाडून हल्ले केले. ग्रेनेडियर्सनी अतिशौर्याने त्यांचा सामना करीत प्रत्येक वेळी शत्रूला धूळ चारली. संध्याकाळपर्यंत त्यांनी १३ पाकिस्तानी रणगाडे उद्ध्वस्त केले होते. यांत हमीदनी स्वतः ४ रणगाडे निकामी केले होती. याशिवाय अनेक रणगाडे तसेच टाकून पाकिस्तानी सैनिक पळून गेले होते. या लढाईमध्ये पाकिस्तान्यांकडील अमेरिकन बनावटीचे पॅटन रणगाडे भारताकडील शेरमन रणगाड्यांपेक्षा वरचढ आहे हे लक्षात आले आणि भारताने आपले शेरमन तसेच सेंचुरियन रणगाड्यांच्या स्क्वॉड्रन येथून मागे खेचल्या. आता ग्रेनेडियर्सकडे फक्त आरसीएल तोफा आणि सुरुंग इतकेच बळ उरले होते.

पुढील सकाळी (१० सप्टेंबर) ८:०० च्या सुमारास पाकिस्तान्यांनी तीन रणगाड्यांनिशी हल्ला चढवला. त्यातील पुढे असलेला रणगाडा ६०० फूटांवर आल्याबरोबर हमीदने त्याचा फडशा पाडला. तासाभराने अधिक कुमक घेउन शत्रू निकराने चालून आला. हमीदने त्यांच्यातीलही एका रणगाड्याला विध्वंस केला. शत्रूने सुलतानढवा सुरू केलेला पाहून हमीदने आपल्या तुकडीला सुरक्षित स्थळी आसरा घेण्याचा आदेश दिला आणि आपली जीप घेउन ते रणांगणात फिरू लागले. उघड्या वाहनाला सगळीकडून धोका असल्याने ते जागोजाग थांबून निशाणा साधत होत व लगेचच तेथून पळ काढून पुढच्या ठिकाणाहून हल्ला करीत होते.

असे करीत असताना एका पाकिस्तानी रणगाड्याने त्यांना कठीण ठिकाणी कोंडून धरले. त्यांच्या साथीला कोणालाही येणे शक्य नव्हते. रणगाड्याने आपली अवाढव्य तोफ हमीदच्या छोट्याशा जीपवर रोखली. एकट्या पडलेल्या हमीदने जागेवरून हलता येत नसतानाही न घाबरता किंवा बावचळता आपली आरसीएल उलट रणगाड्यावर रोखली आणि दोघांनीही एकाच क्षणी हल्ला केला. हमीदने आपला नववा बळी मिळवला परंतु क्षणार्धात त्यांना वीरमरण आले.[]

४ ग्रेनेडियर्सनी उर्वरित हल्ल्याला रोखून धरले व भारताला निर्णायक विजय मिळवून दिला.

परमवीर चक्र

[संपादन]

असल उत्तरच्या लढाईतील अब्दुल हमीदच्या अतुलनीय शौर्याबद्दल त्यांना त्याच दिवशी परमवीर चक्र घोषित करण्यात आले. [१०]

परम योद्धा स्थळ, राष्ट्रीय युद्ध स्मारक, नवी दिल्ली येथे अब्दुल हमीद यांचा अर्धपुतळा

लष्करी सन्मान

[संपादन]
परमवीर चक्र []
समर सेवा तारा रक्षा पदक सैन्य सेवा पदक

हमीदच्या स्मरणार्थ इंडिया पोस्टने २८ जानेवारी, २००० रोजी एक टपाल तिकिट जारी केले. त्यात हमीद यांचे अर्धचित्र आणि त्यांची जाँगा-माउंटेड आरसीएल आणि जीपचे चित्रण आहे. [११]

परमवीर चक्र या दूरचित्रवाणी मालिकेच्या दहाव्या भागात अब्दुल हमीदच्या कामगिरीचे चित्रण आहे. यात हमीदची भूमिका नसीरुद्दीन शाह यांनी केली होती आणि या भागाचे दिग्दर्शन चेतन आनंद यांनी केले होते. [१२]

माहितीपट

[संपादन]

असल उत्तरची लढाई - दुसऱ्या महायुद्धानंतरची सर्वात मोठी रणगाड्यांची लढाई (२०१८) या माहितीपटात हमीद आणि ४ ग्रेनेडियर्सच्या कामगिरीचे चित्रण आहे. हा एक टीव्ही डॉक्युमेंटरी आहे जो डिस्कव्हरी चॅनल मालिका, मिशन आणि वॉर्सद्वारे वीरवर प्रदर्शित झाला आहे. [१३] [१४]

स्टोरी ऑफ CQMH अब्दुल हमीद मध्ये भारतीय असल उत्तरच्या लढाईतील घटना आणि अब्दुल हमीदच्या मृत्यूचे तपशीलवार प्रकाशन केले. [१५]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ Rajat Pandit (updated 12 August 2018) "National War Memorial to miss August 15 deadline". Times of India (). Retrieved on 26 November 2018.
  2. ^ Abdul Hamid death anniversary: Lesser-known facts about the Indian Army soldier posthumously conferred with the Param Vir Chakra Archived 2023-08-28 at the Wayback Machine., News9, 10 September 2022.
  3. ^ a b c Chakravorty 1995, पान. 49.
  4. ^ Palsokar 1980.
  5. ^ Cardozo 2003, पान. 92.
  6. ^ a b Cardozo 2003, पान. 93.
  7. ^ a b Cardozo 2003.
  8. ^ Chakravorty 1995.
  9. ^ Prabhakar 2003.
  10. ^ Chakravorty 1995, पान. 50.
  11. ^ "January 2000". Government of Maharastra. 4 March 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 26 February 2018 रोजी पाहिले.
  12. ^ Cheena Kapoor (10 September 2017). "Army Chief to keep promise made to 1965 martyr's wife". Daily News and Analysis. 17 January 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 26 February 2018 रोजी पाहिले.
  13. ^ "Battle of Asal Uttar – Largest Tank Battle Since World War II Mission & Wars". Veer by Discovery. 6 August 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 6 May 2018 रोजी पाहिले.
  14. ^ "This R-Day, get ready for Discovery channel's 'Battle Ops'". The Hindu. 25 January 2018. 6 August 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 22 April 2018 रोजी पाहिले.
  15. ^ ADGPI. "Story of CQMH Abdul Hamid". Youtube. Indian Army. रोजी मूळ पानापासून संग्रहित2023-10-17. 9 September 2018 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)

संदर्भ

[संपादन]

 साचा:Param Vir Chakra recipients
चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता <ref>खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="lower-alpha"/> खूण मिळाली नाही.