वर्षारंभ
१ जानेवारी हा सार्वत्रिकरीत्या वर्षारंभाचा पहिला दिवस असला तरी, जगांतील विविध देश व धर्म यांच्या हिशोबाने ३६५ दिवसांत प्रत्यक्षात ८० वर्षारंभ दिन येतात. यांपैकी कित्येक तारखा समान असल्या तरी १२ महिन्यांत ५८ दिवस असे आहेत की त्या दिवशी कुठलाना कुठला वर्षारंभ दिवस असतो.
आज जे इसवी सनाचे संवत्सर (ग्रेगोरियन कॅलेंडर) अंमलात आहे ते ख्रिश्चन धर्मगुरू आठवा पोप ग्रेगरी याने १५८२ साली तयार केले. त्याच्या आधीचे ज्युलियन कॅलेंडर (अंलबजावणी इसपू ४५ पासून) ज्युलियस सीझरने रोमन कॅलेंडरमध्ये सुधारणा करून बनवले होते. रोमन केलेंडरमधील १० महिन्यांमध्ये ज्युलियस सीझरने जुलै महिन्याची आणि ऑगस्टसने ऑगस्ट महिन्याची भर टाकल्याने ज्युलियन कॅलेंडरचे वर्ष १२ महिन्यांचे झाले. असे असले तरी, ख्रिश्चन धर्मातील एका पंथाचे-ईस्टर्न ऑर्थोडाॅक्स चर्चचे अनुयायी अजूनही रोमन कॅलेंडरच मानतात. त्यांचे नववर्ष ग्रेगोरियन कॅलेंडरातल्या १४ जानेवारीला सुरू होते.
चीनचे कॅलेंडर :- चीनच्या वर्षारंभाचा दिवस २० जानेवारी ते २० फेब्रुवारी दरम्यान पडतो. दर तीन वर्षांनी ह्या चांद्र कॅलेंडरचा सौर पंचांगाशी (सूर्याधारित सोलर पंचांगाशी) मेळ घालावा लागतो. चीनच्या वर्षांची आणि राशींची नावे बारा जनावरांच्या नावांवरून ठेवली आहेत. चीनचे लोक वर्षारंभाच्या दिवशी चिनी लोक एका मोठ्या लाल लिफाफ्यात पैसे घालतात व तो लिफाफा लहान मुलांना देतात. वाईट शक्तींना दूर ठेवण्यासाठी या दिवशी खूप फटाके फोडतात. चीनने इसवी सन १९४९मध्ये ग्रेगोरियन कॅलेंडरचा स्वीकार केला.
जपानचे कॅलेंडर :- जपानचे लोक चीनचे चांद्र कॅलेंडर पाळत असत. मात्र इ.स. १८७३पासून ते ग्रेगोरियन कॅलेडरनुसार वर्षारंभाचा दिवस मानू लागले आहेत. या दिवशी जपानी लोक, कुटुंबातील लोकांचे कष्ट कमी व्हावेत यासाठी, बौद्ध प्रार्थनागृहांत जाऊन १०८ वेळा घंटा वाजवतात. नव्या वर्षाला जपानमध्ये ओमिसाका म्हणतात.
कंबोडियाचे कॅलेंडर :- ह्यांच्या वर्षाच्या आरंभाचा दिवस १३ किंवा १४ एप्रिलाला पडतो. या दिवशी कंबोडियाची जनता विभिन्न धार्मिक स्थळांमध्ये जाते आणि पारंपरिक खेळ खेळते.
कोरियाचे कॅलेंडर :- ह्यांच्या वर्षाची सुरुवात चांद्र पंचांगाप्रमाणे होत असली, तरी १ जानेवारी हाही वर्षारंभाचा दिवस समजला जातो.
थायलंडचे कॅलेंडर : १३ किंवा १४ एप्रिल हा थायलंडच्या वर्षाचा पहिला दिवस. ह्या दिवशी लोक एकमेकांना थंडगार पाण्याने भिजवून शुभकामना देतात.
व्हिएटनामचे कॅलेंडर :- चिनी कॅलेंडरप्रमाणे व्हिएतनामी लोकांचे नवीन वर्ष २० जानेवारी ते २० फेब्रुवारी यादरम्यान सुरू होते. हा महत्त्वाच्या सणाचा आणि सुट्टीचा दिवस असतो.
श्रीलंकेचे कॅलंडर :- श्रीलंकेच्या नववर्षाच्या पहिल्या दिवसाला 'अलुत अवरुद्ध' म्हणतात. हा दिवस एप्रिलच्या मध्यावर येतो. नव्या वर्षाच्या आरंभीच्या दिवशी श्रीलंकेचे प्रजाजन नैसर्गिक वस्तू वापरून स्नान करतात. हे दुर्गुणांबद्दलचे आणि आयुष्यात केलेल्या चुकांचे प्रायश्चित्त समजले जाते.
युरोप :- युरोपात सर्वसाधारणपणे ग्रेगरीय दिनदर्शिका अंमलात आहे, परंतु ब्रिटनमधील पेमब्रोकशायर काऊंटीतील ग्वाटन व्हॅलीतील लोक १३ जानेवारी हा वर्षारंभाचा दिवस मानतात. हा ज्युलियन कॅलेंडरचा पहिला दिवस आहे.
डेन्मार्क :- नव्या वर्षाचे स्वागत म्हणून लोक घरातली जुनी आणि निरुपयोगी भांडी शेजाऱ्याच्या दारावर नेऊन फोडतात. वर्षारंभाच्या दिवशी सकाळी ज्याच्या दारावरती जास्तीत जास्त फुटकी भांडी मिळतील, तो वर्षभरात सर्वात अधिक प्रसिद्ध होईल, अशी कल्पना.
युरेशिया :- रशिया आणि जाॅर्जिया (हा युरोपात आणि आशियातही येतो.) येथील लाखो लोक ज्युलियन कॅलेंडर पाळतात. वर्षाच्या आरंभाचा दिवस १४ जानेवारीला येतो. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी रशियन लोक एका कागदावर आपली इच्छा लिहून तो कागद जाळतात. याशिवाय आदल्या रात्रीच्या बारा वाजायच्या आत एका पेल्यात शँपेन घेतात व तिचा एक थेंब जमिनीवर सांडून ती पितात.
आफ्रिका :- इथियोपियात नववर्षाला 'एनकुतातश' म्हणतात. या वर्षाचा पहिला दिवस सप्टेंबरच्या ११ तारखेला येतो. ग्रेगोरियन कॅलेंडरच्या लीप वर्षात हा दिवस एक दिवस पुढे जाऊन १२ तारखेला येतो.
अमेरिका :- अमेरिकेच्या पेनसिल्व्हानियामध्ये 'ओडुंडे' नावाचा एक उत्सव असतो. ज्या दिवशी हा उत्सव असतो, त्या दिवसाला 'आफ्रिकन न्यू ईयर'डे म्हणतात. हा दिवस जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पडतो. हा अमेरिकेतील आफ्रिकन लोकांकडून साजरा होणाऱ्या महत्त्वाच्या उत्सवांपैकी एक आहे.
नेपाळ :- नेपाळ परंपरेनुसार नवीन वर्ष १४ एप्रिलला सुरू होते. ह्या दिवशी सार्वत्रिक सुट्टी असते आणि लोक पारंपरिक पोषाख घालून हा दिवस साजरा करतात.
भारत
[संपादन]भारतात सार्वत्रिकरीत्या पाळले जाणारे कॅलेंडर म्हणजे आंतरराष्ट्रीय ग्रेगोरियन कॅलेंडर. याशिवाय [भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका|भारतीय राष्ट्रीय पंचांग]] (भारताचे राष्ट्रीय कॅलेंडर) नावाचे एक भारतातच वापरायचे सरकारी कॅलेंडर आहे. त्याच्या वर्षाचा अनुक्रमांक व महिन्यांची नावे शक संवत्सराप्रमाणेच असतात. २२ मार्च १९५७ रोजी सरकारने हे भारतीय राष्ट्रीय पंचांग वापरायला सुरुवात केली. प्रत्यक्षात जनतेची साथ न मिळाल्याने या कॅलेंडरच्या तारखा सरकारी पत्रांवर वा सरकारी राजपत्रांवर ग्रेगोरियन तारखांच्या जोडीने लिहिण्यापलीकडे अन्यत्र वापरल्या जात नाहीत. आकाशवाणीवरही या तारखेची घोषणा होते. वर्षारंभ २२ मार्चला (ग्रेगोरियन लीप वर्षात २१ मार्चला) होतो. महिन्यांची नावे हिंदू पंचांगाप्रमाणे असतात.
आर्थिक वर्षारंभ
[संपादन]१ एप्रिल हा भारतात आर्थिक वर्षारंभाचा दिवस असतो. ह्या दिवसापर्यंंत देशात पिकणाऱ्या शेतमालाचा अंदाज मिळत असल्याने ह्या दिवसापासून भारतात आर्थिक नववर्ष सुरू होते. इतर देशांमध्येही १ जानेवारीऐवजी अन्य दिवस हे आर्थिक वर्षारंभाचे दिवस आहेत. उदा०
- अमेरिका : १ ऑक्टोबर
- इंग्लंड : ६ एप्रिल
- इराण : २१ मार्च
- कोस्टा रिका : १ ऑक्टोबर
- थायलँड : १ ऑक्टोबर
- ब्रह्मदेश : १ ऑक्टोबर
१ एप्रिल हा आर्थिक वर्षारंभाचा दिवस असलेले भारताखेरीजचे अन्य देश
[संपादन]- कॅनडा
- जपान
- दक्षिण आफ्रिका
- हाँगकाँग
१ जुलै हा आर्थिक वर्षारंभाचा दिवस असलेले देश
[संपादन]- आयर्लँड
- ऑस्ट्रेलिया
- इजिप्त
- न्यू झीलंड
- पाकिस्तान
- बांगला देश
१ जानेवारी हा आर्थिक वर्षारंभाचा दिवस असलेले देश : - आयर्लंड, ऑस्ट्रेलिया, इटली, इस्रायल, कतार, कोलंबिया, ग्रीस, चीन, तैवान, दक्षिण कोरिया, पोलंड, पोर्तुगाल, फ्रान्स, बल्गेरिया, बेलारूस, ब्राझील, मकाव, मेक्सिको, युक्रेन, युनायटेड अरब अमिरात, रशिया, रुमानिया, सिंगापूर, स्पेन, स्विट्झरलंड, स्वीडन, वगैरे.
१ श्रावण
[संपादन]- हिंदू पंचांगानुसार येणाऱ्या श्रावण शुक्ल प्रतिपदेला नेपाळचे आर्थिक वर्ष सुरू होते. हा दिवस ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार साधारणपणे जुलै महिन्याच्या मध्यावर येतो.
भारतातील सहकारी वर्ष
[संपादन]- १ जून हा भारतातील सहकारी संस्थांचा वर्षारंभाचा दिवस असतो.
भारतात राज्यनिहाय वेगवेगळी पंचांगे वापरात आहेत.
महाराष्ट्र, गोवा राज्यातील संपूर्ण प्रदेशांत तर आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, आणि तेलंगण राज्यातील मराठी बहुल प्रदेशांत शालिवाहन शक-कालगणना पाळतात. शक संवत्सर हे चांद्र पंचांग आहे. याचा वर्षारंभ चैत्राच्या पहिल्या दिवशी-गुढी पाडव्याला येतो. ह्याचा वर्षक्रमांक ग्रेगोरियन वर्षातून ७८ किंवा ७९ वजा केले की मिळतो.
गुजरात : गुजराती वर्ष दिवाळीच्या पाडव्यापासून, म्हणजे शक संवत्सराच्या कार्तिक शुद्ध प्रतिपदेला सुरू होते. वर्षक्रमांक विक्रम संवत्सरानुसार असतो. तो ग्रेगोरियन वर्षक्रमांकात ५६ किंवा ५७ किंवा मिळवले की मिळतो. महिन्यांची नावे शक संवत्सराप्रमाणेच असतात.
आसाम, केरळ, तामिळनाडू, पंजाब : वर्षारंभाचा दिवस, नावे अनुक्रमे रोंगाली बिहू, विशु, तमिळ पुतंडू आणि वैशाखी. ही १३/१४/१५ एप्रिलला येते. केरळमध्ये चिंगम (कोलम वर्ष) नावाचे एक मल्याळी पंचांगही वापरात आहे. त्याचा वर्षारंभ १५/१६/१७ ऑगस्टला असतो.
बंगाल : वर्षारंभाचा दिवस 'पहिला वैशाख'. हा दिवस १४/१५ एप्रिलला येतो.
पारशी वर्षारंभाच्या दिवसाला नवरोज म्हणतात. भारतातील लोक हा दिवस १७/१८/१९ ऑगस्टला मानतात. पारशी पंचांग सूर्याधारित आहे. पारश्यांच्यात फसली, कदमी व शहेनशाही अशी तीन कॅलेंडरे प्रचारित आहेत. फसली पद्धतीप्रमाणे ३० दिवसांच्या १२ महिन्यांचे वर्ष होते. शेवटच्या महिन्यानंतर ५ किंवा लीप ईयरच्या वर्षी जादा बिननावाचे दिवस जोडले जातात. फसली वर्षाची सुरुवात वसंतसंपाताच्या दिवशी २३ मार्चला होते. संपात दिवस थोडाथॊडा मागे येत असल्याने तो एक दिवस मागे येईल तेव्हा बहुधा ते एक दिवस गाळतील. वर्षारंभ वसंतसंपाताला घेणे हे शास्त्रशुद्ध आहे. ही पद्धत भारतातील एका विद्वान पारशाने सुचवली व इराणात ती अमलात आली पण भारतातील पारशांनी ती स्वीकारली नाही.
ज्यूंचा वर्षारंभाचा दिवस २१ मार्चला येतो. त्यालाही नवरोज म्हणतात. ज्यू पंचांग सूर्याधारित आहे.
देशोदेशींची कॅलेंंडरे
[संपादन]ब्रिटन : इसवी सन ५९७मध्ये आधीच्या रोमन कॅलेंडराऐवजी इंग्लंडने ज्युलियन कॅलेंडर वापरायला सुरुवात केली. पुढे इसवी सन १७५२मध्ये अमेरिका, इंग्लंड आणि अन्य काही युरोपी देशांनी ग्रेगोरियन कॅलेंडर अंमलात आणले. त्या आधि १५८२ सालीच कॅथाॅलिक देशांनी ग्रेगोरियन दिनदर्शिका स्वीकारली होती.
ज्युलियन पंचांग : हे कॅलेंडर ज्युलियस सीझरने इसपू ४५ या वर्षी आधीच्या रोमन कॅलेंडरात सुधारणा करून सुरू केले. हे पंचांग ख्रिश्चन धर्मातील एका पंथाचे-ईस्टर्न ऑर्थोडाॅक्स चर्चचे अनुयायी अजूनही मानतात.
इस्लामी कॅलेंडर : याची सुरुवात इसवी १६ जुलै सन ६२२ रोजी झाली. हे पूर्णतः चांद्र पंचांग आहे. वर्षारंभाचा दिवस म्हणजे मोहरम महिन्याच्या सुरुवातीचा (शुक्ल पक्षातील) चंद्रदर्शनाचा दिवस. ही बहुधा द्वितीया (बीज) असते. या कॅलेंडरला हिजरी कॅलेंडर म्हणतात. इराणमध्ये या कालगणनेची सौरमानाधारित आवृत्ती वापरात आहे.
पारशी पंचांगे : पारशी पंचांग सूर्याधारित आहे. पारश्यांच्यात फसली, कदमी व शहेनशाही अशी तीन कॅलेंडरे प्रचारित आहेत. फसली पद्धतीप्रमाणे ३० दिवसांच्या १२ महिन्यांचे वर्ष होते. शेवटच्या महिन्यानंतर ५ किंवा लीप ईयरच्या वर्षी जादा बिननावाचे दिवस जोडले जातात. वर्षाची सुरुवात वसंतसंपाताच्या दिवशी २३ मार्चला होते. संपात दिवस थोडाथॊडा मागे येत असल्याने तो एक दिवस मागे येईल तेव्हा बहुधा ते एक दिवस गाळतील. वर्षारंभ वसंतसंपाताला घेणे हे शास्त्रशुद्ध आहे. ही पद्धत भारतातील एका विद्वान पारशाने सुचवली व इराणात ती अमलात आली पण भारतातील पारशांनी ती स्वीकारली नाही.
यहुदी पंचांग (ज्यू पंचांग) : इ.स.पू. ३७६१ साली हे कॅलेंडर सुरू झाले.
चिनी कॅलेंडर : इ.स.पू. २६३७ या वर्षी प्राचीन चिनी कॅलेडरची अंमलबजावणी सुरू झाली.
जपान : जपानने इसवी सन १५८२मध्ये ग्रेगोरियन कॅलेंडर स्वीकारले. त्यापूर्वी किंचित सुधारणा केलेले चिंनी क़लेंड अंमलात होते. या कॅलेंडरचा वर्षारंभाचा दिवस मार्च ते जुलै या महिन्यात होत असे.
शालिवाहन शक : शालिवाहन राजा (ज्याला गौतमीपुत्र शतकर्णी म्हणतात) याने इसवी सन वर्ष ७८मध्ये उज्जैनचा राजा, विक्रमादित्य याला युद्धात हरवले. त्या विजयाच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा शक सुरू केला. भारतातील अनेक प्रांतांत होणारे धार्मिक सण ह्या पंचांगानुसार होतात.
वीर निर्वाण संवत : भगवान वर्धमान महावीरांच्या निर्वाणाच्या दिवशी, म्हणजे इ.स.पू ५२७ सालच्या १५ ऑक्टोबर या तारखेला ही कालगणना सुरू झाली. भारतातील जैन धर्मीय ही अजूनही पाळतात. वर्षारंभाचा दिवस दिवाळीचा पाडवा.
विक्रम संवत : हा गुजरातमध्ये आणि उत्तरी भारतात अंमलात आहे. याची सुरुवात मालवगणांच्या सामूहिक प्रयत्नांनी गर्दभिल्लचा पुत्र विक्रम याच्या नेतृत्वाखाली, त्याकाळी विदेशी समजले जाणाऱ्या शक लोकांच्या पराजयाची स्मृती म्हणून सुरू झाला. संवताची सुरुवात इ.स.पू. ५७ या वर्षी झाली. वर्षारंभाचा दिवस कार्तिक शुक्ल प्रतिपदा-दिवाळीचा पाडवा. वर्षक्रमांक इसवी सनाच्या अंकात ५६ किंवा ५७ मिळवून मिळतो.
नानकशाही कॅलेंडर : इसवी सन २०२० साली ह्या शीख कॅलेंडरचे ५५२वे वर्ष चालू आहे.
खालसा संवत - इसवी सन २०२० साली खालसा संवताचे ३२२वे वर्ष चालू आहे. (शालिवाहन शकाचे १९४२, विक्रम संवताचे २०७६-७७ आणि हिजरी संवताचे १४४२वे वर्ष चालू आहे.) वर्षारंभाचा दिवस १३ एप्रिल. सन १६९९ साली गुरू गोविंद सिंहांनी याच दिवशी खालसा पंथाची स्थापना केली
जलाली कॅलेंडर : हे पर्शियात अंमलात होते. थोड्याफार फरकाने आजही ते इराणमध्ये आणि अफगाणिस्तानात वापरले जाते. हे सोलर हिजरी कॅलेडरच आहे. जलाली कॅलेंडर हे मुळच्या यझ्दगेर्दी कॅलेंडरचे बदलेले रूप. हे १५ मार्च १०९७ रोजी पर्शियाचा तत्कालीन शासक सेलजुक सुलतान जल-अल-दिन याने खगोल शास्त्रज्ञांच्या समितीच्या शिफरशीने सुरू केले. त्या समितीत उमर खय्याम होता. कॅलेंडरचे नाव सुलतानाच्या नावावरून आले.
जगातील चालू/बंद असलेल्या अन्य संवतांचे इसवी सन २०२२ सालचे अनुक्रमांक :
[संपादन]वर्षारंभाचे दिवस वेगवेगळे असल्याने या वर्षानुक्रमांकात एकाचा फरक येऊ शकतो. खाली दिलेल्या संवतांच्या यादीतल्यापेक्षा काही अधिकची नावे संवत्सर या पानावर आहेत.
- आदम संवत : ७३७४
- इजिप्ती संवत : २७६७६
- इब्राहीम संवत : ४४६२
- इराणी संवत : ६०२४
- इसवी सन : २०२२
- कलचुरी संवत : १७८०
- कलियुग संवत : ५१२३
- कल्की संवत : अजून सुरू व्हायचा आहे.
- कल्पाब्द : १९७२९४९१२३ (हिंदू कालगणनाेनुसार)
- चिनी संवत : ९६००२३२० (?)
- जावा सन : १९४८
- तुर्की संवत : ७६२९
- पारशी संवत : १८९९१२५
- पार्थियन संवत : २२६९
- बांगला संवत : १४३३
- बौद्ध संवत २५९७
- ब्रह्मदेशी सन : २५६३
- मलयकेतु शक : २३३४
- महावीर संवत २६१७
- मूसा सन : ३६६१
- यहुदी संवत : ५७८३
- युधिष्ठिर संवत : ५१२३
- युनानी सन : ३५९५
- रोमन सन : २७७३
- वल्लभी संवत १७०२
- विक्रम संवत : २०७९
- वीर निर्वाण संवत : २५४९
- शंकराचार्य संवत : २३०२
- शालिवाहन शक : १९४४
- श्रीकृष्ण संवत : ५२४८
- सप्तर्षी संवत : ५०९८
- सृष्टि संवत : १९५५५८८५१२३ (हिंदू कालगणनेनुसार)
- हर्षाब्द संवत : १४१५
- हिजरी सन : १४४३
हे सुद्धा पहा
[संपादन]- संवत्सर
- जगभरात 'इतकी' नववर्ष संवत्सरे; उद्या चैत्रारंभ! Archived 2020-03-23 at the Wayback Machine. : महाराष्ट्र टाइम्समधील २३ मार्च २०२० च्या अंकातील लेख.