भैरोसिंग शेखावत (ऑक्टोबर २३, १९२३ - मे १५, २०१०) हे भारताचे अकरावे उपराष्ट्रपती होते. त्यांनी ऑगस्ट १९, २००२ रोजी आपल्या पदाचा कार्यभार हाती घेतला. उपराष्ट्रपती होण्याआधी ते भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते होते व दीर्घ काळ त्या पक्षाचे उपाध्यक्ष राहिले. शेखावत भारतीय जनता पक्षाच्या संस्थापक सभासदांपैकी एक होते. सर्वात ज्येष्ठ आणि अनुभवी काँग्रेसेतर नेत्यांत त्यांचा समावेश होता. ते सर्वप्रथम १९५२ मध्ये राजस्थान विधानसभेवर निवडून गेले. त्यांनी १९७७ ते १९८०, १९९० ते १९९२ आणि १९९३ ते १९९८ दरम्यान राजस्थानचे मुख्यमंत्रिपद सांभाळले. शेखावत यांनी २००२ च्या उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव केला. जुलै २००७ मध्ये राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत महाराष्ट्राच्या प्रतिभाताई पाटील यांच्याकडून त्यांना मोठ्या फरकाने पराभव पत्करावा लागला.
त्यांची राजकीय कारकीर्द सुमारे ५ दशकांची होती.वयाच्या ८३व्या वर्षी त्यांनी पॅरीसचा आयफेल टॉवर चढून दाखविला.[ संदर्भ हवा ]